गोलान टेकड्या इस्रायलच्याच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



दक्षिणेकडच्या इजिप्तशी घमासान युद्ध पेटलेलं असतानाच त्याने बेधडक ईशान्येकडे दुसरी आघाडी उघडून सीरियाच्यागोलान हाईट्स’ या १८०० चौ.कि.मी. भागापैकी १२०० चौ.कि.मी. भाग व्यापला. म्हणजेच गेली ५१ वर्षे गोलान इस्रायलकडे आहे.


दि. २५ मार्च, २०१९ रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे जाहीर केलं की, गोलान टेकड्या हा इस्रायल देशाचाच हिस्सा आहे. म्हणजे आता या घोषणेला दोन महिने उलटून गेले. आश्चर्य म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणीही याबद्दल फारशी आरडाओरड केली नाही किंवा तशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाही, असं नाही. युरोपीय महासंघ या २८ देशांच्या संघटनेने ताबडतोबच जाहीर केलं की, “गोलान भूप्रदेशावर इस्रायलचं सार्वभौमत्व आम्ही मान्य करीत नाही.” खुद्द इस्रायलमधील अनेक तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी मत व्यक्त केलं की, युद्धात व्यापलेला प्रदेश हा अधिकृत भूभाग होऊ शकत नाही. पण, या व्यतिरिक्त प्रचंड गदारोळ वगैरे काहीच झाला नाही. जसा तो जेरुसलेमच्या बाबतीत झाला होता. ६ डिसेंबर, २०१७ रोजी ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं की, जेरुसलेम शहर ही इस्रायलची राजधानी आहे. याला अमेरिका अधिकृतपणे मान्यता देत आहे. लगोलग त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सूचना दिली की, अमेरिकन दूतावास तेल अवीव शहरातून जेरुसलेममध्ये हलवा. यावर जगभर प्रचंड बोंबाबोंब झाली. कारण, इस्रायलच्या पोटात निर्माण झालेल्या पॅलेस्टाईन स्वायत्त प्रदेशाला जेरुसलेमचा पूर्व भाग ही आपली राजधानी करायची आहे. तसेच आगामी काळात केव्हातरी आपण स्वायत्त प्रदेशाचे स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्र बनविण्यात यशस्वी होऊ, अशीही त्याच्या नेत्यांना आशा आहे. अमेरिकेच्या या निर्णयाने त्या आशेवर पाणी फिरले. मुळात जगभरच्या मुसलमानांना मक्का आणि मदिनेनंतर जेरुसलेम हे सर्वाधिक पवित्र ठिकाण वाटते. जगभरच्या ख्रिश्चनांनाही अगदी तसेच वाटते. कारण, येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर यांच्या जीवनातले अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग जेरुसलेममध्ये घडलेले आहेत आणि असं ठिकाण ही ज्यू राष्ट्राची राजधानी व्हावी, ही गोष्ट त्यांच्या पचनी पडत नाही. पण, गोलान टेकड्यांबाबत असा भावनिक मुद्दा नाही.

 

