पावसाळ्यातील विमा कवच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2019   
Total Views |



पावसाळ्याच्या काळात आरोग्य विम्यापासून ते वाहन विम्यापर्यंत विम्याचे कवच असणे कधीही सुरक्षित. तेव्हा, आज अशाच काही विमाप्रकारांची माहिती करून घेऊया...


विमा कंपन्यांकडे पावसाळ्यात वाहनधारकांचे बरेच दावे येतात, तसेच पावसात रोगराईवाढल्यामुळे आरोग्य विमाधारकांचे दावेही फार मोठ्या प्रमाणावर येतात. वैयक्तिक अपघातांच्या दाव्यातही या काळात वाढ झालेले दिसून येते. तसेच पावसामुळे बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान होते. परिणामी, या नुकसानीचे दावेही येतात. संपूर्ण वर्षात विमा कंपन्यांकडे येणाऱ्या दाव्यांत पावसाळ्यात येणाऱ्या दाव्यांचे प्रमाण अधिक असते. भारतात विशेषत: पावसाळ्यात नुकसान होण्याचे प्रमाण जरी जास्त असले, तरी भारतीय लोकसंख्येच्या तुलनेत सर्वसाधारणत: विमा (जीवन विमा नव्हे) उतरविणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. 'इन्शुअरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया'ने(आयआरडीएनआय) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये भारतात जीवन विम्याचे संरक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या ३.६९ टक्के आहे. पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीतून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता तुमच्याकडे एकूण चार प्रकारचे विमा संरक्षण असणे आवश्यक आहे.

 

मोटर (वाहन) विमा

 

वाहन विमा दोन प्रकारचा आहे. एक 'थर्ड पार्टी' व दुसरा 'कॉम्प्रेहेन्सिव्ह.' 'थर्ड पार्टी' विमा उतरविणे हे भारतात कायद्याने आवश्यक आहे. 'थर्ड पार्टी' विमाधारकाला अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीने वाहनाचे नुकसान झाल्यास त्याचा दावा संमत होत नाही. पण, वाहनाच्या अपघातात तिर्‍हाईत व्यक्ती जायबंद झाली, तर त्याला नुकसान भरपाई मिळू शकते. 'कॉम्प्रेहेन्सिव्ह' पॉलिसीमध्ये सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते. 'थर्ड पार्टी'पेक्षा 'कॉम्प्रेहेन्सिव्ह' पॉलिसीसाठी जास्त 'प्रीमियम' भरावा लागतो. 'कॉम्प्रेहेन्सिव्ह'मध्ये दरवर्षी घसारा विचारात घेऊन वाहनाची किंमत कमी कमी होते व दरवर्षी कमी झालेल्या रकमेवर विमा संरक्षण मिळते. पावसाळ्यात पाण्याने इंजिन खराब होते. 'इंजिन संरक्षण' खास विमाही आहे. या संरक्षणासाठी वाहनांच्या किंमतीच्या अर्धा ते एक टक्का अतिरिक्त प्रीमियम आकारला जातो. 'शून्य घसारा' तसेच 'इंजिन संरक्षण' हे 'क्लॉज' असलेला विमा जास्त पैसे भरून घ्यावा. पावसाळ्यात वाहनाच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहन नादुरुस्त होऊ शकते. वाहनावर झाड पडून वाहनाचे नुकसान होऊ शकते. झाडे पडण्याच्या प्रमाणात सध्या फार मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहन विम्याचे संरक्षण हवेच.

 

आरोग्य विमा

 

पावसाळ्यात बरेच आजार डोके वर काढतात. यापैकी अनेक आजार तर जीवघेणे असतात. 'आरोग्य विमा' किंवा 'मेडिक्लेम पॉलिसी' घेताना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना त्या पॉलिसीत संरक्षण आहे की नाही, हे पाहावे. पावसाळ्यापुरते मर्यादित न राहता, प्रत्येकानेे योग्य रकमेची विमा पॉलिसी घ्यावीच. नोकरीच्या ठिकाणी जरी कंपनीने तुमचा विमा उतरविलेला असला तरी त्यात कदाचित सर्व प्रकारच्या आजारांपासून संरक्षण असेलच असे नाही. त्यामुळे तो तपासून पाहा. कंपनीने काढलेली पॉलिसी त्रोटक असेल, तर तुमचे संपूर्ण संरक्षण करणारी एक वेगळी पॉलिसी उतरवा. विशिष्ट आजारांसाठीही पॉलिसी उतरविता येते. समजा, तुम्ही 'डेंग्यू' या आजारासाठीची पॉलिसी घेतली असेल, तर तुमच्या प्राथमिक आरोग्य पॉलिसीच्या 'नो क्लेम बोनस'ला धक्का लागत नाही व विशिष्ट आजारासाठीच्या पॉलिसीज तुमचा 'ओपीडी'ला झालेला खर्च व अन्य खर्चाचीही नुकसान भरपाई मिळते. विशिष्ट आजारांसाठी असलेल्या पॉलिसींमध्ये पॉलिसी काढल्यापासून पहिले ३० दिवस कोणत्याही प्रकारचा दावा संमत होत नाही. पावसाने अजून जोर धरलेला नाही. त्यामुळे ही पॉलिसी आता घ्यावी. पाऊस जोर धरेपर्यंत ३० दिवसांचा 'वेटिंग पीरिएड' संपून जर काही आजारांची बाधा झाली, तर संरक्षण मिळू शकेल.

