हा विजय, राष्ट्रीय जनतेचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019   
Total Views |

 

भाजपच्या या विजयाची शिल्पकार भारतातील राष्ट्रीय जनता आहे. ही राष्ट्रीय जनता धर्माचा म्हणजे उपासना पद्धतीचा विचार करीत नाही, जातीचा विचार करीत नाही, भाषेचा विचार करीत नाही, गरीब-श्रीमंत असा वर्गीय विचार करीत नाही. ती देशाचा विचार करते. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित, हे या जनतेला समजते.

नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल, भाजपला अपयश येईल, एनडीएला सरकार बनविण्याइतक्या जागा मिळणार नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा गठबंधनाचे सरकार येईल, अशा भावविश्वात शरद पवार, चंद्राबाबू नायडू, मायावती, ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी होते. त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. शेख महम्मदी स्वप्ने हवेत विरून गेली आहेत. ज्याला आपण अशिक्षितम्हणतो, ज्याला राजकारणाची आकडेवारी समजत नाही, आर्थिक संख्याशास्त्र समजत नाही, अशा मूक आणि बहिर्या मतदाराने या सर्वांच्या कानफटात अशी हाणली आहे की, उमटलेली पाच बोटे पुसून जायलादेखील वर्ष-सव्वा वर्ष लागेल.

नरेंद्र मोदी, भाजप आणि रालोआविरुद्ध २०१४ पासूनच कसा ठरवून प्रचार झाला. पहिल्यांदा हे सांगण्यात आले की, देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने येऊ लागली आहेत. भाडोत्री पुरस्कारवापसीवाल्यांनी पुरस्कार वापस करायला सुरुवात केली. यांना कधी काळी पुरस्कार मिळाले होते, हे तेव्हा लोकांना समजले. तेव्हा पहिली प्रतिक्रिया अशी होती की, या भुतावळीला कशासाठी पुरस्कार दिले? ज्यांना आपल्या इमारतीतदेखील फारसे कुणी ओळखत नाही. त्यांना असे वाटले की, पुरस्कार वापस केल्याने प्रचंड खळबळ निर्माण होईल. समुद्रात पावसाचे दोन थेंब पाणी पडल्याने समुद्राला उधाण आल्याचे कुणी ऐकले आहे काय?

हैदराबाद विद्यापीठात रोहित वेमुला याने आत्महत्या केली. तो दलित नसताना त्याला दलितठरविण्यात आले. त्याच्याभोवती कथानक गुंफण्यात आले. (डाव्यांच्या शब्दात नरेटिव्ह’) भाजप दलितविरोधी आहे, असा प्रचार सुरू झाला. दलितांवर कुठे हल्ले झाले, त्यांना मारझोड झाली की, ते भाजपला चिकटविण्यात येऊ लागले. २०१९ च्या निवडणुकीत या सर्व दलित बांधवांनी भाजपला भरभरून मते दिली. लबाड लांडगं ढाँग करतंय,’ हे सामान्यातील सामान्य दलित बांधवाला समजले.


नंतर प्रचार सुरू झाला, संविधानीय संस्था धोक्यात येत चालल्या आहेत. लोकसभा, सर्वोच्च न्यायालय, सेन्सॉर बोर्ड, एफटीआय, विद्यापीठे, धोक्यात येत चालली आहेत. त्यांच्या स्वायत्ततेवर बंधने येऊ लागली आहेत. संघाची माणसे तिथे घुसवली आहेत, हा प्रचार झाला. २०१९ साली मतदारांनी असा प्रचार करणार्यांच्या तोंडाला मतदानाची शाई फासली आहे. ती लवकर निघत नाही, म्हणून आता महिनाभर धुवत बसा.

या प्रचाराचा आणखी एक फुसका बार झाला आणि मग प्रचार सुरू झाला, ‘संविधान धोक्यात आले आहे. संविधान धोक्यात आले आहे,’ हा बोक्यांचा प्रचार होता. मांजर जातीतील बोका हा धूर्त आणि लबाड प्राणी समजला जातो. फुकटचं खाण्यात आणि दादागिरी करण्यात त्याची हयात जाते. ज्यांना संविधानया शब्दातील फक्त चार अक्षरेच माहीत आहेत, ते संविधानतज्ज्ञासारखे बोलू लागले. या सगळ्या बोके मंडळींना २०१९ च्या मतदारांनी खोक्यात बंद करून टाकले आहे. आशा करूया की, आता त्यांची संविधान-संविधानही ओरड काही काळापुरती तरी बंद होईल. 


