हायरोग्लीफसचं गूढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



इजिप्तमधल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ती देवांची भाषा होती. त्याचा अर्थ कुणालाच उलगडता येईना. युरोपीय अभ्यासकांनी त्या लिपीला ‘हायरोग्लीफ’ असं नाव दिलं.


युरोपीय देशांनी ज्याप्रमाणे जगभर आपलं साम्राज्य पसरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला; त्याचप्रमाणे त्यांनी जगभरातील विविध देशांचा, तिथल्या स्थानिक भाषांचा, इतिहासाचा, सभ्यतांचा कसून अभ्यास केला. या अभ्यासामागचा हेतू केवळ ज्ञानार्जन एवढाच होता, असं म्हणता येणार नाही. कारण, त्या त्या देशातल्या धर्मापेक्षा, भाषेपेक्षा, सभ्यतेपेक्षा आमचा ख्रिश्चन धर्म, आमची भाषा आणि आमची युरोपीय सभ्यताच कशी श्रेष्ठ आहे, हे तिथल्या लोकांच्या मनावर ठसवण्याचाच त्यांनी प्रयत्न केला. पण, कसं का असेना, त्यांनी प्रचंड अभ्यास केला आणि तो ग्रंथरूपात जतन करून ठेवला. यातून विविध अध्ययन शाखांचा उदय झाला. भारताचा सर्वांगीण अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे ‘इंडॉलॉजी’ किंवा ‘भारतविद्या.’ तशीच इजिप्तचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे ‘इजिप्टॉलॉजी’ किंवा ‘इजिप्तविद्या.’ इस्लामी अरब आक्रमकांनी इजिप्तमध्ये इतक्या कत्तली नि बाटवाबाटवी केली की, तिथले मूळ लोक, त्यांचा वंश इत्यादी संपले. अरबांकडून इजिप्तचा ताबा प्रथम मामेत्बुक तुर्क आणि मग उस्मानी तुर्कांकडे आला. १६-१७व्या शतकात जेव्हा युरोपीय राष्ट्रांचा पूर्वेकडल्या देशांशी व्यापार वाढू लागला, तेव्हा इजिप्तवर कॉन्स्टन्टिनोपल उर्फ इस्तंबूलच्या उस्मानी साम्राज्याचा-ऑटोमन एम्पायरचा अंमल होता. अतिशय चौकसपणे सगळीकडे पाहणाऱ्या युरोपीय संशोधकांचं लक्ष पिरॅमिड्सकडे गेलं. पिरॅमिड्ससह अन्यत्रही आढळणाऱ्या अनेक कोरीव शिळांचाही त्यांनी अभ्यास सुरू केला. ही इजिप्तविद्येची सुरुवात होती. त्या कोरीव शिळांवरच्या मजकुरात कोणतीही लिपी नव्हती, तर काही चिन्हं होती. इजिप्तमधल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ती देवांची भाषा होती. त्याचा अर्थ कुणालाच उलगडता येईना. युरोपीय अभ्यासकांनी त्या लिपीला ‘हायरोग्लीफ’ असं नाव दिलं.

 

सन १७८९ साली फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. राजा सोळावा लुई आणि राणी मेरी अँटोनेट यांच्यासह अनेक सरदारांना ठार मारण्यात आलं. पण, मग क्रांतिकारकांमध्ये आपापसातच मारामाऱ्या सुरू झाल्या. त्यांनी एकमेकांना ठार मारलं. असं होता होता सर्वसंमतीने एक सत्ताधारी गट निर्माण झाला आणि तो विविध क्षेत्रांत तिथल्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेऊ लागला. या अवस्थेतूनच नेपोलियन बोनापार्ट नावाच्या तरुण, तडफदार आणि कर्तबगार माणसाचा उदय झाला! सन १७९८ मध्ये नेपोलियनने इजिप्तची मोहीम हाती घेतली. अजून तो सर्वसत्ताधीश झालेला नव्हता, तर सत्तारूढ मंडळींचा सेनापती होता. इजिप्तच्या मोहिमेमागे त्याचे अनेक हेतू होते. इजिप्तवर ताबा मिळवून इंग्रजांचा भारताकडे जाणारा मुख्य व्यापारी मार्ग कापणं, हा प्रमुख हेतू. त्याचप्रमाणे मध्यपूर्वेत फ्रान्सचा दबदबा निर्माण करणं, इस्लामधर्मीयांना ख्रिश्चन धर्म, संस्कृती यांचं श्रेष्ठत्व पटवणं हेदेखील त्याचे हेतू होते. त्यामुळे नेपोलियनच्या सैन्यात संशोधक, शास्त्रज्ञ आणि धर्मचिंतकदेखील होते. भूमध्य समुद्रातल्या ब्रिटिश आरमाराला चकवून नेपोलियनने अलेक्झांड्रिया हे इजिप्तचे मुख्य बंदर सहज जिंकलं. ताबडतोब लष्करी, आरमारी आणि राजनैतिक कारवायांबरोबरच फ्रेंच विद्वानांनी अध्ययनाचं कामही झपाट्याने सुरू केलं. काहिरा उर्फ कैरोमधल्या प्रमुख उलेमांना इस्लामी धर्मचिंतकांना फ्रेंच धर्मचिंतक भेटले. त्यांच्यात धर्मसंवाद सुरू झाला. भाषातज्ज्ञ अरबी भाषक विद्वानांना भेटले. त्यांच्यात संवाद सुरू झाला. हे परस्परसंवाद, एकमेकांना समजून घेणं वगैरे.सगळं गोड-गोड बोलणं पूर्णपणे राजकीय असतं, याचा आपल्याला अनुभव आहेच. मारे मराठी भाषा शिकून घ्यायची आणि मग तिच्यात ख्रिस्तपुराण नि येशूची कवनं रचून, तुमच्या धर्मापेक्षा आमचाच धर्म श्रेष्ठ; हेच शेवटी सांगायचं? तर हे सगळे वर्षभर चाललं होतं. १७९९ साली राजकारणाचे फासे उलटे पडू लागले. नेपोलियनला इजिप्तमध्ये थांबणं अशक्य झालं. त्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये तो फ्रान्सला परतला. इजिप्तच्या उलेमांना पटविण्याचा नेपोलियनच्या विद्वान टोळीचा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. उलट, प्राचीन इजिप्शियन इतिहास आणि सभ्यतेतून आपल्याला बरेच काही शिकता येण्यासारखे आहे, हे फ्रेंच विद्वानांच्या लक्षात आलं.

