काँग्रेसी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा ‘हिंदुत्ववाद’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019   
Total Views |



आता एकाएकी सामान्यजनांचा बुद्धिभेद करणारे हे काँग्रेसी नेते हिंदुत्ववाद कसा काय पचवू लागले
, असा प्रश्न एकाएकी निर्माण झाला आहे. हे आयाराम नेते आता तर '३७० कलम रद्द’, 'तिहेरी तलाक कायदा’, 'पाकिस्तानबरोबरचे मोदी सरकारचे कडक धोरण’ या निर्णयांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करू लागले आहेत. या मनपरिवर्तनाला काय म्हणावे, अशी मजेशीर शंका जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.



'धर्मनिरपेक्षता'
, 'निधर्मीवाद', 'पुरोगामी' हे शब्द गेली सत्तर वर्षे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात परवलीचे शब्द होते. ’होते' म्हणायचे कारण म्हणजे याआधी या शब्दांचा जे नेते सर्वाधिक वापर करत होते, तेच आता ‘हिंदुत्ववादी' भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे निदान महाराष्ट्रात तरी या शब्दांचा वापर आता सर्रासपणे केला जाणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. जे नेते उरले आहेत, ते सुद्धा भविष्यात कोणत्याही क्षणी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या केविलवाण्या स्थितीमुळे या शब्दांवर नको तेवढा विश्वास ठेवणार्‍या कार्यकर्त्यांचे मात्र मोठे वांदे झाले आहेत, हे नक्की. काँग्रेसी नेत्यांच्या लांगूलचालनाच्या दांभिक राजकारणाला पूरक समजली जाणारी ही पुरोगामी फौज आता कमालीची विस्कळीत झाली आहे. आपले ’निधर्मी' नेते एकाएकी 'हिंदुत्ववादी' कसे झाले, याचे कोडे त्यांना उलगडेनासे झाले आहे. मग काय, काही कार्यकर्त्यांनी चक्क आपल्याला नेत्यांमागोमाग ’हिंदुत्ववादा'चा स्वीकार केलेला दिसतो.



काँग्रेसी नेत्यांनी कायम शाहू
, फुले आणि आंबेडकरांचा चोवीस तास जप करून केवळ आपला राजकीय स्वार्थच साधला. हे तिन्ही महापुरुष थोर आहेतच. पण, 'श्रीमंतयोगी', 'जाणते राजे' स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नव्हते का, असा सवाल विचारला जावा, अशी परिस्थिती काँग्रेसी नेत्यांनी निर्माण करून ठेवली. शिवाजी महाराज परधर्मद्वेष्टे होते, असे वाटण्याजोगी परिस्थिती याच नेत्यांनी उगाचच तयार केली. वास्तविक, शिवाजी महाराज समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे 'रयतेचे राजे' होते. त्यामुळे वर्षानुवर्षे या मुद्द्यांवर राजकारणच काँग्रेसकडून रेटले गेले. मग आता एकाएकी सामान्यजनांचा बुद्धिभेद करणारे हे काँग्रेसी नेते हिंदुत्ववाद कसा काय पचवू लागले, असा प्रश्न एकाएकी निर्माण झाला आहे. हे आयाराम नेते आता तर '३७० कलम रद्द', ’तिहेरी तलाक कायदा', 'पाकिस्तानबरोबरचे मोदी सरकारचे कडक धोरण' या निर्णयांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करू लागले आहेत. या मनपरिवर्तनाला काय म्हणावे, अशी मजेशीर शंका जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. राजकीय पक्षांमध्ये फरक हा ‘धर्मनिरपेक्ष' आणि ‘निधर्मी' या संज्ञामधून केला जाऊ शकत नाही. कारण, मुळात हिंदुस्थानी, भारतीय जनमानस हे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि निधर्मीच आहे. म्हणून तर जगातील अन्य कुठल्याही देशापेक्षा आपल्या देशात विविध धर्म, अक्षरशः शेकडो जाती-पोटजाती हजारो वर्षे काही अपवाद सोडल्यास गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या देशात बहुसंख्येने वसणारे हिंदू कमालीचे सहिष्णू आणि सोशिक आहेत आणि हीच प्रवृत्ती थोड्याफार फरकाने अन्य धर्मीयांमध्येही आहे.



महाराष्ट्रातील मराठी माणसाची वृत्तीही सहिष्णू आणि दिलदार आहे
. म्हणून तर आज महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी लोकसंख्येत जवळजवळ अडीच कोटी लोकसंख्या ही अमराठी भाषकांची आहे. त्यामुळे काही पुरोगामी आणि उरलेले प्रतिगामी असे आपण म्हणू शकत नाही. मात्र, शूद्र राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसी नेत्यांनी हे कृत्रिम वर्गीकरण आजवर केले. आता मात्र काँग्रेसी नेत्यांच्या घाऊक भाजपीकरणानंतर हा खोटा भेदच संपुष्टात येण्याची शक्यता असून हे वर्गीकरण करणे काहीसे कमी होईल, अशी आशा आपण करू शकतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, नंतरचे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील या काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या काळात निश्चितच दिलदार आणि मोठ्या मनाचे राजकारण केले. पण, ही परंपरा नंतर मात्र राखली गेली नाही. फुले, शाहूंचा नामजप करायचा आणि प्रत्यक्षात जातीय (आणि पोटजातीयसुद्धा) राजकारण खेळायचे, असले कोते राजकारण नंतरच्या काळात झाले.



