आदर्शाचा दीपस्तंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


V. N. Utpat_1  




वारकरी संप्रदायातले अग्रणी भागवताचार्य, ज्येष्ठ विचारवंत, सावरकरप्रेमी, उत्तम शिक्षक, हिंदुत्वनिष्ठ, पत्रकार, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, संपादक वा. ना. उत्पात यांची २८ सप्टेंबर रोजी वयाच्या ८०व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यानिमित्ताने डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा उत्पात यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...


 
रात्री एका वाहिनीवरील चर्चा संपवून स्टुडिओतून बाहेर आलो, तोच मोबाईल खणाणला. वा. ना. उत्पातांचा फोन होता. “तर्कशुद्ध आणि परखडपणे बाजू मांडलीस म्हणून तुझ्या कौतुकासाठी फोन केला. तुझा, प्रति रविवारचा ‘सोलापूर तरुण भारता’तला स्तंभ मी वाचत असतो. अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत चालला आहेस, याचा आनंद वाटतो. अप्पांच्या (गुरुवर्य ब्र. स्वामी वरदानंद भारती) कृपेचा वरदहस्त तुझ्यावर आहे.” मी ऐकताना संकोचत होतो. ‘जशी माया पाण्याहूनी पातळ’, म्हणजे काय असते, याचा साक्षात अनुभव मिळत होता. काही वर्षे स्तंभलेखन केल्यानंतर ती लेखनधुरा आमचे चिरंजीव वैद्य परीक्षित शेवडे हे गेली दोन वर्षे यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यालाही वा. ना. हटकून फोन करून शाबासकीची थाप देत असत.


८० वर्षांचा सतत कार्यमग्न असलेला हा ‘तरुण’ कोविडमुळे वैकुंठाला जातो, हे वृत्तच अविश्वसनीय वाटावे असे होते; पण दुर्दैवाने अशी वृत्ते खोटी ठरत नाहीत. तीन तपांहून अधिक काळ प्रति चतुर्मास्यात ते ‘भागवत’, ‘ज्ञानेश्वरी’ वा ‘रुक्मिणी स्वयंवर’ यांसारख्या ग्रंथांवर प्रवचने करीत असत. त्यातही २१ वर्षे सलग चतुर्मास्य प्रवचने पंढरीतील गजानन महाराज मंदिरात केली. एखाद्या विषयावर, एका जागेवर, तब्बल चार महिने बोलणे सोपे नसते. त्यासाठी विषयाचा सखोल अभ्यास, मनन, चिंतन, पाठांतर, सहजसोप्या भाषेतील मांडणी इतके भाग आवश्यक असतात. ‘गीता’, ‘उपनिषदे’, ‘संस्कृत साहित्य’, ‘इतिहास’, ‘संत साहित्य’ व ‘सावरकर साहित्या’चा त्यांचा दांडगा व्यासंग होता. देव, देश आणि धर्म यासाठी आपल्या वाणी व लेखणीचा त्यांनी उपयोग केला. तर्कशुद्ध मांडणी आणि प्रतिवाद करताना आक्रमकता हे त्यांचे गुण निश्चितच अनुकरणीय होते.


ज्येष्ठ विचारवंत, सावरकरप्रेमी, उत्तम शिक्षक, हिंदुत्वनिष्ठ, पत्रकार, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, संपादक, आयोजक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी पंढरपूरच्या द. ह. कवठेकर प्रशालेत शिक्षक आणि पुढे मुख्याध्यापक म्हणून ३९ वर्षे काम केले. इतिहास, संस्कृत आणि इंग्रजी हे त्यांचे हातखंडा असलेले विषय असत. आज त्यांचे शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. पाठ्यपुस्तकातील, ‘...या देशाच्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन,’ या प्रतिज्ञेचा योग्य अर्थ त्यांना गवसला होता. या देशाची परंपरा ही क्रूर असलेल्या कोणा खिलजी, बाबर, औरंगजेबाची नसून भूमीलाही माता मानणार्‍या प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, सम्राट चंद्रगुप्त, ललितादित्य, विक्रमादित्य, राणा प्रताप, शिवराय, गुरू गोविंदसिंग आणि सर्व संतांची असल्याचे त्यांना भान होते. शाळा म्हणजे कारखाना नव्हे आणि विद्यार्थी हे त्याचे उत्पादन नव्हे, हे लक्षात ठेवून माणूस घडवण्याचे कार्य त्यांनी केले. पुढे ते शिक्षणक्षेत्रातील नामांकित असलेल्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष झाले.
 
