एका थारेपालटी घटनेचा ८०वा स्मृतिदिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



१ सप्टेंबर, १९३९ या दिवशी जर्मन जनरल हान्झ गुडेरियन याच्या चिलखती दलाने पोलंडच्या डॅन्झिंग बंदराजवळच्या वेस्टरप्लाट या भागावर हल्ला चढवला आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली. ८० वर्षं उलटली त्या घटनेला!


दि. १ सप्टेंबर, १९३९ या दिवशी जर्मनीच्या भूदल, नौदल आणि वायुदल या तीनही सेनादलांनी एकत्रितपणे पोलंडवर हल्ला चढवला आणि मानवजातीच्या आधुनिक इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात भीषण असे युद्ध सुरू झाले. तेच दुसरे महायुद्ध १ सप्टेंबर, १९३९ ते २ सप्टेंबर, १९४५ असे पूर्ण सहा वर्षे आणि एक दिवस चाललेल्या या युद्धामध्ये जगातील किमान साडेसात ते साडेआठ कोटी लोकांना ठार मारले. हा प्रत्यक्ष युद्धातल्या बळींचा आकडा झाला. या अनुषंगाने आणखी किती लोक ठार झाले, किती कायमचे जीवनातून उठले आणि किती स्थावर, जंगम मालमत्तेची हानी झाली, याची मोजदाद करणेसुद्धा अशक्य आहे. अगणित, अमर्याद अशा शब्दांतच त्याचे वर्णन करता येईल. आपल्या भारताच्याच संदर्भातले एक उदाहरण पाहूया. १९४२ साली बंगालमध्ये दुष्काळ पडला. किमान १० लाख लोक अन्न अन्न करीत, टाचा घासत तडफडून मेले. हा दुष्काळ नैसर्गिक नव्हता, तर मनुष्यनिर्मित होता. तत्कालीन भारत सरकारने म्हणजेच इंग्रज सरकारने बंगाल प्रांतासाठी असलेला धान्यसाठा, एक खास हुकूमाने मध्यपूर्वेतलढणाऱ्या दोस्त सैन्याकडे धाडला. वर दिलेल्या साडेआठ कोटींच्या हिशेबात हे दहा लाख नाहीत. कारण, ते भारतीय होते. गुलामांचे जीव राहिले काय नि गेले काय! हे फक्त एक उदाहरण झालं. अशी कित्येक उदाहरणे आहेत. संपूर्ण जग या युद्धात अक्षरश: होरपळून गेलं. आधुनिक युरोपिय राष्ट्रांच्या अतिरेकी साम्राज्यलालसेचा हा परिपाक होता. एकंदर घटनाप्रवाह पाहता या परिपाकाची सुरुवात इसवी सनाच्या पंधराव्या शतकातच झाली. जगाचं नेतृत्व, जगाचा व्यापार आशिया खंडाच्या हातात होता. युरोप खंड बायबलच्या पुस्तकी बंधनात अडकून पडले होते. अशावेळी काही कर्ते सुधारक पुढे आले, त्यांनी बायबल आणि पोप यांना विरोध करत वेळ फुकट न घालवता, समाजाचे लक्ष ख्रिश्चॅनिटीपूर्व काळातील (ख्रिस्तपूर्व) ग्रीक ज्ञानाकडे वळवले. यातून युरोप खंडात पुनरुज्जीवन म्हणजेच 'रिनायसान्स' घडून आलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान यात नवा विचार सुरू झाला. या 'रिनायसान्स' युगाच्या प्रवर्तकांमधील एक फार महत्त्वाचे नाव म्हणजे 'लिओनार्दो-द-विंची.'

 

