नागोर्नो-काराबाखमधील युद्धाचा भारताशीही संबंध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2020   
Total Views |

vicharvimarsh_1 &nbs


आज जेव्हा आर्मेनिया विरुद्ध अझरबैजान युद्धाच्या बातम्या वाचल्यावर अनेक जण या देशांचे आकार आणि भारतापासूनच अंतर पाहून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे युद्ध छोटेखानी असले तरी भारतासाठी फार महत्त्वाचे आहे.


आर्मेनिया हे भारताप्रमाणेच एक सांस्कृतिक राष्ट्र आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्‍या पहिल्या समूहांपैकी एक. येशूनंतर पहिल्या शतकात ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्‍या आर्मेनियात त्याच्या २०० वर्षांपूर्वी म्हणजे निसर्गपूजक पगान काळात हिंदू मंदिरं बांधली गेली होती. त्यातील सूर्यदेवाचे आणि नवग्रहांच्या मंदिरांचे भग्नावशेष पुनःप्रस्थापित करण्यात आले आहेत. ख्रिस्ती धर्म स्वीकारला असला तरी आर्मेनियन लोकांनी तो आपल्यापुरता मर्यादित ठेवला. खुष्कीच्या मार्गावरील व्यापारी असलेले हे लोक अनेक शतकांपासून भारतात येत आहेत. मुघल सम्राट अकबराने त्यांना आग्य्रात स्थायिक व्हायला जमीन दिली आणि १५९८ मध्ये अकबराचे चर्च उभे राहिले. कोलकात्यातील आर्मेनियन चर्च १६८८ साली बांधण्यात आले आणि १७२४ मध्ये त्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीशीही आर्मेनियाचे जुने ऋणानुबंध आहेत.

ही पार्श्वभूमी मांडायचे कारण म्हणजे, आज जेव्हा आर्मेनिया विरुद्ध अझरबैजान युद्धाच्या बातम्या वाचल्यावर अनेक जण या देशांचे आकार आणि भारतापासूनच अंतर पाहून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे युद्ध छोटेखानी असले तरी भारतासाठी फार महत्त्वाचे आहे. आज आर्मेनियाची लोकसंख्या जेमतेम ३० लाख असली, तरी जगभर स्थायिक झालेल्या आर्मेनियन लोकांची संख्या एक कोटींच्या आसपास आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान ओटोमन साम्राज्याचा भाग असलेल्या आर्मेनियात तुर्कीने प्रचंड नरसंहार घडवून आणला. त्यात तुर्कीतील ९६ टक्के म्हणजे सुमारे १५ लाख आर्मेनियन लोकांचा मृत्यू झाला. हे हत्याकांड नव्हते तर युद्ध आणि साथीच्या आजारांमुळे झालेले मृत्यू होते, असे कारण देऊन तुर्की ‘आर्मेनियन जेनोसाईड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या घटनेची जबाबदारी स्वीकारत नाहीत. याच सुमारास झालेल्या खिलाफत आंदोलनामुळे केरळमध्ये मोपल्यांकडून हिंदूंच्या झालेल्या नरसंहाराच्या बाबतीतही भारतातील डाव्यांकडून अशीच भूमिका घेतली जाते. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील युद्धामागचा सूत्रधार तुर्की असून, त्याला पाकिस्तानचीही साथ आहे.


