ध्वज विजयाचा उंच धरा रे...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



२६ जुलै, १९९९ या दिवशी 'ऑपरेशन विजय' सफल संपूर्ण झालं. तेव्हापासून दर वर्षी २६ जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्य आणि वायूदलाच्या पराक्रमाची ही शौर्यगाथा...


दि. १९ फेबु्रवारी, १९९९. एक लक्झरी बस दिल्लीहून निघाली. तिच्यात भारताचेतत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह लोकप्रिय आणि प्रसिद्ध व्यक्तींचा एक समूहच होता. प्रख्यात चित्रपट अभिनेते देव आनंद आणि शत्रुघ्न सिन्हा, क्रिकेटपटू कपिलदेव निखंज, ख्यातनाम नर्तिका मल्लिका साराभाई, कवी जावेद अख्तर, पत्रकार कुलदीप नय्यर, चित्रकार सतीश गुजराल अशी ही सगळी झगमगती नक्षत्र मंडळी भारत-पाक सीमेवर अटारी इथे पोहोचली. समोर पाकची वाघा सरहद्द. तिथे त्यांचं स्वागत करण्यास खुद्द पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ जातीने उभे होते. प्रचंड जल्लोष झाला. मग हा सगळा ताफा लाहोर शहराकडे निघाला. लाहोर शहरात रावी नदीच्या काठावर २०० फूट उंचीचा एक भव्य मनोरा उभा आहे. त्याला म्हणतात 'मिनार-ए-पाकिस्तान'. या मनोऱ्याशी आपली राष्ट्रीय अस्मिता निगडित आहे, असं पाकिस्तानला वाटतं. कारण, मार्च १९४० या दिवशी महंमदअली जीना यांच्या नेतृत्वाखाली 'मुस्लीम लीग'ने ठराव संमत केला होता की, इंग्रजांच्या अंमलाखालील भारतात हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे असून, मुसलमानांना हिंदूंसोबत राहायचे नाही. आम्हाला वेगळा देश हवा. पुढे १९६८ साली पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी या घटनेची स्मृती म्हणून त्याच जागी २०० फूट उंचीचा एक मनोरा उभारला, तोच 'मिनार-ए-पाकिस्तान.'

 

नवाझ शरीफांनी त्याच 'मिनार-ए-पाकिस्तान' समोर विशाल मंच उभा केला होता. भारताच्या पंतप्रधानांचं आणि बरोबरच्या सगळ्यांचंच अतिशय उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. पाकिस्तानचे झाडून सगळे नेते तिथे हजर होते. पण भूदल, वायुदल आणि नौदल यांचे सर्वोच्च सेनापती मात्र नव्हते. ही एक गंभीर राजकीय त्रुटी होती. राजनैतिक शिष्टाचाराचा हा सरळ भंग होता. पाहुण्या येणाऱ्या राष्ट्रप्रमुखाला, एक राजनैतिक शिष्टाचार म्हणून मानवंदना देणं, कडक 'सॅल्यूट ठोकणं' हे सेनेचं कर्तव्य असतं. सेनापतींनी ते टाळलं होतं, हा कसला इशारा होता? अटलजींनी हे मनावर न घेता त्यांच्या नेहमीच्याच शैलीत अप्रतिम भाषण केलं. भारताला पाकिस्तानशी लढण्यात कसलंही स्वारस्य नाही. उलट खऱ्याखुऱ्या मैत्रीसंबंधातच दोघांचंही हित आहे, ही संपूर्ण हिंदू समाजाचीच भावना त्यांच्या शब्दांमधून उत्कटतेने व्यक्त होत होती. तिकडे पाकिस्तानी सेनाप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ मात्र मिशीतील मिशीत हसत असतील. कसं कळत नाही या हिंदूंना? अहो, तुम्हाला नसेल लढायचं, पण आम्हाला लढायचंय ना! पहिल्यांदा आम्हाला काश्मीर हवाय, मग टप्प्याटप्प्याने उरलेला हिंदुस्तान घेऊच. १९ फेबु्रवारीला लाहोरमध्ये शांतता आणि मैत्रीचे नगारे वाजत असताना पाकसैन्याचे भारतीय हद्दीतील मोर्चे पक्के बसलेसुद्धा होते. मश्को घाटी या या परिसरातल्या 'हुसेन पोस्ट' या एका चौकीला खुद्द सेनाप्रमुख मुशर्रफ ७ फेबु्रवारीला भेटसुद्धा देऊन आले होते. म्हणजे खुद्द सरसेनापती बेधडक सरहद्द ओलांडून परक्या भूमीवर उभारलेल्या बेकायदा लष्करी चौकीला भेट देऊन पाहणी करून आलेसुद्धा. आता तुम्ही राजकीय क्षेत्रात काय मैत्रीचे ढोल पिटायचे ते पिटा. भारताला गाफील ठेवा. तोवर आम्ही श्रीनगर ते लेह या भारताच्या राष्ट्रीय महामार्ग क्र.१ वरचा कारगिल ते बटालिक भाग ताब्यात आणतो. भारत सावध होऊन युद्धाला येईस्तोवर संपूर्ण लद्दाख ताब्यात घेऊन टाकू.

