पुतण्याचा डाव, काकांना पेच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019   
Total Views |




शनिवारच्या वर्तमानपत्रांची शरद पवारांना आंदण मिळालेली हेडलाईन अजितदादांनी अलगद हिरावून घेतली होती
. कात्रजसारखा खंडाळ्याचा घाट चढून शरद पवार पुण्याला पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले नाहीत, इतक्यात ईडी’ सोडून त्यांना पुतण्याचा पत्ता सांगण्याची नामुष्की आली. ‘ईडी’चे पुराण कुठल्या कुठे गायब झाले आणि ‘अजितदादा’ नावाचे नवे पुराण माध्यमे आळवू लागली. दोन-तीन दिवस अनेक सराव करून पवारांनी घडवलेल्या नाट्यावर अजितदादांनी आपला निरर्थक राजीनामा बोळ्यासारखा फिरवला आणि पुतण्याचा डाव काकांसाठी पेच होऊन गेला.




शिखर बँक घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यात शरद पवार यांचे नाव आल्यानंतर खळबळ माजली होती
. कारण, सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनात पवारांवर अनेक आरोप झाले, तरी कुठली तक्रार वा गुन्हा त्यांच्या विरोधात कधी दाखल झाला नव्हता. अशा पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आपल्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे पवार विचलित झाले, तर नवल नव्हते. कारण, त्यातील गांभीर्य राजकीय विश्लेषकांना कळत नसले तरी पवारांना नेमके कळत होते. हा विषय राजकारण खेळण्याचा नाही, तर त्यात आपले शेपूट अडकलेले आहे, हे त्यांना पक्के जाणवलेले आहे. कारण, राजकीय सूडबुद्धीने आजवर कोणीही पवारांना कशातही गुंतवू शकलेला नाही. तशी नुसती शक्यता असली तरी पवार पूर्वकाळजी घेऊन त्यातून आपली सहीसलामत सुटका करून घेत आलेले आहेत. सत्तेत कुठलाही पक्ष असो किंवा पवार विरोधी पक्षात बसलेले असोत, त्यांनी कधी असे बालंट आपल्यावर येऊ दिलेले नाही. म्हणूनच उच्च न्यायालयाचा आदेश व नंतर तडकाफडकी दाखल झालेल्या गुन्ह्यातील गांभीर्य पवारांना पूर्णपणे ठाऊक आहे. मात्र, अशा प्रसंगी तोंड लपवायलाही जागा शिल्लक नसल्याने राजकीय आतशबाजी करून तात्पुरती त्यातून सुटका करून घेण्याला प्राधान्य होते. कारण, सर्वांना ‘मॅनेज’ करण्यात तरबेज असलेल्या पवारांना न्यायालयाला गुंडाळणे शक्य नव्हते. साहजिकच चिदंबरम वा शिवकुमार यांच्याप्रमाणेच या घटनेचे राजकीय भांडवल करण्यापासून त्यांनाही पर्याय नव्हता. मात्र, त्यासाठी त्यांनी निवडलेली वेळ व पवित्रा चक्रावून सोडणारा होता. कारण, शुक्रवारी पवारांनी केलेला राजकीय तमाशा वरकरणी कितीही ‘यशस्वी’ झालेला दिसला, तरी तो ‘मास्टरस्ट्रोक’ अजिबात नव्हता. तो घाईगर्दीने कौटुंबिक समस्येवर शोधलेला तोडगा होता आणि काही तासांतच अजितदादांनी त्यावर पुरता बोळा फिरवून टाकला.