कॉकेशस पर्वताच्या दक्षिणेला, काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्राच्या बेचक्यात जॉर्जिया, आर्मेनिया आणि अझरबैजान तीन छोटे देश आहेत. उत्तरेला रशिया, आग्नेयेला इराण आणि नैऋत्येला तुर्कीने घेरलेला हा भाग ओटोमन साम्राज्याच्या अंतानंतर काही वर्षांतच सोव्हिएत रशियाने गिळंकृत केला. आर्मेनियाचा आकार महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांएवढा, तर अझरबैजानचा आठ जिल्ह्यांएवढा. अझरबैजानची लोकसंख्या आर्मेनियाच्या साडेतीन पट म्हणजे एक कोटींच्या आसपास. अझेरी लोक वंशाने तुर्की; पंथाने शिया. ते तुर्की, अझरबैजान आणि इराणमध्ये वाटले गेले आहेत. गेल्या काही दशकांत अझरबैजानमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडले असून कॅस्पियन समुद्रातील माशांपासून मिळणारे कॅवियार हीदेखील महत्त्वाची निर्यात आहे. आर्मेनियाला समुद्रकिनारा नाही, तसेच तुर्की आणि अझरबैजानशी संबंध फारसे चांगले नसल्यामुळे त्यांना इराण आणि जॉर्जियाचाच आधार आहे. अझरबैजानचे इस्रायलशी चांगले संबंध असून तेथून येणार्‍या तेलाच्या बदल्यात इस्रायल अझरबैजानला शस्त्रास्त्रं पुरवतो. रशिया या संपूर्ण प्रदेशाकडे आपले परसदार म्हणून बघतो. त्याचे दोन्ही देशांशी मैत्रिकरार असून, आर्मेनियाशी संरक्षण विषयक करारही असल्यामुळे आर्मेनियात रशियन लष्करी तळ आहेत. फ्रान्स आणि अमेरिकेत आर्मेनियन वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय असल्यामुळे तेदेखील या प्रश्नाबद्दल सचिंत आहेत.


ज्या प्रदेशावरून हे युद्ध सुरू आहे तो ‘नागोर्नो-काराबाख’ किंवा ‘रिपब्लिक ऑफ आर्टसाख’ हा प्रदेश साडेचार हजार चौ. किमीचा असून पहाडी आहे. त्याची सध्याची लोकसंख्या दीड लाखांच्या घरात आहे. ऐतिहासिकदृष्ट्या तेथे आर्मेनियन लोकांचे बाहुल्य असले तरी सोव्हिएत रशियाने प्रशासकीय सोयीसाठी त्याचा समावेश अझरबैजानमध्ये केला होता. १९८०च्या दशकात मिखाईल गोर्बाचेव यांनी सोव्हिएत रशियात लोकशाही प्रस्थापित करण्याचे संकेत दिले असता, या सर्व प्रदेशातील लोकांच्या स्वातंत्र्यभावनांनी उचल खाल्ली. १९८८ ते १९९४ या कालावधीत आर्मेनिया आणि अझरबैजान या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये नागोर्नो-काराबाखवरून युद्ध चालू होते. त्यात दोन्ही बाजूंकडून भाडोत्री रशियन सैनिकांचा वापर झाला. लोकसंख्येने कमी असूनही शिस्त आणि जिद्दीमुळे आर्मेनिया अझरबैजानवर भारी पडला. या कालावधीत सार्वमत घेण्याचा दोन वेळा प्रयत्न झाला. त्यात स्थानिक लोकांनी आर्मेनियात सहभागी होण्याच्या बाजूने कौल दिला. १९९४ साली युद्धविराम झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी हा भाग अझरबैजानमध्ये समाविष्ट केला असला तरी त्याला स्वायत्तता दिली. त्यामुळे तेथे अझरबैजानची सत्ता चालत नाही.
नागोर्नो- काराबाखला आर्मेनियाशी जोडणार्‍या बर्‍याच मोठ्या भागावर आर्मेनियाचे नियंत्रण आहे. युरोपीय सुरक्षा आणि सहकार्य संस्थेच्या (मिन्स्क गट) माध्यमातून हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न होत असला तरी त्याला यश आले नाही.



२००८ साली या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मतदान झाले. यात केवळ ४६ देशांनी सहभाग घेतला. अझरबैजानला पाठिंबा देणार्‍या ३९ देशांपैकी ३१ मुस्लीम देश होते. अमेरिका, रशिया आणि फ्रान्ससह भारताने आर्मेनियाच्या बाजूने मतदान केले. यावर्षी रशिया आणि पोलंडला मात देऊन भारताने आर्मेनियाला रडार पुरवण्याचे चार कोटी डॉलरचे कंत्राट मिळवले. डीआरडीओ आणि बेलने संयुक्तपणे बनवलेल्या ‘स्वाती रडार’मुळे आर्मेनियाच्या लष्करी ताकदीत वाढ झाली आहे, त्याचसोबत ‘मेक इन इंडिया’लाही चालना मिळाली आहे. अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये या प्रदेशावरून गेली तीन दशकं अधूनमधून चकमकी होत असतात. पण, त्यातून जमिनीवरील परिस्थिती बदलत नाही. आर्मेनियाने आपल्या स्वातंत्र्यापासून सातत्याने काश्मीर मुद्द्यावर भारताला समर्थन दिले आहे. गेल्या वर्षी राज्यातून ‘कलम 370’च्या तरतुदी हटविण्याच्या निर्णयाचेही आर्मेनियाने समर्थन केले आहे. दरवर्षी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीवर आर्मेनियन विद्यार्थी मोठ्या संख्येने भारतात शिकण्यासाठी येतात.


