‘सर्वदा शक्तिशाली...’ : द. सुदानमध्ये शांतता राखण्यास भारतीय सैन्य सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2020   
Total Views |

troops_1  H x W

जगात अगदी नेहमीच विविध ठिकाणी संघर्षाचे वातावरण असते. त्यामुळे जगातील त्या त्या भागामध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि शांततेचे वातावरण पुढेही कायम राखणे, यासाठी ‘संयुक्त राष्ट्र संघटना’ प्रयत्नशील असते. त्यासाठी संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावित असते. त्यातही भारतीय सैन्याचे संयुक्त राष्ट्र शांतीसेनेमध्ये असलेले योगदान हे अनन्यसाधारण आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी शांतता प्रस्थापित करणे आणि ती कायम राखणे याद्वारे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय संस्कृतीचे अगदी यथार्थ उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र संघटनादेखील भारतीय सैन्यावर अगदी प्रगाढ विश्वास नेहमीच व्यक्त करीत असते.



आफ्रिकेतला दक्षिण सुदान हा देश नेहमीच संघर्षांत होरपळत असतो. देशातील दोन आदिवासी जमातींमधला संघर्ष एवढा टोकाला गेला की, त्यांनी थेट एकमेकांविरोधात युद्धच पुकारले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर होतो. या गृहयुद्धामुळे द. सुदान नेहमीच अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेला देश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांनी दोन्ही गटांमध्ये शस्त्रसंधी होतेदेखील; मात्र पुन्हा कधी संघर्ष उफाळून येईल, हे सांगता येत नाही. त्यासाठी शस्त्रसंधीच्या काळामध्ये देशात शांतता कायम राखण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे तेथे ‘शांतीसेना’ पाठविण्यात आली आहे. शांतीसेनेचे मुख्य काम म्हणजे तेथील स्थानिक प्रशासनास सर्व प्रकारचे साहाय्य करून शांतता कायम राखणे आणि दोन्ही गटांमधील संघर्ष कसा संपुष्टात येईल, यासाठी प्रयत्न करणे. या शांतीसेनेमध्ये जगातील अनेक देश आपल्या सैन्याच्या काही तुकड्या पाठवित असतात. या तुकड्यांचे मुख्य काम म्हणजे तेथील स्थानिक राजकारण, समाजकारण आणि संघर्ष यामध्ये तटस्थ राहून सर्वसामान्य नागरिकांच्या हितांचे रक्षण करणे. आता त्यामध्ये बर्‍याचदा शांतीसेनेवरही हल्ले केले जातात, त्यांना लक्ष्य केले जाते. मात्र, तरीदेखील शांतीसेना आपले कार्य अगदी चोखपणे बजावित असते.
आता येत्या काही दिवसांमध्येच द. सुदानमध्ये शांतीसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्याची ‘१५, ग्रेनेडिअर इन्फ्रन्ट्री बटालियन’ तेथे रवाना होणार आहे. त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण दिल्ली येथे सुरू आहे, साधारणपणे ५,५०० जणांची तुकडी तेथे जाणार असून, त्यापैकी ५,२०० जवान असून, उर्वरित ३०० जणांचा ‘सपोर्ट स्टाफ’ असणार आहे. अतिशय खडतर अशा शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणानंतरच आपले जवान द. सुदानमध्ये कामगिरीवर रवाना होणार आहेत. ते सविस्तरपणे समजून घेण्यासाठी शुक्रवारी सकाळीच दिल्लीतल्या प्रशिक्षण तळावर जाण्याची संधी मिळाली. थंडीमुळे सकाळी सकाळी तसे आळसावलेले वातावरणच दिल्लीमध्ये असते. मात्र, प्रशिक्षण तळावर याच्या अगदी उलट असे उत्साहाने भारलेले वातावरण होते. तळावर प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम कानावर पडला तो ‘भारतमाता की जय - सर्वदा शक्तिशाली’ हा घोष. भारतीय सैन्याच्या ‘15, ग्रेनेडिअर इन्फ्रन्ट्री बटालियन’चा हा युद्धघोष. तर हा युद्धघोष कानावर पडला आणि थंडी, आळस हे सर्व काही अगदी क्षणार्धात गायब झाले आणि पत्रकारांचा चमूही अगदी उत्साही झाला. त्यानंतर मग रवाना होणार्‍या भारतीय तुकडीचे नेतृत्व करणारे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. ज्योथिश यांनी संपूर्ण प्रशिक्षण आणि द. सुदानमध्ये भारतीय सैन्य नेमकी कशी भूमिका बजाविणार आहे, त्याची अगदी सविस्तर माहिती दिली. सोबतच प्रशिक्षण नेमके कसे चालते, त्याची प्रात्यक्षिकेही दाखवित भारतीय सैन्याच्या क्षमता अधोरेखित केल्या.
तुकडी आपल्या कामगिरीवर रवाना होण्यापूर्वी विशेष असे सैनिक संमेलन आयोजित केले जाते, अशी माहिती कर्नल ज्योथिश यांनी दिली. सैनिक संमेलनाची परंपरा तशी अगदी प्राचीन. म्हणजे प्राचीन काळी युद्धावर जाण्यापूर्वी आपल्या सैनिकांसोबत संवाद साधण्याची परंपरा होती, त्यामध्ये राजा आणि सेनापती भाग घेत असत. तीच परंपरा आजही सुरू आहे आणि ती अतिशय महत्त्वाचीदेखील आहे. यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ अधिकारी मोहिमेवर जाणार्‍या जवानांशी संवाद साधतात, त्यामध्ये प्रामुख्याने जवानांचे मनोबल वाढविणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेमध्ये सहभागी असला तरीही ‘तुम्ही तेथे तुमच्या देशाचे राजदूत म्हणूनच जात आहात,’ हे त्यांना सांगितले जाते. द. सुदानमध्ये जाणार्‍या सैनिकांसोबत संवाद साधण्यासाठी मेजर जनरल एम. के. कटियार (डायरेक्टर जनरल - स्टाफ ड्युटीज) सकाळी सकाळीच आले होते. त्यांनी आपल्या खास शैलीत संवाद साधला, “तुमची बटालियन ही आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. तुम्ही अगदी काही दिवसांपूर्वीच सिक्कीममध्ये चीन सीमेवर तैनात होतात, तेथे तुमची कामगिरी ही अतिशय महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे, तुमच्या बटालियनला गेल्या अनेक दशकांपासूनचा देदीप्यमान आणि शौर्यपूर्ण वारसा लाभला आहे आणि म्हणूनच आता द. सुदानमध्येही तुम्हाला तुमच्या बटालियनच्या लौकिकास साजेशीच कामगिरी करायची आहे आणि त्यात तुम्ही यशस्वी होणार, याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही!”



