कोकणात पक्षांतराचे वारे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2019   
Total Views |


तिवरेतील दुर्दैवी धरणफुटीनंतर 'खेकडे' आणि कणकवलीतील चिखल धुमशानानंतर 'राणे' हा विषय कोकणातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. असे असताना होऊ घातलेल्या घाऊक पक्षांतरामुळे कोकणातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. उद्या ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा 'शिवबंधन' बांधून या पक्षांतराच्या त्रैमासिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत. भाजप-शिवसेनेच्या झंझावातामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत काहीच अर्थ राहिला नाही. या पक्षांमध्ये अजिबात राजकीय भविष्य नाही, असा विरोधी पक्षांमधील बहुसंख्याकांचा समज होतो आहे. कोकणातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींमध्ये तर कमालीचा गर्भगळीतपणा आलेला दिसतो. श्रीवर्धनचे आ. अवधूत तटकरे, दापोलीचे आ. संजय कदम, कर्जतचे आ. सुरेश लाड हे तिन्ही 'राष्ट्रवादी' वीर येत्या काळात शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक 'काका-पुतणे' नात्याप्रमाणे नवनिर्वाचित खा. सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे विद्यमान आ. अवधूत तटकरे यांच्यातील विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्यात दोन वर्षांपूर्वीच अवधूत यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी राजकीय संबंध स्थापल्याने तेही 'घड्याळ' 'हाता'तून काढतील, असे निश्चित मानले जात आहे. दापोलीचे तेज तडफदार आ. संजय कदम हेही येत्या काळात 'शिवबंधना'त अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच. आता ते शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा आमदारकी मिळवतात का ते आगामी निवडणुकांच्या मौसमात कळेलच. पण, एका दिग्गज नेत्याच्या विरोधामुळे त्यांचा प्रवेश अडल्याचे समजते. यावरही नक्कीच मार्ग निघेल, अशी शक्यता आहे. कर्जतचे राष्ट्रवादीचेच आ. सुरेश लाड हेही पक्षांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. तेही निवडणुकीच्या तोंडावर 'घड्याळ' सोडणार असल्याची चर्चा त्यांच्याच समर्थकांमध्ये रंगलेली आहे. त्यामुळे 'कोकणी' आमदार ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धोबीपछाड देणार असल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही यापुढे तरी कोकणच्या लोकप्रतिनिधींकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे मात्र नक्की की, या घाऊक पक्षांतरामुळे 'पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष' ही राष्ट्रवादीची प्रतिमा अजूनच घट्ट होणार आहे.

 

सामंत, केसरकरांची परंपरा...

 

राष्ट्रवादीचे नेतृत्व मुळात कोकणातील आमदारांना खिजगणतीतच ठेवत नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष अपवाद वगळता कधीच कोकणात फारसा रुजला नाही. गणेश नाईकांच्या पक्षांतरानंतर नवी मुंबई, काही प्रमाणात रायगड व काही मोजक्या ठिकाणीच राष्ट्रवादीला कोकणात यश मिळाले. रत्नागिरीचे विद्यमान आमदार व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. त्यानंतर ते बराच काळ युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. आमदारकीच्या दुसर्‍या टर्ममध्ये त्यांना महत्त्वाचे राज्यमंत्रीपदही बहाल करण्यात आले. पण, त्यांनीही २०१४च्या निवडणुकीच्या तोंडावर 'घड्याळ' सोडून 'शिवबंधन' बांधले आणि तिसर्‍या वेळी आमदार म्हणून निवडूनही आले. विद्यमान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून मंत्रिपद (राज्यमंत्रिपद का असेना) मिळवलेले धूर्त कोकणी राजकारणी. त्यांनी योग्य वेळ साधत थेट 'मातोश्री'शीच संधान बांधले. त्यात नारायण राणे यांच्या अतिआक्रमक राजकारणाचा सर्वाधिक फायदा केसरकरांनी उचलला. राणेंच्या राजकारणाला विरोध करतच हे 'काँग्रेसी' स्टाईल केसरकर थेट मंत्री झाले. २०१४ साली 'शिवबंधन' बांधलेल्या केसरकरांनी निष्ठावंतांना बाजूला सारत अल्पावधीतच वरचे पद मिळवले. आतातर मंत्रिमंडळ विस्तारात 'कॅबिनेट मंत्री' म्हणून संधी मिळालेले बीडचे जयदत्त क्षीरसागर हेही राष्ट्रवादीचेच! ते तर महिनाभरापूर्वी शिवसेनेत आले व मंत्रीही झाले. तीच गोष्ट सातार्‍याच्या नरेंद्र पाटलांची. त्यांनी 'शिवबंधन' बांधून लोकसभा निवडणुकीत थेट छत्रपती उदयनराजे यांनाच जोरदार टक्कर दिली. आता ते अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. परभणीचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर हेही शिवसेनेच्या दारात पक्ष प्रवेशासाठी उभे असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. शिवसेनेत प्रवेश करून पदे पटकावणार्‍या या 'राष्ट्रवादी'वाल्यांचा नसता ताप मूळ शिवसैनिकांना झाल्याची शक्यता अधिक आहे. त्याचबरोबर आता ही पक्षांतरे अजून किती होतील, याचीही चर्चा आतापासून सुरू झाली आहे. पक्षांतरांच्या या कोकणी दशावताराला कसे रोखायचे, हा यक्षप्रश्न आता राष्ट्रवादीला पडला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@