सह्याद्रीतून 'काटेचेंडू' वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2020   
Total Views |

Echinops sahyadricus_1&nb
नव्याने उलगडलेली प्रजाती महाराष्ट्रात प्रदेशनिष्ठ 
 

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सह्याद्रीमधील पर्वतरांगांच्या उतरावरुन काटेचेंडू वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात महाराष्ट्र आणि इटलीतील तरुण वनस्पतीशास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. या प्रजातीचे नामकरण 'इचिनाॅप्स सह्याद्रीकस', असे करण्यात आले असून ही केवळ उत्तर पश्चिम घाटामध्ये म्हणजेच सह्याद्रीमध्ये प्रदेशनिष्ठ आहे. संशोधकांना ही प्रजाती केवळ महाराष्ट्रात सापडली आहे. 
 

 Echinops sahyadricus _1& 
 
सह्याद्रीची विस्तुत पसरलेली डोंगररांग जैवविविधतेचा खजिना आहे. या डोंगररांगांचा समावेश जागतिक वारसा स्थळ असलेल्या पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भागामध्ये होता. या भागामधून 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे हर्षल भोसले, 'साठ्ये महाविद्यालया'च्या वनस्पतीशास्त्र विभागाचे सुशांत मोरे आणि इटलीच्या 'कॅमरीनो विद्यापीठा'चे फॅबिओ काॅन्टी यांनी काटेचेंडू वनस्पतीची नवी प्रजात शोधून काढली आहे. या शोधाचे वृत्त शनिवारी 'नाॅर्डिक जर्नल आॅफ बाॅटनी' या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. ही नवी प्रजात वनस्पतीच्या 'इचिनाॅप्स' या कुळातील आहे. जगभरात या कुळात १३० प्रजाती सापडतात. त्यापैकी पाच प्रजाती या देशात आणि त्यामधील दोन प्रजाती महाराष्ट्रात सापडतात.
 


plant_1  H x W:
 

या कुळातील महाराष्ट्रातून नव्याने उलगडलेली प्रजात सह्याद्रीमध्ये सापडल्याने तिचे नामकरण या जागेवरुन 'इचिनाॅप्स सह्याद्रीकस', असे करण्यात आल्याची माहिती संशोधक हर्षल भोसले यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी (महा MTB) बोलताना दिली. ही प्रजात नाशिकमधील साल्हेरच्या उत्तरेपासून ते दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजेच जगात ती केवळ या भागामध्येच आढळत असल्याने तिचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सह्याद्रीच्या खोऱ्यामधील पुरातन किल्ल्यांवरील उतारांवर ही प्रजात प्रामुख्याने आढळते. 'उत्तर पश्चिम घाटामधील पठारांवरील प्रदेशनिष्ठ जैवविविधतेचे मूल्यांकन' या प्रकल्पाअंतर्गत संशोधकांचे काम सुरू होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शोधमोहिम राबविण्यात आल्या. यावेळी आॅगस्ट, २०१९ साली संशोधकांना ही प्रजात सह्याद्रीमध्ये आढळून आली. इतर कोणत्याही राज्यात संशोधकांना ही प्रजाती सापडली नाही. या शोधमोहिमेसाठी श्रीपाद हळबे आणि बृहद भारतीय समाज मुंबई यांनी आर्थिक पाठबळ पुरवले आहे. 
 
 
नव्या प्रजातीविषयी...
'इचिनाॅप्स सह्याद्रीकस' ही प्रजातसाधारण २०० सें.मीटरपर्यत म्हणजेच माणसाच्या छातीपर्यंत वाढते. त्याच्या फुलोरा गोलाकार चेंडूसारखा ९ सें.मी. व्यासाच असतो. हा फुलोरा काटेचेंडू प्रजातीमधील सगळ्यात मोठा फुलोरा असल्याची माहिती संशोधक सुशांत मोरे यांनी दिली. पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान या वनस्पती उगवतात. तोपर्यंत यांचे मूळ जमिनीत असते. नोव्हेंबरमध्ये त्यांना फुलांचा बहर येतो आणि डिसेंबरमध्ये त्यांना फळ येतात. या फुलांना गोड सुवास असल्याने कीटक खास करुन मधमाश्या त्यावर आकर्षित होतात. ही प्रजात केवळ महाराष्ट्रात सापडत असल्याने तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पठारांवरील रस्त्यांचे रुदींकरण, बांधकाम आणि घाटांमध्ये बेसुमार पद्धतीने वाढणाऱ्या 'काॅसमाॅस' या परदेशी वनस्पतींमुळे या प्रजातीच्या अधिवासाला धोका आहे. 
 
 

@@AUTHORINFO_V1@@