वाळवंटातल्या नंदनवनात अब्दुल्ला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



आता मृत समुद्रावरही 'स्पा' निघू लागले आहेत आणि त्यात 'केम्पेन्स्की,' 'मेरियट' यासारख्या अग्रगण्य हॉटेल कंपन्या पुढाकार घेत आहेत.


'स्पा' हा शब्द सध्या फारच प्रचलित झाला आहे. इतका की, त्या प्रचलित होण्याला 'बोकाळला आहे' असेच म्हणावे लागेल. कुणीही गण्या-गंप्या उठतो आणि एक 'स्पा' सुरू करतो. 'स्पा' या शब्दाचा अर्थ काय, याचा त्याला पत्ता नसतो आणि पर्वा तर अजिबात नसते. 'स्पा' चालू केला की तिचे गुलहौशी, गुलछबू नवश्रीमंत मंडळी मसाज करवून घ्यायला, मेद झडवून घ्यायला येणार. त्यांचा खिसा हलका करायचा, हा महत्त्वाचा भाग. शब्दाचा अर्थ कळला नाही म्हणून काय फरक पडतो? मुळात 'स्पा' हे 'बेल्जियम' या युरोपमधील देशातील एक गाव आहे. खनिज पाण्याने समृद्ध अशा औषधी झऱ्यासाठी ते पूर्वापार प्रसिद्ध आहे. त्या पाण्याने अंघोळ करून किंवा काही काळ ते पाणी पिऊन 'रोगमुक्त' होऊ इच्छिणारे लोक नेहमीच 'स्पा'ला येत असतात. त्याच्या सोईसाठी चांगली मुक्कामाची स्थळं म्हणजे 'पथिकाश्रम' किंवा हॉटेल्सदेखील 'स्पा'मध्ये पूर्वापार आहेत. १९७०च्या सुमारास 'स्पा'मधील एका कल्पक हॉटेलचालकाने एक औषधी झरा सरकारकडून भाड्याने मिळवून त्याच्यावर नवं हॉटेल बांधलं. म्हणजे हॉटेलच्या मुख्य स्विमिंग टँकचे सगळेच पाणी औषधी झऱ्यातून येऊ लागले. शिवाय विविध प्रकारचे मसाज, सोना बाथ, मड बाथ इ. आरोग्यदायक अंघोळींचे जगभरचे सगळे प्रकार त्याने आपल्या हॉटेलमध्ये ठेवले. ही युक्ती भलतीच 'क्लिक' झाली. इतकी की, हळूहळू अशा सुखसोयींनी युक्त असलेल्या पर्यटनस्थळाला किंवा हॉटेललाच 'स्पा' असे नाव पडले. ते इतके रुळले की, आता औषधी झरा नसलेल्या, पण मसाज व विविध बाथ्स उपलब्ध असलेल्या कोणत्याही रिसॉर्टला 'स्पा' असेच म्हणतात.

 

