'We the People' (लोकशक्तीचा)चा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2020   
Total Views |

Modi biden _1   
 



अमेरिकेची निवडणूक असो की बिहारची निवडणूक असो, या निवडणुकांत जिंकणारे पक्ष आणि गठबंधन यांची नावे वेगवेगळी असली तरी हा विजय 'We the People' चा आहे.
 
 
 
साधारणत: एकाच वेळेला दोन निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जो बायडन जिंकले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाले आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत वातावरण होतेच. ते अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. अमेरिकेची निवडणूक अमेरिकेच्या देशापुरती मर्यादित नसते, जागतिक राजकारणावर निवडणूक निकालाचे परिणाम ठरत असतात.
 
 
ट्रम्प यांचा पराभव झाल्यामुळे पाकिस्तानला आनंद झाला. कारण, ट्रम्प पाकिस्तानधार्जिणे नव्हते. बायडन पाकिस्तानधार्जिणे आहेत, असेही नाही. अमेरिकेचे परराष्ट्रीय धोरण व्यक्तिनिष्ठ नसते, ते देशनिष्ठ असते. देशाच्या दृष्टीने पाकिस्तानला जवळ करणे आवश्यक झाले, तर बायडन त्यांना जवळ करतील, आवश्यकता नसेल तर दूर राहतील आणि पाकिस्तानने नको त्या भानगडी केल्या, तर पाकिस्तानला धडा शिकवतील.
 
 
याचवेळी भारतातील बिहार राज्याच्या निवडणुका झाल्या. बिहारच्या निवडणुका जगाच्या दृष्टीने तशा महत्त्वाच्या नाहीत. भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या होत्या असेही नाही. प्रत्येक राज्याची निवडणूक होते, तशी बिहारची निवडणूक झाली. आपल्या वृत्तवाहिन्या मोठ्या आवाजात, भडक शब्दांत प्रत्येक बातमी सांगत राहतात. त्यांना असे वाटते की, अशा प्रकारे बातम्या सांगितल्या की त्या खूप मोठ्या होतात, तसे काही घडत नसते.
 
 
बिहारच्या निवडणुकीचे महत्त्व याच्यासाठी होते की, कोरोना संकटाच्या काळात ही निवडणूक झाली. कोरोना संकटाने स्थलांतरित मजूर, बेरोजगारी, शिक्षण, असे असंख्य प्रश्न निर्माण केले. शासनाने त्यावर उपाययोजना करण्यासाठी काही पावले उचलली. लोकांचे मत काय आहे, हे या निवडणुकीने पुढे आले, हे महत्त्वाचे आहे.
 
 
बिहारमधील जनतेने भाजप आघाडीला निवडून दिलेले आहे. भाजप आघाडीला विजय का मिळाला आणि तेजस्वी यांची राजद पिछाडीवर का गेली, याबद्दल सतत विश्लेषण चालू आहे. मोदींची लाट संपलेली नाही. तेजस्वी यादव यांचे विषय आणि सभांची गर्दी पुरेशा मतांत परावर्तित झाली नाही. धार्मिक मुद्दा पुढे आणण्यात आला. नितीश यांचे राजकीय वजन कमी झाले आहे, वगैरे प्रकारे विश्लेषण चालू आहे.
 
 
 
बिहारच्या निवडणूक निकालाने केंद्रातील मोदी शासनाला नैतिक बळ प्राप्त करून दिले आहे. जरी ही निवडणूक बिहारची असली तरी कोरोना काळातील केंद्र शासनाच्या धोरणावरदेखील जनमताचा कौल व्यक्त झालेला आहे. तो भाजपला अनुकूल आहे. बिहारमधील निवडणुकीत भाजपच्या जागाही वाढल्या आहेत, ही शुभचिन्हे आहेत. राम मंदिर होईल, आता राष्ट्र मंदिराच्या दिशेने जायचे आहे, त्याचे हे शुभसंकेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याही दृष्टीने बिहारचा विजय त्यांची राजकीय उंची खूप वाढविणारा आहे. ते महाराष्ट्राचे राजकीय नेते आहेतच, आता त्यांचा दर्जा राष्ट्रीय नेत्याचा झालेला आहे.
 
 
अमेरिकेची निवडणूक असो की बिहारची निवडणूक असो, या निवडणुकांत जिंकणारे पक्ष आणि गठबंधन यांची नावे वेगवेगळी असली तरी हा विजय 'We the People' चा आहे. अमेरिकेच्या संविधानाचे पहिले शब्द आहेत, 'We The People of India' आणि भारतीय संविधानातील उद्देशिकेचे शब्द आहेत. 'We The People of India' यातील 'We the People' हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रजासत्ताकात सत्तेवर कुणी बसायचे हे We the People' म्हणजे आम्ही लोक ठरवत असतो. अमेरिकेत हा निर्णय अमेरिकन लोक करतात आणि बिहारमध्ये हा निर्णय बिहारी जनतेने केला आहे. यासाठी निवडणुकांचा विजय हा 'We the People' चा विजय आहे.
 
 
’थश ींहश झशेश्रिश’ ही संकल्पना संविधानाने निर्माण केलेली आहे. त्याचा अर्थ फार खोलवरचा आहे. आम्ही आमचे मालक आहोत आणि आमच्यावर शासन कुणी करायचे, हे आम्ही ठरविणार. हा ठरविण्याचा अधिकार कुठल्याही एका व्यक्तीला नाही तसेच कुठल्याही राजकीय पक्षाला नाही. निवडणुकीच्या काळात राजनेते आणि पक्ष लोकांना भुलविण्यासाठी अनेक योजना जाहीर करतात. तेजस्वी यादव म्हणाले की, “मी दहा लाख रोजगार देईन.” आता लोक त्याला भूलत नाहीत. सुशासन कोण देऊ शकेल, स्थिर शासन कोण देऊ शकेल, त्यांना ते मतदान करतात. हा लोकशक्तीचा विजय आहे.
 