समाजकारण करीत असताना ते राजकारणातही शिरले. १९७४ ते १९९५ या काळात नगरसेवक आणि पुढील दोन वर्षे ते पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. आणीबाणीत दीड वर्षांचा तुरुंगवासही त्यांच्या वाट्याला आला होता. राजकारणातून त्यांनी समाजकार्य करण्याचा प्रयत्न केला. ‘पंढरी प्रहार’ हे साप्ताहिक काढून ते संपादक बनले. निर्भीड आणि स्पष्टवक्ता हे दोन गुण त्यांच्यातल्या पत्रकाराला सजग ठेवीत असत. संपादनाचे काम सांभाळत अनेक नियतकालिके व वृत्तपत्रातून लेखनही केले. ‘लोकसत्ता’, ‘तरुण भारत’, ‘सोबत’, ‘विवेक’, ‘सह्याद्री’ आदी अनेक ठिकाणी त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे. ‘मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥’ हा बाणा असल्यामुळे समाजातील पाखंड विचारांवर त्यांची लेखणी सर्व शक्तिनिशी प्रहार करीत असे. ‘सोलापूर तरुण भारता’त सलग नऊ वर्षे ‘आस्वाद सुभाषितांचा’ ही लोकप्रिय माला त्यांनी लिहिली. तिचे पुढे पुस्तकही प्रकाशित झाले. त्यांनी सुमारे २५ पुस्तके लिहिली. आरंभी त्यांनी पुस्तक प्रकाशनाचे कार्यही केले. पुढे व्याप वाढल्यावर प्रकाशकाकडे पुस्तके दिली. अलीकडच्या काळात त्यांचे ‘धर्मभास्कर’ मासिकातील ‘मनुस्मृतीवरील लेखांचे पुस्तक’, ‘उठा हिंदूंनो, जागृत व्हा रे,’ हे स्वामी वरदानंद भारतींच्या राष्ट्रसंरक्षण पोवाड्याचा अर्थ विशद करणारे पुस्तक आणि ‘कलंक मतीचा झडो’ हा लेखसंग्रह, अशी तीन पुस्तके पुण्यातील ‘कॉन्टिनेंटल’ या अग्रगण्य प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली.


‘सावरकर-एक धगधगते यज्ञकुंड’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक होय. अप्पांनी (‘वा. ना’ म्हणून ते महाराष्ट्राला परिचित असले तरी त्यांचे असलेले घरगुती संबोधन) सावरकर साहित्याचा सखोल अभ्यास केला होता. पंढरपुरात त्यांनी सावरकरांचा नऊ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारून त्या चौकाला, ‘सावरकर चौक’ हे नाव दिले. १९९५ मध्ये जालना आणि पुढे २००३ मध्ये मुंबई येथे झालेल्या सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी पंढरपुरात स्वा. सावरकर वाचनालयाच्या स्थापनेचे बीजारोपण केले. त्यातून पुढे सावरकर क्रांतिमंदिराचा वटवृक्ष फोफावला. किमान एक लाख ग्रंथांचा संग्रह असावा, या विचाराने त्यांना झपाटून टाकले होते. त्यासाठी मोठी इमारतही उभी करायची होती. भागवत कथा आणि व्याख्यानातून मिळत असलेल्या द्रव्यातून त्यांनी इमारतीचे स्वप्न साकार केले. जवळपास ४० सहस्र ग्रंथ जमा झाले असून त्यात अजून नक्कीच भर पडत राहील. इमारतीतच ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक अभ्यासिका चालू केली. साधारण व गरीब विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची एक मोठी सोय त्यांनी करून दिली. या संस्थेतर्फे प्रतिवर्षी दोन वेळा सावरकर व्याख्यानमाला होते. गेली अनेक वर्षे आप्पांनी सावरकर जयंती व आत्मार्पण दिनी सप्ताहभराच्या या मालेचे अत्यंत यशस्वी आयोजन केले. एका वर्षी तिथे व्याख्यान देण्याचा योग आम्हालाही लाभला.


सनातन धर्म संस्थेचा ‘देवर्षी नारद’ पुरस्कार, ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा ‘सावरकर’ पुरस्कार, ‘ज्ञानविज्ञान’ पुरस्कार, ‘याज्ञवल्क्य’ पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले होते. पंढरपूर अर्बन बँकेचे संचालकपदही त्यांनी प्रदीर्घ काळ सांभाळले. उत्पात समाज हा माता रुक्मिणीचा पुजारी म्हणून ओळखला जातो. अप्पा हे त्या परंपरेचे कटाक्षाने पालन करीत होते. उत्पातांमधील ज्येष्ठ म्हणून त्यांचा लौकिक होता. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. इतके सगळे कार्य पाहिल्यावर हे एका माणसाने केले, यावर विश्वास बसणे कठीण! अन्यांना अमुक करा, असे सांगणे सोपे असते.


परोपदेशे पांडित्यं सर्वेषां सुकरं नृणाम।
धर्मे स्वीयमनुष्ठानं कस्यचित्तु महात्मान:॥


(अर्थात, दुसर्‍याला उपदेश करण्याचा शहाणपणा करणे सर्वांसाठी सोपे असते. नियमांचे पालन करून राहणे एखाद्या थोर माणसालाच जमते.)


