पुलवामा आणि पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2019   
Total Views |



२००८च्या अखेरीस मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि अवघ्या चार महिन्यांमध्ये लोकसभेच्या बहुतांश सर्व जागा काँग्रेस
-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. किंबहुना, कुठलेही सबळ कारण वा कर्तृत्व नसतानाही युपीएला पुन्हा सत्ता मिळू शकली होती. त्याचे करण पुलवामाप्रमाणेच कसाबचे हत्याकांड होते काय? आपणच प्रस्थापित केलेल्या सिद्धांताची ग्वाही देण्यासाठी पवार पुलवामासारखी घटना असा उल्लेख करीत आहेत काय?



महागळतीमुळे विरोधकांच्या शिडातली हवा निघून गेलीय
, हे सगळेच अभ्यासक मान्य करीत आहेत. कारण, शनिवारी आयोगाने जी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली, त्यात कुठून कोणाला उभे करावे, हा विरोधकांसाठी गहन प्रश्न झाला आहे. प्रत्येक उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत स्वपक्षातत कोण शिल्लक उरलेले असतील, याचीच खात्री आज काँग्रेस व राष्ट्रवादी अशा पक्षांना राहिलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर वयोवृद्ध नेते शरद पवार एकाकी झुंजताना दिसत आहेत. ‘अभी तो मैं जवान हूं,’ असेही त्यांनी एक सभेत बोलून दाखवले. पण, यानिमित्ताने पवार जे काही मन ‘मोकळे’ बोलत सुटलेले आहेत, त्यांचे मनोगत अनेकांना थक्क करून सोडणारे वाटल्यास नवल नाही. मात्र, त्यातून वय वाढले म्हणून स्वभाव अजिबात बदलत नसल्याची ग्वाहीच पवारांनी दिलेली आहे. अजून आपण थकलेलो नाही आणि ‘अनेकांना घरी बसवायचे आहे’ हा निर्धार त्यांनी अशाच एका प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला. त्याकडे किती पत्रकार भाष्यकारांनी गंभीरपणे बघितले आहे? पक्ष उद्ध्वस्त होऊन पडलाय. अस्तित्वाची लढाई समोर उभी आहे आणि खांद्याला खांदा लावून लढायला कोणी उमदा तरुण सहकारी सोबत राहिलेला नाही. पण, तरीही पक्षाची नव्याने उभारणी करण्यापेक्षाही पवार कोणाकोणाला घरी बसवायचे आहे, त्याच्याच चिंतेत पडलेले आहेत.



जे कोणी साथ सोडून गेले
, त्यांना धडा शिकवण्याची जिद्द कायम आहे. पण, त्यांना धडा शिकवताना राष्ट्रवादी नावाचा त्यांचा पक्ष पुन्हा नव्याने उभारी घेऊन कसा उभा राहाणार आहे? अशा दुर्दैवी परिस्थितीतही टिवल्याबावल्या करून लक्ष वेधून घेण्याची ही धडपड कौतुकाची वाटण्यापेक्षा केविलवाणी भासू लागली आहे. कारण, चटपटीत बोलण्यासाठी ताळतंत्र सोडायला पवार म्हणजे धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे नाहीत. इतकेही भान नसावे का? असते, तर पुन्हा पुलवामासारखी घटना घडली नाही, तर राज्यात सत्तांतर होण्याची भाषा त्यांनी नक्कीच वापरली नसती. अशा बोलण्यातून आपण कोणता संदेश जनतेला देतो वा कुठला संकेत पाठवला जातो, याचेही भान इतक्या अनुभवी नेत्याला नसावे का?



