हंटर बायडन डोनाल्ड ट्रम्पना जिंकवणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2020   
Total Views |

america_1  H x


गेल्या वर्षी त्यांनी युक्रेन सरकारने हंटर बायडनबद्दल त्यांच्याकडे असलेली गोपनीय माहिती आपल्याला द्यावी, यासाठी अमेरिकेकडून संरक्षण क्षेत्रात होत असलेली मदत रोखून धरली. याच कारणासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या पदच्युतीसाठी त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला होता. यावरून या प्रकरणाच्या विस्फोटकतेची कल्पना येते.


अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकांना अवघे दोन आठवडे उरले असताना, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले हुकूमाचे पत्ते बाहेर काढायला सुरुवात केली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडन यांचा धाकटा मुलगा हंटर बायडनचे खासकरून युक्रेन आणि चीनमधील कंपन्यांशी असलेले संबंध आणि त्याच्या व्यवहारांत जो बायडन यांचा कथित सहभाग यामुळे बायडन यांची प्रतिमा डागाळली आहे. ५० वर्षांचे हंटर बायडन यांचे ड्रग्जचे व्यसन, बाहेरख्यालीपणा आणि अन्य भानगडी यापूर्वीही चर्चेत आल्या असल्या, तरी बायडन यांनी आजवर भारतीय राजकीय नेत्यांप्रमाणे भूमिका घेतली होती. राजकीय नेत्याकडे गाडी आणि घरही नसणे आणि त्याच्या मुलांनी किंवा नातेवाइकांनी अल्पावधीत कोट्यवधींची माया जमवणे, समाजसेवक म्हणून वावरणार्‍या नेत्यांनी अचानक काहीशे कोटी रुपयांची संपत्ती जाहीर करणे, याचे आपल्याला काही वाटेनासे झाले आहे. याचे कारण, निवडणुकांत कार्यकर्त्यांना वडापाव खायला घालायचा किंवा सभेला गर्दी जमविण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करायची तरी प्रचंड खर्च येतो, जो निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादांत बसणे अशक्य असते. त्यातूनच मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांची निर्मिती होते. ही वस्तुस्थिती जगातील सर्व लोकशाही देशांत असली, तरी अमेरिकेसारख्या देशांमध्ये हे इतके उघडपणे चालत नाही. तिथे राजकीय पक्ष तसेच नेते निवडणूक प्रचारासाठी उघड-उघड प्रचंड प्रमाणात देणग्या गोळा करू शकतात. उदाहरणादाखल जो बायडन आणि डेमोक्रॅटिक पक्षाने केवळ येत्या निवडणुकीसाठी ४० कोटी डॉलर देणग्या गोळा केल्या आहेत. राजकीय नेते, जे बरेचदा शिक्षणाने वकील असतात, स्वतःच्या स्वयंसेवी संस्था काढतात. या संस्थांना सेवाभावी कार्यासाठी मिळणार्‍या देणग्या किंवा मग या नेत्यांना पुस्तकं लिहिण्यासाठी, भाषणं करण्यासाठी मिळालेली बिदागी यांचा त्यांनी खासगी कंपन्यांच्या केलेल्या कामाशी संबंध असतो.


ट्रम्प यांच्या तुलनेत जो बायडन यांचे स्वच्छ चारित्र्य आणि त्यांनी प्रामाणिकपणे भरलेले कर हा त्यांच्या प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण, जर हंटर बायडनवर होत असलेल्या आरोपांत तथ्य असेल, तर असे मानण्यास जागा आहे की, त्याच्या भ्रष्टाचाराचे फायदे बायडन यांनाही मिळत होते. या सगळ्याची सुरुवात गेल्या वर्षी झाली. हंटर बायडन यांनी एप्रिल २०१९मध्ये आपला लॅपटॉप पाण्यात भिजला म्हणून बदली केला. तो दुरुस्त करून घेणार्‍या दुकानदाराने प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही म्हणून त्याने तो उघडून बघितला असता हा लॅपटॉप माजी उपराष्ट्रपतींच्या मुलाचा असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यात हंटरच्या युक्रेनियन कंपनीसोबतच्या व्यवहारांची माहिती, त्याचे ड्रग्ज सेवन करतानाचे तसेच अन्य वादग्रस्त फोटो आणि माहिती असल्यामुळे दुकानदाराने हार्ड डिस्क कॉपी करून एक प्रत चौकशीसाठी एफबीआयला दिली, तर दुसरी डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील आणि न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर रुडी जुलियानी यांच्याकडे सोपविली. तेव्हापासून ट्रम्प यांनी हंटरचा विषय हाती घेतला. मतदानाला दोन आठवडे असताना त्यातील तपशील बाहेर येऊ लागला आहे, यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.