मुळात या गोलान टेकड्या आहेत तरी कशा? या मुद्द्याची नीट समजूत येण्यासाठी हा मजकूर वाचता-वाचता मध्य-पूर्वेचा नकाशा पाहिलात तर बरं. भूमध्य सागराच्या पूर्व तटावर वरच्या बाजूला लेबेनॉन आणि खालच्या बाजूला इस्रायल असे देश आहेत. त्यांच्या पूर्वेला वर सीरिया आणि खाली जॉर्डन असे देश आहेत. आपल्या महाराष्ट्रात कोकण हा समुद्राला लागून असलेला उत्तर-दक्षिण चिंचोळा प्रदेश आहे. म्हणून तिला ‘कोकणपट्टी’ असं म्हणतात. कोकणपट्टीची जमीन ही तुलनेने नापीकच आहे. कोकणच्या पूर्वेला सह्याद्रीची उभी रांग आहे. ही रांग ओलांडण्यासाठी ज्या डोंगरवाटा चढाव्या लागतात, त्यांना आपण ‘घाट’ म्हणतो. या घाटांमधून आपण ‘घाटमाथ्या’वर पोहोचलो की, सपाट पठारी प्रदेश लागतो. त्यालाच आपण ‘दख्खनचं पठार’ म्हणतो. मात्र, आपलं हे पठार इतकं विस्तीर्ण आहे की, त्यावर महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक एवढे प्रांत बसलेले आहेत. ही दख्खन पठाराची भूमी गोदावरी, भीमा आणि कृष्णा या नद्यांनी सुपीक बनवलेली आहे. इस्रायल या कोकणपट्टीसारख्याच चिंचोळ्या आणि अगदीच चिमुकल्या देशाची भूमी अगदीच नापीक आणि रेताड आहे. आता इस्रायली शास्त्रज्ञांनी आपलं सगळं वैज्ञानिक कौशल्य पणाला लावून आणि इस्रायली शेतकर्यांनी प्रचंड मेहनत करून या रेताड वाळवंटाचं नंदनवन बनवलं आहे, हा भाग वेगळा. पण, तुलनेने लेबेनॉन आणि सीरिया यांची भूमी सुपीक आहे, तर जसा कोकणाला लागूनच सह्याद्री तसेच इस्रायलच्या समुद्रसपाट भूमीच्या पूर्वेला उंचावर या गोलान टेकड्या किंवा खरं म्हणजे गोलानचे विस्तीर्ण पठार आहे. सुमारे १८०० किमी परिघ असलेले आणि साधारणपणे तोंडल्याच्या आकाराचे हे पठार सीरियाचे आहे. उत्तरेकडे ते लेबेनॉन, पश्चिमेला इस्रायल आणि दक्षिणेला जॉर्डनच्या सीमांना भिडलेले आहे.

 

मध्य-पूर्वेच्या या प्राचीन परिसरात हजारो वर्षांपासून ज्यू आणि अरबांच्या विविध टोळ्या राहतात. किंबहुना, आधुनिक जेनेटिक्स विज्ञानाच्या मते, ज्यू आणि अरब हे वांशिकदृष्ट्या एकच आहेत. रोमन साम्राज्याच्या पडत्या काळात रोमनांनी ज्यू लोकांना हद्दपार केलं. पण, मागे राहिलेल्या अरबांनी रोमनांबरोबरच ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पुढे हेच अरब मुसलमान बनले. पण, काळाच्या ओघात तुर्कांनी अरबांना त्यांच्या भूमीसह जिंकले. त्यामुळे संपूर्ण मध्य-पूर्व ही साधारण ६०० ते ८०० वर्षे तुर्कांच्या उस्मानी साम्राज्याचा ऑटोमन एम्पायरचा भाग होती. १९१४ ते १९९८च्या पहिल्या महायुद्धात तुर्कांचे ऑटोमन साम्राज्य हे जर्मनीचं मित्रराष्ट्र होतं. जर्मनी आणि तुर्कस्तान हरले, तर अँग्लो फे्ंरच-अमेरिकन्स हे दोस्त जिंकले. १९१९च्या ‘व्हर्साय तहा’त या दोस्तांनी जर्मनी आणि तुर्क यांच्या भूप्रदेशांचे लचके तोडून तोडून खाल्ले. त्यातला लेबेनॉन-सीरियाचा वाटा फे्ंरचांनी घेतला, तर पॅलेस्टाईन अरबस्तान हा वाटा इंग्रजांनी. पुढे १९४८ साली ज्यू लोकांनी मोठ्या जिद्दीने इंग्रजांकडून पॅलेस्टाईन सोडवलं आणि इस्रायल हे आपलं राष्ट्र बनवलं. पण, त्या आधीच म्हणजे १९४६ सालीच फ्रेंचांनी सीरिया या अरब मुसलमान देशाला स्वातंत्र्य दिलं होतं. गोलान पठार ही सीरियाची भूमी होती. ७०० चौरस मैल किंवा १८०० चौ.कि.मी. परिघाचा हा पठारी प्रदेश चक्क सुपीक आणि निसर्गरम्य आहे. त्याच्या उत्तरेकडील माऊंट हर्मन या सुमारे नऊ हजार फूट उंचीच्या डोंगरावर चक्क बर्फ पडतो. या पठारावर तेव्हा २७० खेडी होती नि त्यात अवघे दीड लाख लोक राहत होते. त्यातले ८५ टक्के लोक सुन्नी मुसलमान होते. उरलेल्यांमध्ये चेरकासी, तुर्कमेन हे बाहेरचे मुसलमान. आल्वाईत, ड्रूझ, इस्माईलिया आणि बदाऊन हे अरबच पण, अन्य पंथांचे मुसलमान आणि अगदीच थोडे मॅरोनाईट ख्रिश्चन व ज्यू होते.

