वंचितचे 'संचित' काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2019   
Total Views |


 


'वंचित बहुजन आघाडी' हे नाव गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजत आहे. नावात 'आघाडी' हा शब्द असला तरी हा पद्धतशीर नोंदणीकृत केलेला पक्ष आहे. सुरुवातीला या पक्षाची दखलही काँग्रेसने घेतली नव्हती. पण, या नवख्या 'वंचित'ने असे काही फासे टाकले की, त्यात काँग्रेस आघाडी गुरफटत गेली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 'आघाडी'चा जबर फटका काँग्रेसला बसला. १३५ वर्षे झालेल्या काँग्रेस पक्षाला कालपरवा स्थापन झालेल्या 'वंचित बहुजन आघाडी'ने अवघ्या ४० जागांची 'ऑफर' करणे हा नियतीने काँग्रेसवर उगवलेला सूड आहे. गेल्या सत्तर वर्षांत नेहमीच काँग्रेसने आंबेडकरी पक्षांना खेळवले. पाताळयंत्री कारवाया करून काही आंबेडकरी पक्षांना तर काँग्रेसने मुळासकट संपवले. 'आता मात्र आम्ही घेणारे राहिलो नसून देणारे झालो आहोत, काँग्रेसने काळाप्रमाणे बदलावे,' असे या आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर अलीकडे बोलून गेले. त्याला अनुसरूनच बुधवारी 'वंचित'कडून काँग्रेसला २८८ पैकी ४० जागांची ऑफर देण्यात आली. यावर काँग्रेसने धर्मनिरपेक्ष व पुरोगामी तत्त्वांचे नेहमीचे तुणतुणे वाजवले आहे. 'आम्हीच बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांचे रक्षणकर्ते असून त्याला इतर पक्षांनी साथ द्यावी,' असे सांगून 'वंचित'ला गांभीर्याने राजकारण करण्याचे आवाहन केले. असा हा कलगीतुरा रंगला असतानाच 'वंचित'मध्ये उभी फूट पडली. 'वंचित'चे कर्तेधर्ते म्हणवले जाणारे 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी थेट बाळासाहेबांवरच तोफ डागत बाहेरचा रस्ता पकडला. उलट 'बाळासाहेबांनीच 'वंचित' सोडावी,' असाही उद्घोष त्यांनी केला. “आम्ही राब राब करून वाढवलेली 'वंचित' बाळासाहेब आंबेडकरांनी रा. स्व. संघाच्या गोठ्यात बांधली,” असा आरोप करुनही माने मोकळे झाले. “हा पक्ष बहुजनांचा राहिला नसून यात आता 'अभिजन' घुसले आहेत,” अशी खोचक टीका माने यांनी केली आहे. यावरून आता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ज्या गोपीचंद पडळकरांवरून माने यांनी बाहेरचा रस्ता धरला आहे, त्यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. त्यामुळे ही 'वंचित'मधील ही राजकीय ठिणगीच ठरते की पुढे त्याचे वणव्यात रुपांतर होते, ते येणारा काळाच ठरवेल.

 

फुटीमागे पवारांची 'पॉवर'?

 

'वंचित'मधील फूट वाटते तेवढी सहज झाली नाही, ती घडवून आणली आहे. दिसते तेवढे हे लक्ष्मण मान्यांचे प्रकरण साधेसरळ नसून त्यांचा 'बोलविता धनी' वेगळाच आहे. “काही दिवसांत सगळ्या गोष्टी लोकांसमोर येतील,” ही 'वंचित'चे नुकतेच उदयाला आलेले नेते गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. पडळकरांनी थेट कोणा व्यक्तीचे नाव घेतले नसले तरी त्यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस'चे नाव स्पष्ट सांगितले आहे. याचा अर्थ स्पष्ट असून त्यांना ज्येष्ठे नेते शरद पवारांवरच अंगुलीनिर्देश करायचा आहे. जसे पडळकर आधी रा. स्व. संघात सक्रिय होते तसे 'उपरा'कार माने आधी (कदाचित अजूनही) पवारांच्या राजकारणाचे खंदे समर्थक होते. अशा 'डबल गेम' करणार्‍या पडळकर आणि मानेंमधील ही राजकीय लढाई आहे. पण याला विविध राजकीय संदर्भ आहेत. 'वंचित'ने लोकसभा निवडणुकीत भल्याभल्यांचे राजकीय गणित बिघडवल्याने आता 'वंचित'चेच गणित येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघडविण्याचे डावपेच खेळले गेल्याची दाट शक्यता आहे. 'जाणते नेते' म्हणवले जाणारे पवार यांची 'पॉवर' तर अशा कारस्थानांसाठी कुप्रसिद्ध आहेच. त्यात 'उपरा'कार तर त्यांचे एकेकाळचे पट्टशिष्य. पवारांच्या नेहमीच्या प्रत्येक पक्षात 'आपला' माणूस असावा, या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी जाणीवपूर्वक मानेंची पाठवणी आंबेडकरांच्या गोटात केली असण्याची शक्यता आहेच. पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे विळ्याभोपळ्याचेे नाते तर सर्वश्रुत आहेच. आपल्या कट्टर राजकीय शत्रूच्या गोटात आपला माणूस नेमणे, हा पवारांच्या हातचा मळच. याची भुणभुण लागल्यानेच कदाचित बाळासाहेबांनी मानेंना महत्त्वाची जबाबदारी देण्यास नकार दिला असण्याची शक्यता आहे. विचारांमध्ये विरोध किंवा मतभेद असला तरी शक्यतो बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करायची नाही, असा आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये अलिखित नियम आहे. पण, माने यांच्या खांद्यावरून बंदूक चालवून 'अदृश्य शक्ती'ने हा प्रघात मोडला आहे. आता मानेंच्या बंडानंतर 'वंचित'ची वाटचाल कशी असेल व बाळासाहेब 'वंचित'ला कसे सांभाळतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. 'वंचित'च्या 'संचिता'ची राज्याच्या राजकारणात पुढेही नक्कीच दखल घेतली जाणार, एवढे नक्की.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@