प्राचीन भारतीय संस्कृतीतील, धर्मप्रणालीतील चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019   
Total Views |




प्रतीकशास्त्र आणि चिह्नसंकेतांच्या अभ्यासाच्या अंतिम टप्प्यावर आपण प्राचीन भारतीय संस्कृतीतील चिह्ने आणि त्यांच्या संकेतांचा परिचय करून घेऊया. 'प्राचीन भारतीय संस्कृती' या संबोधनाचा संदर्भ खूपच व्यापक आहे. आपल्या या संस्कृतीत, मानवी इतिहासातील प्रतीके आणि चिह्नांचा वापर सर्वप्रथम सुरू झाला. लिखित साहित्य, शिल्पकला, मूर्तिकला, चित्रकला, रंग, बुद्धिबळ-सारीपाट यांसारखे मनोरंजक आणि उद्बोधक बैठे खेळ, अध्ययन, अध्यापन, दैवत संकल्पना, उपासना पद्धती, शब्द-नाद-ध्वनी इतक्या व्यापक व्यवस्थेत अशी प्रतीके आणि चिह्ने संयुक्तिक संकल्पना मांडून शब्द आणि दृश्य माध्यमातून व्यक्त झाली.


पल्या संस्कृतीतील या प्रतीकशास्त्राची मांडणी या जगातील संपूर्ण मानवधर्माचा, मानवी बुद्धीचा, मानसिकतेचा विचार करून तत्त्वज्ञान, विज्ञान, बुद्धिमत्ता या तीन भक्कम स्तंभांवर संकल्पित झाली होती. परकीय आक्रमणे होण्याचा आधीच्या काळात 'धर्म' ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. दैनंदिन व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनशैलीला पूरक आणि निसर्गचक्राशी जुळवून घेणार्‍या प्रथा आणि परंपरांची निर्मिती झाली होती. वनस्पतीशास्त्र, पक्षिशास्त्र, खगोलशास्त्र, निसर्गक्रम प्रदेशातील हवामान, नीतिशास्त्र, न्यायशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भूमिती, संगीत आणि स्वरशास्त्र अशा असंख्य शास्त्रांचा मूलभूत अभ्यास झाला होता आणि त्याचा संदर्भ प्रतीके आणि चिह्नांच्या संकल्पनेत केला गेला होता. आपल्या संस्कृतीतील चिह्ने आणि प्रतीकशास्त्राच्या मांडणीमागच्या संकल्पनांचा अभ्यास, वर्गीकरणशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला करता येतो. मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे बोलताना आपल्या तोंडातून निर्माण होणारा ध्वनी हा 'आवाज,' 'उद्गार,' 'शब्द' या संबोधनांनी ओळखला जातो. अशा असंख्य उद्गांरांचे म्हणजे शब्दांचे एक वाक्य तयार होते आणि ते वाक्य आपल्याला काही निश्चित संकेत देत असते आणि अर्थ सूचित करत असते. असे शब्दसुद्धा 'प्रतीकशास्त्र' म्हणजेच चिह्न संस्कृतीचा एक भाग आहेत. वैश्विक ज्ञान आणि अलौकिकाशी पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजे 'शब्दब्रह्म' आणि 'नादब्रह्म' या संकल्पना. मंत्रोच्चारण, प्रार्थना, उपासना, सामूहिक मंत्रपठण या सर्व क्रियांचे मानवी दैनंदिन जीवनातील महत्त्व विस्ताराने आपल्या प्राचीन संस्कृतीत लिहिले गेले.

 

