गोड गळ्याच्या गायिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2020   
Total Views |

Suman Kalyanpur_1 &n
 
 
 
हिंदी-मराठी रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
शास्त्रीय संगीताचे उत्तम ज्ञान, मधुर आवाज आणि पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये असूनही, या गायिकेची प्रतिभा हवी तशी लोकांसमोर उलगडली नाही. ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘नाविका रे वारा वाही रे’ अशा सुमधुर गीतांनी त्यांनी मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केले. लता मंगेशकरांसारख्या आवाजाची प्रत त्यांच्या गायिकीला असल्याने लताबाईच गात असल्याचा भास बर्‍याचदा श्रोत्यांना झाला. १९६० ते ७०च्या दशकात त्या लोकप्रिय गायिका होत्या. हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, मैथिली, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, उडिया आणि पंजाबी व्यतिरिक्त त्यांनी अनेक भाषांमध्ये चित्रपटांची गाणी गायली. अशा गोड गळ्याच्या गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर.
 
 
 
सुमन कल्याणपूर म्हणजे सुमन हेमाडी, यांचा जन्म दि. २८ जानेवारी, १९३७ रोजी ढाका येथे झाला. त्यांचे वडील शंकरराव हेमाडी हे कर्नाटकच्या मंगळुरुमधील सुसंस्कृत सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होते. ढाकामधील ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये ते उच्च पदावर कार्यरत होते. बर्‍याच काळासाठी ढाका (आता बांगलादेश) येथे तैनात होते. सुमन या सहा भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या. १९४३ साली त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. तेव्हापासून सुमन यांनी संगीत प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्यांना चित्रकला आणि संगीतामध्ये रस होता. मुंबईच्या नामांकित सेंट कोलंबो हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यावर चित्रकलेच्या पुढील अभ्यासासाठी त्यांनी प्रतिष्ठित सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयात प्रवेश मिळविला. त्याचबरोबर त्यांनी पुण्याचे ‘प्रभात फिल्म्स’चे संगीत दिग्दर्शक आणि जवळचे मित्र पंडित केशवराव भोळे यांच्याकडून शास्त्रीय गायन शिकण्यास सुरुवात केली. सुमन यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला गाणे हा त्यांचा फक्त छंद होता. परंतु, हळूहळू त्यांची संगीतामधील रुची वाढली आणि त्यांनी उस्ताद खान, अब्दुल रहमान खान आणि गुरुजी मास्टर नवरंग यांच्याकडून संगीत शिक्षणास सुरुवात केली.
 
 
 
घरात संगीताची आवड असली, तरी सुमन यांच्या सार्वजनिकरीत्या गाण्यावर बंदी होती. १९५२ साली ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये त्यांना गाण्याची संधी मिळाली. या संधीसाठी त्या नाही म्हणू शकल्या नाहीत. १९५३ साली प्रदर्शित झालेल्या ‘शुक्राची चांदणी’ या मराठी चित्रपटासाठी त्यांना गाण्याची संधी मिळाली. या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक गायनाला सुरुवात केली. ‘शुक्राची चांदणी’मधील गाण्यांमुळे शेख मुख्तार इतके प्रभावित झाले की, त्यांनी सुमन यांना ‘मंगू’ चित्रपटासाठी तीन गाणी गाण्याची संधी दिली. परंतु, या चित्रपटामध्ये त्यांनी एकच गाणे गायले. अशाप्रकारे १९५४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मंगू’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
 
 
 
इस्मत चुगताई निर्मित आणि शाहीद लतेफ दिग्दर्शित ‘दरवाजा’ (१९५४) या चित्रपटासाठी संगीतकार नौशाद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पाच गाणी गायली. त्याच वर्षी सुमन यांनी ओ. पी. नय्यर यांचे ‘मोहब्बत कर लो, जी भर लो, अजी किसने रोका हैं’, हे प्रसिद्ध गाणे मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्याबरोबर ‘आर पार’ चित्रपटासाठी गायले. तलत महमूद यांनी सुमन यांचे गाणे एका मैफिलीत ऐकले. त्यांच्या गाण्याने ते खूप प्रभावित झाले. तलत यांनी त्यांच्यासोबत युगल गीत गायल्यानंतर चित्रपटसृष्टीने खर्‍या अर्थाने त्यांच्यासारख्या नवख्या गायिकेची दखल घेतली. जयकिशन, रोशन, मदन मोहन, एस. डी. बर्मन, एन. दत्ता, हेमंत कुमार, चित्रगुप्त, नौशाद, एस. एन. त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, कल्याणजी-आनंदजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्यांनी ८५० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली. १९६०च्या दशकात त्यांनी रफींसमवेत १४० पेक्षा जास्त युगल गीत गायले. सुमनजींचे मराठीतील पहिले गाणे वसंत प्रभू यांच्या ‘पसंत आहे मुलगी’ या चित्रपटामधील ‘भातुकलीचा खेळ मांडिला’ हे होते. ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘एकटी’, ‘मानिनी’ आणि ‘अन्नपूर्णा’ अशा मोजक्याच मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणे गायले. मराठी चित्रपटगीतांव्यतिरिक्त त्यांची भाव आणि भक्तिगीते प्रचंड गाजली.
 
 
 
लतादीदी आणि त्यांच्या आवाजातील साधर्म्याबद्दल कल्याणपूर खूप अस्वस्थ होत्या. त्यांनी एकदा उत्तर दिले होते की, “माझ्यावर लताबाईंच्या आवाजाचा खूप प्रभाव होता. माझ्या कॉलेजच्या काळात मी त्यांची गाणी म्हणायचे. रेडिओ सिलोननेही आवाजाच्या साध्यर्मामुळे त्यांचे नाव कधीच जाहीर केले नाही. अगदी रेकॉर्डिंगला कधीकधी चुकीचे नाव दिले. कदाचित, यामुळे अधिक संभ्रम निर्माण झाला.” १९५०-६०चे दशक हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ होता. त्यावेळी लताबाई रेकॉर्डिंगसाठी उपलब्ध नसल्यास किंवा निर्मात्यांना त्यांना प्रति गाणे 100 रुपये देणे परवडत नसल्यास ते गाणे सुमनजींकडून गायले जायचे. याच काळात रॉयल्टीच्या मुद्द्यांवरून लताबाईंनी रफींबरोबर गाण्यास नकार दिला. तेव्हा ही गाणी सुमनजींनी रफींसमवेत रेकॉर्ड केली होती. हिंदी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाण्यांसाठी त्यांनी तीन वेळा प्रतिष्ठित ‘सूर श्रृंगार संसद पुरस्कार’ मिळाला, तसेच २००९ साली महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘लता मंगेशकर पुरस्कारा’ने गौरवित केले. त्यांची गाणी आजही हिंदी-मराठी रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांच्या कारकिर्दीला सलाम!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@