आर्मेनिया-अझरबैजान युद्धाचे भारतासाठीही धडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2020   
Total Views |
armenia-azerbaijan_1 
 
पाकिस्तानसारख्या दिवाळखोर देशाला त्रास देण्याने भारताचे काम भागणार नाही. त्यामुळे या युद्धातून योग्य ते धडे घेऊन भविष्यात काश्मीर भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ होऊ शकणार्‍या ड्रोन हल्ल्यांविरोधी रणनीती तयार असायला हवी.
 
 
 
सारे जग अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये गुंतले असताना, रशिया आणि तुर्कीने परस्परांच्या सहमतीने आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यामध्ये युद्धविराम घडवून आणला आहे. या युद्धविरामामुळे आर्मेनियावर नामुष्कीदायक पराभव पत्करण्याची वेळ आली आहे. या पराभवाची तुलना बांगलादेशनिर्मिती युद्धात पाकिस्तानने पत्करलेल्या शरणागतीशी केली जात आहे. युद्धविराम करारानुसार, या युद्धात अझरबैजानने ताब्यात घेतलेल्या प्रदेशांवर आर्मेनियाने पाणी सोडले असून, स्वतःच्या ताब्यात राहिलेल्या प्रदेशातही माघार घेऊन तिथे रशियन शांतीसैन्य तैनात करण्याचे मान्य केले आहे. या पराभवामुळे आर्मेनियात संतापाची लाट उसळली असून पंतप्रधान निकोल पशियान यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी चिन्ह आहेत. हे युद्ध छोटेखानी असले तरी ड्रोन आणि उच्च तंत्रज्ञान, स्वतःच्या सैनिकांचे रक्त न सांडता, शत्रूची कशी दाणादाण उडवता येते, याचे उत्तम उदाहरण आहे.
 
 
 
सुमारे १०० वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात ओटोमन तुर्कीने आपल्या साम्राज्याचा भाग असलेल्या आर्मेनियन लोकांचा प्रचंड प्रमाणात नरसंहार घडवून आणला, ज्याला ‘आर्मेनियन जेनोसाईड’ म्हटले जाते. या युद्धातही अझरबैजानच्या विजयामध्ये तुर्कीचा सिंहाचा वाटा आहे. आर्मेनिया हा जगाच्या पाठीवर ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्‍या पहिल्या प्रदेशांपैकी एक. असे असले तरी आर्मेनियन लोकांनी आपल्या धर्ममतांचा प्रसार पैसा किंवा तलवारीद्वारे केला नाही. मुळात खुष्कीच्या मार्गावरील व्यापारी असलेल्या आर्मेनियन लोकांचे मुघल काळापासून भारताशी घनिष्ठ संबंध असून, तेव्हापासून त्यांच्यातील काही, भारतात स्थायिक झाले. उत्तरेला रशिया आणि दक्षिणेला तुर्कीचे ओटोमन साम्राज्याच्या बेचक्यात असलेल्या कॉकेशस पर्वतराजींचा हा प्रदेश. विसाव्या शतकात, पहिल्या महायुद्धानंतर आर्मेनिया ओटोमन साम्राज्यातून सोव्हिएत रशियाच्या ताब्यात गेला. अझरबैजानशी असलेले त्याचे वैर तेव्हापासूनचे.
 
