संस्कार आवश्यक असतात का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



मारामाऱ्या, भांडणं आणि गुंड टोळ्यांची आपापसातली युद्ध हे प्रकार जगभर सर्वच देशांमध्ये चालू असतात. पण, सर्रास खून पाडण्यासाठी आधुनिक हत्यारं या कॅरबियन देशातल्या गुंडांना कुठून मिळतात? याचं उत्तर आहे, अमली पदार्थांच्या तस्करांकडून!


वेस्ट इंडिज म्हटलं की, आपल्याला फक्त गॅरी सोबर्स, रोहन कन्हायसारखे महान फलंदाज, जलदगती गोलंदाजांचा कायम धडधडता तोफखाना, तेथील सुंदर समुद्रकिनारे आणि त्यांचं ‘कॅलिप्सो’ या नावाने प्रसिद्ध असलेलं संगीत एवढ्याच गोष्टी आठवतात. कारण, वेस्ट इंडिजबरोबर आपले क्रिकेट सामने सुरू झाले की, प्रसारमाध्यमांमधून आपल्यासमोर हीच आणि एवढीच माहिती पुन्हा पुन्हा मांडली जात असते. जमैका, बार्बाडोस, अँटिगुआ, त्रिनिदाद अशी नावं सारखी घेतली जात असतात. पण प्रत्यक्षात ही ठिकाणं कुठे आहेत? मुळात हे वेस्ट इंडिज आहे तरी कुठे, याबद्दल कधीच काही सांगितलं जात नाही आणि प्रसारमाध्यमांच्या पलीकडे जाऊन आपण ते माहिती करून घ्यावं, असंही कोणाला वाटत नाही. पूर्वी अमेरिका हे एकच खंड समजलं जात असे. हल्ली उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ही दोन वेगळी खंडं मानली जातात. या दोन खंडांच्या दरम्यान अटलांटिक महासागरात अनेक छोटी-छोटी बेटं आहेत. अटलांटिक महासागराच्या या विशिष्ट परिसराला ‘कॅरेबियन समुद्र’ असं म्हणतात. त्यामुळे या बेटांना ‘कॅरेबियन बेटं’ असंही म्हणतात. ख्रिस्तोफर कोलंबस भारताचा शोध घ्यायला पूर्वेऐवजी पश्चिमेकडे निघाला, तो अटलांटिक समुद्र ओलांडून या बेटांवर पोहोचला. त्याला वाटलं, हेच इंडिया. म्हणून त्याने तेथील स्थानिक रहिवाशांना ‘इंडियन्स’ म्हटलं. पुढे तेच नाव रूढ झालं. फक्त त्यांच्या शरीराच्या तांबूस रंगामुळे त्यांना ‘रेड इंडियन्स’ म्हणू लागले. नंतर उलगडा झाला की, ही भूमी म्हणजे ‘इंडिया’ किंवा ‘इंडिज’ नव्हे. मग ‘पश्चिमेकडचा भारत’ या अर्थी त्या बेटांना ‘वेस्ट इंडिज’ हे नाव रूढ झालं. कोलंबसानंतर स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश असे सगळेच युरोपीय देश वेस्ट इंडिज बेटांसह सगळ्याच अमेरिका खंडावर तुटून पडले. त्यांनी स्थानिक ‘रेड इंडियनां’च्या प्रचंड कत्तली केल्या. भयानक बाटवाबाटवी केली. अॅझटेक, माया, इन्का अशा स्थानिक सभ्यता पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. हे सगळे होत असतानाच हे युरोपीय लोक आफ्रिकेतून काळे गुलाम जहाजं भरभरून आणीतच होते. पुढे ब्रिटिशांनी भारतातून हिंदू गुलामही नेले. त्यामुळे या देशांमध्ये स्थानिक इंडियन वंशाचे लोक, आफ्रिकन वंशाचे लोक, भारतीय लोक आणि युरोपीय लोक व या सर्वांच्या सरमिसळीतून निर्माण झालेली प्रजा असे सर्व नमुने आहेत. ‘वेस्ट इंडिज’ या नावाने जे लोक क्रिकेट खेळतात, तो एकच देश नाही. जमैका, अँटिगुआ, डोमिनिका, बार्बाडोस, त्रिनिदाद अशी ही वेगवेगळी बेटं आहेत. त्यापैकी सलग भूमीवर असलेला एकमेव देश म्हणजे गयाना. हे सगळे वेगळे देश आहेत. तेथील राजसत्ता वेगळ्या आहेत. परंतु, पूर्वी हे सगळे ब्रिटिश सत्तेखाली असल्यामुळे ते अजूनही कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियाप्रमाणे आपल्याला ‘युनियन जॅक’ या ब्रिटिश झेंड्याखाली मानतात. ‘वेस्ट इंडिज’ या नावाखाली मोडणारे इतरही देश किवा बेटं या परिसरात आहेत. पण, ते क्रिकेट खेळत नाहीत. कारण, ते फ्रेंच किंवा पोर्तुगीज अंमलात होते. म्हणजे फक्त जिथे ब्रिटिशांनी राज्य केलं, तिथेच क्रिकेट रूढ आहे.