सध्या चालू असलेल्या युद्धाला अझरबैजानपेक्षा तुर्की जबाबदार आहे. त्यानेच अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम आलियेव यांना आपण आर्मेनियाच्या ताब्यातील सर्व प्रदेश परत मिळवण्याचे स्वप्न दाखवले आहे. या युद्धात तुर्कीची वायुसेना अझरबैजानला मदत करत आहे. तुर्कीच्या ‘एफ 16’ विमानाने आपले ‘सुखोई’ विमान पाडल्याचा आरोप आर्मेनियाने केला असून तुर्कीने पुरवलेल्या ड्रोनच्या माध्यमातून नागोर्नो-काराबाखवर हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात लढण्यासाठी तुर्कीने सीरियातून आपले भाडोत्री सैनिक पाठवले असून अझरबैजानमध्ये साध्या वेशातील पाकिस्तानी सैनिकही लढत असल्याचे समोर आले आहे. रशिया, युरोपीय महासंघ आणि ‘नाटो’ने शांततेसाठी केलेल्या आवाहनांना अझरबैजान प्रतिसाद देत नाहीये. गेले दहा दिवस चालू असलेल्या या युद्धात २०० हून अधिक लोक मारले गेले असून त्यात सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. हे युद्ध अधिकृतरीत्या अझरबैजानच्या भागात चालू असल्याने रशिया त्यात सहभागी झाला नाहीये. पण, जर आर्मेनियावर हल्ला झाला तर परिस्थिती बदलेल. रशिया आणि तुर्की यांच्यातून विस्तव जात नसून लिबिया आणि सीरियामध्ये ते एकमेकांविरुद्ध ठाकले आहेत. युरोपीय महासंघाचे रशियाशी पटत नसल्याने तसेच अझरबैजान आणि मध्य आशियातून रशियाला वळसा घालून युरोपात जाणार्‍या गॅस पाईपलाईन तुर्कीमार्गे जात असल्याने, त्यांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे.


युरोपीय महासंघात समावेशाचे दरवाजे बंद झाल्यावर रसीब तैय्यप एर्दोगान यांच्या नेतृत्त्वाखाली तुर्की पुन्हा एकदा मुस्लीम जगतातील मध्यवर्ती साम्राज्य (खलिफत) बनण्याचे स्वप्न बघत आहे. भारतावर बहुतेक मुस्लीम आक्रमक आणि शासक वंशाने तुर्की होते. तुर्कीच्या खलिफाला पुनःप्रस्थापित करण्यासाठी झालेल्या खिलाफत चळवळीमुळे पाकिस्तानवादी चळवळीला गती प्राप्त झाली, तर महंमद अली जिनांनी तुर्कीमध्ये मुस्तफा कमालने स्थापन केलेल्या आधुनिक, सेक्युलर मुस्लीम राष्ट्राच्या संकल्पनेच्या आधारे पाकिस्तानला विकसित करायचे स्वप्न पाहिले. यामुळे तुर्की आणि पाकिस्तानमध्ये बंधुत्त्वाचे नाते आहे. २०१९साली तुर्की, पाकिस्तान आणि मलेशियाने एकत्र येऊन ‘इस्लामोफोबिया’विरुद्ध लढा देण्याची गरज व्यक्त केली. काश्मीरप्रश्नावर एर्दोगान यांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला आहे. हा विषय रशियाच्या परसदारातील असल्यामुळे तूर्तास भारताने उघडपणे भूमिका घ्यायचे टाळले असले तरी तुर्की आणि पाकिस्तानच्या थेट सहभागामुळे तो महत्त्वाचा नक्कीच आहे.
@@AUTHORINFO_V1@@