चीनच्या विरोधावर नाही, आक्षेप राहुलच्या बरळण्यावर आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019   
Total Views |


 

 
आक्षेप चीनच्या भारतविरोधी भूमिकेवर नाहीच. आक्षेप, राहुल गांधींनी चीनची री ओढण्यावर आहे. चीनने भारतविरोधात पावलं टाकण्यात नवीन काय आहे? पण, गांधी घराण्यातील स्वयंघोषित राजपुत्राला त्याबाबत आनंदाच्या उकळ्या फुटण्याची तर नवलाई आहेच ना! यापूर्वीच्या सत्रात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग यांनी पाकिस्तानविरोधातील भूमिका युनोच्या मंचावर अधिकृतपणे मांडली होती. त्या वेळीही चीन आडवा आला होताच. कणखर भारताला उगाच मलूल व्हावे लागले होते त्या वेळी. पण, म्हणून भारताच्या संसदेत विरोधी बाकांवर बसणार्यांपैकी कुणी आनंदाने टाळ्या पिटल्या नाहीत तेव्हा, कॉंग्रेसच्या पंतप्रधानांची नाचक्की झाली म्हणून.
 
जैश--मोहम्मदचा म्होरक्या असलेल्या मसूद अझहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आलेल्या प्रस्तावाला पार्श्वभूमी भारतातील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची असली, तरी तो प्रस्ताव भारताच्या पंतप्रधानांनी मांडलेला नाही. तो अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आदी देशांच्या पुढाकारातून पटलावर आलेला प्रस्ताव आहे. त्याला चीनने प्रखर विरोध करण्याचे तीव्र पडसाद त्या त्या देशांच्या राजकीय भूमिकेवर भविष्यात उमटणारच आहेत. पाकिस्तानी दहशतवादाचा मुक्तभोगी असलेल्या भारताला त्या निर्णयाच्या परिणामांपासून स्वत:ला वेगळे ठेवता येणार नाही, हे खरे असले तरी चीनच्या मुजोरीला लागलीच भारताच्या पराभवाच्या तराजूत तोलून त्याआडून मोदींना अपयशी ठरविण्याच्या नादात आपण आपल्या देशाच्या नुकसानीचा निलाजरेपणाने बाजार मांडतोय्याचेही भान, शंभर वर्षांचा इतिहास लाभलेल्या एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला उरले नसेल, तर त्या पक्षातील बुजुर्गांनी आपल्या अध्यक्षाला शहाणपणाच्या चार गोष्टींचा कानमंत्र देण्याची गरज आहे. अजून किती हसे करून घेणार आहेत ते स्वत:चे अन्पक्षाचेही?

गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय राजकारणातले परिवर्तन सारे जग बघते आहे. चीनने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहण्याला, भारताविरुद्ध उभे ठाकण्याला काही संदर्भ आहेत. काही कारणे आहेत. त्याची भूमिका भारताला कडवा प्रतिस्पर्धी मानण्यातून साकारली आहे. इथे पंतप्रधानपदी कोण विराजमान आहे, यावरून त्यांच्या वागण्याची दिशा ठरत नाही. तसे नसते तर नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी आमच्याविरुद्ध युद्ध पुकारले नसते. अगदी, भविष्यात कधी चुकीने राहुल गांधीही या देशाचे पंतप्रधान झाले, तरी चीनच्या वागण्यात परिवर्तन घडून येण्याची शक्यता सुतराम नाही. या प्रकरणात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आदी देशांनी भारताच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्यामागील कारणांचे अवलोकन केले तर ही बाब लक्षात येईल की तो, भारताच्या मागील कालावधीत वाढलेल्या ताकदीचा जसा परिणाम आहे, तशीच त्याला त्या देशांच्या चीनविरोधाची किनारदेखील आहे. प्रत्येकाचेच स्वत:चे असे राजकारण आहे इथे. त्यामुळे कुणी बाजूने उभे राहिले म्हणून हुरळून जाण्यात अर्थ नाही, तसेच कुणी विरोधात उभे ठाकले म्हणून लगेच अश्रू ढाळण्याचेही कारण नाही.

आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व बहाल करण्यासाठीचा प्रस्ताव दाराशी आलेला असताना, स्वत:ला कमकुवत घोषित करून त्या सदस्यत्वाचे दान चीनच्या पदरात टाकण्याचे पाप पंडित नेहरूंनी केले होते. तोच चीन, त्याच सुरक्षा परिषदेच्या मंचावर आज भारताविरुद्ध दंड थोपटून उभा आहे. इतिहास सांगतो की, सार्या जगाला दहशतवादी वाटणारा मसूद अझहर चीनला मात्र आजवर कायम देवदूत वाटत आला आहे. त्याच्यावरील कारवाईला त्या देशाने यापूर्वी निदान चार वेळा विरोध केला आहे. अगदी भारताच्या पंतप्रधानपदी कॉंग्रेसचा नेता विराजमान असतानासुद्धा! फरक फक्त एवढाच आहे की, त्या वेळी राजकारणाची खेळी खेळण्यासाठी कुणी त्याबाबत आनंद व्यक्त केला नव्हता, की आपल्या पंतप्रधानांवर कुणी तुटूनही पडले नव्हते. दुर्दैवाने, आज मात्र तसे घडते आहे. शेजारी देशाच्या भूमिकेवरूनआपल्यादेशाच्या पंतप्रधानांची खिल्ली उडविण्याची तर्हा खुज्या राजकारणापायी अनुसरली जात आहे.

