बिहारचे निवडणुकीतले त्रांगडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2020   
Total Views |

bihar_1  H x W:


चिरागला अधिक जागा नाकारून शत्रुत्व घेण्याची चूक नितीश यांना भोवली आहे काय? कारण, जणू नितीश यांच्या पक्षाला धूळ चारण्यापलीकडे चिरागसमोर कुठलेही उद्दिष्ट दिसत नाही. हा अजब डावपेच असतो. त्यापेक्षा नितीशनी थोडे जुळवून घ्यायला हवे होते, असे वाटते. कारण, त्यामुळे एनडीएच्या मतांमध्येच अशी विभागणी होऊ शकली नसती. शिवाय, इथे फक्त नितीश यांना मिळालेल्या जागीच मतविभागणी व्हायचा धोका उभा ठाकलेला आहे.


अखेरीस कोरोना गेलेला नसताना बिहार विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्यासाठी सर्वच पक्षांची पळापळ सुरू झालेली आहे. कारण, सहा महिन्यांपूर्वी कोरोनाचा ‘लॉकडाऊन’ सुरू झाला आणि निवडणूक आयोगाने सर्व प्रकारच्या निवडणुका बेमुदत स्थगित करून टाकल्या. अगदी विधान परिषदेचे आमदार निवडायला किरकोळ मतदार असतात. तरीही त्याचेही मतदान रोखण्यात आलेले होते. पर्यायाने बिहार विधानसभेची मुदत संपल्यावर तिथे राष्ट्रपती राजवट लावली जाईल, अशीही भाषा व्यक्त केली जात होती. पण, कोरोना महामारीचे भय संपून एक एक व्यवहार पूर्वपदावर येत असताना, निवडणुका वेळेवर घ्यायचे निश्चित झाले. साहजिकच आळशी बसलेल्या कार्यकर्ते व नेत्यांना नवा तजेला आला. दोन महिन्यांपूर्वीच प्रत्येक पक्षात हालचाली सुरू झालेल्या होत्या. अनेकांनी तर टेलिकॉन्फरन्स मार्गानेही बैठका उरकून घेतल्या. आता त्याचा मुहूर्त झाला असून, हा लेख वाचला जात असताना पहिल्या फेरीतल्या मतदानाच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची मुदतही संपून गेलेली आहे. आणखी महिनाभरात त्या मतदानाचा निकालही यायचा आहे. कारण, अवघ्या तीन फेर्‍यांमध्ये मतदान व्हायचे असून तीन दिवसांनंतर मोजणी व्हायची आहे. त्यात तसा फारसा राजकीय रंग चढेल अशी अपेक्षा नव्हती. पण, दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये बेबनाव सुरू झाला आणि ऐन अर्ज भरण्याला आरंभ होताना बिहारच्या राजकारणात नवनवे रंग भरले जाऊ लागले. दुरंगी निवडणूक होईल, अशी अपेक्षा असताना तीन-चार नव्हेतर काही जागी पंचरंगी निवडणूकही होण्याची शक्यता आता दिसू लागली आहे. कारण, आधीपासून गृहीत धरलेला पट राजकीय नेत्यांनी पुरताच उधळूनच टाकला आहे. कोण सत्तेसाठी लढतोय, तर कोण अन्य कोणाला पाडायलाच मैदानात उतरला आहे, त्याचे समीकरण समजून घेतानाही डोके चक्रावून जाते आहे.



दिल्लीच्या सत्तेत एकत्र बसलेले जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टी यांना विधानसभेत एकत्र बसायचे नाही. किंबहुना, दोन वर्षांपूर्वीच भाजप व जदयु यांनी नितीश कुमार हाच विधानसभा निवडणुकीचा चेहरा आहे, अशी घोषणाच करून टाकलेली होती. पण, लोजपा किंवा चिराग पासवान यांना ते मान्य नव्हते आणि त्यांनी वारंवार आपली नाराजी बोलून दाखवलेली होती. फार कशाला, नित्यनेमाने चिराग पासवान नितीश सरकारवर हल्ले करीत होते. अगदी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही लक्ष्य बनवित होते. त्यामुळेच विधानसभेच्या वाटपात ते नसतील, असा आडाखा भाजप व नितीश यांनीही बांधलेला असावा. म्हणून तर अखेरच्या क्षणी पासवान यांनी एनडीएकडे पाठ फिरवताच दोन्ही पक्षांनी अर्ध्या अर्ध्या जागा वाटून घेतल्या आहेत. मात्र, आघाडीत यायला नकार देताना चिराग यांनी अटीच अशा ठेवलेल्या होत्या की, त्या मान्य होऊ नयेत. कारण, मागल्या विधानसभेत व अगदी गेल्या लोकसभेत त्यांच्या पक्षाच्या मतांची टक्केवारी समोर आलेली आहे. त्यामुळे त्यांना जागावाटपातला मोठा हिस्सा मिळू शकणार नाही, हे उघड गुपीत होते. सवाल होता विरोधी लालू आघाडीत पासवान सहभागी होणार का आणि एनडीए सोडणार का? तशी शक्यता नसल्याचे त्यांनीच जाहीर करून टाकले. पण, त्यालाही अशी पुस्ती जोडली की, भल्या भल्या राजकीय अभ्यासकांचे डोके चालेनासे झालेले आहे. आपली भाजपशी दोस्ती कायम आहे आणि आपल्याला बिहारमध्ये नितीश मुख्यमंत्रिपदी नकोत; हा चिरागचा हट्ट आहे. किंबहुना, राज्यामध्ये भाजपचे सरकार व मुख्यमंत्री असावा, असेही त्यांनी सांगितले आहे. पुढे जाऊन चिराग पासवान म्हणतात, “आपण ज्या जागा जिंकू ते बहुमत असू शकणार नाही. पण, आपला पाठिंबा भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी असेल.”



