यात्रा, रॅली, सभा आणि परिषदा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019   
Total Views |


 


सध्या महाराष्ट्रात भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेला मिळत असलेल्या जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे विरोधक अक्षरशः हबकून गेले आहेत. तशा यात्रा मग इतर पक्षांनीही सुरू केल्या आहेत. भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'च्या आधी निघाली ती शिवसेनेची 'जनआशीर्वाद यात्रा', तर सत्ताधारी दोन्ही पक्ष यात्रा काढतात, हे बघून राष्ट्रवादी काँग्रेसनेही या 'यात्रा महोत्सवा'त उडी घेतली.


सध्या महाराष्ट्रात भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेला मिळत असलेल्या जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे विरोधक अक्षरशः हबकून गेले आहेत. तशा यात्रा मग इतर पक्षांनीही सुरू केल्या आहेत. भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'च्या आधी निघाली ती शिवसेनेची 'जनआशीर्वाद यात्रा.' युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जातीने 'जनआशीर्वाद' यात्रेमार्फत महाराष्ट्रातील गावागावांत फिरत आहेत, तर सत्ताधारी दोन्ही पक्ष यात्रा काढतात, हे बघून राष्ट्रवादीनेही या यात्रा महोत्सवात उडी घेतली आहे. येत्या ६ ऑगस्टपासून ते 'शिवस्वराज्य' यात्रा काढणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नरपासून ही यात्रा निघणार आहे. महाराष्ट्राची आगामी निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने सर्वच पक्षांना जनतेने आपल्या यात्रेतील यात्रेकरू व्हावे, असे वाटते आहे. या राजकीय यात्रांचा इतिहास काढला तर या लोकांपुढे केल्या जाणार्या राजकीय सादरीकरणाच्या तंत्राचा वापर सर्वप्रथम भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी परिणामकारकरित्या केला. त्याचा प्रचंड राजकीय फायदा भाजपला झाला. त्यानंतरच खर्‍या अर्थाने भाजप सत्ताधारी पक्ष बनला. सुरुवातीला उत्तर प्रदेश आणि त्यानंतर देशात भाजपला सत्ता मिळाली. राजकीय पक्षांच्या यात्रेचा विषय आला की, रथयात्रेचे नाव सर्वात आधी येते. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी नव्वदच्या दशकात 'सोमनाथ ते अयोध्या' ही बहुचर्चित रथयात्रा काढली. या यात्रेमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर त्यांनी जनचेतना, जनसुरक्षा यात्रा अशा सहा विविध यात्रा काढल्या. मधल्या काळात भाजपचे दुसरे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी एकता यात्राही काढली.

 

महाराष्ट्रातील राजकीय यात्रांचा विषय निघाला की, भाजपचे दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचे स्मरण होते. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी १९९४-९५ ला संघर्ष यात्रा काढली आणि त्यानंतर महाराष्ट्र विधीमंडळावर भगवा फडकला. १९९४-९५ मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या शिवनेरी ते शिवतीर्थ या संघर्ष यात्रेमुळे महाराष्ट्र पेटला होता. त्यानंतर राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा शिवसेना-भाजपच्या हाती सत्ता आली होती. या तुफान राजकीय संघर्षाच्या अग्रभागी होते भाजपचे लढाऊ नेते गोपीनाथ मुंडे. १९९५ च्या आधी राज्यात काँग्रेसची सत्ता होती आणि मुख्यमंत्री शरद पवार होते. सतत हुलकावणी देत असलेली सत्ता मिळवायचीच, असा चंग बांधून त्यावेळी विरोधी पक्षनेते पदावर असलेल्या गोपीनाथ मुंडेंनी रान उठवले होते. त्या आठवणी आजही भाजपचे जुने कार्यकर्ते काढतात. त्यावेळी राज्यात सत्ता मिळवायची असेल तर मुख्य आव्हान शरद पवारांचे होते व त्याची गोपीनाथ मुंडेंना पूर्ण जाणीव होती. पवारांना आव्हान देणे सोपे नव्हते. लढवय्या गोपीनाथ मुंडेंनी हे आव्हान स्वीकारले. राजकारणातले गुन्हेगारीकरण हा मुद्दा लावून धरत मुंडेंनी पवारांविरोधात रान उठवले. गुन्हेगार आणि राजकारण्यांच्या अभद्र युतीवर मुंडेंनी तोफ डागली. नागपुरात झालेले गोवारी प्रकरण असो की, जळगावचे कुप्रसिद्ध सेक्स स्कॅन्डल, शेतकर्‍यांचे प्रश्न असोत की बेरोजगारी आणि कुपोषणाचा प्रश्न गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेस सरकारला जाब विचारत संघर्ष अक्षरशः धगधगता ठेवला. त्यामुळे पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला खाली खेचत शिवसेना-भाजप युती १९९५ मध्ये सत्तेत आली. त्यात गोपीनाथ मुंडेंच्या संघर्ष यात्रेचा मोठा वाटा होता. गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही २०१४ साली विधानसभा निवडणुकीआधी संघर्ष यात्रा काढली होती. सिंदखेडराजा ते चौंडी असा पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचा मार्ग कार्य्कर्मा होता. सिंदखेडराजा हे वीरमाता जिजाऊंचे जन्मस्थान तर चौंडी हे अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान. या दोन्ही वीरांगनांना आदर्श ठेवत त्यांनी राज्यातील जनतेला सत्ताबदलाची हाक दिली होती. मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजा यांनी राज्यातील वातावरण ढवळून काढले होते.

