झोजी ला खिंडीत रणगाडे;‘ऑपरेशन स्लेज’चा धुव्वा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 
 
 
स्कार्दू किल्ला
 
 
१ नोव्हेंबर, १९४८ ला रणगाड्यांचे गोळे सरळ रेषेत (वक्राकार नव्हे), शत्रूच्या मोर्चांवर आदळू लागले आणि एक वर्षभर रेंगाळत चाललेल्या युद्धाचं सगळं पारडंच फिरलं. शत्रूला माघार घेण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही. १ जानेवारी, १९४९ ला युद्धबंदी झाली. या बातम्यांनी संपूर्ण पाश्चिमात्य जग, तिथले जाणते सेनापती, युद्धतज्ज्ञ, युद्ध वार्ताहर अक्षरश: हादरले. १३ हजार फूट उंचीवर रणगाडे नेले? कोणी? काल स्वतंत्र झालेल्या भारताने? आणि कोण हा वेडा सेनापती? त्याचं नाव मेजर जनरल थिमय्या म्हणे! हद्द झाली बुवा! असे वेडे निर्माण होतात तेव्हाच इतिहास घडतो.
 

भारतीय हवाई दलाच्या सर्जिकल स्ट्राईकने संपूर्ण भारतीय समाजमनात आनंदाची आणि उत्साहाची लहर उठली आहे. कुठेही चार माणसं एकत्र भेटली की, हाच विषय निघतो आहे. प्रत्येक जण आपण ऐकलेलं, वाचलेलं उत्साहाने बोलतो आहे. प्रत्येकाला व्यक्त व्हायचं आहे, समाजमाध्यमांवर तर काय असंख्य अभिनव कल्पनांनी माणसं भारतीय सैन्याबद्दल अभिमान व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानची टिंगल करीत आहेत. देशाभिमानाची ही लहर इतकी तीव्र झाली आहे की, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, भारतीय सेनादल यांचा कायम पाणउतारा करणाऱ्या सगळ्या वृत्तपत्रांना आणि त्यांच्या महान इंटेलेक्चुअल वगैरे संपादकांना या कारवाईचं समर्थन करावंच लागतं आहेअशा कालखंडात वाचायला, बोलायला विचार करायला, त्याच विषयाशी संबंधित अशा नव्या-जुन्या माहितीच्या घटनांची, प्रसंगांची उजळणी होणे आवश्यक असते. त्यातून मूल्यांबद्दलच्या प्रेरणा, अस्मिता, निर्माण होतात, बळकट होतात. त्यासाठी भारतीय सेनादलाची काश्मीर मधलीच एक मोहीम आणि राबवणारा एक असामान्य सेनानी यांची आठवण जागवणं आवश्यक आहे.

 

१५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्या अगोदर एक दिवस म्हणजे १४ ऑगस्टला पकिस्तान हा नवीन देश जन्माला आला. पण त्याही अगोदर एक दिवस म्हणजे १३ ऑगस्ट रोजीच रावळपिंडीच्या पाकिस्तानी सेना मुख्यालयात विचार सुरू झाला होता की, जर काश्मीर नरेश महाराजा हरिसिंह यांनी त्यांचं संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याचं नाकारलं, तर काय करायचं? आणि निर्णय झाला होता की, काश्मीरवर हल्ला चढवून ते काबीज करायचं. हरिसिंहांनी कोणताच निर्णय न घेतल्यामुळे जीनांनी आपला निर्णय पक्का केला. पाकिस्तानी सैन्यातल्या मेजर जनरल अकबरखान या अतिशय कुशल धडाडीच्या सेनापतीवर काश्मीर काबीज करण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आलीपाकिस्तानच्या जन्मानंतर ठीक सव्वादोन महिन्यांनी म्हणजे २१ ऑक्टोबर, १९४७ या दिवशी पाक सैन्याने पठाणी टोळीवाल्यांच्या वेषात काश्मीरमधील डोमेल या ठाण्यावर हल्ला केला. पाकने या कारवाईला सांकेतिक लष्करी नाव दिलं होतं ‘ऑपरेशन गुलमर्ग.’

 

