अरब-इस्रायल संबंध-‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोईका’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

vv1_1  H x W: 0



अरबस्तानातले ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान यांचे जीन्स एकाच कुळातले आहेत. म्हणजेच सगळ्यांचा मूळ पुरुष अब्राहम आहे, हे ज्यू पुराणकथांचं म्हणणं बरोबर आहे. पण, हे विज्ञान राजकारण्यांना पटायला वीस वर्षे जावी लागली.



रबितात अल् आलम अल् इस्लामी’ किंवा ‘मुस्लीम वर्ल्ड लीग’ ही एक अत्यंत श्रीमंत अशी इस्लामी संस्था आहे. १९६२ साली सौदी अरेबियाचे तत्कालीन युवराज फैझल (पुढे सुलतान बनले) यांनी तिची स्थापना केली. खुद्द मक्का शहरातच या संस्थेचं मुख्यालय असून, पवित्र कुराण आणि सुन्ना यांतील इस्लामच्या शिकवणुकीचा प्रचार-प्रसार करणं, हे तिचं कार्य आहे. जगात सर्वत्र शांती आणि सामंजस्य असावं आणि कोणत्याही प्रकारच्या कट्टरपणाशी शिक्षण, परंपरा, प्रसारमाध्यमं आणि सभा-संमेलनं यांच्याद्वारे लढा द्यावा, असा संस्थेचा कार्यक्रम आहे. तशी संस्था ‘एनजीओ’ म्हणजे अ-शासकीय संस्था आहे, पण जिची स्थापनाच मुळी युवराजाने केली, ती कितीशी ‘अ-शासकीय’ असेल, ही विचार करण्यासारखी बाब आहे. तात्पर्य, संस्थेकडे गडगंज निधी आहे, इस्लामी धर्मतत्त्वांचा प्रचार-प्रसार आणि आनुषंगिक सेवा कार्य, सेवा प्रकल्प यासाठी जगभरच्या असंख्य इस्लामी संस्था-संघटनांना ‘मुस्लीम वर्ल्ड लीग’ अधिकृतपणे मदत करीत असते. मुहम्मद बिन अब्दुल करीम ईसा हे गृहस्थ सध्या या संस्थेचे महासचिव असून, सौदी अरेबियाच्या केंद्रीय कायदेमंत्री या पदासह इतरही अनेक महत्त्वपूर्ण पदावंर त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे.


सौदी अरेबिया हे इस्लाम धर्माचं जन्मस्थान आहे
. सौदी राजघराणं, सौदी सरकार आणि सौदी जनता इस्लामच्या ‘सुन्नी’ या पंथाची अनुयायी आहे. जगातही सर्वत्र इस्लामधर्मीय जनता सुन्नी पंथाचीच मुख्यतः आहे, पण सौदी अरेबियात, सुन्नी पंथातही पुन्हा ‘वहाबी’ हा धर्मविचार अतिशय प्रबळ आहे. मुहम्मद इब्न अब्द अल् वहाब या इस्लामी धर्मपंडिताने हा विचार मांडला. त्यामुळे पाश्चात्य अभ्यासक त्याला ‘वहाबीझम’ असं म्हणतात. कुराण आणि सुन्ना यातील धर्माचरण जसंच्या तसं प्रत्यक्षात आणणं, त्यात काना, मात्रा, वेलांटीचाही फरक न करणं म्हणजे वहाबी विचार. त्यामुळे जगभरचे इस्लामचे अभ्यासक, यात अन्यधर्मीय अभ्यासकांबरोबरच खुद्द सुन्नी आणि शिया अभ्यासकही आले, यांचं असं म्हणणं आहे की, ‘मुस्लीम वर्ल्ड लीग’ ही संस्था मदत देताना ‘वहाबीझम’चा प्रचार करते.