स्वतः प्रतिभावंत लेखक आणि वक्ता दशसहस्रेषु असूनही इतरांचे मनमोकळेपणाने कौतुक करण्याइतका मोठेपणा त्यांच्याकडे होता, हे आम्ही अनुभवले आहे. आम्हा दोघांचे गुरू ब्र. स्वामी वरदानंद भारती, हा एक ओलाव्याचा समान धागा होता. त्यातून ते दोघेही ‘आप्पा’ याच संबोधनाने ओळखले जात असत, हा आमच्यासाठी आदराचा आणखी एक विशेष होता. तसे आमच्यात वयाचे अंतर बरेच असूनही आप्पांनी ते कधी जाणवू दिले नाही; अर्थात या त्यांच्या मोठेपणाची आणि ज्येष्ठतेची जाणीव आम्ही नेहमीच ठेवली! सावरकरांच्या ‘कमला’ या काव्याचे रसग्रहण आप्पांच्या (स्वामीजी) तोंडून कसे ऐकले, हे सांगताना आप्पांच्या (उत्पात) वाणीला भरते येत असे आणि त्यांच्या मुखातून ते श्रवण करणे हा एक वेगळाच अनुभव होता.


पंढरपूर अर्बन बँकेच्या हेमंत उत्पातांनी त्यांची एक आठवण सहज सांगितली. १९९१ मध्ये नाशिक येथे लावणी मंडळाचा कार्यक्रम मूलचंदशेठ गोठी यांनी आयोजला होता. लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात यांच्या या कार्यक्रमात आप्पा निवेदन करीत असत. त्या दिवशी ख्यातनाम साहित्यिक व कवी असलेले तात्यासाहेब शिरवाडकर येणार होते. नाशिकला जायला निघण्यासाठी सर्व जण जमा झाले. इतक्यात रांजणवाडी झाल्यामुळे आपण येऊ शकत नसल्याचा निरोप आप्पांकडून आला. सगळे जण काळजीत पडले. हेमंत उत्पात हे आप्पांचे विद्यार्थी. ते घरी गेले आणि आग्रह करून आप्पांना घेऊन आले. सोबत औषधे असली तरी या आग्रहामुळे आप्पा थोडे नाराज होते. नाशिकला पोहोचेपर्यंत रांजणवाडीचा त्रास आटोक्यात आला. कार्यक्रम चांगलाच रंगला आणि आप्पांच्या उत्कृष्ट निवेदनामुळे एका वेगळ्याच उंचीवर गेला. एकदा पंढरपूरच्या तनपुरे मठात अनुराधा पाल यांचे तबलावादन होते. कार्यक्रम छान झाला. आप्पा बोलायला उठले आणि पहिलेच वाक्य उच्चारले, ‘यह अनुराधा पाल नहीं, अनुराधा ताल हैं।’ यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. याला ‘प्रत्युत्पन्नमति’ म्हणतात. पंढरीत आलेल्या नवोदित वा दिग्गज कलाकारांचे भरभरून कौतुक करणे, हा त्यांच्या निर्विष स्वभावाचा भाग होता.


अनेक गुणांचा समुच्चय असून आणि अनेकविध विषयांचे गाढे अभ्यासक असूनही ते कमालीचे साधे होते. आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श बंधू, आदर्श शिक्षक, आदर्श वक्ता, आदर्श लेखक, आदर्श जीवन असे ‘आदर्शाचे दीपस्तंभ’ म्हणण्यासारखे जीवन त्यांनी व्यतीत केले. पंढरपुरात गेलो की अप्पांची भेट घेणे हा विलक्षण आनंदाचा आणि माहितीत भर टाकणारा अनुभव असायचा. त्यांच्यासह विठ्ठल आणि रुक्मिणी दर्शन घेणे हा अपूर्व धन्यता मिळणारा भाग असे. ते उत्साहाने इतिहास सांगत असत. त्यानंतर त्यांच्या घरी गप्पांची मैफील रंगत असे. त्यांचे अनुभव आणि भरभरून बोलणे हे ऐकत राहावेसे वाटे. वेळेच्या मर्यादेमुळे काहीसे अतृप्त राहूनच निघावे लागे. पुत्रवत प्रेम करणारी अशी वडीलधारी माणसे या कठीण काळात निघून जात आहेत, हे जास्त दुःख देणारे आहे. ज्यांना वाकून नमस्कार करावा, अशा योग्यतेच्या व्यक्ती कमी होत चालल्या आहेत. यात व्यक्तिगत आणि सामाजिक अशी हानी होते याची रुखरुख लागून राहाते. हिंदू संस्कृती वाचली पाहिजे, असे वाटणारे विचारवंत कमी होत चालले आहेत, अशा वेळी असा आघात होणे असह्य असते, वेदनादायी असते. तथापि, अशा आदर्शातून, आपणही काही देव-देश व धर्म हितार्थ कार्य करू, अशी प्रेरणा मिळणे निश्चितच संभवनीय असते. ती प्रेरणाच खरी श्रद्धांजली ठरू शकते!!
 

@@AUTHORINFO_V1@@