 
शीतयुद्धाची समाप्ती होत असताना आर्मेनिया आणि अझरबैजान हे दोन स्वतंत्र देश झाले. त्यांच्यात सहा वर्षं चाललेल्या युद्धाला १९९४  साली विराम मिळाला, पण त्यात आर्मेनियाने देशप्रेम, कवायती सैन्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आकार आणि लोकसंख्येच्या बाबतीत मोठ्या असलेल्या अझरबैजानच्या नागोर्नो-काराबाख या मोठ्या भागाचा लचका तोडला होता. ‘रिपब्लिक ऑफ आर्टझाख’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश जागतिक समुदायाच्या दृष्टीने अझरबैजानचा भाग असला, तरी गेली 25 वर्षं आर्मेनियाच्या ताब्यात होता. त्याच्या अवतीभवतीच्या अझरबैजानी प्रदेशातही आर्मेनियाचे सैन्य तैनात होते. या भागात आर्मेनियन वंशाच्या लोकांचे बाहुल्य असल्याने आर्मेनियाचा त्यावर दावा होता. आर्मेनियात लोकशाही आहे, तर अझरबैजानमध्ये भ्रष्टाचाराने बरबटलेली घराणेशाही. आर्मेनियाला समुद्र किनारा नाही. तुर्कीबाबत कटू आठवणी असल्याने बाहेरच्या जगाशी संबंध साधायला केवळ रशिया आणि इराण हे दोनच पर्याय. दोन्ही देशांवर या ना त्या कारणाने आंतरराष्ट्रीय निर्बंध असल्याने आर्मेनिया गरीब आणि अविकसित राहिला.
 
 
दुसरीकडे कॅस्पियन समुद्राच्या किनार्‍यावर अझरबैजानमध्ये प्रचंड प्रमाणात खनिज तेल आणि नैसर्गिक वायुचे साठे सापडले. युक्रेनला वळसा घालून रशियन गॅस युरोपला न्यायचा, तर अझरबैजानचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हे दोन्ही देश रशियाच्या प्रभावाखाली येत असले आणि दोघांशीही त्याचे सुरक्षा करार असले तरी अझरबैजानचे महत्त्व अधिक आहे. अरब देशांचे इस्रायलशी वैर असल्याच्या काळापासून अझरबैजान तुर्कीद्वारे इस्रायलला खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पुरवतो आणि त्याबदल्यात इस्रायलकडून ड्रोन आणि अन्य शस्त्रास्त्र घेतो. अझरबैजानला तुर्कीही खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतो. तुर्कीश भाषा बोलणारे अझेरी लोक इराण, अझरबैजान आणि तुर्कीमध्ये आढळतात. याउलट आर्मेनियाची परिस्थिती आहे.
 
 
 
ना देशाची जागा मोक्याची, ना कोणती साधनसंपत्ती. नाही म्हणायला आर्मेनियन लोक मोठ्या संख्येने अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्थायिक झाले असल्याने, या देशांना त्याच्याबद्दल सहानुभूती आहे. आपल्या स्वातंत्र्यापासून आर्मेनिया जम्मू आणि काश्मीर, तसेच अन्य विषयांवर पाठिंबा देत असल्याने भारतातही आर्मेनियाबद्दल सहानुभूती आहे. पण, केवळ सहानुभूती किंवा माणसांच्या पराक्रमावर युद्ध जिंकता येत नाहीत. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात पारंपरिक युद्ध झाले असते, तर आकार आणि लोकसंख्येने लहान असूनही आर्मेनियाने अझरबैजानला धूळ चारली असती. पण, गेल्या दोन दशकांत रशियाशिवाय तुर्की आणि इस्रायलकडून अझरबैजानने अत्याधुनिक ड्रोन आणि रडार मिळवले होते.
 
 
कोविड संकटाचा फायदा घेऊन हे युद्ध सुरु करण्यास अझरबैजानला तुर्कीनेच प्रोत्साहन दिले. त्यातून अझरबैजानला आपला गमावलेला प्रदेश मिळणार होता, तर तुर्कीला एका ‘मुस्लीम विरुद्ध बिगर मुस्लीम’ संघर्षात सहभागी होऊन मुस्लीम देशाला मदत केल्याचे समाधान. यातूनच ‘मध्यवर्ती मुस्लीम साम्राज्य’ अशी आपली प्रतिमा रंगवण्यासाठी तुर्कीला मदत मिळणार होती. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला रसिप तैय्यप एर्दोगान तुर्कीचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी युरोपीय महासंघात प्रवेश नाकारल्या गेलेल्या तुर्कीला वेगळी दिशा दिली. सुमारे पाच शतकं पश्चिम आशिया, पूर्व युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील मोठ्या भूभागावर पसरलेले ओटोमन साम्राज्य आधुनिक स्वरुपात परत आणण्याचा चंग बांधला. यासाठी तुर्कीला पाकिस्तान आणि मलेशियाची साथ मिळाली. इराक, सीरिया, काश्मीरपासून लिबियापर्यंत सर्वत्र मुस्लीम प्रश्नांत नाक खुपसायला तुर्कीने सुरुवात केली.
 