 

सध्या ‘कॅरेबियन बेटं’ वेगळ्याच कारणासाठी गाजत आहेत. ते कारण म्हणजे अनिर्बंध खुनाखुनी. गेल्या आठवड्यात गयानातल्या लुसिगनान या गावात राँडेल रॉलिन्स या गुंडाच्या टोळीने एका फटक्यात ११ लोकांना ठार मारलं. यातील पाच तर लहान मुलं होती. याचं कारण काय, तर म्हणे सूड. लुसिगनान हे गाव गयानाची राजधानी जॉर्जटाऊनच्या जवळच आहे. रॉलिन्सची प्रेयसी जॉर्जटाऊनला जात असताना या गावाजवळ एकाएकी नाहीशी झाली. प्रतिस्पर्धी गुंड टोळ्यांनी तिचं अपहरण केलं की, ती स्वत:च कोणाचा तरी हात धरून पळाली की, वेगळं काही घडलं, याचा कोणालाच पत्ता लागलेला नाही. लुसिगनान गावातली बहुसंख्य वस्ती मूळ ‘रेड इंडियन’ वंशाच्या लोकांची आहे, तर ‘रॉलिन्स’ हा आफ्रिकन वंशाचा आहे. आपल्या प्रेयसीला या इंडियन लोकांनीच पळवलं असलं पाहिजे, अशा निव्वळ संशयावरून त्याने ही क्रूर कत्तल घडवली. लिमलेटच्या किंवा पेपरमिंटच्या गोळ्या फेकाव्यात तितक्या सहजपणे रॉलिन्सच्या गुंडांनी लुसिगनान गावातल्या रहिवाशांवर गोळ्या चालवल्या. नातवाचे बोट धरून चाललेले आजी-आजोबा त्याच्यासकट ठार झाले, कडेवर बाळ घेतलेली कोणी लेकुरवाळी त्या बाळासकट ठार झाली, आपल्या बछड्याला गोळ्यांपासून वाचवण्यासाठी आपला अंगातला नाईट गाऊन आडोसा म्हणून धरणारी कोणी आई त्या मुलासह ठार झाली, अस अत्यंत करुण दृश्य लुसिगनानच्या रहिवाशांनी पाहिलं. ११ निरपराध लोक फुकट मेले. त्यांचा अपराध असलाच तर एवढाच होता की, ते मूळ ‘इंडियन’ वंशाचे होते. हे एकट्या गयानातच घडतंय असे नव्हे. एल साल्वाडोर, ग्वाटेमाला, व्हेनेझुएला, जमैका, त्रिनिदाद अशा सगळ्या ठिकाणी हेच चालू आहे. कसल्याही बारीकशा कारणावरून लोकांची डोकी फिरतात. फटाफट पिस्तुलं बाहेर पडतात आणि धडाधड गोळ्या झाडल्या जातात. सेंट किट्स हे नाव आठवतंय्? विश्वनाथ प्रतापसिंग, नरसिंह राव वगैरेंच्या काळात सेंट किट्समधल्या बेनामी बँक