 

आता राज्यात पुन्हा एकदा यात्रांचा माहोल तयार झाला आहे. भाजपची महाजनादेश यात्रा लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरीमधून सुरू झाली. ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून जाणार असून तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करणार आहे. विदर्भातून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्टला नाशिक येथे होणार आहे. पाच वर्षांत केलेल्या कामांचा हिशोब देण्यासाठी आम्ही जनतेच्या दरबारात जात आहोत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली आहे. आम्ही सांगण्यायोग्य कामे केली म्हणूनच आम्ही लोकांसमोर जात आहोत, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. ही यात्रा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच भाजपने विरोधी पक्षांचे चार आमदार फोडल्याने विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. तसेच यात्रा कालावधीतील या महिन्याभरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे किमान अर्ध्याधिक आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने विरोधक कमालीचे धास्तावले आहेत. सातारचे छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले महाजनादेश यात्रा ज्यावेळी सातार्‍यात येणार होती, त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, त्यांनी सुरुवातीलाच प्रवेश करून राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला. छत्रपतींचा हा घाव 'जाणते राजे' शरद पवार यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी तत्काळ सातारमध्ये धाव घेऊन डागडुजीचा प्रयत्न सुरू केला आहे. एक दिवस सातार्‍यात वस्ती करून त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांशी हितगुज केली. त्याचबरोबर खासदार छ. उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांचीही त्यांनी भेट घेतली. आता पवार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विधानसभेसाठी राजघराण्यातील व्यक्तीने उभे राहावे, यासाठी आग्रही असल्याचे समजते. पक्षांतर करणार्‍या शिवेंद्रसिंहराजे यांना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्धार पवार यांनी केला आहे. पण आताच्या त्यांच्या पडत्या काळात त्यांच्या डावपेचांना कितपत यश मिळेल, याची शाश्वती नाही. पवारांच्या या खेळीवर शिवेंद्रसिंह यांनीही मीही तयार असल्याचे सांगून पलटवार केला आहे.

 

दुसरीकडे महाजनादेश यात्रेला व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेला दमदार प्रत्त्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेते व शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली ही यात्रा काढण्यात येणार असून सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे यात्रेचे स्टार प्रचारक असतील, अशी माहिती मिळत आहे. येत्या ६ ऑगस्टपासून ही यात्रा जुन्नरमधून होईल. छ. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला जुन्नरनजीक असल्याने राष्ट्रवादी जाणीवपूर्वक येथून यात्रेची सुरुवात करणार आहे. मात्र, तीन दिवस उरले असूनही त्यांचा कार्यक्रम अजून निश्चित नाही. 'वायएसआर काँग्रेस'च्या स्थापनेनंतर जगनमोहन यांनी आंध्रात तब्बल साडेतीन हजार किमीची 'प्रजा संकल्प यात्रा' यशस्वी केली. ही पदयात्रा टप्प्याटप्प्याने काढली गेली असली तरी एखाद्या राजकीय नेत्याने एवढे प्रचंड अंतर पायी चालणे, हा भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक विक्रमच आहे. आंध्रच्या प्रत्येक गावागावात आणि नक्षलबाधित भागामध्येही त्यांची 'प्रजा संकल्प यात्रा' पोहोचली होती. सध्या जगनमोहन यांच्या 'आंध्र पॅटर्न'ची चर्चा रंगली असली तरी तो 'पॅटर्न' महाराष्ट्राच्या प्रकृतीला कितपत लागू पडेल, याविषयी शंका आहे.

 

आपला देश कमालीच्या वैविध्याने नटलेला आहे. त्याचे प्रतिबिंब राजकारणातही जाणवते. महाराष्ट्र हे सुरुवातीपासून पुरोगामी आणि सगळ्या राज्यांच्या तुलनेत प्रगत असे राज्य. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासारखे खरे 'जाणते' राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभल्याने राज्याची पायाभरणी चांगली झाली. जगनमोहन यांच्या 'एकला चलो रे...' या पॅटर्नची भुरळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पडल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी झळकले होते. हे खरे असेल आणि जगन यांच्याप्रमाणे राजकारण राज यांना करायचे असेल, तर राज यांना त्यांचा आताचा 'पॅटर्न' पूर्णपणे बदलावा लागेल. त्यांच्या पक्षाच्या नावात जरी 'महाराष्ट्र' असला तरी त्यांच्या पक्षाचे अस्तित्व विदर्भासारख्या मोठ्या भागात जवळपास नाही. त्याकडे त्यांना गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकच्या बाहेर, गावागावांमध्ये नाही जमले तरी निदान तालुके पिंजून काढावे लागतील. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था तळागाळातून समजून घ्यावी लागेल. जगनमोहन यांच्या प्रजा संकल्प यात्रेच्या धर्तीवरच आदित्य ठाकरे यांची जनाशिर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. काँग्रेसने एक वर्षापूर्वी राज्यात जनसंघर्ष यात्रा काढली होती. पण त्या यात्रेत म्हणावा तसा उत्साह नव्हता. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यात्रा काढून संघर्ष करण्याची मानसिकताच नव्हती. त्यामुळे ती यात्रा केवळ उपचार ठरली होती. ती यात्रा काढणारे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच आता हाती कमळ धरल्याने हा संघर्ष संपला आहे. महाजनादेश यात्रेला कडवा विरोध करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अकरा प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे येत्या आठ दिवसांत न दिल्यास सरकारविरोधात 'जनआक्रोश यात्रा' काढण्याचा इशारा शेट्टींनीही दिला आहे.

@@AUTHORINFO_V1@@