चोरीचा मामला, जोरात बोबंला!

Total Views |



हिटलरच्या पिस्तुलाची कहाणी अस्सल बनवण्यासाठी त्याने ‘हिमलर’ आणि ‘वॉल्थेर’ कंपनीची बनावट पत्र तयार केली. एवढेच नव्हे, तर संशोधनाच्या बहाण्याने ‘बुंडेसआर्काइव्ह’मध्ये प्रवेश मिळवून तिथल्या अस्सल कागदपत्रांचा बांधीव खंड ढिला करून त्यात ती बनावट पत्रे घुसवून देण्यातही त्याने कल्पनातीत यश मिळवलं. ‘डेर स्पिगेल’चा वार्ताहर मध्येच कडमडला, हे त्याचे दुर्दैव.


छांदिष्ट लोक जगात सर्वत्र आहेत. कोणी पोस्टाची तिकिटे गोळा करतात, कोणी जुनी-नवी नाणी जमवतात, कोणी मान्यवरांच्या सह्या घेतात, कोणी किचेन्स, कोणी माचिसवरची चित्रं, कोणी चिनी मातीची खेळणी, कोणी मूर्ती, कोणी हत्यारं, कोणी अत्तराच्या कुप्या, कोणी पुस्तकं, कोणी काय, तर कोणी काय! छंद आणि छांदिष्ट यांना खरोखरच कोणतीही सीमा नाही. दर शुक्रवारी अशा दुर्मीळ, अनमोल चीजा विकत घेण्यासाठी आवर्जून चोरबाजारात जाणारे लोकही पुष्कळ आहेत. माझ्या एका मित्राने दर शुक्रवारच्या अशा वाऱ्यांमधून शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्ड्सचा इतका उत्तम संग्रह जमवला आहे की, एकदा काही दुर्मीळ रेकॉर्ड्स ऐकण्यासाठी साक्षात कुमार गंधर्व त्याच्या घरी आले होते. अशा चीजांचा व्यापारही फार मोठ्या प्रमाणावर चालतो. या व्यापारात कोणताही ठरीव बाजारभाव नसतो. अवचितपणे एखाद्या जुनाट, मळकट वस्तूला हजारो रुपयांची किंमत मिळून जाते. या बाजारात अशा प्रकारे लाखो रुपयांच्या उलाढाली सुरू असतात. भारतापेक्षा पाश्चात्त्य देशांमध्ये दुर्मीळ वस्तूंचा हा बाजार अधिक शिस्तबद्ध, अधिक सुसंघटित आहे. ‘सदबी’, ‘ख्रिस्ती’ अशा जुन्या नव्या ख्यातनाम संस्थांतर्फे दुर्मीळ वस्तूंचे रीतसर लिलाव पुकारले जातात. त्यांच्यासाठी जगभरातून बोल्या लावल्या जातात आणि विक्रमी किंमतीत वस्तू विकल्या जातात. पण, कोट्यवधी डॉलर्सच्या उलाढालीच्या मोहानेच या व्यापारात बनवाबनवीही मोठ्या प्रमाणावर चालते. प्राचीन वस्तूंच्या बरहुकूम हुबेहूब बनावट वस्तू बनवणारे कलावंत आणि अव्वाच्या सव्वा किंमती लावून त्या विकणारे व्यापारीही इथे भरपूर आहेत. इतिहासप्रसिद्ध व्यक्तींच्या वापरातल्या वस्तू जमविणे हा छंद अनेकांना असतो. अशा छांदिष्टांना मोठंच आकर्षण ठरेल, अशा दोन वस्तू म्हणजे दोन पिस्तुलं, रॉली मार्टिन नावाच्या व्यापाऱ्याने आठ लाख डॉलर्सना विकायला काढली. वाल्थेर या जर्मन कंपनीने बनवलेली ही दोन पिस्तुलं खुद्द अॅडॉल्फ हिटलरची असून, त्यापैकी एका पिस्तुलानेच हिटलरने आत्महत्या केली होती.