खात्याचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं. हे सेंट किट्स वेस्ट इंडिज द्वीपसमूहातलं एक अगदी चिमुकलं बेट आहे. इतकं चिमुकलं की त्याची लोकसंख्या अवघी ४० हजार आहे. आमच्याकडल्या एखाद्या नगरपालिका वॉर्डची लोकसंख्यासुद्धा यापेक्षा जास्त असते. तर त्या सेंट किट्समध्ये गेल्या महिन्यात चार दिवसांत तीन खून झाले. खूनबाजीसाठी आत्तापर्यंत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आघाडीवर होती. आता या सर्व कॅरेबियन देशातला मिळून खुनांचा वार्षिक आकडा अमेरिकेच्या चौपट आणि युरोपीय देशांच्या पंधरा पट मोठा झाला आहे. ज्याचे दर एक हजार नागरिकांमागे तीन नागरिक तुरुंगात आहेत, असे ३१ देश एकंदर जगात आहेत. त्यापैकी १७ देश कॅरेबियन आहेत. मारामाऱ्या, भांडणं आणि गुंड टोळ्यांची आपापसातली युद्ध हे प्रकार जगभर सर्वच देशांमध्ये चालू असतात. पण, सर्रास खून पाडण्यासाठी आधुनिक हत्यारं या कॅरबियन देशातल्या गुंडांना कुठून मिळतात? याचं उत्तर आहे, अमली पदार्थांच्या तस्करांकडून! युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशात अमली पदार्थांना प्रचंड मागणी आहे. दक्षिण अमेरिकेतल्या, अनेक देशांमधून हे अमली पदार्थ प्रथम कॅरेबियन देशांमध्ये पोहोचतात आणि तिथून क्यूबामार्गे अमेरिकेत पोहोचतात. साहजिकच या तस्करीमध्ये कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल होते. त्यामुळे त्यात गुंतलेल्या टोळ्यांच्या हातात भरपूर पैसा आणि अत्याधुनिक शस्त्रं सहजपणे येतात. त्यांच्या जोरावर वाटेल ते करण्यास सरसावलेल्या लोकांना नियंत्रणात आणू शकणारी कोणतीही प्रभावी सामाजिक संस्था तिथे नाही. कायदा आणि सुव्यवस्था ठेवणाऱ्या यंत्रणांमध्ये अवघा आनंदीआनंदच आहे. त्यामुळे तरुण पिढीने झटपट पैसा देणाच्या गुन्हेगारीकडे वळू नये, असे प्रभावीपणे सांगणारं, पटवणारं कोणीच नाही.

 

ऑस्ट्रेलियन उंट

 