असे म्हटले जाते की, २०१४ ते २०१९या काळात हंटर बायडन युक्रेनमधील बुरिस्मा नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात काम करणार्‍या आणि गैरव्यवहाराचे आरोप झालेल्या कंपनीच्या संचालकपदावर होते. त्यासाठी त्यांना महिन्याला ८३ हजार डॉलरपर्यंत मानधनही मिळत होते. २०१६सालापर्यंत उपराष्ट्रपती म्हणून जो बायडन, बराक ओबामा सरकारच्या वतीने अमेरिकेचे युक्रेनशी असलेले संबंध हाताळत होते. सुमारे सात दशकं सोव्हिएत रशियाचा भाग असलेला युक्रेन शीतयुद्धाच्या अखेरीस फुटून निघाला असला, तरी रशियाच्या प्रभावाखाली राहिला होता. २००५ साली अमेरिका आणि युरोपीय महासंघाच्या छुप्या मदतीने घडवण्यात आलेल्या ‘केशरी’ क्रांतीद्वारे तो रशियाच्या प्रभावातून बाहेर होण्यात बर्‍यापैकी यशस्वी झाला, तर २०१४मध्ये झालेल्या आंदोलनानंतर युक्रेन रशियाच्या मांडलिकत्वातून बाहेर पडला. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन ब्लादिमीर पुतीन यांनी दक्षिण युक्रेनमध्ये स्थित; पण अनेक शतकांपासून रशियासाठी महत्त्वाच्या क्रिमिया प्रांतावर आक्रमण करून कब्जा मिळवला आणि त्याबद्दल युरोपीय महासंघ आणि ओबामा सरकारचा रोष ओढवून घेतला. यामध्ये जसे आत्मसन्मानाचे कारण होते, तसेच या भागात असलेल्या नैसर्गिक वायूच्या भांडाराचेही.


बुर्सिनासह अन्य कंपन्यांची भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चौकशी करणार्‍या व्हिक्टर शोकिन या सरकारी वकिलास युरोपीय महासंघ आणि अमेरिकेच्या सांगण्यावरून हटविण्यास युक्रेनचे तत्कालीन अध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांना भाग पाडण्यात आले होते. यामागे बुर्सिना प्रकरणाची चौकशी त्यांच्या हातून काढून घेण्याचा उद्देश असावा, असे आरोप केले जात आहेत. या निमित्ताने हंटर बायडन यांनी बुर्सिनाचे सल्लागार म्हणून काम करणार्‍या वादिम पॉझेर्स्कीची भेट उपाध्यक्ष असलेल्या जो बायडन यांच्याशी घालून दिली होती, असे पुढे आले आहे. पॉझेर्स्कीने ही भेट घडवून आणल्याबद्दल हंटरचे ई-मेलद्वारे आभार मानल्याचे स्पष्ट झाले आहे. या विषयावर प्रश्न विचारले असता जो बायडन उत्तर देत नसून, त्यांच्या प्रचारप्रमुखांनी अशी भेट झाल्याचे त्यांच्या अधिकृत कॅलेंडरमध्ये दिसत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण, जरी ही अनौपचारिक भेट असेल आणि तिचा युक्रेनबाबत अमेरिकेने घेतलेल्या निर्णयांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले, तर मग बायडन यांच्या चारित्र्यावर न धुतला जाणारा डाग पडतो. असे म्हटले जात आहे की, हंटरच्या युक्रेनमधील व्यवहारांपेक्षा चीनमधील व्यवहार अधिक स्फोटक आहेत. या गोष्टी बाहेर याव्यात म्हणून दबावतंत्राचा वापर करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाची मर्यादा ओलांडली. गेल्या वर्षी त्यांनी युक्रेन सरकारने हंटर बायडनबद्दल त्यांच्याकडे असलेली गोपनीय माहिती आपल्याला द्यावी, यासाठी अमेरिकेकडून संरक्षण क्षेत्रात होत असलेली मदत रोखून धरली. याच कारणासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या पदच्युतीसाठी त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला होता. यावरून या प्रकरणाच्या विस्फोटकतेची कल्पना येते.



गेल्या आठवड्यात ही बातमी रुपर्ट मरडॉक यांच्या ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने पहिल्या पानावर छापली असता, अमेरिकेत राजकीय भूकंप होणे स्वाभाविक होते. प्रचारात मागे पडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या दोन आठवड्यांमध्ये जोर लावला असून फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना आणि पेनिसिल्वेनिया या राज्यांमध्ये चुरशीची लढत निर्माण झाली आहे. हा विषय स्फोटक असून, बायडन यांच्या संभाव्य विजयाचे पराभवात रूपांतर करू शकतो हे ओळखून ‘सीएनएन’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’सारखी उदारमतवादी माध्यमं बायडन यांच्या मदतीला धावून आली. त्यांनी या ई-मेलच्या तसेच बायडन यांच्या भेटींची खातरजमा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करणे योग्य नसल्याची भूमिका घ्यायला सुरुवात केली. या बातमीत लोकांचे ई-मेल पत्ते आणि फोन नंबर आहेत, या सबबीखाली ट्विटरने ही बातमी शेअर करण्याचा पर्याय बंद केला, तर फेसबुकने ती सहज शेअर केली जाणार नाही, याची दक्षता घेतली. ही माहिती मिळवून अमेरिकन तपास यंत्रणांना पुरविण्यात रशियाचा तर हात नाही ना, याची चर्चा होऊ लागली. २०१६सालच्या निवडणुकांत हिलरी क्लिटंन यांना हरविण्यासाठी रशियन हॅकरनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे ई-मेल हॅक केले होते. या सर्व गोंधळामुळे समाज-माध्यमांच्या तटस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजमाध्यमांची निवडणुकीतील भूमिका हा एक स्वतंत्र विषय आहे. हंटर बायडन प्रकरण हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातातले ‘ट्रम्प कार्ड’ ठरण्याची शक्यता आहे.
@@AUTHORINFO_V1@@