 

जीनांना सिंध, पंजाब, बलुचिस्तान या भागाप्रमाणेच संपूर्ण काश्मीर पाकिस्तानात हवा होता. पण, काश्मीरचे महाराज हरिसिंह त्यासाठी तयार होईनात. तेव्हा पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या वेषात सरळ काश्मीरवर हल्ला चढवला. तो दिवस होता, २२ ऑक्टोबर, १९४७ म्हणजे भारत-पाकिस्तान स्वतंत्र होऊन जेमतेम सव्वादोन महिने होत होते.नंतर झडलेल्या सुमारे १४-१५ महिन्यांच्या युद्धात भारताने पाकचा पराभव केला. पण, भारतात अधिकृतपणे विलीन झालेल्या काश्मीर संस्थानचा दोन तृतीयांश भूभाग पाकच्याच ताब्यात राहिला. उरलेला एक तृतीयांश भाग जिंकून घेण्यासाठी पाकने १९६५ आणि १९७१ अशा दोन युद्धात जंग-जंगपछाडलं. पण, भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर त्याची मात्रा चालली नाही. १९७१च्या युद्धानंतर 'सिमला करार' झाला. त्यानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच 'लाईन ऑफ कंट्रोल' उर्फ 'एलओसी'ही सरहद्द ठरविण्यात आली. भारताच्या हद्दीतल्या काश्मीरचे तीन प्रशासकीय विभाग आहेत. पहिला जम्मू विभाग, दुसरा काश्मीर खोरं आणि तिसरा लद्दाख. लद्दाखची हद्द चीनला भिडते. लद्दाख हा अति उंचीवरचा बर्फाळ प्रदेश असून तेथील लोकसंख्या फारच अल्प आहे. भारताचा राष्ट्रीय महामार्ग क्र.१, म्हणजे ट्राफिकवाल्यांच्या भाषेत 'एनएच १,' ही लद्दाखची जीवनवहिनी आहे. भारताच्या अति उत्तरेकडचा हा ५३४ किमीचा महामार्ग उरीमधून सुरू होतो आणि उरी-बारामुल्ला-श्रीनगर-सोनमर्ग-झोजीला खिंड-द्रास-कारगिल असे टप्पे घेत लेहलासंपतो. लेह ही लद्दाख विभागाची राजधानी. काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानने १९८८ पासू भलत्याच जोरदार कारवाया सुरू केल्या. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील रशियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी दिलेली अफाट शस्त्रसामग्री पाकिस्तानने काश्मीरकडे वळवली. काश्मीरच्या खोऱ्यात आणि जम्मू विभागातही दहशतवादाचा कहर उसळू दिला.

 