अर्थात, राहुल गांधींनीआपल्यादेशाच्या पंतप्रधानांची किंमत मातीमोल करण्याचा हा काही पहिला प्रसंग नव्हे. मुळात, ती गांधी घराण्याला लागलेली घाणेरडी सवय आहे. त्या घराण्याच्या पलीकडे कुणी पंतप्रधान बनण्याच्या लायकीचा असल्याचे त्यांना कधीच मान्य नसते. या घराण्यात आपण पंतप्रधान बनण्यासाठीच जन्माला आलो असल्याच्या गैरसमजात ते वावरत असतात. त्यांना सोडून इतर कुणी त्या पदावर आले की ते त्यांना सहन होत नाही. मग पंतप्रधानासारख्या बड्या पदावरील व्यक्तीच्या अवमानाच्या क्लृप्त्या अंमलात येतात, गांधी घराण्यातील सदस्यांकडून. याला ना लालबहादूर शास्त्रींचा अपवाद राहिला, ना मोरारजी देसाईंचा. ना पी. व्ही. नरिंसह राव त्यातून सुटले, ना डॉ. मनमोहनिंसग. नरेंद्र मोदी तर आहेतच भाजपाचे. ‘‘गांधी घराण्यातील कुणी पंतप्रधानपदी विराजमान असता तर बाबरी ढाचा पडला नसता,’’ हे विधान असो, की मग डॉ. मनमोहनिंसगांच्या स्वाक्षरीचा कागद पत्रकारांसमोर फाडून हवेत भिरकावण्याचातोप्रसंग... अरे, पंतप्रधानच कशाला, यांना तर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरदेखील गांधी घराण्यापलीकडे कधी कुणी चालला नाही. बसलाच कुणी त्या पदावर, तर कायम त्याचा अपमान करण्याच्या संधी शोधल्यात यांनी. त्यामुळे राहुल यांनी मोदींची टर उडवणे, हा गांधी घराण्याच्या परंपरेचा भाग आहे.

बरं, आपण काय बोलतोय्‌, कशाबाबत बोलतोय्‌, याचे तरी भान राखावे ना एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाच्या एका राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकार्याने? तर तेही नाही. बरं, राहुल यांची अडचण अशी झाली आहे की, त्यांनी स्वत:भोवती चेल्याचपाट्यांची गर्दीही अशी जमवून ठेवली आहे की, त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत करावयाचे राजकारण अन्आंतरराष्ट्रीय पातळीवर करावयाचे राजकारण यातील भेदाची कल्पनाही आहे की नाही, याबाबत शंका उपस्थित व्हावी. तसे नसते तर असली पातळीविहीन, हास्यास्पद विधाने त्यांनी केली नसती. निदान देशाबाहेरील शक्तींशी लढताना तरी हा देश, इथले सारे राजकीय नेते एक असल्याची प्रचीती त्यांनी जगाला आणून दिली असती. पाकिस्तानची शकले पाडून बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हाचा तो प्रसंग अजून हा देश विसरलेला नाही. आपसातले राजकारण मागे टाकून इंदिराजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची अटलजींची भाषा अजून स्मरणात आहे लोकांच्या. कॉंग्रेस पक्षात कुणीच सांगत नसेल का राहुल यांना, अशा प्रसंगात कसे वागायचे असते ते? निवडणुकीचे राजकारण निवडणुकीपुरते असते. तो आयुष्यभर जगण्याचा विषय नसतो. युद्धाच्या प्रसंगात तर देश एकसंध असल्याचे वर्तणुकीतून सिद्ध करण्याचाच ध्यास असला पाहिजे प्रत्येकाचा. पण, इथे तर देशात दुफळी माजली असल्याचे चित्र निर्माण करण्याचीच अहमहमिका लागली आहे प्रत्येकात. नरेंद्र मोदी तुम्हाला पंतप्रधान नको आहेत, भाजपा तुम्हाला सत्तेत आलेली नकोय्‌, त्यासाठीच तुमचा हा सारा जळफळाट चालला आहे, हे तर स्पष्टच आहे. पण, म्हणून आपल्या पंतप्रधानांची टर उडवण्यासाठी, त्यांना कमी लेखण्यासाठी चीनची भलावण करत सुटणार का निर्लज्जांनो? तो मसूद अझहर दहशतवादी असल्याचे सारे जग मान्य करते.

अमेरिका, इंग्लंड, फ्रान्ससारखे देश त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित करण्याची प्रक्रिया आरंभतात. त्यासाठी सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला जातो. केलाच चीनने विरोध, तर तो विरोध झुगारून अन्य मार्गाने मसूदवर कारवाई करण्याची कणखर भूमिका उर्वरित जगाने स्वीकारणे, हा भारताच्या रणनीतीचा विजय नव्हे? मग, ज्यात जरासेही आश्चर्य नाही त्या चीनच्या विरोधात मोदींचा पराभव शोधून त्याचे हीन दर्जाचे राजकारण करण्याचा अट्टहास कशासाठी चाललाय्‌? भारताचे मोठे होणे जगात कुणालाच नको आहे. मग, शेजारच्या बलाढ्य चीनला ते नको असण्याचे आश्चर्य ते काय असणार आहे? अर्थव्यवस्थेपासून तर आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंतच्या क्षेत्रात भारत दिवसागणिक मजबूत होत असल्याची खात्री अमेरिकेपासून जगातल्या इतर देशांना पटू लागली आहे. चीनचा विरोध पत्करून त्यांनी भारताच्या बाजूने उभे राहणे, हा त्याचाच परिपाक आहे. हे राहुल गांधींना उमजत नसेल, त्यांना ते समजावून सांगण्याची गरज त्यांच्या सभोवतालच्या चेल्याचपाट्यांनाही वाटत नसेल, तर आता परमेश्वरानेच सद्बुद्धी द्यावी या बिचार्या कॉंग्रेसजनांना!

@@AUTHORINFO_V1@@