आता मृत समुद्रावरही 'स्पा' निघू लागले आहेत आणि त्यात 'केम्पेन्स्की,' 'मेरियट' यासारख्या अग्रगण्य हॉटेल कंपन्या पुढाकार घेत आहेत. गेल्या वर्षी 'केम्पेन्स्की'चे 'इश्तार' हे ३१८ कक्षांचे भव्य हॉटेल मृत समुद्राच्या किनाऱ्यावर सुरू झाले. हे ठिकाण समुद्रसपाटीच्या १३०० फूट खाली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक प्रवाशांनी या हॉटेलला आवर्जून भेट दिली. त्यात विशेष उल्लेखनीय किंवा प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे रेनी झेलवेगर ही हॉलिवूडची नटी. यंदा 'हॉटेल इश्तार'ला जोडूनच 'अनंतारा' नावाचा 'स्पा' सुरू करण्यात आला आहे. सुमारे एक लाख चौरस फूट विस्ताराच्या या 'स्पा'मध्ये एक बर्फ गुंफा आहे. एक 'हमाम' म्हणजे सार्वजनिक किंवा सामुदायिक स्नानगृह आहे. २० 'मसाज कक्षं' आहेत नि २८ 'सोना' किंवा तत्सम स्नानकक्षं आहेत. मध्य-पूर्वेतला हा आजवरचा सर्वात मोठा 'स्पा' आहे. मृत समुद्राच्या काठी, भर वाळवंटात, समुद्रसपाटीच्या खाली असलेल्या या पर्यटनगरात अमेरिकन पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणार, हे नक्की आहे. त्यांनी यावं नि आपल्या खिशातला डॉलर्सचा भार हलका करून जावं, हीच ऑर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांची इच्छा आहे. आपला शेजारी इस्रायल पर्यटन व्यवसायावर चांगली कमाई करत असताना आपण मात्र परकीय चलनाला वंचित राहावं, हे अब्दुल्लांना पसंत नाही. जॉर्डन हा मध्य-पूर्वेतला एक अरब देश आहे. सौदी अरेबिया, सीरिया, इराक आणि इस्रायल हे त्याचे शेजारील देश आहेत. १९४९ पर्यंत या देशाला 'ट्रान्स जॉर्डन' असे नाव होते. त्या वर्षीपासून ते नुसतेच 'जॉर्डन' असे करण्यात आले. 'जॉर्डन' नावाची नदी इथून वाहते. तिच्या पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडचा प्रदेश किंवा 'जॉर्डन' नदीच्या खोऱ्यासह आजूबाजूचा बराच मोठा प्रदेश 'फिलिस्टाईन' नावाच्या लोकांचा मूळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. लष्करीदृष्ट्या हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा होता नि आजही आहे. कारण, तिथे आशिया, आफ्रिका नि युरोप हे तीन खंड एकत्र येतात. 'फिलिस्टाईन' लोकांची भूमी म्हणून तिला 'पॅलेस्टाईन' हे नाव रोमनांनी दिले. 'पॅलेस्टाईन'च्या उत्तरेला लेबेनॉन देश आहे. तेथील 'हरमॉन' नावाच्या पहाडावर 'जॉर्डन' नदी उगम पावते. ही नदी इतकी छोटी आहे की, तिला 'नाला'च म्हटले पाहिजे. मात्र, अगदी वर्षभर ती वाहत असते म्हणून तिला अनेक भूगोल अभ्यासक 'पूर आलेला नाला' असे म्हणतात. 'हरमॉन'च्या डोंगराळ भागातून उड्या घेत 'जॉर्डन'चा प्रवाह जेव्हा 'गॅलिली'च्या समुद्रात शिरतो, तेव्हाच तो समुद्रसमाटीच्या ६२८ फूट खाली गेलेला असतो. 'गॅलिली'चा समुद्र किंवा 'सी ऑफ गॅलिली' हा समुद्र नव्हेच मुळी, तो एक तलाव आहे. पण, आजूबाजूचा प्रदेश इतका ओसाड आहे की, हा तलाव म्हणजेच समुद्र वाटावा. येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अनेक प्रसंग या 'सी ऑफ गॅलिली'च्या परिसरात घडलेले आहेत.

 

'गॅलिली'च्या समुद्रातून बाहेर पडून 'जॉर्डन' नदी पुढे वाहत जाऊन, नव्हे उतरत जाऊन मृत समुद्राला मिळते तेव्हा ती समुद्रसपाटीपासून १३०० फूट खाली उतरलेली असते. 'गॅलिली'चा समुद्र ते मृत समुद्र हे अंतर सरळ रेषेत फक्त ६५ मैल आहे. पण, 'जॉर्डन' नदी ते पार करताना इतके वळसे नि वाकणं घेते की ते अंतर २०० मैल होतं! समुद्राला 'नदीचा पती' म्हटलं गेलं आहे. सागराला म्हणजे पतीला भेटण्यासाठी सरिता मोठ्या लगबगीने जात असतात, अशी कविकल्पना आहे. इथे 'जॉर्डन' नदीने आपल्या पतीला गळामिठी घालण्यासाठी इतके आडेवेढे घेण्याचे कारण म्हणजे तो 'मृत' आहे. 'जॉर्डन' हा हिब्रू भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ 'उतरत जाणारी.' ९० ते १५० फूट रूंदीचा प्रवाह मिरवणारी 'जॉर्डन' नदी जेव्हा मृत समुद्राला मिळते तेव्हा तिच्या मुखाची रूंदी होते फक्त ५४० फूट नि खोली जेमतेम तीन फूट! 'जॉर्डन' नदीच्या दोन्ही बाजूंना सुमारे १५०० ते २००० फूट उंचीच्या समांतर डोंगररांगा थेट लेबेनॉनपासून सिनाई वाळवंटापर्यंत उत्तर-दक्षिण अशा पसरत गेलेल्या आहेत. म्हणजे, ही पहाडपट्टी सुमारे २०० मैल लांब आहे. 'जॉर्डन' नदीचं हे खोर ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीनही संप्रदायांमधल्या असंख्य रोमहर्षक घटनांचं साक्षीदार आहे. येशू ख्रिस्ताचा दीक्षागुरू योहान हा 'जॉर्डन' नदीच्या काठीच राहत असे. 'जॉर्डन' नदीचे पाणी डोक्यावर शिंपडून तो लोकांना आपले 'शिष्यत्व' किंवा 'दीक्षा' देत असे. खुद्द येशूलाही त्याने अशीच दीक्षा दिली. म्हणून तर आजही ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्याच्या डोक्यावर पवित्र पाणी शिंपडलं जातं. या विधीला 'बाप्तिस्मा' असे म्हणतात. मृत समुद्र किंवा 'डेड सी' हे एक मोठे भौगोलिक आश्चर्य आहे. भूकंप किंवा तत्सम प्रचंड उलथापालथींमुळे या समुद्राचा इतर मुख्य समुद्रांशी असलेला संबध साफ तुटलेला आहे. त्यामुळे वाळवंटात असलेले एक बंदिस्त सरोवर असं रूप त्याला प्राप्त झालं आहे. मात्र, तरीही त्याचे पाणी खारेच आहे. बारा महिने 'जॉर्डन' नदी मृत समुद्रात सतत गोड पाण्याची भर घालत असूनही त्याचे पाणी खारेच आहे. नुसते खारे नव्हे, तर इतर समुद्रांपेक्षा पाच पट जास्त क्षार त्याच्या पाण्यात आहेत. त्यात मुख्यतः पोटॅश, ब्रोमाईड, मॅग्नेशियम इ. द्रव्यं भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ मंडळी बरेचदा त्याचा उल्लेख 'रसायनांची द्रव स्थितीतील खाण' असा करतात. सुमारे ४० मैल लांब आणि १० मैल रूंद अशा या मृत समुद्रातले पाणी रंगाने निळे असले तरी चवीला कडू आणि तेलकट आहे. अतिक्षारतेमुळे त्यात मासे जगत नाहीत, पण शिंपले जगतात आणि पाण्याच्या पारदर्शकतेमुळे ते वरून स्पष्ट दिसतात.