शुक्रवारी साधारण दुपारी ४च्या सुमारास पवारांनी विजयी मुद्रेने माध्यमांच्या कॅमेर्‍यासमोर येऊन आपण
‘ईडी’ला क्षमा केल्याच्या थाटात निवेदन दिले आणि ते पुण्याच्या अतिवृष्टी पीडितांना भेटायला निघून गेले. समोरचा देखावा बघून हुरळून जाणार्‍या माध्यमांच्या प्रतिनिधी व भुरट्या पत्रकार शहाण्यांना तितके पुरेसे होते. त्यांनी पवारांचा तो ‘मास्टरस्ट्रोक’ जाहीर करून क्रिकेटलाही लाजवणारे समालोचन आरंभले होते. पण, नियतीने पुण्याच्या वाटेवर खंडाळ्याच्या जागी कात्रजचा घाट आणून ठेवल्याचा कोणाला पत्ता होता? पवार ‘विजयीवीर’ म्हणून पुण्याला रवाना झाल्यानंतर अकस्मात एक बातमी अशी आली की, खंडाळा घाटाऐवजी आपला विजयवीर कात्रजच्या घाटात थेट कसा पोहोचला, तेच माध्यमवीरांना समजेना. कारण, पवार पुण्याकडे रवाना झाले आणि तासाभरात अजितदादांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची बातमी झळकली. विधानसभेची मुदत संपत आली असताना आणि पक्षांतर करायचे नसेल, तर राजीनामा देऊन अजितदादांनी साधले काय? याचे उत्तर कुठल्याही विश्लेषकाकडे नव्हते आणि खुद्द अजितदादा मोबाईलवरही ‘नॉट रिचेबल’ झालेले होते. पत्रकारांना सोडाच, खुद्द काकांनाही पुतण्याचा फोन लागत नव्हता आणि ‘दादा कुठे आहेत?’ हीच रात्री उशिरापर्यंतची सर्वात मोठी हेडलाईन होऊन गेली. थोडक्यात, शनिवारच्या वर्तमानपत्रांची शरद पवारांना आंदण मिळालेली हेडलाईन अजितदादांनी अलगद हिरावून घेतली होती. कात्रजसारखा खंडाळ्याचा घाट चढून शरद पवार पुण्याला पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले नाहीत, इतक्यात ईडी’ सोडून त्यांना पुतण्याचा पत्ता सांगण्याची नामुष्की आली. ‘ईडी’चे पुराण कुठल्या कुठे गायब झाले आणि ‘अजितदादा’ नावाचे नवे पुराण माध्यमे आळवू लागली. दोन-तीन दिवस अनेक सराव करून पवारांनी घडवलेल्या नाट्यावर अजितदादांनी आपला निरर्थक राजीनामा बोळ्यासारखा फिरवला आणि पुतण्याचा डाव काकांसाठी पेच होऊन गेला.



पहिली गोष्ट म्हणजे
, दादांचा राजीनामा व्यवहारत: किंवा राजकीय कारणास्तव निरर्थक आहे. कारण, विधानसभेची मुदत जवळपास संपलेली आहे आणि पक्षांतर करायचे नसेल, तर आमदारकीचा राजीनामा देण्याचे काहीही कारण नाही. अगदी लोकसभा लढवायची म्हणूनही राजीनामा देण्याचे कारण नाही. मग त्याला इतके महत्त्व कशाला आहे? तर असा राजीनामा काकांना अंधारात ठेवून दिला, म्हणजेच काहीतरी गफलत आहे, इतकेच अजितदादांना त्यातून दाखवायचे होते. हत्तीचे ‘सुळे’ दिसतात, पण चावायचे दात दिसत नाहीत, तशीच ही कहाणी नाही का? अन्यथा कशावरही ज्ञानप्रबोधन करणार्‍या सुप्रियाताई ‘ईडी’च्या गुन्ह्याविषयी मौन धारण करून आहेत आणि अजितदादा गायब झाल्यापासूनही त्यांनी कुठे अवाक्षर उच्चारलेले नाही. दादा गायब आणि ताईंचे मौन, यात कुठेतरी मोठी गफलत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पवार कुटुंबातील धुसफूस पोतडीतून साप डोकवावा, तशी जाणवते आहे. आताही अशी माहिती आहे की, रोहित या नातवाला विधानसभेत आणून पवार राजकीय वारसाच त्याच्याकडे सोपवण्याच्या विचारात आहेत. म्हणून दुसरा नातू पार्थ व त्याचे पिताश्री अजितदादा अस्वस्थ होते. यातून ताई-दादा यांच्यातही खटके उडाल्याच्या अफवा होत्या. बारामतीतून पार्थला उमेदवारी देण्यावरूनही वाद झाल्याचे म्हटले जाते. हा विषय कौटुंबिक बॉम्बस्फोट होण्याचाही धोका निर्माण झाल्याची कुजबूज होती. तो स्फोट रोखण्यासाठीच कुटुंबप्रमुखाने ‘ईडी’चे नाट्य घडवून घरगुती नाटकावर पडदा पाडायचा प्रयत्न केला होता काय? नसेल तर त्या नाट्याचा राजकीय लाभ शून्य होता. फार कशाला ‘ईडी’विरोधात रंगलेल्या नाट्याने पवारांनी उत्तम संधी गमावलेली आहे. कारण, मतदानाला आणखी २५ दिवस असून आता त्या नाट्यातील हवा गेलेली आहे. ‘ईडी’ही त्यांना आणखी महिनाभर नोटीस समन्सही पाठवणार नाही. म्हणजेच ‘ईडी’ने दाखल केलेला गुन्हा हा हुकूमाचा राजकीय पत्ता पवारांनी अवेळी खेळून वाया घालवला आहे. पण का?