 
‘नाटो’चा सदस्य असल्यामुळे तुर्कीची सैन्यदलं अत्याधुनिक असली तरी परदेशांतील युद्ध लढण्याएवढी तुर्कीची अर्थव्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे तुर्कीला मर्यादित यश मिळाले होते. नागोर्नो-कारबाख या सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या प्रदेशासाठी चाललेल्या युद्धात ढवळाढवळ करणे तुर्कीच्या सोयीचे होते. हा प्रदेश रशियाच्या प्रभावक्षेत्रात असला तरी अझरबैजानमधील तेल आणि वायूच्या स्रोतांमुळे आर्मेनियाकडे झुकणे रशियासाठी अशक्य होते. अरब देश, अमेरिका आणि फ्रान्सला या प्रदेशाच्या राजकारणात थेट हात घालण्यास सवड नव्हती. या परिस्थितीचा फायदा घेऊन तुर्कीने अझरबैजानला गेलेला प्रदेश परत मिळवण्याचे स्वप्न दाखवले.
 
 
अत्याधुनिक ड्रोन आणि अन्य उच्च तंत्रज्ञान पुरवले. सीरिया आणि पाकिस्तानातून या भागात लढण्यासाठी भाडोत्री सैनिक सहभागी झाले होते. पर्वतमय प्रदेशात दबा धरुन बसून आक्रमण करत येणार्‍या शत्रूला धडा शिकवायला आर्मेनिया सज्ज होती, पण आकाशातून अदृश्य स्वरुपात येऊन हल्ले करणार्‍या ड्रोनवर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. तुर्कीने अमेरिकेकडून मिळालेली विमानं अझरबैजानमध्ये तैनात केल्यामुळे मुख्यतः रशियन विमानं आणि शस्त्रास्त्रांनिशी लढणार्‍या आर्मेनियाचे काही चालेना. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीने हा प्रदेश अझरबैजानचा असल्याने रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेचेही हात बांधले गेले होते. अझरबैजानकडून झालेल्या ड्रोन हल्यात आर्मेनियाचे खंदकात दबा धरुन बसलेले सैनिक, रणगाडे, तोफखाना आणि रडार सहजपणे टिपले गेले. हा हल्ला एवढा तीव्र होता की, आर्मेनियाला शरणागती पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. या धक्क्यातून सावरायला आर्मेनियाला बराच काळ जाणार आहे.
 
 
या युद्धामुळे मर्यादित युद्धांचे परिमाण बदलले आहे. ड्रोन तंत्रज्ञान हे तुलनेने कमी खर्चिक आणि अधिक अचूक असल्याने दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानसारखी उपद्व्यापी राष्ट्रं ते वापरु शकतात. तुर्की आणि पाकिस्तान यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अर्थात, भारताची तुलना आर्मेनियाशी होऊ शकत नाही. भारताकडेही अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांकडून अत्याधुनिक ड्रोन असून विविध प्रकारच्या ड्रोनच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या अंतर्गत अनेक जागतिक कंपन्या भारतात नागरी तसेच लष्करी वापराचे ड्रोन बनवण्याचे प्रकल्प उघडत आहेत. असे असले तरी पाकिस्तानचा उद्देश भारताला त्रास देणे हा आहे. पाकिस्तानसारख्या दिवाळखोर देशाला त्रास देण्याने भारताचे काम भागणार नाही. त्यामुळे या युद्धातून योग्य ते धडे घेऊन भविष्यात काश्मीर भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ होऊ शकणार्‍या ड्रोन हल्ल्यांविरोधी रणनीती तयार असायला हवी.



@@AUTHORINFO_V1@@