अखंड-शांत-प्रसन्न-संपूर्ण अर्थात 'अनाहत' नादाचे आणि शरीरातील चक्रांपैकी चौथ्या चक्राचे एक सुंदर प्रतीक म्हणजे 'अनाहत चक्र.' (चित्र क्र. १). प्रेम, सहानुभूती, नि:स्वार्थ एकनिष्ठ भक्ती या सर्व मानवी भावना आणि धारणांचे हे नितांत सुंदर प्रतीक. श्रद्धा, भक्ती, प्रेम, आपुलकी, दया, करुणा, वात्सल्य, नि:स्वार्थ परोपकार आणि एकनिष्ठा अशा सर्व भावनांना सातत्याने जागृत ठेवणारे हे 'अनाहत चक्र.' प्राचीन काळापासून शाक्त, बौद्ध, वैदिक संकल्पना आणि साहित्यामध्ये या प्रतीकांचा उल्लेख सातत्याने केला गेला. मानवी शरीरातील 'अनाहत चक्रा'ची जागा हृदयाच्या जवळ कल्पिली गेली आहे. या चिह्नाच्या मध्यभागी दोन त्रिकोणांचे अर्थात शिव अधिक शक्ती तत्त्वाचे षट्कोनाचे चिह्न अंकित झाले आहे. शीर्ष वर असलेला त्रिकोण हे सर्वश्रेष्ठ, सर्वव्यापी परमेश्वराचे म्हणजे पुरुषतत्त्वाचे प्रतीक आहे. शीर्ष खाली असलेला त्रिकोण हे निर्मितीक्षम स्त्रीतत्त्वाचे आणि निसर्गाच्या मातृत्व भावनेचे प्रतीक आहे. याच्या सभोवती प्रकाश आणि पूर्ण ज्ञानाचे प्रतीक बारा पाकळ्यांचे कमळ आरेखित केलेले आहे. शुद्ध, संपूर्ण, निरामय कामजीवन म्हणजेच निसर्गातील सजीवांचा निरंतर युगुलधर्म हे या चिह्नाचे संकेत आहेत. आपल्या शरीरात एकूण आठ चक्रांची संकल्पना प्राचीन काळात मांडली गेली. अलौकिक निसर्गशक्तीची ऊर्जा आणि चेतना देणारी अशी आठ चक्रे, त्यांच्या प्रतीके, चिह्नांसह आणि अर्थसंकेतांसह या सिद्धांतात मांडली गेली आहेत. वैदिक संस्कृतीच्या श्रद्धेनुसार, सर्वश्रेष्ठ, सर्वव्यापी परमेश्वराचे प्रथम अस्तित्व 'शब्द' आणि 'नाद' या दोन श्राव्य माध्यमांच्या कंपनातून सिद्ध झाले. याचे दृश्य स्वरूपातील प्रतीक किंवा चिह्न म्हणजे 'ओंकार.' (चित्र क्र. २). वैदिक आणि तांत्रिक या दोन्ही श्रद्धा संप्रदायांसाठी हा 'ओंकार' आणि त्याचे हे प्रतीक सारखेच महत्त्वाचे मानले गेले आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीतील सर्वच प्रतीके आणि चिह्ने, समस्त मानवधर्माचा विचार मांडणारी होती. या ओंकाराचा उच्चार, नाद आणि ध्वनी म्हणजे विश्वाच्या निर्मितीची सुरुवात असे म्हटले जाते. आज प्रचलित असलेल्या जवळपास सर्वच धर्मप्रणाली, त्यातील पंथ आणि संप्रदाय यांच्यावर या 'ओंकारा'चा फार मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते. माणुसकी, शक्ती, भक्ती, श्रद्धा अशा अनेक मानवी भावना आणि धारणा या 'ओंकारा'च्या नाद आणि ध्वनीमध्ये निर्माण होतात आणि अनुभवता येतात.

 

 
 

भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माचा संदर्भ देताना याच 'ओंकार' प्रतीकाचा वापर केला जातो. उच्चार, नाद, ध्वनी यावर आधारलेले वैदिक मंत्रविज्ञान आणि तांत्रिक तंत्रविज्ञान या दोन्ही श्रद्धा संप्रदायांमध्ये हा 'ओंकार' प्रत्येक श्लोकाच्या अग्रस्थानी लिहिला गेला आहे. ख्रिश्चन धर्मामधील सर्वच पंथ, संप्रदाय आणि यहुदी म्हणजेच ज्युईश धर्मसंकल्पनेत धार्मिक विधीत 'आमेन' या शब्दाचा उच्चार, सहमती आणि आशीर्वादपर वचन म्हणून वापरला जातो. इस्लामिक संकल्पनेत 'आमीन' या शब्दाचा उच्चार याच संदर्भाने केला जातो. बौद्ध धर्मीय सर्व संप्रदायांच्या धार्मिक विधींमध्ये हा ओंकार 'ओं मणिपद्मे हूं' अशा प्रकारे याच संदर्भात उच्चारला जातो. इंग्रजी भाषेतील 'ऑमनी' (Omni) हा उपसर्ग (प्रेफिक्स) अनेकदा व्यापकता, सर्वत्वता या संदर्भात वापरला जातो. (Omnipresent) 'ऑमनीप्रेझेंट' सर्वव्यापी, (Omnipotent) 'ऑमनीपोटन्ट' सर्वशक्तिमान असे अनेक शब्द 'Omni' हा उपसर्ग लावून वापरले जातात. 'आमेन,' 'आमीन' 'ओं मणिपद्मे हूं,' 'ऑमनी' हे सर्व उच्चार, त्याचा नाद आणि ध्वनी 'ओंकारा'शी नाते सांगतात. शिल्प, मूर्ती, चित्र या दृश्यमाध्यमांच्या पलीकडील अर्थसंकेत देणारी ही प्राचीन भारतीय प्रतीके आणि चिह्ने, दृश्य आणि श्राव्य माध्यमातून पूर्ण विज्ञाननिष्ठ आणि तर्कसंगत आहेतप्राचीन भारतीय दैनंदिन जीवनशैली, प्रतीके आणि चिह्ने यांचा वापर करून फार समृद्ध झाली आहे. यातीलच एक प्रतीक म्हणजे 'मंगल कलश.' (चित्र क्र. ३). प्राचीन भारतीय संस्कृतीत स्त्रीला फार महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. हा 'मंगल कलश' म्हणजे कुटुंबातील स्त्रीच्या सृजनाचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. इथे 'सृजनशील' आणि 'सर्जनशील' या दोन शब्दांच्या अर्थातील फरक जाणून घेणे आवश्यक आहे. 'सृजन' म्हणजे 'उत्पत्ती' आणि 'सर्जन' म्हणजे 'निर्मिती.' सृजनशील उत्पत्तीसाठी दोन घटकांची गरज असते जसा सजीवांचा युगुलधर्म. सर्जनशील व्यक्तीत्याची निर्मिती एकट्याने करू शकते, जसे चित्रकार, शिल्पकार कलाकृती निर्माण करतात.

