हाथरसवरून देश पेटविण्याचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2020   
Total Views |

delhi _1  H x W
काँग्रेसला साथ आहे ती ‘पीएफआय’ची. पोलिसांच्या प्राथमिक तपासावरून ‘पीएफआय’ ही संघटनाच हाथरस प्रकरणाचा वापर करून देशभरात अराजक पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी ‘पीएफआय’ला परदेशातून कोट्यवधी रुपये पुरविण्यात आल्याचा संशयही सक्तवसुली संचालनालयाला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जे काही घडले ते अतिशय दुर्दैवी होते, यात कोणतीही शंका नाही. या घटनेचे सत्य नेमके काय, ते समोर आलेच पाहिजे. जेणेकरून संबंधितांना न्याय मिळू शकेल. उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलण्याची भाषा योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर केली होती. जनतेनेही त्यावर विश्वास दाखवूनच भाजपला सत्ता दिली होती. कारण, भगवेवस्त्रधारी योगी आदित्यनाथ हे नक्कीच काहीतरी वेगळे करतील, अशी आशा जनतेला होती. त्यात बर्‍याच प्रमाणात योगी आदित्यनाथ यशस्वीही झाले आहेत. हाथरस प्रकरणातही त्यांनी सत्य लवकरात लवकर बाहेर यावे, यासाठी तत्काळ कार्यवाही केली आहे. सर्वप्रथम त्यांनी प्रकरणाची फास्ट ट्रॅक चौकशी करण्याचे आदेश दिले, त्यानंतर प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, यासाठी ‘एसआयटी’ची स्थापना केली. त्याउपरही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ‘सीबीआय’ चौकशी व्हावी, असे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. एकीकडे अनेक मुख्यमंत्री ‘सीबीआय’तपासाला विरोध करीत असताना योगी आदित्यनाथ यांनी स्वतःहून ‘सीबीआय’ तपासाची मागणी केली, हे विशेष. एकूणच प्रकरणातील सत्य बाहेर यावे, यासाठी आवश्यक ते सर्व काही योगी आदित्यनाथ यांनी केले, त्यात कोणतीही कसूर त्यांनी सोडली नाही.

मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयांमुळेच प्रकरणाचे राजकारण करून आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेससह अन्य पक्षांची गोची झाली आहे. कारण, या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यास आणि संबंधितांना न्याय मिळावा, अशी काँग्रेसची इच्छाच नाही. त्यांना या प्रकरणाचा वापर केवळ राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी करावयाचा आहे. आता अर्धवेळ राजकारणी असलेले राहुल गांधी यांचा राजकीय वकुब किती आहे, वयाची पन्नाशी गाठली तरीदेखील त्यांना तरुण नेता मानावे, असा त्यांचा आणि काँग्रेसचा बालीश हट्ट असतो. दुसरीकडे प्रियांका गांधी-वाड्रा यांचे तर विश्वच वेगळे आहे. काही काँग्रेसजनांना वाटते की, प्रियांका गांधी यांची केशरचना, त्यांचे नाक हे त्यांच्या आजी आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखे आहे. म्हणून त्यांच्याकडे आता काँग्रेसचे आणि देशाचेही नेतृत्व सोपवायला हवे. त्यातूनच मग भावाबहिणींनी हाथरसमध्ये जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राडा केला. भेटच घ्यायची होती तर शेकडो कार्यकर्ते घेऊन जाण्याची गरज नव्हती. मात्र, राहुल गांधी यांना काहीही करून वातावरण तापविण्याची इच्छा होती, म्हणूनच शेकडो कार्यकर्ते सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी अपेक्षेप्रमाणे त्यांना सीमेवरच अडवले. मग राहुल गांधी यांनी तेथे खाली पडण्याचा केलेला अभिनय, पोलिसांनी लाठी मारल्याचा केलेला कांगावा आणि त्यानंतर मग देशभरात सक्रिय झालेली ‘इकोसिस्टीम’ यामुळे देशात केवळ उत्तर प्रदेशातच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा देखावा निर्माण करण्यात आला. मात्र, राहुल गांधी याच्या निकटवर्तीयाच्या एक स्टिंग ऑपरेशनमध्ये काँग्रेसला नेमके काय अपेक्षित होते, ते पुढे आले. श्योराज जीवन या नेत्याने जे सांगितले ते अतिशय धक्कादायक होते.