पुलवामा येथील पाक घातपात्यांचा हल्ला ४० भारतीय जवानांना शहीद करून गेला
, तेव्हा सरकार झोपले आहे काय, असा सवाल विरोधकांनीच पंतप्रधानांना विचारला होता. पुढे त्या हल्ल्याला चोख उत्तर म्हणून भारतीय लष्कर वायुदलाने बालाकोटचा प्रतिहल्ला केल्यावर शंका घेणारे भारतीय विरोधी पक्षच होते. पुढे त्याचा जनमानसावर प्रभाव पडला, तेव्हा विरोधकांना आपल्या मूर्खपणाची कल्पना आली आणि पुलवामाच्या घटनेवरच शंका काढणे सुरू झाले. त्याचीच किंमत लोकसभा मतदानात विरोधकांनी मोजलेली आहे. कारण, पुलवामाचा हल्ला जनमानसात सहानुभूती निर्माण करण्यासाठीच झाला, असा एकूण विरोधी पक्षाचा सूर होता. त्यातला गर्भितार्थ असा होता की, जाणीवपूर्वक सहानुभूती मिळवण्यासाठी भारतानेच तो घातपात घडवून आणला आणि नंतर चोख प्रत्युत्तर देऊन मतांची बेगमी केली. पवार त्याच जुन्या आरोपांना नवी फ़ोडणी देऊन विधानसभेपूर्वी पुलवामासारखी घटना घडली नाही, तर असे बोलत आहेत. याला ‘थिल्लरपणा’ म्हणतात. जो त्या काळात संजय निरूपम यांच्यासारख्या छचोर काँग्रेस नेत्याने केलेला होता आणि पुढे राजकीय हत्यार म्हणून बाकीच्या विरोधी पक्षांनी वापरला होता, त्याची सुरुवात पवारांनी केलेली नव्हती. पण, आज आधीच त्यांनी तशी सुरुवात करून ठेवलेली आहे. ती होऊ घातलेल्या पराभवाची मानसिक तयारी म्हणावी लागते. पण, त्याच संदर्भाने पवारांना आणखी एक प्रश्न विचारला गेला पाहिजे. अशा रितीने देशाशी घातपाती डाव खेळून निवडणुका जिंकता येतात, हा सिद्धांत आला कुठून व प्रस्थापित कोणी केला? कधी हा सिद्धांत अस्तित्वात आला? २००८ साली नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबईमध्ये पाकिस्तानातून कसाब टोळी पोहोचली होती आणि त्यांनी दक्षिण मुंबईत दीडशेहून अधिक लोकांचे मुडदे पाडले. ते खरेच पाकिस्तानातून आलेले हल्लेखोर होते की त्यांना तत्कालीन युपीए सरकारने आमंत्रण देऊन निवडणुका जिंकण्याचा डाव खेळलेला होता? कारण, त्यावेळी पवार स्वत:च युपीए सरकाचे एक ज्येष्ठ मंत्री होते आणि त्या हल्ल्यानंतरही मुंबईसह महाराष्ट्रात लोकसभेसाठी काँग्रेसने प्रचंड यश संपादन केले होते ना?



२००८च्या अखेरीस मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि अवघ्या चार महिन्यांमध्ये लोकसभेच्या बहुतांश सर्व जागा काँग्रेस
-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. किंबहुना, कुठलेही सबळ कारण वा कर्तृत्व नसतानाही युपीएला पुन्हा सत्ता मिळू शकली होती. त्याचे करण पुलवामाप्रमाणेच कसाबचे हत्याकांड होते काय? आपणच प्रस्थापित केलेल्या सिद्धांताची ग्वाही देण्यासाठी पवार पुलवामासारखी घटना असा उल्लेख करीत आहेत काय? कारण, जनहितार्थ बेधडक खोटे बोलण्यासाठी पवार ख्यातकीर्त आहेत. १९९३ सालातही मुंबईत एकामागून एक बॉम्बस्फोटांची मालिका घडली व शेकडो लोकांचा त्यात हकनाक बळी गेलेला होता, तर तेव्हाही पवारांनी काही तासात दूरदर्शनवर जनतेची दिशाभूल करण्यासाठी धडधडीत खोटी विधाने केलेली होती. १२ स्फोट झालेले असतानाही मुस्लीम वस्तीत १३ स्फोट झाल्याचे असत्य जनतेच्या गळी मारण्याचे काम मुख्यमंत्री म्हणून पवारांनी केलेले होते. सगळे स्फोट हिंदू वस्तीत झाले म्हणून मुस्लिमांवरच संशय घेतला जाईल, म्हणून न झालेला स्फोट मुस्लीम वस्तीत झाल्याची लोणकढी थाप पवारांनी घटनात्मकपदी विराजमान असताना ठोकलेली होती. असा माणूस कुठलीही घटनात्मक जबाबदारी नसताना किती खोटे बोलू शकतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, अशा थिल्लर व छचोर राजकारणातून त्यांची विश्वासार्हता संपत गेली आणि आता तर त्यांचे निकटवर्ती व सहकारीही पवारांवर विश्वास ठेवायला राजी नाहीत. अशी दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. पण, म्हणून टिवल्याबावल्या करण्याची खोड संपलेली दिसत नाही; अन्यथा आपल्या पाच वर्षांचा हिशोब देत यात्रा करणार्‍या मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘हेटाळणीयुक्त हिशोबनीस’ वा ‘खतावणीस’ असा उल्लेख पवारांनी केला नसता. पक्षाची प्रथमच वा नव्याने उभारणी करणार्‍यांपाशी सकारात्न्मक दृष्टी असायला हवी. पवारांचे दुर्दैव असे की, त्यांच्यापाशी कायम विघ्नसंतुष्टताच राहिलेली आहे. त्यामुळे उभारण्यापेक्षा उद्ध्वस्तीकरणातून त्यांची राजकीय वाटचाल झालेली आहे. ते नवे काही निर्माण करू शकले नाहीत. पण, यशवंतराव चव्हाण व वसंतदादांनी उभारलेला काँग्रेसचा भक्कम किल्ला मात्र त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला आहे.