trrops_1  H x W
मेजर जनरल कटियार यांच्या या संबोधनानंतर प्रत्यक्षात सैन्य प्रशिक्षण दाखविण्यात आले. यामध्ये ‘स्लिथरिंग’ (उंचावरून दोरीच्या साहाय्याने खाली उतरणे), ‘सँड मॉडेल मेकॅनिझम’ म्हणजे प्रत्यक्ष संघर्षक्षेत्रामध्ये जाण्यापूर्वी संपूर्ण क्षेत्राचे एक मॉडेल वाळूच्या साहाय्याने तयार केले जाते. त्याद्वारे जवानांची तुकडी संपूर्ण स्थिती समजून घेते आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचे, अथवा घेता येईल, यावर चर्चा केली जाते. त्यानंतर सर्वांत महत्त्वाचे होते ते शांतीसेना काम कशी करते, त्यासाठी प्रशिक्षण तळावर शांतीसेनेची छावणी तयार करण्यात आली होती आणि त्याद्वारे द. सुदानमधील संघर्ष करणार्‍या दोन्ही गटांसोबत नेमकी कशी वागणूक दिली जाते, ते अगदी सविस्तरपणे सांगण्यात आले. शांतीसेनेच्या तळावर हल्ला झाल्यास सैनिक प्रथम अनेकदा ताकीद देतात आणि तळापासून दूर जाण्याचे आदेश देतात. त्यानंतरही हल्लेखोरांनी ऐकले नाही, तर प्रथम अश्रुधुराचे नळकांडे वापरण्यात येते, त्यानंतर हवेत गोळीबार केला जातो. मात्र, तरीदेखील हल्लेखोर परत न गेल्यास अगदी अखेरचा पर्याय म्हणून थेट हल्लेखोरांच्या दिशेने गोळीबार केला जातो; अर्थात हल्लेखोरांवर गोळीबार करण्याची वेळ फारशी येत नाही, असे कर्नल ज्योथिश यांनी स्पष्ट केले. कारण, शांतीसेनेचे मुख्य कार्य हे शांतता कायम राखण्याचे असते. त्यामुळे तेथे शांतीसेनेच्या तुकड्यांना तटस्थपणे कार्यरत राहणेच गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