तो म्हणाला, “हाथरसमध्ये दंगे होतील, मोठ्या प्रमाणावर गोळीबार होईल. दोन्ही बाजूंची बरीच मंडळी त्यात मरतील. मग मोठा संघर्ष उफाळेल आणि मग आमचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा हे पुन्हा हाथरसमध्ये येतील. मग या मुद्द्याचा वापर करून राज्यात मोठ्या प्रमाणावर अराजक निर्माण होईल आणि झालेच तर त्यात योगी आदित्यनाथ सरकार बरखास्तही होऊ शकते. पीडितेच्या कुटुंबाला मी व्यवस्थित समजावले आहे आणि त्यासाठी पैसेही दिले आहेत.” देशात आणि प्रामुख्याने भाजपशासित राज्यांमध्ये एखादी घटना घडली की, तेथे अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करायला तत्काळ जायचे, ही कार्यपद्धती काँग्रेस पक्ष अगदी इमानेइतबारे पाळत आला आहे. यापूर्वी त्याचे उदाहरण २००२ सालापासून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तब्बल १२ वर्षे घाणेरडे राजकारण काँग्रेसने केले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तर मोदींचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ असाही केला होता. विशेष म्हणजे, २००२ सालापासून नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यासाठी काँग्रेसने आपली संपूर्ण ‘इकोसिस्टीम’ कामाला लावली होती. त्यात पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी अशा अनेक गणंगांचा समावेश होता. त्यानंतर ‘भगवा दहशतवाद’ ही नवी संकल्पना जन्माला घालून देशातील हिंदू समाजाला बदनाम करण्याचे काँग्रेसचे षड्यंत्रही अनेक वर्षे सुरूच होते. त्यानंतर आता त्याचा तिसरा अध्याय काँग्रेसने हाथरसमध्ये सुरू केला आहे.

यावेळी काँग्रेसला साथ आहे ती ‘पीएफआय’ची. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमध्ये दंगे भडकविण्यात सक्रिय सहभाग असणारी हीच ‘पीएफआय’ संघटना. प्रामुख्याने कट्टरतावादी मुस्लिमांची ही संघटना देशविघातक कृत्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि अन्य सर्व प्रकारचे साहाय्य करीत असते. पोलिसांच्या प्राथमिक तपासावरून ‘पीएफआय’ ही संघटनाच हाथरस प्रकरणाचा वापर करून देशभरात अराजक पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी ‘पीएफआय’ला परदेशातून कोट्यवधी रुपये पुरविण्यात आल्याचा संशयही सक्तवसुली संचालनालयाला आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अतिक उर रहमान, मसूर अहमद आणि आलम या तिघांसह केरळच्या मल्लपुरममधील सिद्दीकी यांना अटक केली आहे. त्यांचा संबंध ‘पीएफआय’सोबत असल्याचा संशय पोलिसांना आहे. चौघांच्या जवळ असलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून आक्षेपार्ह साहित्यही सापडल्याचा पोलिसांचा दावा आहे. एकूणच हाथरस प्रकरणाचा वापर करून 2002 साली जे केले, त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेस आणि त्यांच्या ‘इकोसिस्टीम’चा प्रयत्न आहे; अर्थात यावेळीही समोर योगी आदित्यनाथ यांचे कणखर नेतृत्व आहे. त्यामुळे हाथरस प्रकरणी पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांसह काँग्रेससोबतही ‘न्याय’ होणार, हे निश्चित!
@@AUTHORINFO_V1@@