 

सर्व बाजूंनी अरब मुसलमानांनी वेढलेल्या नवजात इस्रायली राष्ट्राला जन्मापासून किंवा खरं म्हणजे जन्मापूर्वीपासून अखंड लढावं लागत होतं. त्यामुळे इस्रायली सेनापतीचं गोलान टेकड्यांकडे बारकाईने लक्ष होतं. गोलान पठारावरून खालच्या इस्रायली प्रदेशावरतोफांचा भडिमार करण्याची संधी सीरियन सैन्य कसं बरं सोडेल? त्यामुळे १९४८ पासून १९६७ पर्यंत गोलान पठाराचा पश्चिम उतार आणि त्याच्या लगतची खालची इस्रायली सरहद्द ही अखंड युद्धभूमी होती. अधिकृत युद्ध नव्हे, पण सततचे संघर्ष, छापेमारी, तोफांचा अवचित भडिमार वगैरे प्रकार अखंड १९ वर्षे चालू होते. १९६७ साली इस्रालय आणि इजिप्त यांच्यात सिनाई प्रदेशावरून युद्ध पेटलं. इजिप्त इस्रायलच्या दक्षिणेला आहे नि सिनाई वाळवंट हे इस्रालय नि इजिप्त यांच्या दरम्यान आहे. म्हणजेच या युद्धाचा इस्रायलच्या ईशान्येकडे असणार्या सीरियाशी संंबंध नव्हता. पण, इस्रायल काही सत्ययुगातील धर्मयुद्ध वगैरे करीत नव्हता. त्याने तो संबंध आणला. दक्षिणेकडच्या इजिप्तशी घमासान युद्ध पेटलेलं असतानाच त्याने बेधडक ईशान्येकडे दुसरी आघाडी उघडून सीरियाच्या ’गोलान हाईट्स’ या १८०० चौ.कि.मी. भागापैकी १२०० चौ.कि.मी. भाग व्यापला. म्हणजेच गेली ५१ वर्षे गोलान इस्रायलकडे आहे. मूळ काश्मीर संस्थानाचा दोन तृतीयांश भाग पाकिस्तानने १९४८ पासून व्यापलेला आहे. मूळ पाकिस्तानी भूमीचीसुद्धा पाकिस्तानी सत्ताधार्‍यांनी धूळधाण उडवली, तिथे व्याप्त काश्मीरचं ते काय वेगळं करणार? या उलट व्याप्त गोलानमध्ये इस्रायलने पर्यटकांसाठी असंख्य सुंदर पर्यटन स्थळं उभारली आहेत. माऊंट हर्मनच्या बर्फाळ प्रदेशात इस्रायलने पर्यटकांसाठी ‘स्कीईंग रिसॉर्ट’ बांधले आहे. ‘स्कीईंग’ म्हणजे बर्फावरून घसरण्याचा खेळ. मात्र, हे करताना इस्रायलने अनेक मूळ रहिवाशांना हद्दपार करून नव्या ज्यू वसाहती वसवल्या आहेत. खरं पाहता हे योग्य नाही. पण, मुसलमानांचा भरवसा कोणी द्यावा? तर असं हे गोलान पठार इस्रायलव्याप्त नसून इस्रायलचाच अधिकृत भाग आहे, असं अमेरिकेने जाहीर केलं आहे. अब देखते रहेंगे, क्या होता है आगे आगे...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@