शांतता कायम राखणे हेच आमचे ध्येय : कर्नल डी. ज्योथिश


द. सुदानला जाणार्‍या भारतीय सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करणारे कर्नल डी. ज्योथिश यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. ती म्हणजे संयुक्त राष्ट्र शांतीसेना ही सुरक्षा परिषदेच्या अखत्यारित काम करते आणि त्यांनी त्यासाठी काही तत्त्वे आखून दिली आहेत, त्यामुळे त्यांचे पालन करणे हे अत्यावश्यक असते. त्यासाठी भारतीय सैन्याला विशेष प्रशिक्षण दिले जाते. कारण, भारतीय सैन्य हे प्रामुख्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी), दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये काम करते आणि त्यांना तसेच प्रशिक्षण मिळालेले असते. मात्र, आता द. सुदानमध्ये शांतीसेनेला तेथे शस्त्रसंधी, युद्धबंदीची स्थिती कायम राखायची आहे. त्यामुळे त्यासाठी भारतीय जवानांना तशा प्रकारचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. कारण, द. सुदानमध्ये गेल्यावर आमची भूमिका पूर्णपणे बदलणार आहे, आम्हाला तेथे शांतीदूत म्हणून काम करायचे आहे; म्हणजेच भारतात आम्ही ज्या मोहिमा पार पाडतो, त्याच्यापेक्षा वेगळी स्थिती तेथे असणार आहे. त्यासाठी भारतीय सैन्यानेही प्रशिक्षणाची विशेष तंत्रे निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. शांतीसेनेसाठी जाणार्‍या जवानांची निवडही अगदी काटेकोरपणे केली जाते. त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या मजबूत असलेल्यांची निवड होते. त्यांना संघर्षग्रस्त भागातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींची पूर्णपणे माहिती दिली जाते, त्यामुळे त्यांनाही मोहिमेविषयी स्पष्टता येते.
संपूर्ण जगात भारतीय सैन्य हे आपल्या कौशल्यांसाठी ओळखले जात असल्याचे कर्नल ज्योथिश यांना नमूद केले. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेमध्ये भारताचे स्थान अनन्यसाधारण आहे. “आजवर जेथे जेथे भारतीय सैन्य शांतीसेनेमध्ये कार्यरत होते, त्या सर्व मोहिमांमध्ये भारतीय सैन्याने अतिशय ‘प्रोफेशनली’ काम केले आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेसही भारतीय सैन्याच्या क्षमता नेमक्या ठावूक आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भारतीय सैन्य हे कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह ठेवून कधीही काम करीत नाही, त्यामुळेच जगातील अनेक संघर्षभूमींमध्ये भारतीय सैन्याविषयी स्थानिक जनतेच्या मनातही मोठा आदर असतो. त्याचा अनुभवही आम्ही वेळोवेळी घेत असतो. भारतीय सैन्याने आजवर अनेक मोहिमांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यामुळे द. सुदानमध्येही आम्ही यश संपादन करूच,” असा विश्वासही कर्नल ज्योथिश यांनी व्यक्त केला.


शांतीसेनेमध्ये भारताचे गेल्या ७० वर्षांपासूनचे योगदान


संयुक्त राष्ट्र शांतीसेनेच्या मोहिमांना १९४८ सुरुवात झाली आणि तेव्हापासून भारतीय सैन्य त्यामध्ये आपले योगदान देत आहे. आतापर्यंत शांतीसेनेच्या ७१ पैकी तब्बल ५१ मोहिमांमध्ये भारतीय सैन्य सहभागी झाले आहे. त्यामध्ये काँगो, लेबेनॉन आणि सुदान या प्रदेशांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक जनतेचे हित साधणे आणि त्यांची काळजी घेणे, हे भारतीय तुकड्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच स्थानिक प्रशासनाकडूनही भारतीय सैन्याचे विशेष कौतुक केले जाते.


कोरोना चाचणीनंतरच जवान होणार रवाना


द. सुदानमध्ये जाणार्‍या सर्व भारतीय सैनिकांची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये नकारात्मक अहवाल आल्यानंतरच सर्व सैनिकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष संघर्षक्षेत्रातही वेळोवेळी कोरोना संसर्गाची चाचणी केली जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यास जवानांना नियमाप्रमाणे विलगीकरणात ठेवले जाणार असून, त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही संयुक्त राष्ट्रातर्फे केली जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@