 

पाश्चात्त्य देशातल्या शिस्तबद्ध व्यापाराचा महत्त्वाचा भाग असा की, कोणत्याही इतिहासप्रसिद्ध वस्तूची खरेदी करताना ही वस्तू त्या व्यापाऱ्याकडे कशी आली, त्या वस्तूची विश्वसनीयता किती इ. गोष्टींची ग्राहक बारकाईने चौकशी करतात. वृत्तपत्रांचंही अशा मोठ्या व्यवहारांकडे लक्ष असतं. त्यामुळे व्यापाऱ्यांना खरीखुरी माहिती द्यावीच लागते. या दोन पिस्तुलांबद्दल तपशीलवार माहिती देताना रॉली मार्टिनने सांगितलं की, “दोन्ही पिस्तुलांनी एकेक आत्महत्या झालेली आहे. ‘६.३५ कॅलिबर’च्या ‘स्पेशल मॉडेल आठ’ या पिस्तुलाने हिटलरची माजी प्रेयसी गेल रॉबल हिने १९३१ साली आत्महत्या केली होती. त्यावेळी हिटलर सत्तेवर आलेला नव्हता. दुसऱ्या ‘७.६५ कॅलिबर’च्या ‘पीपीके’ पिस्तुलाने स्वत: हिटलरने दि. ३० एप्रिल, १९४५ रोजी आत्महत्या केली. जर्मनीचा दुसऱ्या महायुद्धात पराभव झाला होता. पश्चिमेकडून दोस्त सेना आणि पूर्वेकडून लाल सेना अत्यंत वेगाने जर्मन राजधानी बर्लिनवर चालून येत होत्या. ही शर्यत अखेर लाल सेनेने जिंकली. जमिनीखाली बांधलेल्या अत्यंत मजबूत अशा खंदकात बसून हिटलर काम रेटत होता. सोव्हिएत तोफांचे गोळे त्या बंकरवरच येऊन कोसळू लागले आणि स्टॅलिनच्या हातात जीवंत सापडण्यापेक्षा हिटलरने डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं. त्याची बायको ईव्हा ब्राऊन हिने सायनाईड खाल्लं. मग हिटलरच्या खाजगी वापरातली ही पिस्तुल रॉली मार्टिनकडे कशी आली? तर लाल सेनेने बर्लिन ताब्यात घेतल्यावर अनेकांची धरपकड केली. त्यात हिटलरचा खाजगी नोकर हेझ लिज हाही होता. त्याच्याकडे ही दोन्ही पिस्तुलं लाल सैन्याला सापडली. त्या पिस्तुलांचा इतिहास लिजकडूनच सोव्हिएत सेनापतींना समजला. त्यांनी खास भेट म्हणून ती थेट स्टॅलिनकडे पाठवली. पुढे वर्षानुवर्षे ती स्टॅलिनच्या खाजगी संग्रहात होती. सोव्हिएत साम्राज्याच्या पतनानंतर रशियन गुप्तहेर खात्याने म्हणजे केजीबीने त्यांना अनावश्यक वाटणाऱ्या अनेक वस्तू युरोप व अमेरिकेतल्या श्रीमंत संग्राहकांना, व्यापाऱ्यांना विकल्या. त्याच वाटेने ही दोन पिस्तुलं एका प्रसिद्ध आणि धनाढ्य युरोपीय कुटुंबाकडे आली. त्यांना स्वत:चं नाव उघड करायचं नसल्यामुळे त्यांनी ती रॉली मार्टिनच्या मध्यस्थीने बाजारात आणली.

