वेन हो ली आणि सीआयएफ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



हेरांच्या दुनियेत शह आणि प्रतिशह कसे असतात पाहा. वेन हो ली हा चिनी हेर नव्हता, असंच आता म्हणायला पाहिजे. कारण, त्याच्यावरचा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही.


अल्बर्ट आइनस्टाइन या मूळच्या जर्मन ज्यू असलेल्या, परंतु अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेल्या जगद्विख्यात शास्त्रज्ञाने अणुसिद्धांत मांडला आणि इतर कित्येक वैज्ञानिकांच्या श्रमांची त्यात भर पडत अखेर रॉबर्ट ओपेनहायमर या मूळच्या जर्मन शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने अणुबॉम्ब बनवला, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. अणुबॉम्बचा प्रत्यक्ष उपयोग रणांगणावर होण्यापूर्वीच जर्मनीने गुडघे टेकले होते. अणुबॉम्ब पडून दोन शहरं साफ बेचिराख झाल्याबरोबर जपाननेही गुडघे टेकले आणि दुसरे महायुद्ध संपले. मुळात अण्वस्त्रे बनविण्यासाठी अमेरिका आणि जर्मनी या दोघांच्यात जोरदार चढाओढ लागलेली होती. अमेरिकेने ती जिंकली. जर्मनीने अण्वस्त्रांबरोबरच विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांवरही जारीने संशोधन चालवलं होतं. पराभूत जर्मन प्रदेशावर पश्चिमेकडून अँग्लो-फ्रेंच-अमेरिकन संयुक्त सेना व पूर्वेकडून सोव्हिएत सेना चाल करून जात होत्या. सोव्हिएत सेना विलक्षण झपाट्याने पुढे सरकत होत्या. त्या मानाने दोस्त सेनांचा सेनापती जनरल आयसेनहॉवर संथपणे पुढे सरकत होता. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या जीवाची उलघाल होत होती. कसंही करून अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांवर संशोधन करणारे जर्मन शास्त्रज्ञ त्यांच्या कागदपत्रांसकट हस्तगत करायला हवे होते. ते जर सोव्हिएत सैन्याच्या हाती पडले तर धडगत नव्हती. खुद्द त्या जर्मन शास्त्रज्ञांनाही या गोष्टीची कल्पना होतीच. स्टालिनच्या पंजात अडकण्यापेक्षा अमेरिकेचा आश्रय घेणं केव्हाही उत्तम आणि असा विचार करून अनेक जर्मन शास्त्रज्ञ स्वत: होऊनच अमेरिकेत पळून आले आणि अमेरिकेचा जीव भांड्यात पडला.

 

पुढच्या काळात हायड्रोजन बॉम्ब, न्यूट्रॉन बॉम्ब तसंच विविध लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र विकसित करून अमेरिकन शस्त्रभांडारात फार मोठी भर टाकण्यात या जर्मन शास्त्रज्ञांचा भरघोस सहभाग होता. अणुबॉम्बचं गुपित मात्र अमेरिका फार काळ स्वत:जवळ सुरक्षित राखू शकली नाही. सोव्हिएत गुप्तहेर खात्याने ते पळवलंच. ही आत्यंतिक महत्त्वाची कामगिरी बजावणारा हेर स्वत:च एक शास्त्रज्ञ होता. त्याचं नाव होतं क्लाउस फुक्स. साम्यवादी तत्त्वज्ञानाने भारून जाऊन त्याने हे कृत्य केलं. जगभर सर्वत्र अशाप्रकारची हेरगिरी चालतेच. एकमेकांच्या संशोधनाची गुपितं पळवण्यासाठी सर्वच राष्ट्रं टपलेली असतात. हेरगिरीच्या क्षेत्रात नीतिमूल्यं वगैरे नसतात. दुसर्‍याचं गुपित पळवून आपल्या राष्ट्रधुरीणांना पुरवणं हेच तिथे प्रमुख नीतिमूल्य असतं. त्यामुळे शत्रुराष्ट्रांप्रमाणेच मित्रराष्ट्रांचीही गुपितं पळविली जात असतात. अलीकडे एका चिनी शास्त्रज्ञाला अमेरिकेत अटक झाली. वेन हो ली हा अणुशास्त्रज्ञ मूळचा चिनी, पण आता अमेरिकन नागरिकत्व घेतलेला आणि अमेरिकन सरकारच्या न्यू मेक्सिको प्रांतातील लॉस आलमॉस येथील आण्विक प्रयोगशाळेत काम करणारा होता. अत्यंत गुप्त आणि प्रगत अशी आण्विक गुपितं चीनला पुरविल्याच्या आरोपावरून त्याला पकडण्यात आलं होतं.