भाजपची नव्याने उभारणी करताना नरेंद्र मोदी वा अमित शाहांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांना खरोखरच घरी बसवले किंवा निवृत्त होण्यास भाग पाडले
. ही वस्तुस्थिती कोणी नाकरू शकणार नाही. पण, त्यांनी तशी भाषा कधी वापरली नाही. त्यांच्या जागी उमदे नव्या पिढीचे पर्यायी नेतृत्व आपल्या पक्षातून असे पुढे आणलेले आहे की, ज्येष्ठ वा जुन्या नेत्यांना बाजूला होण्याखेरीज पर्याय राहिला नाही. या नव्या पिढीच्या भाजप नेत्यांनी कोणाला घरी बसवण्याचे राजकारण केले नाही, तर पक्षाला नव्याने उभारी देण्याचे प्रयास केले आणि त्यातून नवे नेतृत्व उदयास येत गेले. ज्येष्ठांच्या अभावी पक्षाचे भवितव्य काय, असा प्रश्न भाजपला पडला नाही. मतदारालाही पडला नाही. याच्या उलट छत्रपती उदनयराजे यांचे वक्तव्य लक्षात घेतले, तर पवारांच्या राजकीय वाटचालीची दिशा व हेतू लक्षात येतो. अनेकांना पाठ थोपटून वा संधी देऊन संपवण्याची किमया हे पवारांचे राजकारण झालेले होते. छगन भुजबळ वा मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते-पाटील ही पुढली पिढीच होती. त्यांना भाजपने वा अन्य कुणा विरोधी पक्षाने घरी बसवलेले नाही. असे सहकारी घरी बसवले जाण्यापेक्षा अन्य पक्षात आपापले स्थान शोधायला निघून गेले. मग आणखी कोणाला पवार घरी बसवणार आहेत आणि आपल्याच सहकार्‍यांना, अनुयायांना घरी बसवण्यातून नव्याने राष्ट्रवादी पक्षाची उभारणी कशी होणार आहे? आपण नव्या दमाचे हिंमतीचे व उमेदीचे नेते निर्माण करू, अशी भाषा पवारांनी एकदाही वापरलेली नाही. आपण अजून म्हातारे झालेलो नाही. अजून अनेकांना घरी बसवायचे आहे, हा निर्धार मनातले सत्य सांगून जाणारा आहे. तो समजून घ्यायला पद्मसिंह पाटील वा मधुकर पिचड यांना उशीर झाला. अमोल कोल्हे वा धनंजय मुंडे यांनाही पन्नाशी-साठी ओलांडल्यावर त्याची प्रचिती येणारच आहे. मात्र, तेव्हा खूप उशीर झालेला असेल. वयाच्या ७८व्या वर्षी माणूस नवे धुमारे शोधण्यापेक्षा अजून कुठल्या फांद्या तोडायच्या राहिल्यात व त्याशिवाय शांत होणार नाही म्हणतो. त्याचे हेतू कुठल्या पक्षाला वा संस्था-संघटनेला उभारी देऊ शकत नाहीत. त्याला विधायक नव्हे, तर ‘फिदायीन राजकारण’ म्हणतात.

@@AUTHORINFO_V1@@