पण, भाजपने नितीश मुख्यमंत्री म्हणून मतदाराला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलेला असेल, तर बिहारमध्ये भाजप मुख्यमंत्री येणार कुठून? चिराग यांनी आणखी एक फुगा सोडलेला आहे. त्यांनी १४०पेक्षा अधिक उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केलेली आहे. पण, त्यातला कोणीही भाजपच्या विरोधात उभा ठाकणार नाही. उलट जिथे भाजपचा उमेदवार नाही आणि जागा नितीश कुमार यांच्या पक्षाला मिळालेली आहे, तिथेच लोजपा आपला उमेदवार उभा करणार आहे. याचा अर्थ अगदी साधा, सरळ, सोपा आहे. चिराग पासवान आपले काही आमदार निवडून आणावेत आणि सत्तेसाठी सौदेबाजी करावी; अशा भूमिकेत दिसत नाहीत. त्यांना जिंकायचे नसून नितीशना अपशकून करायचा आहे. आपल्याला सत्ता नको, पण, शत्रूला धुळीस मिळवायचे, ही सूडभावनाच असते. ती कशातून आली आहे, त्याचा खुलासा राजकीय नेते वा पक्ष देत नसतात. पण, इथे चिराग यांची भूमिका त्यांच्या पक्षासह नितीशच्या पक्षालाही घातक असली, तरी भाजपसाठी शुभसंकेत वाटतो. कारण, एनडीएतून फुटलेला पक्ष असूनही लोजपा भाजपसोबत आहे. मतविभागणीचा फटका भाजपला बसणार नाही, तर नितीश यांच्या उमेदवारांना बसणार आहे; अर्थात त्यासाठी चिराग पासवान किती तगडे व झुंज देऊ शकणारे उमेदवार मैदानात आणतील, त्यावरच सर्वकाही अवलंबून आहे. थोडक्यात, चिरागला अधिक जागा नाकारून शत्रुत्व घेण्याची चूक नितीश यांना भोवली आहे काय? कारण, जणू नितीश यांच्या पक्षाला धूळ चारण्यापलीकडे चिरागसमोर कुठलेही उद्दिष्ट दिसत नाही. हा अजब डावपेच असतो. त्यापेक्षा नितीशनी थोडे जुळवून घ्यायला हवे होते, असे वाटते. कारण, त्यामुळे एनडीएच्या मतांमध्येच अशी विभागणी होऊ शकली नसती. शिवाय, इथे फक्त नितीश यांना मिळालेल्या जागीच मतविभागणी व्हायचा धोका उभा ठाकलेला आहे.



निवडणुकीत तुम्ही किती जास्त जागा लढवता याला काहीही अर्थ नसतो. त्यापेक्षा लढवलेल्यापैकी किती जागा जिंकता, याला राजकारणात महत्त्व असते. २०१४साली आम आदमी पक्षाचे लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. पण, पदरात काय पडले? चार खासदार आणि तेही केजरीवाल यांचा संबंध नसलेल्या पंजाबमधून. उलट त्याच निवडणुकीत आपपेक्षा १०० जागा कमी लढवलेल्या भाजपने निर्विवाद बहुमतापर्यंत मजल मारली होती. कुठेही आघाडी करताना किंवा जागावाटपात, ज्या जागा जिंकण्याची खात्री असते, त्याच आपल्या पक्षाला मिळायला आग्रही असले पाहिजे. दहाबारा जागा कमी घेतल्याने बिघडत नाही. त्याचे दुःख करण्यापेक्षा जिंकून अधिक जागा आल्या त्याचे कौतुक असते. चिराग पासवान यांना लालूंचे बालेकिल्ले असलेल्या जागा देण्याने एनडीएत ठेवता आले असते का? तशा ५० जागा सहज वेगळ्या काढता आल्या असत्या आणि नितीश व भाजपला तितक्या कमी घेऊन एनडीए कायम राखता आली असती. पण, तसे झालेले नाही. किंबहुना, नितीश हाच लोजपा पक्षासाठी कळीचा मुद्दा होता आणि चिराग आता सुडाने वागताना दिसत आहेत; अर्थात निकाल लागल्यावरच राजकारणाचे बदलते रंग उलगडणार आहेत. पण, नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध करून एनडीए सोडण्याची घोडचूक नितीश यांनी केली, त्याचीच किंमत आजपर्यंत त्यांना मोजावी लागते आहे. मोदीद्वेषातून त्यांनी ती चूक केली होती; अन्यथा तेच कायम बिहारचे निर्विवाद नेता राहिले असते. ममतांना तोच धडा मिळायचा आहे. नववर्षाच्या पूर्वार्धात त्यांच्या राज्यातील विधानसभेचे मतदान व्हायचे असून, ममता मोदीद्वेषामुळे किती लोकप्रियता गमावून बसल्या, त्याचीच आकडेवारी तेव्हा आपल्या समोर येणार आहे. सध्या पुरते आपण बिहारमधल्या चिराग पासवान यांच्या अजब राजकीय भूमिकेचे रहस्य उलगडण्याचा प्रयास करूया.
@@AUTHORINFO_V1@@