 

वैयक्तिक अपघात

 

रस्ते अपघातांचे प्रमाण भारतात दिवसेंदिवस वाढताना दिसते. त्यातही अशा अपघातांत मृत्यू पावणाऱ्यांचे व जायबंदी होणाऱ्यांचे प्रमाणही भारतात जास्त आहे. भारतात वर्षभरच रस्ते अपघात होत असतात. पण, पावसाळ्यात या अपघातांमध्ये वाढ होते. पाणी भरणे, गटारांची झाकणे उघडी असणे, दृश्यमानता कमी होणे, तसेच निसरडे व खड्डे पडलेले रस्ते यामुळे पावसाळ्यात वैयक्तिक अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे वाहनचालकांनी 'वैयक्तिक अपघात विमा' तसेच वैयक्तिक विमा पॉलिसीही घ्यावी. यात पॉलिसीधारकाच्या नातेवाईकाला किंवा वारसाला पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर विमा संरक्षण मिळते. कायमचे पूर्ण अपंगत्व आले असल्यास, कायमचे काही प्रमाणात अपंगत्व आले असल्यास, काही कालावधीसाठी काही प्रमाणात अपंगत्व आले असल्यास विम्याचा दावा संमत होतो. तसेच अवयव निकामी झाल्यास डोळा, हात, पाय वगैरे तरीही विमा संरक्षण मिळते. या पॉलिसीची प्रीमियमची रक्कम फार कमी आहे. या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास विमा कंपनी पॉलिसीची पूर्ण रक्कम देऊन पॉलिसी बंद करते. कायमचे काही प्रमाणात अपंगत्व आल्यास, अपंगत्वाचे प्रमाण बघून पॉलिसी रकमेच्या काही टक्के रक्कम दावा म्हणून संमत केली जाते. काही काळासाठी पूर्ण अपंगत्व आल्यास, विमा कंपनीतर्फे दर आठवड्याला नुकसान भरपाई देण्यात येते. 'वैयक्तिक विमा पॉलिसी'तून उपचाराचा खर्च मिळत नाही. तो 'आरोग्य विमा पॉलिसी'तून मिळतो. 'वैयक्तिक विमा पॉलिसी' विमाधारकाचे जे आर्थिक नुकसान होते, त्याची भरपाई होते. पण, मृत्यू झाल्यास, अवयव निकामी झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते.

 

गृहविमा

 

पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळतात. घरांवर दरडी कोसळतात. घरांवर झाडे पडतात. घरात पाणी भरून घरातील वस्तू नादुरुस्त होतात. पावसाळ्यात शॉर्टसर्किटने घरांना, इमारतींना आग लागण्याचे प्रमाण फार मोठे असते. त्यामुळे घराचे छप्पर हे प्रत्येकाचे सर्वस्व असते. त्यामुळे गृहविम्याचे संरक्षण पावसाळ्यात हवेच! पावसात पूर आला, तर तळमजल्यावर राहणाऱ्या घरमालकांचे फार नुकसान होते. या विम्यासाठी वर्षाला पाच ते दहा हजार रुपये प्रीमियम भरावा लागतो. तुमच्या घरात असलेल्या लाखो रुपयांच्या वस्तू समोर पाच ते दहा हजार रुपये प्रीमियम भरून गृहविम्याचे संरक्षण घेणे कधीही चांगले. गृहविम्यात वैयक्तिक घराचा विमा उतरविता येतो किंवा संपूर्ण इमारतीचा विमा उतरविता येतो. संपूर्ण इमारतीचा विमा उतरविताना ज्या जागेवर इमारत उभी आहे, त्याचे मूल्य समाविष्ट केले जात नाही. फक्त त्यावर उभ्या केलेल्या इमारतीचे जे मूल्य असेल, त्या मूल्यावर प्रीमियम आकारला जातो. यात एक 'हाऊस होल्डरर्स पॉलिसी'ही आहे. ही पॉलिसी घरातील वस्तूंना संरक्षण देते. वीज कोसळण्यामुळे किंवा गडगडाटांमुळे कोणाचे दूरदर्शन संच खराब होतात, कोणाचे रेफ्रीजरेटर खराब होतात, याचीही नुकसान भरपाई मिळू शकते. तळमजल्यावर राहणारे व वरच्या मजल्यावर राहणारे यांचे नुकसान होण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. तळमजल्यावर पाणी घरात घुसू शकते. वरच्या मजल्यांवर राहणाऱ्यांना हा त्रास होत नाही, पण पावसामुळे घराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे जरी नुकसान झाले तरी त्यासाठी संरक्षण देणाऱ्या पॉलिसी आहेत. हल्ली पावसाळ्यात जीवितहानी व वित्तहानी फार मोठ्या प्रमाणावर होत असते. झाडे, होर्डिंग्ज अंगावर पडून माणसे मृत्युमुखी पडतात. वाहने खराब-नादुरुस्त होतात, घरे कोसळतात, जमीनदोस्त होतात, वीज पडून तसेच, पुरांमुळे जीवित व वित्तहानी होते. अनेक प्रकारचे आजार पसरतात. यातील अनेकआजार जीवघेणे असतात. त्यामुळे सद्यस्थितीत गरज म्हणून वर उल्लेखलेले विमा संरक्षण घ्यावे. यामुळे जीवितहानी भरून निघणार नाही, मानसिक धक्का बसणारच, पण काही प्रमाणात वित्तहानी भरून निघेल. विमा उतरविण्यासाठी भारतीय अजूून मनापासून परिपक्व नाहीत. यात विमा कंपन्यांनी, सामाजिक संस्थांनी बदल करून जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी विमा उतरविण्यासाठी प्रवृत्त करायला हवे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@