 

या मोहिमेत एक फारच महत्त्वाची घटना घडली. अलेक्झांड्रियापासून वायव्येला सुमारे ५६ किमी अंतरावर रशीद या गावी तैनात असलेल्या फ्रेंच इंजिनिअरिंग रेजिमेंटमधल्या पिअरे फ्राझ्वाझेवियर बुचार्ड या अधिकाऱ्याला एक कोरीव शिळा सापडली. सुमारे ४ फूट लांब आणि अडीच फूट रुंद अशा या शिळेवर तीन भाषांमध्ये काहीतरी कोरलेलं होतं. बुचार्डने ती शिळा सांभाळून ठेवली. नेपोलियन परत फिरल्यावर इजिप्तचा ताबा ब्रिटिश आरमाराने घेतला आणि इतर मौल्यवान खजिन्याबरोबरच ही शिळाही त्यांच्या हाती पडली. युरोपीय लोक पौर्वात्य नावांचा उच्चार मुद्दाम वेडावाकडा करीत असत. स्वत:चं श्रेष्ठत्व दाखविण्याचा हा एक प्रकार. मग ‘कलकत्ता’चं मुद्दाम ‘खेलखॅटा’ करायचं, ‘गंगा’चं ‘गँजेस’, ‘मथुरा’चं ‘मूतरा’, ‘उस्मान’चं ‘ऑटोमन’, तसेच ‘रशीद’चं फ्रेंचांनी ‘रोझेट’ केलं. इंग्रजांनी फ्रेंचांपेक्षा आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी ‘रोझेट’चं ‘रोझेटा’ केलं आणि अशा प्रकारे इजिप्तमधल्या रशीद गावी सापडलेली कोरीव शिळा ‘रोझेटा स्टोन’ या नावाने लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये दाखल झाली. मग थॉमस यंग या ब्रिटिश संशोधकाने त्यावरच्या लेखाचा अभ्यास सुरू केला. यातूनच आतापर्यंत न उलगडलेल्या ‘हायरोग्लीफ’ चिन्हांचा उलगडा झाला. यंगच्या असं लक्षात आलं की, हा लेख तीन वेगवेगळ्या लिप्यांमध्ये आहे. त्यापैकी एक प्राचीन ग्रीक लिपी आहे. साहजिकच त्या लेखाचा तर्जुमा लगेच झाला. ख्रिस्तपूर्व १९६ या वर्षी इजिप्तच्या पाचवा टॉलेमी या राजाने एका मंदिराला दिलेलं ते दानपत्र होतं. त्या मंदिराला तत्कालीन विशिष्ट करांमधून सूट दिल्याचं नि त्या मंदिरातल्या दोन पवित्र बैलांसाठी काही रक्कम मंजूर केल्याचं ते दानपत्र आहे. राजाने देवस्थानाला जमीन देणं, उत्पन्न लावून देणं, करात सवलत देणं, देवराई लावण्यासाठी रक्कम देणं याचप्रमाणे देवासाठी बोकड, रेडा अगर बैल, वळू सोडणं या चालीरीती इजिप्तमध्येही होत्या, हे या लेखावरून समजलं. थॉमस यंगबरोबरच जाँ फ्राझ्वा शाँपोलेआँ हा फ्रेंच तज्ज्ञही शिलालेख उलगडण्याच्या कामात गुंतला होता. शिलालेखातली एक लिपी ग्रीक असण्याचं कारण, टॉलेमी राजे हे मुळात रामसीस वगैरेसारखे फारोहा वंशाचे नव्हते तर ग्रीक होते. म्हणजे फारोहा राजांकडून ग्रीकांनी इजिप्त जिंकल्यावर त्यांनी आपला जो सुभेदार अलेक्झांड्रियात नेमला, तो टॉलेमी पहिला. पुढे ग्रीक केंद्रसत्ता दुबळी बनल्यावर हे टॉलेमी जवळजवळ स्वतंत्रच बनले नि स्वत:ला राजे म्हणवून घेऊ लागले.

