कॉंग्रेसचे भवितव्य...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2019   
Total Views |

 
 
- भाऊ तोरसेकर
 
 
निवडणुकांची मतमोजणी होऊन आता चार आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. नव्या सरकारचा शपथविधी झालेला असून सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशनही सुरू झाले आहे. पण, त्या निकालांच्या किंवा त्यातील पराभवाच्या धक्क्यातून अजून विरोधी पक्ष बाहेर पडलेले नाहीत. किंबहुना अशा वेळी ज्या मुख्य विरोधी पक्षाने सर्वांना सोबत घेऊन विरोधी राजकारणाची रणनीती बनवायला हवी, तो कॉंग्रेस पक्षच अजून त्या धक्क्यातून सावरलेला नाही. त्याची अनेक कारणे आता समोर आली असून, त्याची मीमांसा नंतरच्या काळात होत राहील. पण, जग कुणासाठी थांबत नाही आणि व्यवहारी राजकारणात असलेल्यांना हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कॉंग्रेसची अशी स्थिती का झाली, ते समजून घेतानाच त्यातून बाहेर पडण्याचेही मार्ग शोधायला हवेत. पण एकदा असा मोठा पराभव झाला, मग कुठल्याही बाजूचे मोठे अनुयायी डगमगू लागतात आणि कॉंग्रेस त्याला अपवाद नाही. म्हणून तर अनेक राज्यांत कॉंग्रेसमध्ये दुफळी माजलेली आहे आणि त्यांना आवर घालण्याच्या मन:स्थितीत श्रेष्ठी वा केंद्रीय नेतृत्व दिसत नाही. मग मीमांसा हा पुढला विषय झाला. पण, या निमित्ताने जे अनेक दृष्टिकोन पुढे आलेत, त्यातला एक मोलाचा धागा तेहसिन पुनावाला या कॉंग्रेस समर्थकाच्या लेखात सापडतो. किंबहुना त्यात नेमकी मीमांसाही असल्याचे ठामपणे सांगता येईल. विविध वाहिन्यांवर कॉंग्रेसची बाजू ठामपणे मांडणारा हा राजकीय निरीक्षक, एका इंग्रजी दैनिकातल्या लेखात म्हणतो, कॉंग्रेस आपली ओळखच हरवून बसली आहे. त्याचा दाखला देताना स्वातंत्र्यपूर्व काळातील कॉंग्रेसची ओळख ‘हिंदू राष्ट्रवादी पक्ष,’ अशी असल्याची आठवण त्याने करून दिलेली आहे. पण, मागील दोन दशकांत हळूहळू कॉंग्रेस हा राष्ट्रविरोधी व अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करणारा पक्ष होऊन बसला, असे त्याचे म्हणणे आहे, त्यात नवे काहीच नाही. 2014 च्या निकालानंतर नेमलेल्या अन्थोनी समितीने तोच निष्कर्ष काढला होता. कॉंग्रेस हिंदुविरोधी पक्ष ठरल्याने त्याची अशी दुर्दशा झाल्याचे अन्थोनी समितीनेही आपल्या अहवालात म्हटलेले होते.
त्यावरचा उपाय म्हणून मागील दीड-दोन वर्षांत राहुल गांधी प्रत्येक निवडणुकीपूर्वी स्थानिक मंदिरांच्या पायर्या झिजवू लागले. ‘जनेऊधारी ब्राह्मण,’ अशी आपली ओळख निर्माण करण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद होता. कारण मुद्दा मंदिरात जाण्याचा नव्हता, तर धर्मांध नसलेल्या हिंदू बहुसंख्यक समाजाचा विश्वास संपादन करण्याचा होता आणि तिथेच कॉंग्रेस तोकडी पडलेली आहे. त्याला पक्षाचे आजचे व्यापक नेतृत्व जबाबदार आहे. आज जे कुणी श्रेष्ठी म्हणून मिरवत असतात, त्यापैकी कुणीही मुळात कॉंग्रेसी संस्कारातून नेतृत्वापर्यंत आलेला नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल केल्याने नाव कमावलेल्यांना थेट पक्षात आणून नेते करण्याचे पाप झाले. त्यातून ही अवस्था आलेली आहे. त्याच्या नेमकी उलट स्थिती भाजपामध्ये दिसू शकते आणि तेच तिच्या यशाचे गमक आहे. कालपरवा भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शाहंनी निवडणुका जिंकण्याची यशस्वी रणनीती राबवली व तेही सरकारमध्ये सहभागी झाले; तर त्यांच्या जागी आता जयप्रकाश नड्डा यांच्याकडे पक्षाची संघटना सोपवण्यात आलेली आहे. लोकसभेचे सभापती म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. कित्येक वर्षे भाजपाच्या वा संघाच्या कुठल्या तरी संघटनेत कार्यकर्ता म्हणून राबत उच्च पदी आलेल्यांच्या हातीच पक्षाच्या धोरणांची सूत्रे राहतील, अशा पद्धतीने काम चाललेले दिसते. नड्डा असोत की बिर्ला, शाह असोत; त्यांनी तरुण वयात संघ वा पक्षाच्या युवा संघटनेत काम केलेले आहे. त्याला विचारसरणीचे संस्कार म्हणतात. चिदम्बरम्, कपिल सिब्बल वा राजीव शुक्ला अशापैकी किती ज्येष्ठ कॉंग्रेसनेते तळागाळातून कार्यकर्ता म्हणून भरती होऊन या पदापर्यंत पोहोचले आहेत? त्यांना आपल्या पक्षाचे विचार वा संस्कारही ठाऊक नाहीत. इतिहासाची ओळख नाही. पुरोगामी वा सेक्युलर अशा शब्दांची पोपटपंची करण्यापलीकडे त्यांना कॉंग्रेस ठाऊक नाही.
 