'रिनायसान्स'ने प्रवर्तित केलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात फायदा घेतला तो प्रथम स्पेनने. यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा की, बायबलला बाजूला ठेवून मानवजातीच्या भौतिक, सांस्कृतिक, ऐहिक विकासासाठी जे पुनरुज्जीवन घडलं, त्याचा फायदा स्पेनच्या राजाने आपल्या राजकीय आणि धार्मिक स्वार्थासाठी घेतला. नौकानयनातल्या शास्त्रीय प्रगतीच्या बळावर स्पॅनिश आरमार अत्यंत बलाढ्य बनलं. त्यांनी दक्षिण अमेरिकतले अनेक देश मनसोक्त लुटले, अमाप कत्तली केल्या, जीवंत राहिले त्यांना आग्रहपूर्वक ख्रिश्चन बनवले आणि स्पॅनिश साम्राज्य वाढवले. पोर्तुगीज हे मुळात स्पेनचे मांडलिक. पुढे ते स्वतंत्र झाले. पण जे स्पेनने अमेरिकेत केलं, तेच पोर्तुगालने पूर्वेकडे भारतात, इंडोनिशयात, चीनमध्ये केलं. जगाच्या व्यापार आता स्पेन, पोर्तुगालच्या म्हणजे युरोपच्या ताब्यात गेला. पण, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा जो झपाटेबंद काळ सुरू झाला तो स्पेन आणि पोर्तुगालपुरता थांबला नाही. डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स आणि ब्रिटन हे देशही उत्कृष्ट नौकानयनाच्या जोरावर साम्राज्यविस्ताराची स्वप्न पाहू लागले. या स्पर्धेत डेन्मार्क नि हॉलंड मागे पडले. स्पेनच्या ब्रिटनने आरमारी युद्धात पराभव केला. स्पेन, पोर्तुगालची साम्राज्य होती तेवढी राहिली नि ब्रिटन, फ्रान्सने पाहता-पाहता जगातला फार मोठा भूभाग जिंकला. सतराव्या शतकात या स्पर्धेत एक तगडा गडी उतरला. त्याचे नाव पीटर-द-ग्रेट. रशिया हा तोपर्यंत एक मागास, आशियाई देश मानला जात असे आणि तो होताही तसाच. पीटर-द-ग्रेटने जाहीर केले की, रशिया हा युरोपीय देश आहे आणि दृढ निश्चयाने त्याने रशियामध्ये प्रचंड सुधारणा घडवून आणल्या. आता या सुधारणा सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुधारावे म्हणून नव्हत्या, तर पश्चिम युरोपातल्या ब्रिटन, फ्रान्सप्रमाणे आपलेही साम्राज्य असावे, या महत्त्वाकांक्षेतून आलेल्या होत्या.

 

अशा प्रकारे युरोप खंडाने जगाचे व्यापारी, राजकीय, धार्मिक (म्हणजे सांप्रदायिक) नेतृत्व आपल्या हाती घेतले. आता पश्चिम युरोपात ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल नि पूर्व युरोपात रशिया त्या साम्राज्यांच्या दरम्यान मध्य युरोपात प्रशिया नावाचा देश होता. त्याच्या आसपास अनेक छोटी राज्यं, संस्थानं होती. हे सगळे लोक 'जर्मेनिक' वंशाचे होते. ब्रिटिश हे 'अँग्लो सॅक्सन' वंशाचे, फ्रेंच हे 'गॉल' वंशाचे, रशियन हे 'स्लाव्ह' वंशाचे, तसे हे 'जर्मेनिक.' प्रशियाचा पंतप्रधान प्रिन्स ऑटो फॉन बिस्मार्क हा एक महान मुत्सद्दी होता. त्याने प्रशिया व ही सगळी संस्थानं एकत्र आणली आणि सन १८७१ मध्ये मध्य युरोपात जर्मनी हा एक नवाच देश निर्माण केला. आता युरोपातल्या इतर सर्व सत्ताधाऱ्यांप्रमाणेच जर्मनीच्या नेत्यांनाही साम्राज्यलालसा होतीच. विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्यातील प्रगतीच्या जोरावर अत्याधुनिक शस्त्रसामग्री जर्मनीकडेही होती. त्यामुळे साम्राज्य स्पर्धा तीव्र होत गेली आणि त्याची परिणती महायुद्धात झाली. १९१४ ते १९१८ अशी चार वर्षे हे महायुद्ध एका बाजूला ब्रिटन-फ्रान्स-अमेरिका-रशिया विरुद्ध जर्मनी-ऑस्ट्रिया या पक्षांमध्ये झाले नि किमान दीड ते दोन कोटी लोकांना ठार करून थांबले. या महायुद्धाने अत्यंत राक्षसी अशा दोन तत्त्वज्ञानांना जन्म दिला. एक म्हणजे साम्यवाद आणि दुसरं म्हणजे नाझीवाद. महायुद्ध सुरू असतानाच रशियातल्या साम्यवाद्यांनी क्रांती केली. राज्यशकट हाती घेऊन त्यांनी रशियाला युद्धातून बाहेर काढले. ही घटना १९१७ मधील. नोव्हेंबर १९१८ मध्ये जर्मनीच्या पराभवाने महायुद्ध संपले. १९१९ मध्ये व्हर्साय इथे तह झाला. विजेच्या राष्ट्रांनी पराभूत जर्मनीला फार अपमानास्पद रीतीने वागवले. यामुळे जर्मन समाज मनोमन अत्यंत संतापलेला होता. जर्मन समाजाच्या या मनःस्थितीचा फायदा घेऊन अ‍ॅडॉल्फ हिटलर नावाच्या एका महत्त्वाकांक्षी नेत्याने 'राष्ट्रीय समाजवाद' म्हणजेच जर्मन भाषेत 'नाझी' तत्त्वज्ञानाचा प्रचार सुरू केला. हिटलरच्या तुफानी वक्तृत्वाने तरुण पिढी भारावून गेली. १९३३ साली हिटलरच्या नाझी पक्षाने जर्मन संसदीय निवडणुकीत मोठे यश मिळवले. सत्ता हाती घेण्यासाठी ते यश पुरेसे नव्हते आणि राजकीय तत्त्वज्ञान म्हणूनही 'नाझीवाद' पटलेला नसूनही जनरल हिंडेगबुर्ग यांनी हिटलरच्या हाती सत्ता सोपवली. कारण, जर्मनीला पराभवाच्या खाईतून हाच माणूस बाहेर काढेल, असा विश्वास त्यांना वाटला म्हणजेच संपूर्ण जर्मन समाज किंवा राजकीय नेतृत्त्व हे हिटलरच्या नाझी तत्त्वज्ञानाने भारून गेले होते, असे नाही.