‘ईडी’च्या कार्यालयात जाण्याचे आगावू नाटक रंगवून आपण हुकूमाचा पत्ता अकारण अवेळी वाया घालवतोय, हे पवारांना नक्की कळू शकते. तरीही त्यांनी तो पत्ता टाकलाच. कारण, घरातील धुसफूस चव्हाट्यावर येण्याची चिंता अधिक मोठी होती. सभापती बागडे म्हणतात, “दोन दिवसांपूर्वीच अजितदादांनी ‘कुठे आहात’ अशी विचारणा करणारा फोन केला होता. म्हणजेच त्यांनी तो फोन केला, त्याच दिवशी पवारांनी ‘ईडी’च्या कार्यालयात २७ सप्टेंबरला जाण्याची घोषणा केल्याचे लक्षात येईल. तो राजीनामा किंवा तत्सम काही स्फोटक कृती करण्यापासून अजितदादांना रोखण्यासाठी पवारांनी अवेळी ‘ईडी’चे खुसपट काढून हे नाट्य रंगवलेले नाही काय? कारण, त्यांच्या नावाचा उच्च न्यायालयाच्या आदेशात उल्लेख येऊन महिना झाला आहे. तेव्हा त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यावर अजितदादा वगैरे मंडळी उच्च न्यायालयात स्थगिती मागायला गेली, तेव्हाही उच्च न्यायालयाच्या आदेशात साहेबांचे नाव होते. सर्वोच्च न्यायालयाने नकार देऊन उच्च न्यायालयाचा आदेश कायम केला आणि मुंबई पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला. तेव्हाही साहेब शांत होते. पण, पोलिसांच्या गुन्ह्याची दखल घेऊन ‘ईडी’ने नुसता एफआयआर दाखल केल्यावर साहेबांना खडबडून जाग आली. तेव्हा घरातला कलह शिगेला पोहोचला होता, हे लक्षात घेतले पाहिजे. अशा पार्श्वभूमीवर पुतण्याला वडीलधारा म्हणून रोखता येत नसेल, तर पवारांनी जाहीर तमाशाने त्यावर पडदा पाडण्याचा खेळ रंगवला. त्यांच्या कुठल्याही मूर्खपणाला मुरब्बी धूर्तपणा ठरवण्यात हयात घालवलेल्यांना त्यात ‘मास्टरस्ट्रोक’ दिसला तरी नवल नव्हते. पण, तासाभरातच अजितदादांनी गुपचूप राजीनामा देऊन काकांचा ‘ईडी’बार पुरता ‘उडवून’ दिला. त्या बातमीने ‘ईडी’चा दोन दिवस धुमसणारा बार ‘फुसका’ ठरला आणि पूरग्रस्तांना बुडायला सोडून काका शनिवारी सकाळीच अजितला शोधायला पुन्हा मुंबईकडे धावले. थोडक्यात, पुतण्या असा डाव खेळला की, माध्यमांशी एकही शब्द बोलल्याशिवाय त्याने काकाला पेचात पकडले.

@@AUTHORINFO_V1@@