स्वरयोगिनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2020   
Total Views |

manasa_1  H x W


संगीतक्षेत्रात विविध स्तरावर मुशाफिरी करून शास्त्रीय संगीताचे ज्ञान समृद्ध करणार्‍या शास्त्रीय गायिका आणि गुरू डॉ. प्रभा अत्रे यांच्याविषयी...

किराणा घराण्याच्या गायकीच्या परंपरेची ज्योत अखंड तेवत ठेवण्यास हातभार लावणारे एक नाव म्हणजे, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आणि गुरू डॉ. प्रभा अत्रे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील विचार पोहोचविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या नावे संगीतावरील ११ पुस्तके एकाच टप्प्यात प्रसिद्ध करण्याचा जागतिक विक्रम आहे. त्यांनी एप्रिल, २०१६ रोजी नवी दिल्लीतील ‘इंडिया हॅबिटाट सेंटर’मध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले. एक कुशल कलाकार होण्याबरोबरच त्यांनी विचारवंत, संशोधक, अभ्यासक, सुधारक, लेखक, संगीतकार आणि गुरू म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कामगिरीचा भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मान केला आहे.


डॉ. प्रभा अत्रेंचा जन्म १३ सप्टेंबर, १९३२रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील आबासाहेब आणि आई इंदिराबाई अत्रे, हे पेशाने शिक्षक होते. प्रभाताई आणि त्यांची बहीण उषा यांना संगीताची आवड होती. मात्र, संगीतामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने त्यांनी विचार केला नव्हता. त्या आठ वर्षांच्या असताना इंदिराबाईंची तब्येत ठीक नव्हती. त्यावेळी शास्त्रीय संगीताचे धडे शिकून इंदिराबाईंना बरे वाटेल, असा सल्ला एका मित्राने दिला होता. त्यानुसार हे धडे देण्यात आले. ते धडे ऐकताना प्रभाताईंना शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर गुरू-शिष्य परंपरेच्या मार्गाने त्याचे संगीत शिक्षण सुरू झाले. किराणा घरण्यामधील सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. ‘ख्याल’साठी अमीर खान आणि ‘ठुमरी’साठी बडे गुलाम अली खान या दोन अन्य महानुभावांचा प्रभाव त्यांच्या गायकीवर पडला.


फर्ग्युसन महाविद्यालयामधून विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रभाताईंनी विधीच्या पदवीचे ज्ञान संपादित केले. गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी ‘संगीत अंलकार’ ही पदवी मिळविली. त्यानंतर ‘सरगम’ या विषयावर त्यांनी डॉक्टरेटची पदवी संपादित केली. १९५५पासून त्यांनी भारत आणि जगभरात आपल्या मैफलींना सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी संगीत नाटकांमध्ये काम केले. ‘संशय-कल्लोळ’, ‘सौभद्र’, ‘शारदा’ आणि ‘विद्याहार’ सारख्या मराठी अभिजात संगीत नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्या अखिल भारतीय रेडिओमधील ‘टॉप’ ग्रेड कलाकार आहेत. त्यांनी ‘ख्याल-तराणा’, ‘ठुमरी-दादरा’, ‘भजन-गीत-गजलां’च्या 550 हून अधिक बंदिशी रचल्या आहेत. ‘तिलांग भैरव’, ‘कौशिक भैरव’, ‘रवि भैरव’, ‘शिवकली’, ‘शिवानी’, ‘भीमवंती’, ‘कलाहीर’, ‘अप्रूव कल्याण’, ‘भूप कल्याण’, ‘पतदीप मल्हार’, ‘दरबारिकौंस’ आणि ‘मुधरकौंस’ यांसारखे राग प्रभाताईंनी रचले आहेत. ‘स्वर-नृत्य प्रभा’ या नृत्यनाटिकेबरोबरच अनेक संगीत नाटकांसाठी त्यांनी संगीत रचना केल्या आहेत.

किराणा घराण्याची परंपरा तेवत ठेवण्यासाठी प्रभाताईंनी सादरीकरण, कार्यशाळा, व्याख्यानांच्या माध्यमातून प्रयत्न केले. जगभरातील विद्यार्थ्यांना गुरू-शिष्य किंवा संस्थात्मक पद्धतीने या परंपरेचे शिक्षण दिले आहे. अमेरिका, कॅनडा, स्वित्झरलंड, नेदरलँड्समधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन परदेशातील विद्यार्थ्यांना त्यांनी संगीताचे धडे दिले आहेत. त्यांनी संगीताच्या विविध पैलूंवर शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘स्वरमय’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘सुस्वराली’ या दुसर्‍या पुस्तकालाही खूप प्रशंसा मिळाली. त्यांचा डॉक्टरेटसाठी केलेला ‘सरगम’ प्रबंध हा त्या विषयावरील अग्रगण्य शैक्षणिक साहित्य आहे. ‘स्वरांगिनी’, ‘स्वरांजनी’ आणि ‘स्वररंगी’ या पुस्तकांमध्ये त्यांनी रचलेल्या शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतामधील ५५०हून अधिक रचनांचा समावेश आहे. प्रभाताईंचे ‘अंतःस्वर’ हे पुस्तक कदाचित या प्रकारच्या एकमेव संगीत आणि संगीताच्या अनुभवांवर आधारित कवितांचे पुस्तक आहे. त्यांची पुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत उपलब्ध आहेत आणि इतर भाषांमध्येही अनुवादित केली जात आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीत आणि परफॉर्मिंग आर्टला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभाताईंनी ‘डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन’ची स्थापना केली. शैक्षणिक संस्था आणि पारंपरिक गुरू-शिष्य परंपरा यांच्यामधील दरी मिटविण्यासाठी आणि संगीत हा विषय करिअर म्हणून घेण्याची इच्छा असलेल्या प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘स्वरमय गुरुकूल’ या संस्थेची स्थापना केली आहे. त्या अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. अत्रे यांना अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात ‘एथ्नोम्युझिकोलॉजी’मध्ये वापरल्या जाणार्‍या संशोधन साहित्याचा अभ्यास करण्यासाठी ‘इंडो-अमेरिकन फेलोशीप’ मिळाली आहे, तसेच बोस्टनमधील प्रख्यात ‘लर्नक्वेस्ट संगीत अकादमी’कडून भारतीय शास्त्रीय संगीताला चिरस्थायी योगदानाची मान्यता दिल्याबद्दल त्यांना ‘लर्नक्वेस्ट लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड’ही मिळाला आहे. डॉ. प्रभा अत्रे यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार आणि केंद्रीय संगीत नाटक अकादमीतर्फे ‘टागोर अ‍ॅकॅडमी रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मध्यप्रदेश सरकारने ‘कालिदास सम्मान’, गुजरातने ‘तनारी संगीत सन्मान’, महाराष्ट्राने ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव’ पुरस्कार, कर्नाटकने ‘मल्लिकार्जुन मन्सूर सन्मान’ आणि ‘स्वरसम्राट पीटी बसवराज राजगुरू रश्त्रिया सन्माना’ने गौरवित केले आहे. अशा या ‘स्वरयोगिनी’ला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
@@AUTHORINFO_V1@@