 
 
लोकांकडे सर्व शक्ती देण्याची प्रक्रिया मानवी समाजामध्ये हळूहळू विकसित झाली आहे, याला ‘लोकशाही’ म्हणतात. समाज चालविण्यासाठी शासन लागते. शासनविहिन समाज जगात कुठेही अस्तित्त्वात नाही. शासनाकडे अमर्याद शक्ती असते. तिला ‘राजलक्ष्मी’ म्हणतात. ती प्राप्त करण्यासाठी पूर्वी भयानक लढाया होत. भाऊच भावांना ठार करीत. एवढेच काय, पत्नीदेखील राजाला ठार करून सर्वसत्ताधीश होई. इंग्लड, युरोपचा इतिहास अशा प्रकारे आहे.
 
 
 
असे रक्तपाताचे संघर्ष न करता, चांगली शासनपद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न ब्रिटनने प्रथम केला. याबाबतीत ब्रिटनचा इतिहास खूप शिकण्यासारखा आहे. ब्रिटनमध्येदेखील राजगादी प्राप्त करण्यासाठी निरंतर युद्धे चालत. असेच एक भयानक युद्ध ‘वॉर ऑफ रोझेस्’ हे युद्ध १४५५ ते १४८७ या काळात इंग्लडमध्ये झाले. राज्याचे वारस असणार्या मुलांमध्ये हे युद्ध झाले. एका गटाची निशाणी लाल गुलाब होती आणि दुसर्या गटाची निशाणी सफेद गुलाब होती.
 
 
 
या ३० वर्षांत राजघराण्यातील आणि सरदार घराण्यातील जवळजवळ ८० जण ठार झाले. राजगादी कधी एका भावाकडे येई, मग त्याचा पराभव होई आणि त्यानंतर दुसरा भाऊ गादीवर बसे असा खो-खो चा खेळ चालत राही. इंग्लडच्या इतिहासातील हे सर्वात वाईट युद्ध म्हटले गेले, त्याला ‘वॉर ऑफ बास्टर्ड’ असेही म्हटले गेले. सत्ता प्राप्त करण्यासाठी सर्व मानवी भावना पायदळी तुडविल्या गेल्या, क्रूरतेची सीमा गाठली गेली आणि नाहक रक्ताचे पाट वाहविले गेले. अशा युद्धातून ब्रिटनच्या राजकर्त्या वर्गाने शहाणपण शिकले आणि पुढच्या काही २००-३०० वर्षांत राज्याचा प्रमुख कोण असेल, याची कायदेशीर व्यवस्था निर्माण केली. पार्लमेंट सशक्त केले आणि राजा, सरदार आणि सामान्य जनता अशा तिघांचे मिळून शासन विकसित केले. ही ब्रिटनची लोकशाही आहे.
 
 
 
भारतात आपण तिचा अंगीकार केलेला आहे. सत्ता प्राप्त करणारा समाजात वर्ग राहणार, त्याच्या महत्त्वाकांक्षेला वाट करून देण्यासाठी राजकीय पक्ष निर्माण केले गेले आणि सत्तेच्या सर्व चाव्या जनतेच्या हातात देण्यात आल्या. जनतेला जबाबदार असलेले सरकार ही शासनपद्धती आपल्या राज्यघटनेने स्वीकारली. गेल्या ७० वर्षांत आपण तिचा अंगीकार केला आहे आणि तिच्या कायद्याचे पालन करण्याची एक सवय लावून घेतली आहे. यामुळे आपल्याकडे सत्तांतरे होतात, पण त्यात रक्तपात होत नाही. म्हणून अशा निवडणुका आणि त्यातून होणारे सत्तांतर हा 'We The People'चा विजय असतो.
 
 
 
जर लोकशाहीची पद्धती विकसित झाली नसती, तर आजही सत्ता प्राप्त करण्यासाठी रक्तपात घडले असते. जेथे लोकशाही नाही तेथे सत्ताप्राप्तीसाठी रक्तपात होतातच. आफ्रिकेतील बहुतके सर्व देशांत हुकूमशाही आहे. मध्यपूर्वेतील बहुतेक देशांत या ना त्या प्रकारे हुकूमशाहीच आहे. जगातील सर्वाधिक रक्तपात या देशांतच होत असतात. सत्तासंघर्षात ज्यांचा काही संबंध नाही, अशी समान्य माणसे या संघर्षात बळी पडतात. अनेकांना देश सोडून जावे लागते. सीरियातील जवळजवळ दहा लाख लोक निर्वासित बनून युरोपमध्ये गेले आहेत. ज्या ठिकाणी लोकशाही राज्यघटना आहे, तेथे असे काही घडत नाही.
 
 
 
बिहारची निवडणूक जरी भाजप आणि मित्रपक्षांनी जिंकलेली असली आणि काँग्रेससहित छोटे-मोठे पक्ष अयशस्वी झाले असले, तरी हा विजय लोकशक्तीचा विजय आहे. शांततामय मार्गाने झालेला मतांचा कौल आहे. ही आपली फार मोठी शक्ती आहे. संविधानाची मूल्ये आपण जगायला शिकतो आहोत, हा त्याचा आश्वासक अर्थ आहे.
 



@@AUTHORINFO_V1@@