उंट हा ऑस्ट्रेलियातला मूळचा प्राणी नव्हे. पण सध्या तिथे उंट इतके बोकाळलेत की लोक हैराण होऊन गेले आहेत. शेतात उभी पिकं खायला वानरं येतात, रानडुकरं येतात, हरणं येतात. तसे ऑस्ट्रेलियात उंट शेतात घुसून पिकांचा फडशा पाडू लागले आहेत. शिकारीला बंदी असल्यामुळे लोक त्यांना मारूही शकत नाहीत. ऑस्ट्रेलिया हा एक अवाढव्य देश, नव्हे खंड आहे. पॅसिफिक महागरातल्या या विशाल भूमीला पहिल्यांदा कोणी भेट दिली, हा वादग्रस्त मुद्दा आहे. पण तरीही सन १५४२ मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दींनी केलेल्या एका यादीत या खंडाचा उल्लेख आहे. सन १६०१ मध्ये एका पोर्तुगीज खलाशाने या भूमीवर प्रथम पाय ठेवला. यानंतरच्या २५-३० वर्षांत डच दर्यावर्दींनी ऑस्ट्रेलियाचा पहिला नकाशा बनवला. पहिलं सर्वेक्षण केलं. एवढेच नव्हे, तर त्यावर ताबा मिळवून सन १६६४ मध्ये त्याचं ‘न्यू हॉलंड’ असं नामकरणही करून टाकलं. पण, पुढे सागरी सत्तास्पर्धेत इंग्लंड पुढारत गेलं नि डचांसह त्यांचे सगळेच प्रतिस्पर्धी पराभूत होत गेले. सन १७७० साली कॅप्टन जेम्स कुक या प्रसिद्ध इंग्लिश दर्यावर्दीने राजा तिसरा जॉर्ज यांच्या नावाने ऑस्ट्रेलियाचा ताबा घेतला. इंग्लंडपासून इतक्या दूरच्या भूमीवर वस्ती करायला जाणार कोण? आणि वस्ती करायला इंग्लिश रक्ताची माणसं जर कोणी जाणार नसतील, तर त्या भूमीवरच्या स्वामित्वाला अर्थच नाही. हे लक्षात घेऊन इंग्रजांनी झकास शक्कल लढवली. इंग्लंडमध्ये नकोसे झालेले हद्दपार, तडीपार, जन्मठेपेचे गुन्हेगार अशा, सगळ्यांना त्यांनी सन १७८८ पासून ऑस्ट्रेलियात नेऊन वसवायला सुरुवात केली. आधुनिक ऑस्ट्रेलियाचे जनक अशा प्रकारे इंग्लंडमधील गुन्हेगार आहेत. पुढे १८५१-५२ मध्ये ऑस्ट्रेलियात सोनं सापडलं. त्या सरशी इंग्लंडसह सर्वच युरोपीय देशांमधील बुभुक्षित लोक ऑस्ट्रेलियाकडे धावत सुटले. सध्याच्या ऑस्ट्रेलियन समाजात त्यांचेही वंशज आहेत. सन १७८८ साली ऑस्ट्रेलिया आधुनिक परिभाषेप्रमाणे अविकसित देश होता. वाहतूक फक्त समुद्रमार्ग आणि अंतर्गत नद्यांच्या मार्गानेच होत होती. इंग्रजांच्या सुरुवातीच्या वसाहती याही समुद्राच्या काठाकाठानेच वसत गेल्या. पुढे हे वसाहतवाले देशाच्या अंतर्भागात शिरू लागले, तसतशी वाहतुकीसाठी जनावरांची गरज निर्माण होत गेली. ऑस्ट्रेलियाचा खूप मोठा प्रदेश वाळवंटी आहे, हे लक्षात घेऊन बैल, घोडे, खेचर, गाढवं यांच्याप्रमाणेच उंटांचीही प्रथम आयात व मग पैदास करण्यात येऊ लागली. पण आता ऑस्ट्रेलिया अतिविकसित, अत्याधुनिक देश बनला आहे. तिथे वाहतुकीसाठी आता जनावरांची गरज उरलेली नाही. बैल, घोडे, गाढवं, खेचरं लोकांनी विकून टाकली वा मारून खाल्ली. पण उंटांच काय करायचं, हा प्रश्न आला. उंट कोणी विकत घेईनात. उंटांचं मांस ऑस्ट्रेलियनांना आवडत नसावं बहुधा. त्यामुळे त्यादृष्टीनेही उंटांची किंमत संपली. तेव्हा मालक लोकांनी उंटांना वाऱ्यावर सोडून दिलं. हे उंट रानोमाळ हिंडू लागले. काटेरी झुडपं खाऊ लागले. त्यांची संख्या वाढतच राहिली. एखाद्या वाळवंटी अरब देशातही आज आपल्याला पाळीव नसणारा, रानउंट पाहायला मिळणार नाही. तो आज ऑस्ट्रेलियात पहायला मिळतो आहे.