लोकसभा प्रचाराची धुराही तशाच उपटसुंभ व्यावसायिकाकडे सोपवण्यात आलेली होती. त्याने जे मुद्दे दिले किंवा घोषणा दिल्या, त्याचे आंधळे अनुकरण करत कॉंग्रेस निवडणुकीच्या गाळात रुतत गेली. त्याचाही वादग्रस्त तपशील आलेला आहे. ज्याला दोन वर्षांपूर्वी कॉंग्रेसमध्ये कुणी ओळखत नव्हता, तोच निवडणुकीच्या प्रचाराचे सूत्रसंचालन करीत होता आणि त्याला उलटा प्रश्न विचारण्याची कुणाची बिशाद नव्हती. तशीच कुणी कन्नड अभिनेत्री भाजपाविरोधी आघाडी चालवण्यासाठी नेमली होती आणि निकाल लागल्यानंतर ते दोघेही बेपत्ता आहेत! माल्ल्या वा नीरव मोदीपेक्षा त्यांची कहाणी वेगळी नाही. शतायुषी पक्षात असे कुणीही येऊन धुमाकूळ घालत असतील, तर त्या पक्षाला कुठले भवितव्य असू शकते? त्यांच्यावर आणि त्यांच्यासाठी किती पैसे खर्च झाले, हा वेगळा विषय आहे. पण, त्यांनी केलेले पक्षाचे नुकसान भरून आणण्यासाठी आता कुणी पुढे यायला राजी नाही, ही शोकांतिका आहे. अशा वेळी तेहसिन पुनावाला, इतिहासाची आठवण करून देतो, तोच अधिक प्रामाणिक वाटतो. डाव्या क्रांतिवादी पोपटपंचीच्या आहारी जाऊन कॉंग्रेस आपली ओळख पुसत गेली, तीच खरी समस्या आहे. कॉंग्रेस हा देशातील कुठल्याही राज्यातील व धर्मातील कार्यकर्त्यांसाठी मुख्य प्रवाह होता. त्याची तीच ओळख पुसली जाताना भाजपा, हिंदू हिताचे रक्षण करणारा पक्ष म्हणून पुढे आला. हे सत्य स्वीकारले तरी सावरणे अशक्य नाही. त्यासाठी भगवी वस्त्रे परिधान करून हिंदुत्ववादी होण्याची गरज नाही, तर सर्वसमावेशक राजकीय पक्ष ही आपली ओळख कॉंग्रेसला पुनरुज्जीवित करावी लागेल. कार्यकर्त्यांची नवी फौज उभी करून उसनवारीचे व्यावसायिक नेते आणून चालढकल केल्यास त्या पक्षाला भवितव्य नसेल. शक्य झाल्यास कॉंग्रेसपासून दुरावलेले छोटे प्रादेशिक गट व नेतेही सामावून घेता येतील. पण, मुळात आपली ओळख कॉंग्रेसने इतिहासाच्या आरशात डोकावून करून घ्यावी.
 