 

पूर्वी 'जॉर्डन' नदी दर दिवसाला यात ६५ लक्ष टन पाण्याची भर घालत असे. पण, कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवन होऊन मृत समुद्राची पातळी अगदी जशीच्या तशी राहत असे. हादेखील एक निसर्ग चमत्कारच! परंतु, आता 'जॉर्डन'च्या पश्चिम तटावरील इस्रायल देश तिच्यातून प्रचंड उपसा करतो आहे. मुळात ती नदी केवढीशी! तिच्यातून प्रचंड उपसा म्हणजे असा कितीसा करणार? पण, इस्रायली शेतीतज्ज्ञ तिच्या उपलब्ध पाण्याचा अक्षरश: थेंबन्थेंब वापरात आणतात. डोक वापरून आणि अविश्रांत कष्ट करून त्या बहाद्दर लोकांनी 'जॉर्डन'च्या पश्चिमेकडच्या आपल्या प्रदेशात वाळवंटाचं नंदनवन करून दाखवलं आहे. आता त्यांच्यापासून धडा घेऊन पूर्व किनाऱ्यावरचे सीरिया नि जॉर्डन हे देशही आपली शेती जोमदार करण्याच्या मागे गंभीरपणे लागले आहेत. कशी गंमत आहे पाहा- इस्रायल औद्योगिकदृष्ट्या अत्यंत आधुनिक आहे, पण आधुनिक कारखानदारी इतकंच किंबहुना कांकणभर जास्तच लक्ष तो आपल्या कृषी क्षेत्राकडे देतो. कारण, अखेर तोच मूलभूत उद्योग आहे, याची त्याला पूर्ण जाणीव आहे. त्याचा आदर्श समोर ठेवून आता जॉर्डन नि सीरियादेखील शेतीत लक्ष घालत आहेत. या सगळ्याच देशांची भूमी रेताड, नापीक, वाळवंटी आहे. पण, इस्रायलने तिथे नंदनवन फुलवून दाखवलं नि सीरिया, जॉर्डन तशीच महत्त्वाकांक्षा बाळगून काम करत आहेत आणि आम्ही दीड शहाणे भारतीय औद्योगिक प्रगती साधण्यासाठी आमच्या अमाप पिकणाऱ्या जमिनी धनदांडग्या उद्योगसमूहांच्या घशात घालून त्यांना 'स्पेशल इकनॉमिक झोन' बनविण्यात घालवत आहे! स्वतः शेतकरी असणारे आमचे 'लोकप्रिय' नेते आम्हाला शेती बंद करून धान्य आयात करण्याचे बदसल्ले देत आहेत. तर ते असो. अशा प्रकारे 'जॉर्डन' नदीच्या पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्यामुळे मृत समुद्राची पातळी दर वर्षाला सुमारे तीन फुटांनी खाली जात आहे. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार हे असंच चालू राहिलं तर सन २०५० मध्ये मृत समुद्र पूर्ण कोरडाठाक पडलेला असेल. परंतु, तोपर्यंत त्याच्या काठावरच्या 'स्पा' केंद्रांनी भरपूर धंदा केलेला असेल. इस्रायलला पर्यटन केंद्र म्हणून भूमध्य समुद्र आहे. जेरुसलेम, बेथलहेमसारखी जगविख्यात धार्मिक स्थळं आहेत. पण, जॉर्डन देशाला मात्र मृत समुद्र किंवा तत्सम फारच थोडी स्थळे आहेत. तेव्हा उपलब्ध असलेल्या प्रत्येक स्थळाचा 'पर्यटन केंद्र' म्हणून विकास घडवून आणायचा नि त्या योगे अमूल्य परकीय चलन मिळवायचे, असा जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांचा इरादा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@