 

ठीक आहे. आता या पिस्तुलांची विश्वसनीयता काय? म्हणजे ‘हिटलरच्या संग्रहातली पिस्तुलं ती हीच,’ याला पुरावा काय? तर जर्मनीतल्या ‘कॉबलेंझ’ या ठिकाणच्या ‘बुंडेसआर्काइव्ह’ म्हणजे ‘राष्ट्रीय दफ्तरखान्या’तील ही दोन पत्रे पाहा. त्यातलं एक आहे स्टॉर्म स्ट्रपर्स ऊर्फ एस. एस. या दहशतवादी नाझी संघटनेचा प्रमुख आणि हिटलरचा उजवा हात हाईन्रिश हिमलर याचं आणि दुसरं आहे ती पिस्तुल ज्यांच्या कारखान्यात बनली त्या वाल्थेर कंपनीच्या व्यवस्थापकाचं. दोन्ही पत्रांत या दोन पिस्तुलांच्या खरेदीबद्दलचा, त्यांचे क्रमांक, मॉडेल इत्यादींबाबतचा तपशीलवार उल्लेख आहे. आता पटली ना खात्री? चला, तर मग घेऊन टाका बघू ती दोन्ही पिस्तुलं! हिटलरच्या वापरातली दोन पिस्तुलं! किंमत फक्त आठ लाख डॉलर्स! केव्हिन शेरी हा अमेरिकन संग्राहक व्यापारी एवढा बेहद्द खूश झाला की, ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नच्या रॉली मार्टिनकडून आठ लाख डॉलर्सना ती पिस्तुलं घ्यायची आणि अमेरिकेत आणून चांगली ३० लाख डॉलर्सना विकायची, असा बेतही त्याने आखून टाकला. पण, ‘हिटरलची पिस्तुलं’ असं म्हटल्यावर जर्मनीतलं मातब्बर साप्ताहिक ’डेर स्पिगेल’ हे जरा जास्त चौकस बनलं. त्यांचा वार्ताहर ‘कॉबलेझ’च्या ‘बुंडेसआर्काइव्ह’मध्ये जाऊन थडकला आणि त्याने बारीक तपास सुरू केला. हाईन्रिश हिमलरचं ऑक्टोबर १९३५ मधील पत्र त्याला किंचित संशयास्पद वाटू लागलं. कारण? कारण असं की, अस्सल दस्तावेजांचा तो बांधीव खंड नेमका त्या पत्राच्या ठिकाणी ढिला पडला होता. असं का बरं व्हावं? मग तो वार्ताहर आणखी खोलात गेला. प्रस्तुत घटनेच्या आसपासच्या तारखांचे इतर दस्तावेज त्याने पाहिले. अलीकडेच हा विशिष्ट खंड कोणी घेतला होता का, याची दफ्तरखान्याच्या नोंदवहीत पाहणी केली. ‘वॉल्थेर’ कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्यांचाही पत्रव्यवहार उपलब्ध झाला, तेवढा तपासला आणि मग त्याच्या लक्षात आलं की, हिमलरचं ‘ते’ पत्र व ‘वॉल्थेर’ कंपनीचे पत्र ही दोन्ही पत्रं साफ बनावट आहेत. पण, मग अस्सल दस्तावेजांच्या बांधीव खंडात ती कुठून आली? कोणी आणि कशी घुसवली? शोधचक्र वेगाने फिरू लागले आणि अखेर असं उघडकीस आलं की, मायकेल ओ हारा नामक इसमाने हे उद्योग अगदी पद्धतशीरपणे केलेले आहेत. मायकेल ओ हारा हा मेलबर्नचा एक कल्पक उद्योजक आणि खाजगी गुप्तहेर. ‘आयडियाज रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट’ नावाची सल्लागार कंपनी तो चालवायचा. कोणत्या ‘रिसर्च’मधून त्याला ही भन्नाट आयडिया सुचली कोण जाणे; पण त्याने रॉली मार्टिन या पुराणवस्तू व्यापाऱ्याला हाताशी धरून हे अफलातून नाटक उभं केलं. हिटलरच्या पिस्तुलाची कहाणी अस्सल बनवण्यासाठी त्याने ‘हिमलर’ आणि ‘वॉल्थेर’ कंपनीची बनावट पत्र तयार केली. एवढेच नव्हे, तर संशोधनाच्या बहाण्याने ‘बुंडेसआर्काइव्ह’मध्ये प्रवेश मिळवून तिथल्या अस्सल कागदपत्रांचा बांधीव खंड ढिला करून त्यात ती बनावट पत्रे घुसवून देण्यातही त्याने कल्पनातीत यश मिळवलं. ‘डेर स्पिगेल’चा वार्ताहर मध्येच कडमडला, हे त्याचे दुर्दैव. संध्या ओ हारा महाशय मेलबर्नमधलं आपलं घर विकून बायको-पोरांसह फरारी आहेत. गुन्हे शोधून काढण्याऐवजी स्वत:च गुन्हा करणाऱ्या या खाजगी गुप्तहेरांचा शोध ऑस्ट्रेलियन पोलीस घेत आहेत.