जम्मू-काश्मीरच्या संस्थानी सैन्यातील आपल्या विश्वासू मुसलमान सैनिकांनी आपल्या हिंदू सेनापतीला ठार केलं आहे. ते उघडपणे टोळीवाल्यांना सामील झाले आहेत, हे कळल्यावर हरिसिंहानी २६ ऑक्टोबरला भारतात विलीन होण्याच्या करारावर सही केली. आता जम्मू आणि काश्मीर हे संस्थान अधिकृतपणे भारताचा भाग बनलेआपल्या महाराष्ट्राचे जसे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ इ. विभाग आहेत तसेच, जम्मू-काश्मीर या संस्थानाचे चार विभाग होते - काश्मीर हा डोंगराळ विभाग असून जम्मू हा त्याच्या पायथ्याचा सखल विभाग, लडाख हा पूर्वेकडचा डोंगराळ, बर्फाळ विभाग आणि गिलगिट-बाल्टिस्तान हा उत्तरेकडचा अतिविरळ लोकसंख्येचा विभाग. या विभागांत भारत चीन आणि तत्कालिन सोव्हिएत रशिया यांच्या सरहद्दी एकमेकांना भिडतात. त्यामुळे लष्करीदृष्ट्या हा विभाग अतिमहत्त्वाचा होता. गिलगिटमध्ये इंग्रजांनी ‘गिलगिट स्काऊट’ नावाचं एक दल उभं केलं होतं. त्याच्यात मुसलमान आणि हिंदू निम्मे-निम्मे होते. मेजर ब्राऊन हा इंग्रज सेनाधिकारी गिलगिट स्काऊटचा कमांडर होता. २६ ऑक्टोबरला हरिसिंहांनी सामीलनाम्यावर सही केल्याचे कळल्यावर ३१ ऑक्टोबरला मेजर ब्राऊनने चक्क बंड केलं. ‘गिलगिट स्काऊट’च्या मुसलमान सैनिकांनी आपल्या हिंदू सहकार्‍यांना सरळ ठार मारलं. गिलगिटच्या हरिसिंहांच्या प्रमुखाला म्हणजे ब्रि. धनधारसिंह यांना कैद करून बडतर्फ करण्यात आलं. गिटगिटच्या सरकारी कचेरीवर मेजर ब्राऊनने पाकिस्तानी झेंडा फडकवला.

 

 
 
मेजर थिमय्या
 

इकडे २७ ऑक्टोबरच्या पहाटे भारतीय सैन्याची पहिली तुकडी श्रीनगर विमानतळावर उतरली आणि काश्मीर व जम्मू विभागांमध्ये लढायांमागून लढाया झडू लागल्या. पठाण टोळीवाले जबर मार खात मागे हटू लागले. आता जीनांनी पठाणी टोळीवाले हा फसवा बुरखा टाकून दिला आणि जानेवारी १९४८ला पाकिस्तानी सैन्य अधिकृतपणे युद्धात उतरलं. याच सुमारास भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये ‘१९ इन्फन्ट्री डिव्हिजन’ हे एक नवं दळ उभारलं आणि त्याचं प्रमुखत्व मेजर जनरल कोदंडेरा सुब्बय्या थिमय्या म्हणजे के. एस. थिमय्या यांच्याकडे सोपविण्यात आलंसैन्याची सगळ्यात छोटी तुकडी म्हणजे ‘सेक्शन.’ एका सेक्शनमध्ये १० सैनिक असतात. तीन सेक्शन्सची एक ‘प्लॅटून’ बनते. तीन प्लॅटून्सची एक ‘कंपनी’ बनते. चार कंपन्यांची एक ‘बटालियन’ बनते. तीन बटालियन्सची एक ‘ब्रिगेड’ बनते आणि चार ब्रिगेड्सची एक ‘डिव्हिजन’ बनते. हे सगळे ढोबळ हिशोबाने आहे. सैन्याच्या त्या त्या ठिकाणच्या आवश्यकतेनुसार यात कमी-जास्त होऊ शकतं. काश्मीर आणि जम्मू या दोन्ही विभागांत भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पक्कं रोखून धरलेलं होतं. ऑक्टोबर १९४७ अखेर मेजर ब्राऊनने दगाबाजीने गिलगिट जिंकल्यावर पठाणी टोळीवाले तिथून पुढे सरकले. त्यांचं उद्दिष्ट होतं - लडाख विभागाची राजधानी लेह! गिलगिट ते लेह हे अंतर जवळपास ५०० किमींचे आहे. पण या वैराण प्रदेशात पाक सैन्याला रोखायला होतंच कोण? फक्त ‘स्कार्दू’ नावाचा एकमेव किल्ला. फेब्रुवारी १९४८ मध्ये टोळीवाले आणि पाक सैन्य ‘स्कार्दू’ला पोहोचलं.

 

महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ले चाकणचा रोमांचकारी वेढा आहे. किल्ले पन्हाळगडाला आदिलशाही सिद्दी जौहरचा वेढा पडलाय. खुद्द शिवराय त्या वेढ्यात अडकून पडलेले आणि इकडे चाकणच्या किल्ल्याला मुघल बादशहा औरंगजेब याचा खुद्द मामा, रणधुंरधर सेनापती शाहिस्तेखान याचा वेढा पडलाय. चाकणचा किल्ला म्हणजे अवघड, बुलंद डोंगरी किल्ला नव्हे, भुईकोट गढीच ती. पण किल्लेदार फिरंगोजी नरसाळा असा जबर हिंमतीचा की, मुघलांच्या अफाट सैन्यासमोर त्याने तब्बल दोन महिने चाकण लढवला. इथे ‘स्कार्दू’मध्येही फिरंगोजी नरसाळ्याच्याच जातीचा एक जबर मर्द पाय रोवून उभा राहिला. त्याचं नाव कर्नल शेरजंग थापा.अपुरं सैन्य, अपुरी शस्त्रं, अपुरं अन्नधान्य आणि जम्मू-काश्मीर अथवा लडाख या विभागांकडून कसलीही मदत मिळण्याची शक्यता शून्य. अशा परिस्थितीत या बहाद्दराने आणि ‘६ जम्मू-काश्मीर रायफल्स’ या त्याच्या पलटणीने तब्बल सहा महिने म्हणजे, फेब्रुवारी ते ऑगस्ट १९४८ दरम्यान शत्रूला रोखून धरलं होतं. ‘स्कार्दू’मधील एकूण एक सैनिक ठार झाल्यावरच पाक सैन्य पुढे सरकू शकलं. लेह जिंकण्याच्या पाकच्या या मोहिमेचं नाव होतं, ‘ऑपरेशन स्लेज.’