 

हिंडेनबुर्गने हिटलरला पसंत करण्यामागे आणखीही एक हिशोब असावा, असा अंदाज आहे. जर्मनीची सत्ता हाती घेण्याचा साम्यवाद्यांचा आटोकाट प्रयत्न चालू होता. १९१७ साली रशियाला महायुद्धातून बाहेर काढल्यावर लेनिन, ट्रॉट्स्की आणि स्टॅलिन या साम्यवादी नेत्यांनी 'साम्यवादी क्रांतीची निर्यात' या गोंडस नावाखाली संपूर्ण युरोपच सोव्हिएत साम्राज्यात आणण्याचा प्रयत्न चालवला होता. १९२४ साली लेनिन मेला. मग ट्रॉट्स्कीला हद्दपार करून स्टॅलिन सर्वेसर्वा झाला. तेव्हापासून तर देशोदेशींच्या साम्यवाद्यांच्या सत्ता हडप करण्याचा प्रयत्नांना भलताच जोर चढला होता. तेव्हा नाझी पक्षाला स्पष्ट बहुमत नसलं, तरी साम्यवाद्यांपेक्षा हिटलर नक्कीच चांगला, असा हिशेब हिंडेनबुर्गने केला असावा. 'नाझीवाद' हे राक्षसी तत्त्वज्ञान असले, तरी नाझींच्या जर्मन राष्ट्राबद्दलच्या निष्ठेबाबत शंकाच नव्हती. साम्यवाद्यांबाबत सगळीच बोंब! सत्ता हाती आल्यापासून म्हणजे १९३३ पासूनच हिटलरची पावले सर्वंकष युद्धाच्या दिशेने पडू लागली. त्याला पहिल्या महायुद्धातल्या मानहानीचा सूड घेण्यासाठी फ्रान्स-ब्रिटनचा पराभव करायचा होता. पण, पराभूत करून त्यांना जर्मन साम्राज्यात सामील करता येणार नाही, हेही तो जाणून होता. त्याचा साम्राज्यविस्ताराचा इरादा होता पूर्व युरोपात. मुख्यतः पोलंड आणि बाल्टिक समुद्र ते काळा समुद्र या पट्ट्यामुळे सर्वच पूर्व युरोपिय देश त्याला कायमचे हवे होते. इथे आपली स्पर्धा सोव्हिएत रशियाबरोबर आहे, हे त्याला अचूक माहिती होतं. मग एकाच वेळी पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे कसं लढणार? तेव्हा त्याने मोठीच राजकीय गंमत केली. २३ ऑगस्ट १९३९ या दिवशी त्याने सोव्हिएत रशियाशी चक्क मैत्रीचा करार केला. त्या रात्री हिटलरचा हाडवैरी स्टॅलिन आणि त्याचा परराष्ट्रमंत्री मोलोटोव्ह यांनी हिटलरचा पराराष्ट्रमंत्री रिबेनट्रॉप याच्या शॅम्पेनच्या पेल्याला पेले भिडवत 'फॉर द हेल्थ ऑफ हेर हिटलर' असा 'टोस्ट' म्हणजे अभिवादन करीत दारू प्याली. हिटलर स्वतः अजिबात दारू पीत नसे. त्यामुळे बर्लिनच्या चॅन्सलरीत बसून तो त्यावेळी पुढच्या योजना ठरवत होता. एका झोटिंगाने दुसऱ्या झोटिंगाला झेंडी लावून आपली पूर्व सरहद्द सुरक्षित केली होती. आता आपलं संपूर्ण बळ पश्चिम युरोपवर लोटायला तो मोकळा झाला होता. बरोबर नवव्या दिवशी म्हणजे १ सप्टेंबर, १९३९ या दिवशी जर्मन जनरल हान्झ गुडेरियन याच्या चिलखती दलाने पोलंडच्या डॅन्झिंग बंदराजवळच्या वेस्टरप्लाट या भागावर हल्ला चढवला आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली. ८० वर्षं उलटली त्या घटनेला!

@@AUTHORINFO_V1@@