पुढील काळात मात्र सामाजिक समरसतेच्या नीतीला अनुसरुन चालणार्‍या भाजपच्या उदयानंतर या पारंपरिक काँग्रेसी राजकारणाला धक्के बसायला प्रारंभ झाला
. २०१४ नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात विकासाच्या राजकारणाने मोठा वेग घेतला. आता तर अशी परिस्थिती आहे की, भाजपला आता कोणी फक्त उच्चवर्णीयांचा किंवा ब्राह्मणांचा पक्ष म्हणू शकणार नाही. सुरुवातीला मात्र जाणीवपूर्वक असा प्रचार करण्यात आला होता. २०१४ पर्यंत हा उच्चभ्रूंचा पक्ष होता. ब्राह्मण, कायस्थ, ठाकूर, संस्थानिक, मारवाडी व्यापारी असे वर्ग या पक्षासोबत होते. त्यानंतर भाजपने महाराष्ट्रात ‘माधव' असे (माळी, धनगर, वंजारी) समीकरण राबवत राज्यात हातपाय पसरले. भाजपमध्ये सुरुवातीला ओबीसींचे प्रमाण जास्त होते. गोपीनाथ मुंडे, ना. स. फऱांदे, अण्णा डांगे अशी मंडळीही पुढे होती. त्यावेळी उच्चवर्णीय मराठा समाज हा प्रामुख्याने काँग्रेससोबत आणि नंतर विशेषतः शरद पवारांसोबत राहिला. मराठा, मुस्लीम आणि दलित यांच्या साहाय्याने काँग्रेसने आणि शरद पवारांनी सत्ता राखली. बहुतांश गरीब मराठ्यांचा पाठिंबा शिवसेनेला होता.



मोदीउदयानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली
. मोदींना २०१४ मध्ये समाजातील सर्व जातीसमूहांनी भरभरून मते दिली. पण राज्यात दोन्ही काँग्रेसची, त्यातही प्रामुख्याने राष्ट्रवादीची ताकद खच्ची करण्यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांना दारे सताड उघडी ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे विखे-पाटील, मोहिते-पाटील, मदन भोसले, धनंजय महाडिक, रणजितसिंह निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, थेट पवारांचे नातेवाईक राणा जगजितसिंह पाटील आदी तालेवार घराणी भाजपमध्ये आली. या घराण्यांसह आता थेट छत्रपतींचे, शाहू महाराजांचे वंशज भाजपमध्ये आल्याने मराठाविरोधी पक्ष ही प्रतिमा आता भाजपला लागू होण्याचे काहीच कारण नाही. सुरुवातीला भाजपला मराठा समाजाचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजपने परिश्रमपूर्वक परिस्थिती बदलली. ’माधव'ला ’म'जोडत आता ’माधवम' (माळी, धनगर, वंजारी आणि मराठा) असे नवे समीकरण तयार करून नवीन ताकद निर्माण केली. उच्च न्यायालयात टिकू शकणारे आरक्षण मराठ्यांना दिल्याने भाजपबद्दल मराठा समाजाला ममत्त्व वाटू लागले आहे. बरे, भाजप म्हणजे काही काँग्रेस नाही. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देऊन काँग्रेस नेते फसले. (खरे म्हटले तर काँग्रेसवाले फसले की राणेच स्वतः फसले, हे तुम्हीच ठरवा.) भाजप हा बर्‍यापैकी शिस्तबद्ध आणि लोकतांत्रिक पक्ष असल्याने येथे आयारामांना लगेच मुख्यमंत्रिपद वगैरे मिळण्याची शक्यता अजिबातच नाही. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसी आयाराम मराठा नेते आपली आमदारकी, खासदारकी टिकविण्यात धन्यता मानतील.



राजेंचे
’जय श्रीराम'


राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी अखेर शुक्रवारी ट्विटरवरून भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली
. विकासासाठी भाजप प्रवेशाचे पाऊल उचलल्याचे सांगत प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत प्रवेश होणार असल्याचे राजेंनी स्वतः जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. राजेंच्या प्रवेशाबाबत महिनाभर उलटसुलट बातम्या फिरत होत्या. ते कधी मुख्यमंत्र्यांना तर कधी शरद पवारांना भेटत होते. गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या सकाळी उदयनराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन चर्चाही केली होती. त्यानंतर उदयनराजे राष्ट्रवादीतच राहतील, अशी अटकळ बांधली गेली. मात्र, पवारांच्या भेटीनंतर अवघ्या पाचच तासांत उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाची बातमी पुन्हा समोर आली. त्यांच्या निर्णयाची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेरीस पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची अट त्यांनी टाकली. भाजपने ती तत्काळ मान्य केली. “ते राजे आहेत, त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू,” असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार भाजपने त्यांना ‘राजेशाही ट्रीटमेंट' दिली. आता छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे हे तीनही राजे भाजपच्या तंबूत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे शुक्रवारी संध्याकाळी खास विमानाने पुण्यातून दिल्लीला पोहोचतील आणि खासदारकीचा राजीनामा देतील. शनिवारी सकाळी पक्षप्रवेश झाल्यानंतर ते दोघेही पुन्हा पुण्याकडे येऊन थेट महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@