पुस्तक परीक्षण : 'राम मंदिरच का?' हे घ्या पुरावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
Ram Mandir _1  
 

कोणताही स्वाभिमानी समाज आक्रमकांनी निर्माण केलेल्या अपमानास्पद खुणा सहन करत नाही. अरब आक्रमकांचा पूर्ण पराभव केल्यावर स्पॅनिश लोकांनी अरबांनी बांधलेल्या टोलेजंग वास्तू सरळ जमीनदोस्त केल्या. एवढेच नव्हे, रशियापासून मुक्तता मिळाल्यावर पोलंडने रशियन लोकांनी बांधलेले एक चर्च हटवले. रशियन हे आर्थोडॉक्स ख्रिश्चन, तर पोलंड हे कॅथलिक ख्रिश्चन म्हणजे पंथ वेगळा, पण धर्म एकच तरीही पोलंडला रशियन चर्च नको होते.

 

पण आम्हा हिंदू लोकांचे सगळेच न्यारे! तमाम हिंदूंना पूज्य असलेल्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवर एक मशीद उभी आहे. मूळ मंदिर उद्ध्वस्त करुन ती मशिद उभारण्यात आलेली आहे. तिथे पुन्हा मंदिर व्हावे, यासाठी हिंदूंना न्यायालयात जावे लागावे? इंग्रजांच्या राज्यात हिंदूंना न्याय मिळण्याची अपेक्षा नव्हतीच पण देश स्वतंत्र झाल्यावर ही समस्या सुटण्याऐवजी अधिकच जटिल व्हावी? आणि ती जटिल बनवणारे लोक आमच्याच देशातले लोकनियुक्त सत्ताधारी असावेत? हाच केवढा चमत्कार आहे!

 

हिंदू समाजातच जन्मलेले हे कृतघ्न लोक हिंदू समाजाच्या प्रभू रामचंद्रांबद्दलच्या श्रद्धेची, भक्तीची टिंगल करतात, 'राम' नावाची कुणी व्यक्ती झालेलीच नाही, असा बुद्धिवाद सांगून हिंदू समाजाचा 'बुद्धिभेद' करतात. शिवाय युक्तिवादही करतात की, 'मंदिरे खूप आहेत. त्यात आणखी भर कशाला? त्यापेक्षा वादग्रस्त ठिकाणावर भव्य रुग्णालय उभारा.' आक्रमक बाबराने केले नसेल एवढे नुकसान या कथित बुद्धिमंतांनी आपल्या कुत्सित, विखारी आणि विकृत लेखनाने केले आहे. सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो की, कोण खरे? राम मंदिरासाठी गेली ५०० वर्षे सातत्याने झगडणारे, प्राण देणारे रामभक्त खरे? की आधुनिक विद्याविभूषित असणारे हे विचारवंत खरे? सामान्य माणसाला जाडजूड आणि जड पांडित्यपूर्ण ग्रंथ वाचायला वेळ नसतो. पण सत्य जाणून घ्यायचे असते.

 

प्रस्तुत 'राम मंदिरच का?' हे पुस्तक लेखकांनी हा सर्वसामान्य वाचक डोळ्यासमोर ठेवूनच लिहिले आहे. सन १५२८ मध्ये मुघल आक्रमक बाबर याचा सेनापती मीर बांकी याने राम मंदिर उद्ध्वस्त केले. तिथपासून आजपर्यंतचा प्रचंड झगड्याचा इतिहास लेखकांनी अगदी साक्षेपाने, धावत्या भाषेत निवेदन केला आहे. अनेक विद्वत्तापूर्ण ग्रंथांचे सार लेखकांनी इथे मांडले आहे. चटकन संदर्भासाठी ते महत्त्वाचे आहे.
 

१९९२ साली संतप्त कारसेवकांनी ढाँचा उद्ध्वस्त केला. त्याचा 'आँखो देखा हाल' सांगणारा पत्रकार राजेश प्रभु-साळगांवकर यांचा लेख तसेच उत्खननतज्ज्ञ डॉ. के. के. महंमद यांचा लेख परिशिष्टात आहे. हे लेखही फार महत्त्वाचे आहेत. एकंदरीत डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परिक्षित शेवडे या पितापुत्र लेखकांनी मराठी वाचकांसाठी योग्य वेळी योग्य पुस्तक आणले आहे.

 

राम मंदिरच का?

लेखक: डॉ. सच्चिदानंद व डॉ.परिक्षित शेवडे

प्रकाशक : नावीन्य प्रकाशन

पृष्ठे :१४४ मूल्य १६०रु.

@@AUTHORINFO_V1@@