अशी दहा वर्षं गेली. भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे अतिरेकी चळवळ थंडावू लागली. मुसलमानी सुलतानशाहीच्या काळातलाच अनुभव पाकिस्तानला पुन्हा आला असं म्हटलं पाहिजे. कितीही देवळे पाडा, मूर्ती फोडा, कत्तली करा, बाटवाबाटवी करा, हे हिंदू लेकाचे संपतच नाहीत. तो अक्षय वट कितीही तोडा, त्याच्या मुळात तपता शिशाचा रस ओता, तो आपला परत जीवंतच. तसंच या काश्मीरसाठी कितीही खून, कितीही घातपात, कितीही बॉम्बस्फोट करा, काश्मीर काही हाती लागत नाही. अशातच ऑक्टोबर १९९८ मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ हा माणूस पाकचा सरसेनापती झाला. १९६५ आणि १९७१ या दोन्ही भारत-पाक युद्धांमध्ये लढलेला आणि 'स्पेशल सर्व्हिस ग्रुप' या पाकच्या कमांडो दलातला अधिकारी असलेला मुशर्रफ मोठा हुशार होता. जम्मू आणि काश्मीर विभागात इतकी वर्षं.... आपटली, पण काहीच उपयोग नाही म्हटल्यावर त्याने नवी धूर्त खेळी केली. लद्दाख विभाग ताब्यात घ्यायचा. उरी ते लेह असा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गाच्या उत्तरेला कारगिल ते लेह या सुमारे १६० किमी परिसरात अत्यंत दुर्गम अशा पर्वतरांगा आहे. या रांगांमधील शिखरं १६ ते १८ हजार फूट उंच आहेत. या पर्वत रांगांपलीकडेच ताबारेषा आहे. त्या ताबारेषेवर पहारा देण्यासाठी भारतीय सैन्याने अनेक पर्वतशिखरांवर गस्ती चौक्या निर्माण केल्या आहेत. डिसेंबर ते एप्रिल कडाक्याच्या थंडीच्या महिन्यांत या चौक्यांमध्ये सैन्य तैनात नसतं. तेव्हाच पाक सैनिकांनी 'मुजाहिदन' म्हणजे स्थानिक काश्मिरी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेषात या चौक्या काबीज करायच्या. मे महिन्यात भारतीय सैनिक चौक्यांवर येतील, तेव्हा लढाई करून त्या चौक्यांवर कायमचा ताबा मिळवायचा. म्हणजेच कारगिल ते लेह हा मार्ग कायमचा तोडून लेहवर कब्जा करायचा आणि लद्दाख कायमचा गिळायचा. भारत युद्धाला उभा राहिलाच, तर आता आपल्याकडे अणुबॉम्ब सज्ज आहेतच. मुशर्रफने बेत तर मोठा झकास जमवला होता. नवाझ शरीफांनी दिल्ली-लाहोर बसचे निमित्त करून भारतीय नेत्यांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला. पाकचा धर्मपिता म्हणजे ब्रिटन. क्रिकेट हे भारताचे मर्मस्थान. १४ मे १९९९ पासून इंग्लंडमध्ये जागतिक विश्वचषकाच्या स्पर्धा भरवून सर्व सामान्य भारतीय जनतेला क्रिकेटच्या गुंगीत ठेवलं गेलं.

 

पण, ६ जून, १९९९ रोजी भारतीय सैन्याने कारगिल क्षेत्रातल्या घुसखोरांविरुद्ध जबरदस्त प्रत्याघात सुरू केला आणि पाहता पाहता चित्र पालटलं. भंपक क्रिकेट, भ्रष्ट राजकारणी, चवचाल नट्या यांच्या मसालेदार बातम्या कुठच्या कुठे गेल्या आणि युद्धाच्या बातम्या गर्जू लागल्या. वृत्तपत्रं, साप्ताहिकं, विशेषांकं काढून जास्तीत जास्त युद्धवार्ता कव्हर करू लागली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तर प्रत्यक्ष बातम्या, माजी सेनापती, युद्ध वार्ताहर, युद्धतज्ज्ञ यांच्या मुलाखतींचा परिसंवादाच्या धडाकाच लावला. पाकिस्तानी घुसखोरांवर ओकणाऱ्या भारताच्या तुफानी बोफोर्स तोफ घराघरातल्या दूरदर्शनवरून गर्जना करू लागल्या. भारतीय जनतेत एक अपूर्व 'युद्ध उत्साह' संचारला. भारतीय सैन्याची मोहीम 'ऑपरेशन विजय' वेगाने पुढे सरकू लागली १३ जूनला टोनोलिंग जिंकलं. ४ जुलैला 'टायगर हिल' जिंकलं. ५ जुलैला द्रास जिंकलं. ७ जुलैला जुब्बार हिल जिंकलं. वास्तविक रणांगणावरची स्थिती अत्यंत प्रतिकूल होती. भारतीय सैन्य पहाडाखाली सपाटीवर होतं, तर पाकसैन्य १६ ते १८ हजार फूट उंचीच्या सरळसोट कड्यांच्या माथ्यावर पक्के मोर्चे बांधून बसलं होतं. पण, भारतीय वायुदल तोफखाना आणि पायदळ सगळ्यांनीच कमाल केली. कसलीही तमा न बाळगता ते कडे चढून गेले आणि हातघाईची लढाई करून त्यांनी शत्रू कापून काढला. २६ जुलै, १९९९ या दिवशी भारतीय सेनेने अधिकृतपणे जाहीर केलं की, शत्रूने पूर्णपणे माघार घेतली असून 'ऑपरेशन विजय' सफल संपूर्ण झालं आहे. तेव्हापासून दर वर्षी २६ जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@