 

अणुबॉम्ब बनविण्यात आता काहीच गुपित राहिलेलं नाही. चीनने केव्हाच अणुबॉम्ब बनविलेला असून आजवर कित्येक चाचणी स्फोट केलेले आहेत. पण, अणुसंशोधनाची प्रक्रिया थांबलेली नाही. ते क्षेत्र सतत विस्तारतंच आहे. अण्वस्त्रांच्या प्रत्यक्ष उपयोगाबाबत सतत नवनवीन संशोधनं सुरूच आहेत. अमेरिकेत तर या क्षेत्रात पायाभूत संशोधन सुरू असल्यामुळे जगभरचे अणुविज्ञानाचे विद्यार्थी, संशोधक, वैज्ञानिक तेथे येत असतात. वेन हो ली हा असाच मूळ चिनी शास्त्रज्ञ. गेली कित्येक दशकं तो अमेरिकेत आहे. तेथेच संशोधन करतो आहे. तेथेच त्याचं लग्न, संसार झालेला आहे. त्यामुळे त्याने आपल्यावरचा चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाचा साफ इन्कार केला. गेली काही वर्षे चीन सामरिकदृष्ट्या झपाट्याने प्रबळ होत चालला आहे. अमेरिकेला हे बघवत नाही. पण, चीनची विशाल बाजारपेठ तर तिला हवी आहे. चीनलाही अमेरिकेचा पैसा हवा आहे. पण त्यासाठी तो अमेरिकेच्या भलत्यासलत्या अटी स्वीकारायला अजिबात तयार नाही. त्यामुळे अमेरिका-चीन संबंध ‘तुझं माझं जमत नाही नि तुझ्यावाचून करमत नाही’ असे झाले आहेत. साहजिकच वेन हो लीच्या आण्विक हेरगिरी प्रकरणाला अमेरिकन प्रसारमाध्यमांनी अतोनात प्रसिद्धी दिली. कित्येक महिने हे प्रकरण पद्धतशीरपणे गाजविण्यात येऊन चीनला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न झाला. आणि अखेर वेन हो लीच्या खटल्याचा निकाल लागला. डोंगर पोखरून उंदीर निघाला. लीवरचा आरोप सरकार सिद्ध करू न शकल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. एवढंच नव्हे, तर न्यायाधीशांनी सरकारवर कडक ताशेरे ओढून लीसारख्या वैज्ञानिकाला देशद्रोही म्हटल्याबद्दल भर न्यायालयात त्याची माफी मागितली.

 

मुक्तता झाल्यानंतर अल्बुकर्क या त्याच्या मुक्कामाच्या गावी त्याचं जंगी स्वागत झालं. एक जोरदार पार्टी झाली. लीचे मित्र, सहकारी इ. २०० लोक तिथे उपस्थित होते. गावात सर्वत्र लीचं स्वागत करणारे फलक लागले होते आणि पार्टीत अमेरिकन राष्ट्राध्वज फडकत होता. लीला मासेमारी करण्याचा छंद आहे. आता काही दिवस तो मनसोक्त मासेमारी करण्यात घालवणार आहे. लीचा बचाव करणारे वकील त्याचे मित्रच आहेत. ते त्याच्याकडून फी घेणार नाहीत. फक्त एक जंगी भोजनपार्टी आणि मासेमारीसाठी एक सहल एवढीच त्यांची मागणी आहे. लीची सुटका, पार्टी इ.चा जो वृत्तांत प्रसिद्ध झाला, त्यात त्याच्या बायकोचा उल्लेख नाही. गेल्या महिन्यात एक छोटीशी बातमी आली होती की, वेन हो लीची बायको ही स्वत:च ‘सीआयए’ची हेर आहे. हेरांच्या दुनियेत शह आणि प्रतिशह कसे असतात पाहा. वेन हो ली हा चिनी हेर नव्हता, असंच आता म्हणायला पाहिजे. कारण, त्याच्यावरचा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही. आज ली साठीचा आहे. त्याच्या तरुण वयातच तो अमेरिकेत आला आणि स्थायिक झाला. या तरुण आणि हुशार शास्त्रज्ञाला अमेरिकेने अणुखात्यासारख्या संवेदनक्षम विभागात नोकरी तर दिली; पण न जाणो, उद्या हा चीनसाठी हेरगिरी करू लागला तर... म्हणून त्याने ज्या अमेरिकन मुलीशी लग्न केलं, तिलाच ‘सीआयए’ने आपली हस्तक बनवले. आणखी पुढे जाऊन सांगायचं, तर अशाप्रकारचे उपाय अमेरिका गेली वर्षानुवर्षं राबवत आहे. जगभरचे होतकरू तरुण उच्च शिक्षण, संशोधन याकरिता अमेरिकेत येत असतात. ते परत जाऊ नयेत, त्यांच्या बुद्धीचा उपयोग त्यांच्या देशाला न होता अमेरिकेला व्हावा म्हणून त्यांच्यावर मुली ‘घालण्यात’ येतात, ज्याप्रमाणे मारेकरी घालतात. पैसा तर वारेमाप मिळतोच. अशाप्रकारे ‘कामिनी ’आणि ‘कांचन’ यांच्या मोहात फसलेले हे तरुण कायमचे तिकडेच राहतात आणि अमेरिकेची भर करतात. त्यांच्यातले जे हेरगिरी वगैरे करतील अशी धास्ती वाटते, त्यांच्या घरात अमेरिकन हेरखात्याची हस्तकच बायको म्हणून घुसविण्यात येते. हेरांची दुनिया ही अशीच असते - विधिनिषेधशून्य!


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@