आता इस्लामचा प्रचार
-प्रसार करणं म्हणजे अन्य संप्रदायांना विरोध करणं आलंच, पण ‘मुस्लीम वर्ल्ड लीग’ ख्रिश्चन धर्माच्या विरोधात उघडपणे तरी बोलत नाही. कारण, सौदी अरेबिया राजनैतिक पातळीवर अमेरिका, ब्रिटन आणि अन्य युरोपीय ख्रिश्चन देशांचा मित्र आहे. मग विरोध कोणाला? तर अर्थातच इस्रायलला. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दल गमाल नासर यांनी १९६०च्या दशकात, संपूर्ण अरब जगाचं नेतृत्व करीत, इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याचा चंग बांधला होता, सौदीने यात उघड भाग घेतला नाही. कारण, इस्रायल अमेरिकेचा मित्र होता. पण, सौदीची संपूर्ण सहानुभूती नासरला होतीच. इस्रायलकडून पुन:पुन्हा मार खाल्ल्यावर शहाणं बनून इजिप्तच्या अन्वर सादात या राष्ट्राध्यक्षाने १९८०च्या दशकात इस्रायलशी चक्क मैत्री केली, हे सौदीला फारसं पसंत नव्हतं, पण तो उघडपणे काही बोलला नाही, एवढंच.


पण बदल
, सतत बदल, हाच तर सृष्टीचा, निसर्गाचा नियम आहे आणि निसर्गाच्या चक्रात अपरिवर्तनीय सौदी अरेबियाही बदलतोय. २०११च्या अरबी क्रांतीने इजिप्तचा हुस्नी मुबारक आणि लीबियाचा मुहम्मद गद्दाफी यांच्या प्रदीर्घ राजवटी संपवल्या. सीरियातल्या आसद राजवटीविरुद्धचा संघर्ष आजही चालूच आहे. या गेल्या आठ-नऊ वर्षांत अरेबियन द्वीपकल्पातला अरबांचा शेजारी इराण आणि अमेरिकेसह पाश्चात्त्य जग यांचे बदलते रंग पाहून अरब देश शहाणे बनले आहेत.


माणूस एकदा शहाणा बनायला लागला की
, किती टोकाचा शहाणा बनतो पाहा. ‘मुस्लीम वर्ल्ड लीग’चे पदाधिकारी विविध ज्यू संस्थांशी संपर्क साधत आहेत. सौदीसह इतर अरब देशांना अचानक लक्षात आलं आहे की, पाश्चिमात्त्य देश तिकडे युरोपात आहेत, अमेरिका तर पार अटलांटिक समुद्रापल्याड आहे; इराण पर्शियन आखातापलीकडे आहे आणि इस्रायल तर आपल्या मध्यपूर्वेतलाच देश आहे. शब्द नीट लक्षात घ्या, बरं का; आपल्या मध्यपूर्वेतला आपला एक चांगला शेजारी देश, जो आपला व्यापार आणि संरक्षण या दोन्ही क्षेत्रात चांगला सहकारी बनू शकतो.


१९८५ साली मिखाईल गोर्बाचेव्ह हे सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले
. त्यांनी दोन शब्द वापरले होते, जे पुढे जगभर लोकप्रिय बनले. ‘ग्लासनोस्त’ म्हणजे ‘मोकळेपणा’ आणि ‘पेरेस्त्रोईका’ म्हणजे ‘परिवर्तन.’ ६७ वर्षे साम्यवादाच्या पोलादी पडद्यात बंदिस्त होऊन पडलेल्या रशियन समाजात गोर्बाचेव्हनी ‘ग्लासनोस्त’ म्हणजे ‘मोकळेपणा’ आणला आणि मग ‘पेरेस्त्रोईका’ म्हणजे ‘परिवर्तन’ वेगाने घडत गेले.

२०११ साली इजिप्त आणि लीबिया वगळता अन्य अरब देशांमधली लोकक्रांती अयशस्वी झाली. राजघराण्यांनी सभेवरची पकड कायम ठेवली. पण, शियापंथीय इराणची सुन्नीपंथीय अरब देशांशी असलेली दुष्मनी सतत वाढतच गेली आहे. एकाही अरब देशाकडे स्वतःची अण्वस्त्रं नाहीत, तर इराण अण्वस्त्रसंपन्न आहे. इराण उघडपणे अरब देश, अमेरिका, इस्रायल सगळ्यांशीच शत्रुत्व करतो. अशा इराणशी २०१५ मध्ये अमेरिकेच्या मावळत्या ओबामा सरकारने अण्वस्त्र करार केला. हा अरब देशांना धक्का होता. अरबी ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोईका’ तिथून सुरू झालं, असं म्हणायला हरकत नाही.