या सर्व फलटणींचे नेतृत्व केले राहुल गांधींनी. मीडियाने असे चित्र रंगविले की, देशातील महासंग्राम रागा विरुद्ध नमोअसा आहे आणि रागालाही असे वाटू लागले की, खरोखरच हा संघर्ष मी म्हणजे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असाच आहे. मग त्यांनी बेफाम भाषणे करायला सुरुवात केली. घोषणा दिली चौकीदार चोर है’, ‘नरेंद्र मोदी माझ्याशी जाहीर चर्चा करायला घाबरतात, पाहा त्यांचे तोंड कसे उतरले आहे.’ ‘मी सत्तेवर आलो तर नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवेन.

निवडणुकांचे निकाल आले आहेत. काँग्रेसला ५० च्या आसपास जागा मिळाल्या आहेत. तुमची जागा कुठे आहे, हे जनतेने राहुल गांधींना दाखवून दिले आहे. राहुल गांधींच्या वटवटीवर मोदी काहीच बोलले नाहीत. सोशल मीडियावर एक विनोद वाचला, एक सिंह आणि गाढव यांच्यात वाद झाला. सिंह म्हणाला की, “आकाशाचा रंग निळा आहे.गाढव म्हणाला की, “आकाशाचा रंग काळा आहे.वाद न्यायालयात गेला. न्यायाधीशांनी दोघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि सिंहाला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. सिंह म्हणाला,“महाराज, माझे म्हणणे बरोबर असताना मला शिक्षा का?” न्यायाधीश म्हणाले,“एक तर तू गाढवाशी वाद का केलास? तो गाढव आहे, हे तुला माहीत आहे ना. तू सिंह आहेस, हे तू कसे विसरलास. म्हणून तुला एक दिवसाची कोठडी.न्यायमूर्ती पुढे म्हणाले,“मोदी कधी केजरीवाल, राहुल गांधी, मायावती यांच्याशी वाद करतात का?”

काँग्रेसने गाजावाजा करून प्रियांका गांधींना राजकारणात आणले. मीडियाने प्रचार सुरू केला, ‘काँग्रेसने आपले ब्रह्मास्त्र काढले.प्रियांका गांधी, इंदिरा गांधींसारख्या दिसतात, याचा प्रचार झाला. २०१९ च्या निवडणुकीने प्रियांका गांधी ब्रह्मास्त्र नसून शोभास्त्र आहे, हे दाखवून दिले. इंदिरा गांधींसारख्या दिसतात म्हणून प्रियांका इंदिरा गांधी होऊ शकत नाहीत. शिवाजीच्या भूमिका करणारे अनेक नट आहेत. ते महाराजांचा पोशाख घालून, कमरेला तलवार लटकवून रंगमंचावर किंवा पडद्यावर येतात. ती भूमिका संपली की, नट हा नट राहतो, तो शिवाजी नसतो. सामान्य माणसाला हे समजते. मीडियाला समजले नाही, कारण त्यातील बहुतेक मंडळी विड्या फुकत बसली असावीत. प्रियांकाचा प्रभाव शून्य. कोणतीही मारकता नसलेल्या अस्त्राला प्रियांकास्त्रम्हणायला हरकत नाही.

मोदी विरोधकांनी आणखी एक कथानक गुंफण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या राज्यात मुसलमान, ख्रिश्चन असुरक्षित आहेत. मुसलमानांना बाहेर पडायला भीती वाटते. मोदी विरोधात असलेल्या मीडियाने त्याच्या कथा शोधल्या, त्या छापल्या. जावेद अख्तर, नसिरुद्दीन शहा, कमल हसन अशा एकापेक्षा एक सरस मंडळींनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. या गँगमध्ये ज्युलियस रिबेरिओ हेदेखील सामील झाले. सर्वसामान्य मुसलमान आणि सर्वसामान्य ख्रिश्चन आपआपल्या जागी आनंदात आणि मस्तीत जगत होते. गेल्या पाच वर्षांत त्याला आपण असुरक्षित झालो, असे कधी वाटले नाही. त्यांच्या हिताचा ठेका घेणारे, चरायला मिळेनासे झाल्यामुळे अस्वस्थ झाले, हे या लोकांना समजले.

