‘अटल टनेल’ ठरणार गेमचेंजर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2020   
Total Views |


Narendra Modi_1 &nbs



पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (३ ऑक्टोबर) ‘अटल टनेल’चे उद्घाटन हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथे करणार आहेत. त्यानिमित्ताने सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या गेमचेंजर बोगद्याचा घेतलेला हा आढावा...


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (३ ऑक्टोबर) सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार्‍या ‘अटल टनेल’चे उद्घाटन हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथे करणार आहेत. या बोगद्यामुळे मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर ४६ किलोमीटरने कमी होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लडाख परिसरामध्ये लष्करी वाहतुकीसाठी आता जवळपास वर्षभर रस्ता खुला राहणे शक्य होणार आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रामुख्याने या प्रकल्पाने गती घेतली. एकीकडे चीन सीमावर्ती भागामध्ये रस्ते, महामार्गबांधणी वेगात करून पायाभूत सुविधांचा विकास करीत आहे, त्याला आता भारतानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेतदेखील भारत सीमावर्ती भागामध्ये करीत असलेल्या विकासकामांची माहिती दिली होती. चीनच्या वाढत्या आगळिकीचे तेही एक कारण आहेच. कारण, गेल्या काही वर्षांपासून चीनने सीमावर्ती भागात वेगवान बांधकामे करीत सामरिकदृष्ट्या काही प्रमाणात आघाडी घेतली होती. त्या तुलनेत यापूर्वीच्या सरकारांनी सीमावर्ती भागाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले होते. मात्र, आता ती कसर भरून काढण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत प्रामुख्याने चीनसीमेवर भारताचा वरचष्मा दिसणार, यात शंका नाही.


या बोगद्याची खरी संकल्पना होती ती माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात देशात एकूणच रस्ते आणि महामार्गबांधणीस सर्वोच्च प्राथमिकता देण्यात आली होती. त्यामुळे वाजपेयी सरकारच्या काळात अशा प्रकारचा बोगदा असावा, अशी कल्पना मांडण्यात आली आणि त्याची आधारशीला २६ मे, २००२ साली रचण्यात आली होती. त्यानंतर हे शिवधनुष्य पेलले ते ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘बीआरओ’ने. या पर्वतीय भागामध्ये प्रतिकूल हवामान, हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी, भूस्खलन आणि दरड कोसळणे आदी आव्हानांचा सामना करून ‘बीआरओ’ने बोगदा पूर्णत्वास नेला. त्यानंतर मोदी सरकारने २४ डिसेंबर, २०१९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बोगद्याला ‘अटल टनेल’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीला दिलेली ही मानवंदनाच होती. ‘अटल टनेल’ हा जगातील एक मोठा बोगदा ठरणार आहे. साधारणपणे ९.०२ किलोमीटरच्या या बोगद्यामुळे यामुळे मनाली ते लाहोल स्पिती हे वर्षभर एकमेकांशी जोडले जाणार आहे. यापूर्वी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी सुरू झाल्यावर लाहोल स्पितीचा संपर्क उर्वरित देशाशी तब्बल सहा महिने बंद होत होता. हा बोगदा पिरपंजाल डोंगररांगेत समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट उंचीवर आहे. घोड्याच्या नालेच्या आकाराच्या या बोगद्याची दक्षिण बाजू मनालीपासून २५ किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून तीन हजार ६० मीटर उंचीवर आहे, तर उत्तर बाजू लाहोल घाटामध्ये तेलिंग आणि सिस्सू गावाजवळ समुद्रसपाटीपासून तीन हजार ७१ मीटर उंचीवर आहे. या बोगद्यातून दररोज तीन हजार मोटारगाड्या आणि १५०० मालवाहू ट्रक ९० किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहतूक करू शकणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोगद्यात दर १५० मीटरच्या अंतरावर दूरध्वनीची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे दर ६० मीटर अंतरावर अग्निशमन यंत्र, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळेदेखील करण्यात आले आहे.


‘अटल टनेल’ हा भारतीय सैन्यासाठी कसा लाभदायी ठरणार आहे, याची माहिती लेहस्थित भारतीय सैन्याच्या 14 व्या कोअरचे प्रमुख मेजर जनरल अरविंद कपूर यांनी दिली. ते म्हणाले, “गेल्या २० वर्षांत भारतीय सैन्याने लॉजिस्टिकच्या गरजांवर पूर्णपणे नियंत्रण प्राप्त केले आहे. त्यामुळे अन्नधान्य, खाद्यपदार्थ, हिवाळ्यासाठीचे विशेष तंबू, कपडे, औषधे यासह दारुगोळ्याचाही वेगवान पुरवठा करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्याकडे सुमारे एक वर्षाचा साठा आहे.यामध्ये एक गोष्ट ध्यानात घ्यायची गरज आहे की, लेह-लडाखमध्ये तापमान उणे असते, त्यात जवळपास १८ ते २० हजार फूट उंचावरील भारतीय सैन्यास रस्ता आणि हवाईमार्गाने सामान पोहोचविले जाते आणि हे वाटते तेवढे सोपे काम नाही. मात्र, असे असतानाही भारतीय सैन्याने त्यावर आपले पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. आता ‘अटल टनेल’मुळे उर्वरित देशाची वर्षभर संपर्क साधणे, दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि अन्य संरक्षणविषयक साहित्याची वाहतूक करणे आता आणखी सोपे होणार आहे. ‘अटल टनेल’मुळे भारतीय सैन्याची वेगात हालचाल करण्याच्या क्षमतेतही मोठी वाढ झाली असल्याचे मेजर जनरल कपूर यांनी सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अटन टनेल’मुळे आता चिनी सीमेवर भारतीय सैन्याला शक्तिशाली असे ‘टी-९०’ हे रणगाडे तैनात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे एकूणच भारताची सैन्यशक्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सोबतच वेगवान वाहतूक शक्य असल्याने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लष्करी साहित्याची वाहतूकही करता येणार आहे.


‘अटल टनेल’ पूर्णत्वास गेल्यानंतर आता हिमाचल प्रदेशात आणखी एक बोगदा बांधण्याची तयारी करण्यात आली आहे. मनाली-लेह या मार्गाचे सामरिक महत्त्व लक्षात घेता शिंकुला पास येथे नवा बोगदा तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. हा नवा बोगदा साधारणपणे १६ हजार फूट उंचीवर आणि १३.५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. यामुळे प्रामुख्याने लेहसाठी १२ ही महिने चालू स्थितीत असलेला रस्तेमार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे यामुळे चीनसोबतच पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीही भारतीय लष्कराला मदत होणार आहे. एकूणच, सीमावर्ती भागामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोदी सरकार देत असलेले प्राधान्य अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. सत्तेत आल्यापासून चिनी सीमेवर पायाभूत सुविधांचा होणारा विकास हे चीनच्या पोटदुखीचे एक प्रमुख कारण आहे. कारण, आतापर्यंत केवळ चीनच पायाभूत सुविधांच्या विकासाचे जाळे विणून भारताला आव्हान देत होता. मात्र, भारतानेही त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे हिमालयातील चीनच्या मनसुब्यांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे.
 
 

@@AUTHORINFO_V1@@