२०१६ साली बहारीनचा सुलतान हमद याने
‘हनुक्का’ हा ज्यू सण चक्क आपल्या राजधानीत साजरा केला. दाढी, पारंपरिक भल्यामोठ्या हॅट्स घातलेले ज्यू दाबी म्हणजे धर्मगुरू आणि डोक्यावर चद्दर आणि पायघोळ झगे घातलेले अरबी मौलवी एकमेकांच्या हातात हात घालून पारंपरिक नृत्याच्या ठेक्यावर नाचले. त्यांनी एकत्र प्रार्थना केल्या.


२०१८च्या ऑक्टोबरमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी उमान
(ओमान) या अरब देशाला अधिकृत भेट दिली. या संदर्भात ‘अल् जझिरा’ या वाहिनीने उमानी परराष्ट्रमंत्री युसूफ बिन अलावी बिन अब्दुल्ला यांची मुलाखत घेतली. तेव्हा ते म्हणाले, “का नाही? नेतान्याहूंनी उमानला भेट देण्यास कोणती हरकत आहे? शेवटी इस्रायल हा आम्हा मध्यपूर्वेतल्या देशांपैकीच एक देश आहे आणि भविष्यात आम्ही नवा प्रारंभ करण्याची गरज आहे.”


२०१८च्या अखेरीस
, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल् नहयान यांनी जाहीर केलं की, येतं वर्ष म्हणजे २०१९ हे वर्ष आम्ही ‘सहनशक्ती वर्ष’ ‘इयर ऑफ टॉलरन्स’ म्हणून साजरं करणार आहोत. त्यानुसार २०१९च्या फेब्रुवारीत खुद्द पोप फ्रान्सिस यांनी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीला भेट दिली. इस्लामच्या इतिहासात प्रथमच ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च प्रमुखाने अरबी भूमीवर पाय ठेवला. बिन झायेद यांनी यावेळी घोषणा केली की, “या प्रीत्यर्थ अबुधाबी शहरात, एकाच परिसरात एक सिनेगॉग, एक चर्च आणि एक मशीद बांधण्यात येईल. कारण, शेवटी आम्ही एकाच अब्राहमिक कुटुंबातले आहोत.” ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान हे अब्राहम या माणसाला आपला मूळ पुरुष मानतात. त्याला उद्देशून हा उल्लेख होता. ‘जेनेटिक्स’ या शास्त्रातले वैज्ञानिक गेली किमान दोन दशकं हेच वैज्ञानिक सत्य सांगत होते की, अरबस्तानातले ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान यांचे जीन्स एकाच कुळातले आहेत. म्हणजेच सगळ्यांचा मूळ पुरुष अब्राहम आहे, हे ज्यू पुराणकथांचं म्हणणं बरोबर आहे. पण, हे विज्ञान राजकारण्यांना पटायला वीस वर्षे जावी लागली.


त्यानंतर आता अरबी पत्रपंडित पुढे सरसावलेत आणि त्यांनी खुद्द कुराणातून दाखले शोधून काढलेत की
, पाहा कुराणात अमक्या जागी ज्यू लोकांना चांगलं म्हणण्यात आलं आहे. जेरूसलेम या पवित्र स्थानी त्यांनाही वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, असं म्हणण्यात आलं आहे. प्रेषित महंमदांनंतर जो इस्लामचा प्रमुख बनला, त्या खलिफा उमरने इ.स. ६३७ मध्ये ज्यूंना मुद्दाम बोलावून जेरुसलेममध्ये वसवलं. त्या आधी, पाचशे वर्षांपूर्वी रोमन सुभेदाराने त्यांना पूर्ण हद्दपार केलं होतं, इत्यादी.

एका सौदी अरेबियन राजपुत्राने, नाव जाहीर न करता व्यक्त केलेली प्रतिक्रिया हजारो शब्दांचा ऐवज दोन वाक्यांत सांगते. तो म्हणतो, “अहो, इराणी लक्ष्ये टिपण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून कोण विमाने चालवणार आहे?”


तर अशा रीतीने इस्लामची जन्मभूमी असणारा अरबस्तान स्वप्नातून वास्तवात येतोय
. २०२० मध्ये आणखी बर्‍याच परिवर्तनांची चित्रं दिसू लागली आहेत.

@@AUTHORINFO_V1@@