 

आपला 'मंगल कलश' आपल्या कुटुंबातील, समाजातील स्त्रीचा सन्मान अशा अगदी प्राथमिक मांडणीत करतो. चांदी अथवा तांब्याच्या कलशात अर्ध्यापर्यंत पाणी भरून त्यावर सोललेला नारळ शेंडी वर असेल असा ठेवला जातो. नारळाच्या भोवताली आंब्याची पाने, देठ पाण्यात बुडेल अशी रचली जातात. नारळ हे कल्पवृक्षाचे फळ आहे, तर आंब्याचे झाड आणि त्याची पाने हे समृद्धीचे प्रतीक आहे. कलशाच्या बाहेरची बाजू गंध+हळद+कुंकू+अक्षता+फुले यांनी सुशोभित केली जाते. यातील गंध हे उपसाकाच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. हळद+कुंकू हे स्त्रीच्या सौभाग्याचे चिह्न आहे. तांदळाच्या अक्षता याचा अर्थसंकेत सर्जनशील, सक्रिय, स्वेच्छाधारी अशा स्त्रीचे वर्णन आहे. या कलशाच्या मुख म्हणजे तोंडामध्ये, सृष्टीच्या जन्मदात्या ब्रह्माचा निवास असतो. या कलशाच्या ग्रीवेमध्ये म्हणजेच मध्यावर शिवदेवतेचा म्हणजे पुरुषतत्त्वाचा निवास असतो. 'ग्रीवा' या शब्दाचा अर्थ आहे, सर्जनशील स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रवेशद्वार. या मंगल कलशाच्या तळावर श्री विष्णूचा म्हणजे पालनकर्त्या कुटुंबाचा निवास असतो. जैन संप्रदायाच्या साहित्यामध्ये या कलशाचे आणि उपासना विधीतील कलशाभिषेकाचे वर्णन विस्ताराने केले गेले आहे. या कलशाला अनेक लोकश्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. समुद्रमंथनातून प्राप्त झालेले अमृत पिण्यासाठी ब्रह्मदेवाने कलशाची निर्मिती केली. महादेवाच्या प्रत्येक मंदिरात पिंडीच्या वर हा कलश स्थापन केलेला असतो आणि त्यातील पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर सतत होत असतो.

 

भारतीय कुटुंबजीवन आणि समाजव्यवस्थेत प्राचीन काळापासून रांगोळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये रांगोळी, गुजरातमध्ये रंगावली, राजस्थानमध्ये मंडन, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोलम, आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये मुग्गु, बंगाल-ओडिशात अल्पना, छत्तीसगढमध्ये चौकपूर्णा, उत्तरप्रदेशमध्ये चौकपूजन, बिहारमध्ये अरिपणा या आणि अशा असंख्य संबोधनांनी 'रांगोळी' भारतवर्षात सर्वपरिचित आहे. वर्षाच्या १२ महिन्यांच्या काळात कुटुंबातील विवाहित महिला आणि कुमारिका साधारण २०० व्रते आणि वैकल्ये धारण करून त्याचे पालन करत असत. साधारण १९व्या शतकाच्या अखेरपर्यंत अशा प्रथा आणि परंपरा निश्चितपणे पाळल्या जात असे. 'Hindu Holidays and Ceremonies - Dissertation on Origin, Folklore and Symbols' हे रावबहादूर बाळकृष्ण आत्माराम गुप्ते यांनी त्यांच्या सौभाग्यावतीच्या मदतीने लिहिलेले पुस्तक १९१६ साली प्रकाशित झाले. भारतवर्षातील सर्वभाषिक हिंदू स्त्रियांच्या २०० व्रते आणि वैकल्यांचा परिचय या पुस्तकात विस्ताराने करून दिलेला आहे. या व्रते आणि वैकल्याच्या साधनेत रांगोळीला फार महत्त्वाचे स्थान आहे. खेडोपाडी आणि शहरी समाजात प्रचलित असलेल्या प्राचीन भारतीय रांगोळी संस्कृतीचा परिचय मला गुरुस्थानी असलेल्या डॉ. आनंद के. कुमारस्वामी यांनी त्यांच्या निबंधातून करून दिला. या प्राचीन भारतीय रांगोळी संस्कृती आणि त्यातील प्रतीक-चिह्नांचा सविस्तर परिचय पुढील लेखात करून घेणार आहोत.

@@AUTHORINFO_V1@@