उत्तर प्रदेशात ६० ते ६५ टक्के असणार्या मतदार संघात भाजपचा उमेदवार निवडून येतो. ख्रिश्चन बहुसंख्य असणार्या प्रदेशातही भाजपचे उमेदवार निवडून येतात. सामान्य ख्रिश्चन आणि मुस्लीम मतदाराने आपल्या हिताचा ठेका घेणार्या मतलबी लांडग्यांना चांगलेच झोडून काढले आहे. झालेल्या जखमांवर त्यांनी आता मलमपट्टी करत बसावे.

भाजपच्या या विजयाची शिल्पकार भारतातील राष्ट्रीय जनता आहे. ही राष्ट्रीय जनता धर्माचा म्हणजे उपासना पद्धतीचा विचार करीत नाही, जातीचा विचार करीत नाही, भाषेचा विचार करीत नाही, गरीब-श्रीमंत असा वर्गीय विचार करीत नाही. ती देशाचा विचार करते. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित, हे या जनतेला समजते. देश सुरक्षित ठेवण्याचे काम राहुल गांधी करू शकत नाहीत. ते परिवार सुरक्षित ठेवण्याचे काम करू शकतात. देश सुरक्षित ठेवण्याचे काम नरेंद्र मोदीच करू शकतात. म्हणून नरेंद्र मोदींच्या मागे उभे राहिले पाहिजे, असे राष्ट्रीय जनतेने ठरविले.

राहुल गांधी यांची प्रतिमा, मोदीविरोधात मीडियाने रंगविली. ती भाजपला फायद्याची झाली. राहुल गांधी हे अपरिपक्व आहेत, त्यांच्याजवळ कोणताही राजकीय विचार नाही. राजकीय तत्त्वज्ञानावर भांडण करण्याची त्यांची क्षमता नाही. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत आरोपांची खैरात केली. हा झाला नकारात्मक प्रचार, जो लोकांना आवडत नाही. संसदीय लोकशाही, राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे, जातीनिरपेक्ष समाजरचनेचे ध्येय, राष्ट्र आणि राष्ट्रविचार, अशा विषयांवर बोलण्यासाठी उदंड अभ्यास आणि चिंतन असावे लागते. राहुल गांधींकडे ते शून्य आहे. त्यांच्याजागी समजा पं. नेहरू असते, तर त्यांनी या विषयांवर विचारवंतांना विचार करायला भाग पाडेल, असे विषय मांडले असते.

राहुल गांधी घराण्याचा पोकळ वारसा घेऊन, केवळ मिरविण्याचे काम करतात. जी क्षमता त्यांच्या पणजोबांत होती आणि जी क्षमता त्यांच्या आजीत होती, त्याचा लवलेशही त्यांच्यात नाही. निवडणुकीपूर्वीच्या वर्षात वेगळ्या व्यासपीठांवर जाऊन देशासंबंधीचे मूलगामी चिंतन मांडावे लागते. गेल्या पाच वर्षांत ही संधी राहुल गांधींना होती, त्याचा त्यांनी उपयोग केला नाही. वाटेल ती पचपच करणारा पप्पू अशी त्यांची प्रतिमा त्यांनी स्वतःहून तयार केली. सार्वजनिक जीवनातील आपली प्रतिमा आपल्या कर्तृत्वाने निर्माण होते. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुषम्हणतात. त्यांची ही प्रतिमा त्यांच्या कर्तृत्वाने झाली. आशा करूया की, या निवडणूक निकालाने राहुल गांधी अधिक गंभीर होतील आणि कर्तृत्वाने आपली प्रतिमा तयार करतील.

राष्ट्रीय जनतेने दिलेल्या जनादेशाचा अर्थ काय? या जनादेशाचा अर्थ असा आहे की, ‘राज्य करणार्यांनी देश प्रथम, मग पक्ष आणि सगळ्यात शेवटी मीया भावनेने राज्य चालविले पाहिजे. देश सर्वांचा आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये. देशाचा विकास झाला पाहिजे. तो जसा भौतिक झाला पाहिजे तसा आध्यात्मिकही झाला पाहिजे. प्राचीन काळापासून भारत कधीही भौतिक संपत्तीच्या मागे लागणारा देश झाला नाही. भौतिक संपत्ती आपण भरपूर मिळवली, त्याहून अधिक आध्यात्मिक संपत्ती मिळवली. जगाला आपण आज भौतिक संपत्ती फारशी देऊ शकत नाही पण, आध्यात्मिक संपत्ती मोठ्या प्रमाणात देऊ शकतो, हा जनादेश त्याच्यासाठी आहे. 

९८६९२०६१०१
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 


@@AUTHORINFO_V1@@