बंगालमध्ये ‘अंधेरा छटेगा, कमल खिलेगा’- तेजस्वी सूर्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020   
Total Views |

Tejasavi_1  H x

बंगालमध्ये
‘अंधेरा छटेगा, कमल खिलेगा’- तेजस्वी सूर्या


नवी दिल्ली, पार्थ कपोले : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारने फॅसिस्टशाही सुरू केली आहे. भ्रष्टाचार आणि अराजकतेचा अतिरेक झाला असून ममता सरकारचा कडेलोट करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये ‘अंधेरा छटेगा, कमल खिलेगा’ या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वचनाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी ‘दैनिक मुंबई भारत’सोबत साधलेल्या विशेष संवादादरम्यान व्यक्त केला.

 

भाजपा आणि भाजपा युवा मोर्चातर्फे प. बंगालमध्ये होणाऱ्या राजकीय हत्या, अराजकता आणि भ्रष्टाचारा विरोधात हावडा येथे शांततामय मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये जवळपास लाखभर कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, पोलिसांनी या शांततापूर्ण मोर्चावर लाठीहल्ला केला, सुमारे १० क्रूड बाँब आणि अश्रुधुराचे नळकांडे आमच्या दिशेने फेकले. त्याचप्रमाणे रसायनयुक्त पाण्याचाही मारा करण्यात आला. त्यामुळे अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले, अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि काहींना तर रक्ताच्या उलट्याही झाल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशावरून भारतीय राज्यघटना आणि लोकशाही यांची पायमल्ली करण्यात आली. भाजपाला मिळणारा प्रतिसाद पाहून ममता बॅनर्जी पूर्णपणे हादरल्या आहेत, तेजस्वी सूर्या यांनी सांगितले.

 

ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस सरकार हे देशातील सर्वाधिक भ्रष्ट प्रशासनाचा नमुना असल्याचा आरोप तेजस्वी सूर्या यांनी केला. ते पुढे म्हणाले, केवळ आपला आर्थिक स्वार्थ आणि लागेबांधे जपण्यासाठी सिंडिकेटद्वारे प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केला जातो. राज्यातील वाढती बेरोजगारी दूर करण्यासाठी ममता बॅनर्जी काहीही प्रयत्न करीत नाहीत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थादेखील रसातळाला गेली असून पोलिसप्रशासन हे ममता दिदी आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या हातातील बाहुले असल्याचीही टिका तेजस्वी सूर्या यांनी ‘दैनिक मुंबई भारत’शी बोलताना केली.

 

पुढील वर्षी फॅसिस्टशाही उलथून पाडू

ममता बॅनर्जी यांच्या फॅसिस्टशाहीकडे बंगाली जनतेचे लक्ष आहे, त्यांना आता या दहशतीच्या वातावरणातून मुक्ती हवी आहे. भाजपाकडे ते विश्वासाने पाहत असून पुढील वर्षी होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीत हे फॅसिस्ट सरकार उलथून पाडले जाईल. भाजपाची स्थापना करताना अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा. बंगालमध्ये २०२१ साली त्याची पुनरावृत्ती नक्कीच होईल. अराजकतावागी सरकारला धडा शिकविल्याशिवाय भाजपा आणि भाजपा युवा मोर्चा शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@