 

एकावर एक फ्री

 

इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम शहराजवळ डडंले नावाचं गाव आहे. आपल्या गावात मेरी कार्टराईट नावाच्या दोन बायका आहेत, हे गावकऱ्यांना हल्लीच कळलं. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? विशेष असं की, या दोन्ही मेरी १०५ वर्षांच्या आहेत. एका छायाचित्रकाराला कोर्टराईट नावाच्या कुटुंबाचा दूरध्वनी आला. त्यांची आजी मेरी कोर्टराईट हिचा १०५ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांना छायाचित्रं काढायची होती. गेल्या आठवड्यात त्या छायाचित्रकाराला कोर्टराईट याच आडनावाच्या दुसऱ्या कुटुंबाचं बोलावणं आलं. त्यांच्याही आजीचं नाव मेरी होतं. तिचाही १०५ वा वाढदिवस होता. छायाचित्रकार प्रथम बुचकळ्यात पडला आणि मग या गंमतीदार योगायोगाचं त्याला फार नवल वाटलं. मेरी कोर्टराईट याच नावाच्या दोन म्हाताऱ्या आपल्या एकाच गावात राहतायत! त्याने ही गंमत आपल्या मित्रांना आणि दोन्ही कोर्टराईट कुटुंबांना सांगितली. मग सगळ्यांनी मिळून दोन्ही मेरींची भेट घडवून आणली. १०५ वर्षांच्या दोन्ही म्हाताऱ्यांनी प्रथम हस्तांदोलन केलं आणि मग त्या खो-खो हसत सुटल्या.

 

ब्लडहाऊंडचा जबडा

 

रॅशेल मरेला मोबाईल फोनच सापडेना. लंडननिवासी रॅशेलने आपल्या मैत्रिणीला नाताळ भेट म्हणून एक मोबाईल फोन आणला आणि मैत्रिणीच्या घरातल्या ख्रिसमस वृक्षात तो दडवून ठेवला. तिला आश्चर्याचा धक्का देणं, हा लपवण्यामागचा उद्देश होता. पण मैत्रिणीला मोबाईल फोन मिळालाच नाही. रॅशेल परत तिच्या फ्लॅटवर आली. दोघींनी मिळून ख्रिसमस वृक्ष आणि सगळा कानाकोपरा तपासला. मग रॅशेलला युक्ती सुचली. तिने मोबाईलचा नंबर फिरवला आणि काय आश्चर्य, मैत्रिणीच्या कुत्र्याच्या पोटातून फोनची घंटी किणकिणू लागली. रॅशेल आणि तिची मैत्रीण ताबडतोब डॉक्टरकडे धावल्या. कुत्र्याच्या पोटाचं ऑपरेशन करावं लागणार, असं त्यांना वाटलं. पण, कुत्र्याच्या डॉक्टरला पैशाचा लोभ नसावा बहुधा. तो म्हणाला, ऑपरेशनपेक्षा निसर्गाला त्याचं काम करू द्या. उद्या सकाळपर्यंत थांबा. खरोखरच दुसऱ्या दिवशी सकाळी श्वानमहाशयांच्या पोटातून अन्य टाकाऊ जिनसांबरोबर मोबाईलही सुखरूप बाहेर पडला. कुत्र्याला मोबाईल कसा गिळता आला, अशी शंका काहींना येईल. त्याचं उत्तर एवढंच की, ब्लडहाऊंड जातीच्या या प्रचंड कुत्र्याचं तोंड म्हणजे वाघाचा जबडाच असतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.