 

एकदा ते पुढे सरकल्यावर त्यांनी द्रास आणि कारगिलवर सहज कब्जा केला. आता लडाखची राजधानी लेह त्यांच्या सहज आवाक्यात आली. पण भारतीय सेनापतींना याची कल्पना होतीच. डोग्रा रेजिमेंटमधील फक्त ४० जवान कॅप्टन पृथ्वीचंद आणि कॅप्टन खुशालचंद या दोन भावांच्या आधिपत्याखाली झोजि ला खिंडीतून चालत लेहला पोहोचले. हे नुसतं वेडं धाडस नव्हतं, तर हा चक्क मूर्खपणा होता. पण भारतीय सेनापतींनी लेहमधल्या नागरिकांसाठी तो केला आणि त्याला यश आलं. डोग्रा रेजिमेंटने लेहच्या आसमंतात पक्के मोर्चे उभारले. पण, हे पुरेसं नव्हतं. लेहला विमानाने रसद पुरवणं अत्यावश्यक होतं. तेव्हा आणखी एक बहाद्दर पुढे आला. त्याचं नाव एअर कमोडोर मेहेरसिंग. लेहला धावपट्टी नव्हतीच, फक्त सपाट मोकळी जागा होती. विमानासाठी आवश्यक अशा दिशादर्शक यंत्रणांचा अर्थातच मागमूसही नव्हता. अशा ठिकाणी कमोडोर मेहेरसिंग विमान घेऊन निघाले म्हटल्यावर खुद्द डिव्हिजन कमांडर मेजर जनरल थिमय्या पुढे सरसावले आणि या दोघांनी लेहला विमान उतरवलं. भारतीय सेना आणि तिचे सेनापती हे असे आहेत!

 

लेहवरचं संकट टळलं आणि आता द्रास-कारगिलमधून शत्रूला पिटाळून लावण्याचा विचार सुरू झाला. या भागात डोंगराळ कडे-कपारी, गुहांमधून शत्रूने पक्के मोर्चे बांधले होते. तोफांचे गोळे वक्राकार (पॅराबोला) गतीने जातात. त्यामुळे ते खबदाडीत दडलेल्या शत्रूपर्यंत पोहोचेनात. ब्रिगेडिअर अटल यांच्या हाताखालच्या मराठा, गुरखा, राजपूत आणि पतियाळा या पलटणींनी पराक्रमाची शर्थ केली.मग जनरल थिमय्यांनी एक लोकविलक्षण साहस केलं. जम्मूहून त्यांनी ‘सात कॅव्हलरी रेजिमेंट’ ही रणगाडा पलटण मागवली. या पलटणीचे प्रमुख कर्नल राजिंदरसिंग स्पॅरॉ हा आणखी एक वेडा माणूस. मद्रास सॅपर्स या लष्करी इंजिनिअर दलाच्या मेजर थांगराजू यांच्या साहाय्याने त्यांनी थेट झोजि ला खिंडीपर्यंत रस्ता बांधला. कसा रस्ता? हिमालयाच्या कच्च्या मातीत १३ हजार फूट उंचीवरच्या बर्फाळ झोजि ला खिंडीत रणगाड्यांची अवजड धुडं पेलून नेणारा पक्का रस्ता१ नोव्हेंबर, १९४८ ला रणगाड्यांचे गोळे सरळ रेषेत (वक्राकार नव्हे), शत्रूच्या मोर्चांवर आदळू लागले आणि एक वर्षभर रेंगाळत चाललेल्या युद्धाचं सगळं पारडंच फिरलं. शत्रूला माघार घेण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही. १ जानेवारी, १९४९ला युद्धबंदी झाली. या बातम्यांनी संपूर्ण पाश्चिमात्य जग, तिथले जाणते सेनापती, युद्धतज्ज्ञ, युद्ध वार्ताहर अक्षरश: हादरले. १३ हजार फूट उंचीवर रणगाडे नेले? कोणी? काल स्वतंत्र झालेल्या भारताने? आणि कोण हा वेडा सेनापती? त्याचं नाव मेजर जनरल थिमय्या म्हणे! हद्द झाली बुवा! असे वेडे निर्माण होतात तेव्हाच इतिहास घडतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@