सात दशकांपूर्वी स्वातंत्र्य येताना देशाची फाळणी धर्माच्या आधारावरच झालेली होती आणि त्यात हिंदूंचा राष्ट्रवादी पक्ष म्हणून कॉंग्रेसने भूमिका बजावली होती. मुस्लिम हिताचे रक्षण करणारा पक्ष, अशी कॉंग्रेसची प्रतिमा कधीच नव्हती. बहुसंख्यक हिंदूंच्या वतीने राष्ट्रहित जपणारा पक्ष, ही प्रतिमा होती. म्हणून तर मुस्लिम लीगसारखा धर्माधिष्ठित पक्ष कॉंग्रेसला हिंदू पक्ष म्हणून हिणवीत होता. आज नेमके त्याच भाषेत कॉंग्रेसवाले भाजपाला टोचून बोलत असतील, तर स्वातंत्र्योत्तर काळातल्या कॉंग्रेसचा खरा वारसा आपणहून भाजपाकडे आलेला आहे. तो वारसा कॉंग्रेसने नाकारला आणि भाजपाने स्वीकारला. तिथेच देशातील राजकीय उलथापालथ सुरू झालेली होती. त्याचे परिणाम दिसायला तीन-चार दशके उलटली इतकेच. आज ज्या प्रकारे कॉंग्रेसमध्ये मुस्लिम दिसतात किंवा मुस्लिमांना कॉंग्रेस आपला पक्ष वाटतो, तशी तेव्हा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातली परिस्थिती नव्हती. मुस्लिम लीगने पाकिस्तान घेतल्याने इथे उरलेल्या धार्मिक अस्मिता जपणार्या मुस्लिम नेत्यांनी धाकापोटीच कॉंग्रेस जवळ केली होती. अन्यथा तेव्हा व नंतरच्या दोन दशकांत ‘हिंदू राष्ट्रवादी पक्ष’ अशीच कॉंग्रेसची ओळख होती. साहजिकच देशाच्या कुठल्याही कानाकोपर्यात कुणी सामाजिक कार्यात उतरला, तर आपोआप कॉंग्रेसी म्हणूनच मुख्य प्रवाहात दाखल व्हायचा. मध्यंतरीच्या काळात कॉंग्रेसमध्ये डाव्या समाजवादी मंडळींनी घुसखोरी केली आणि त्या हिंदू राष्ट्रवादी पक्षाचा चेहरामोहरा बदलून टाकला. आता कॉंग्रेसच्या नेत्यांना वा वारसांनाही आपली खरी ओळख उरलेली नाही! आताची कॉंग्रेस डाव्या विचारांच्या विकृतीच्या इतकी आहारी गेली आहे, की त्यात स्वातंत्र्यचळवळीचा मागमूसही उरलेला नाही. तिच्या नेतृत्वाला गांधीजी आणि माओ यातला फरकसुद्धा समजेनासा झाला आहे. अशा स्मृतिभ्रंश झालेल्या जमावाला कुठले भवितव्य असू शकते?
@@AUTHORINFO_V1@@