 

निसर्गाची आपली म्हणून काही एक व्यवस्था असते. ही व्यवस्था फार अचूक आणि निर्दोष असते. उंदीर, ससे, हरणं, डुकरं या प्राण्यांची वीण म्हणजे पैदास निसर्गत:च फार असते. पण, उंदीर आणि ससे हे साप, घारी, गिधाडे यांचे नैसर्गिक भक्ष्य आहे. त्यामुळे उंदीर, सशांच्या संख्येवर आपोआप निमंत्रण राहतं आणि सापा-गिधाडांचंही पोट भरतं. तीच स्थिती हरण आणि डुकरांची. वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, तरस यांचं हरणं, डुकरं हे नैसर्गिक भक्ष्य आहे. रुचिपालट म्हणून वाघ-सिंह जसे गाई, म्हशी-बकरी खातात, तसेच उंटांनाही खात असावेत, असं पंचतंत्रातल्या प्रसिद्ध गोष्टीवरून वाटतं. परंतु, ऑस्ट्रेलियातल्या या नव्या रानउंटांना असा कोणी नैसर्गिक शत्रूही नाही. त्यामुळे त्यांची वीण फार वेगाने नसली तरी, वाढतच राहिलेली आहे. आता आपल्या गटाची संख्या जरा वाढली की माणसासारखी माणसंसुद्धा बदलतात. त्यांच्या जाणिवा, आकांक्षा, इच्छा, आत्मभान अस्मिता वगैरे भानगडी जागृत होतात, असं आपण पाहतो. मग उंट तर बिचारा बोलून चालून पशूच आणि आत्तापर्यंत तो बिचारा काटेरी झुडपं खाऊन बिनतक्रार जगतच होता. पण आता बहुतेक ऑस्ट्रेलियातली उंटांना खाण्यालायक काटेरी झुडपं संपली असावीत. त्यामुळे पोट भरण्यासाठी ते शेतांवर हल्ला करू लागले आहेत. ऑस्ट्रेलिया अत्याधुनिक देश असल्यामुळे तिथल्या शेतांच्या बांधावर जागोजागी पाण्याचे नळ बसवलेले असतात. शेतात मनसोक्त चरून झाल्यावर हे उंट जबड्यात धरून नळाची चावी फिरवतात. आता उंटाचाच जबडा तो! चावीसह नळ सांध्यातून निखळतोच. या नुकसानीमुळे त्रस्त होऊन मॅकडोनेलशायर या गावच्या नगरपालिकेचे प्रमुख वायने राईट यांनी ऑस्ट्रेलियन सरकारला, शेतांना कुंपणं घालण्याची, त्या कुंपणातून वीजप्रवाह सोडण्याची वगैरे एक खर्चिक योजना सुचवली आहे. तब्बल साडेचार दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स खर्चाची ही योजना आहे. माणसं अतिशिक्षित झाली नि अति श्रीमंत झाली की त्यांचे व्यवहारी शहाणपण हळूहळू लोप पावतं म्हणतात. शेतांना कुंपणं कुठवर घालणार? त्यापेक्षा कोणत्याही अरब देशातून एखादी उंटांना हाताळणारी तज्ज्ञ अरबांची टोळी बोलवायची. त्यांच्याकरवी उंटांना काबूत आणून, उंट आणि अरब दोघांनाही पुन्हा अरब देशात पाठवून द्यायचं. माझ्यासारख्या लेखणीघाशा कुडमुड्या पत्रकाराला जे कळतं ते अति शिक्षित आणि अति श्रीमंत वायने राईट या इसमाला का बरं कळू नये?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@