'चातक' पक्ष्याचे देहरादून ते कोल्हापूर १,५०० किमीचे स्थलांतर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2020   
Total Views |

bird _1  H x W:
अरबी समुद्रावरुन उडून आफ्रिकेत जाणार का ?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) डेहरादूनमध्ये 'सॅटलाईट टॅग' लावलेल्या चातक (Pied Cuckoo) पक्ष्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर गाठले आहे. यादरम्यान त्याने सुमारे १,५५० किमीचे स्थलांतर केले आहे. आता हा पक्षी अमूर फाल्कन पक्ष्यासारखाच पश्चिम घाट ओलांडून अरबी समुद्रावरुन आफ्रिका गाठणार का ? याकडे 'डब्लूआयआय'च्या संशोधकांचे लक्ष लागून राहिले आहे. 
 
 
 
पक्ष्यांच्या हिवाळी स्थलांतराला आता सुरुवात झाली आहे. हेच स्थलांतर जाणून घेण्यासाठी 'डब्लूआयआय'कडून पक्ष्यांना सॅटलाईट आणि जीपीएस-जीएसएम टॅग लावून शास्त्रीय अभ्यास सुरू आहे. याअंतर्गत 'डब्लूआयआय'चे शास्त्रज्ञ डाॅ. सुरेश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये जुलै महिन्यात देहरादूनमध्ये दोन 'पाईड कूक्कू' पक्ष्यांना 'सॅटलाईट टॅग' लावण्यात आले होते. प्रथमच 'पाईड कूक्कू' पक्ष्यांना टॅग लावण्यात आले. त्यांची नावे अनुक्रमे 'मेघ' आणि 'चातक' अशी ठेवण्यात आली. त्यानंतर पावसाळ्याचे पुढील दोन महिने त्यांच्या वावर याच परिसरात होता. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर या पक्ष्यांनी आपल्या हिवाळी स्थलांतराला सुरुवात केली. 
 
 
त्यामधील 'चातक' नामक पक्ष्याने देहरादून पासून ५० किमी दूर राजाजी राष्ट्रीय उद्यानाजवळ असणाऱ्या हरिव्दार शहरालगत आपले बस्तान हलवले. १२ आॅक्टोबरपर्यत हा पक्षी याच परिसरात होता. मात्र, १९ आॅक्टोबर रोजी संशोधकांना या पक्ष्याचे स्थान दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराजवळ सापडले. आवठड्याभरात या पक्ष्याने हरिव्दार ते कोल्हापूरदरम्यान १,५०० किमीचे स्थलांतर केल्याची माहिती डाॅ. सुरेश कुमार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला (महा MTB) दिली. शुक्रवारी या पक्ष्याचे स्थान आम्हाला कोल्हापूरच्या दक्षिणेस गोवा राज्याच्या सीमेजवळ आढळल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्य भारतातून स्थलांतर करताना अमूर फाल्कन पक्षी याच मार्गाचा वापर करुन पश्चिम घाट ओलांडून अरबी समुद्रावरुन उडत आफ्रिकेजवळचे सोमालिया बेट गाठतात. त्यामुळे हा 'चातक' पक्षी अरबी समुद्र ओलांडेल का ? किंवा हिवाळ्यात पश्चिम घाटामध्येच वास्तव्य करेल ? हे एक रहस्य असून येत्या काही दिवसात किंवा आठवड्यात आम्हाला त्याचा उलगडा होईल, असे कुमार म्हणाले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@