 

शिलालेखातली दुसरी लिपी ‘डेमोटिक’ ही आहे. ही इजिप्तमधल्या तत्कालीन सामान्य लोकांची लिपी होती. ती उलगडल्यावर असं लक्षात आलं की, हे ग्रीक लिपीतल्या त्याच लेखाचं ‘डेमोटिक’ रूपांतर आहे. म्हणजे मग तोच लेख ‘हायरोग्लीफ’मध्येही असला पाहिजे. या तर्काने उलट प्रवास करत थॉमस यंगने ‘हायरोग्लीफ’च्या खुणांसाठी अक्षरं निश्चित केली. ही इजिप्तविद्येतली खरी क्रांती होती. कारण, ‘हायरोग्लीफ’ चिन्हांसाठी एकदा अक्षरं नक्की झाली म्हटल्यावर इजिप्तमधल्या इतर अनेक शिलालेखांचं वाचन भराभर होऊ लागलं आणि आजवर अज्ञात असलेला इतिहास उजेडात येऊ लागला. ‘हायरोग्लीफ ही देवांची लिपी आहे, असे जे इजिप्शियन लोक म्हणतात, त्यालाही यातून बळकटी मिळाली. रशीद शिळेवर एकच दानपत्र तीन लिपींमध्ये का कोरण्यात आलं, तर ग्रीक लिपीतला लेख टॉलेमी राजाची भाषा म्हणून; डेमोटिक लेख जनसामान्यांची भाषा म्हणून आणि ‘हायरोग्लीफ’ लेख देवांची भाषा म्हणून. नुकतंच जॉन रे या केंब्रिजमधल्या नामवंत इजिप्तविद्यातज्ज्ञांचं, या सगळ्या घटनाक्रमाचा साद्यंत वृत्तांत देणारं ’दि रोझेटा स्टोन अ‍ॅण्ड दि रिबर्थ ऑफ एन्शन्ट इजिप्तहे पुस्तक हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केलं आहे. युरोपीय संशोधक एखाद्या गोष्टीचा किती कसून अभ्यास करतात, याचा हा ग्रंथ म्हणजे एक प्रत्यक्ष पुरावा आहे. अर्थात, आपल्या दृष्टीने ‘हायरोग्लीफ’ लिपीचा उलगडा हे एक गौडबंगालच आहे. कारण, मुळात इंग्रजी काय किंवा फ्रेंच काय, या भाषाच अशास्त्रीय आहेत. ‘हायरोग्लीफ’ चिन्हांसाठी यंगने इंग्रजी मुळाक्षरे बसवली. पण, म्हणजे मूळ लेखकाला त्या अक्षरांचे तेच उच्चार अपेक्षित असतीलच असं नव्हे. ‘हायरोग्लीफ’च्या इंग्रजी वाचनावरून आज ‘फ्रारोहा’, ‘रामसिस’, ‘तुतनखामन’ इत्यादी उच्चार प्रचलित झाले आहेत, पण त्या प्राचीन इजिप्शियनांना ते तसेच अपेक्षित असतीलच असं नव्हे. जे इंग्रज ’गांधी’ या अगदी साध्या, सोप्या शब्दाचा उच्चार ‘गँडी’ असा करतात, त्यांच्या ‘हायरोग्लीफ’ उच्चार निश्चितीवर कसा विश्वास ठेवायचा? म्हणजे पाहा, संस्कृत या अत्यंत शास्त्रशुद्ध भाषेच्या अभ्यासकांना अभ्यासासाठी, संशोधनासाठी केवढे प्रचंड क्षेत्र उपलब्ध आहे ते! नेपोलियनबरोबरच्या तज्ज्ञांनी इजिप्तमधल्या उलेमांना, ‘आमचीच भाषा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे,’ हे पटविण्याचा प्रयत्न केला होता. इथे मुळात संस्कृत ही ‘आपली’ भाषा आहे नि ती कोणत्याही पाश्चिमात्त्य भाषेपेक्षा शास्त्रशुद्ध आहे, हे आपल्याच लोकांनाच पटविण्यापासून सुरुवात करावी लागेल. अरे, है कोई माई का लाल?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@