‘अर्ल ऑफ सँडविच’ ते ‘मॅकडोनाल्ड’ बंधू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


vichar_1  H x W


आता ‘बर्गर’ म्हणजे माठे सँडविचच. मग मॅकडोनाल्डने ब्रिटनमध्येच येऊन ‘सँडविच’ किंवा ‘बर्गर’च्या पेटंटसाठी अर्ज करावा, हे ब्रिटिश लोक कसं बरं सहन करतील?


ते १९४० साल होतं
. दुसरं महायुद्ध जोरात सुरू होतं. अमेरिका अधिकृतपणे युद्धात उतरलेली नव्हती, पण तिची युद्धाची तयारी जोरात सुरू होती. लोकांना आराम करायला वेळ नव्हता. जेवायलासुद्धा वेळ नव्हता. अशा काळात डिक मॅकडोनाल्ड आणि त्याचा भाऊ मॉरिस या दोघांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सान बर्नार्डिनो इथे पहिलं ‘मॅकडोनाल्ड रेस्तराँ’ म्हणजे रेस्टॉरंट सुरू केलं. मधोमध कापलेला भला मोठा बनपाव. त्यात विशिष्ट प्रकारची चटणी. किसलेला कोबी. वर चीजचा पातळ तुकडा. त्याच्यावर टोमॅटोच्या फोडी आणि त्याच्याही वर ‘हॅम’चा म्हणजे डुकराच्या मांसाचा एक तुकडा ठेवला की झाला ‘हॅमबर्गर.’ यात ‘हॅम’च्या तुकड्याऐवजी चीजचा मोठा तुकडा ठेवला की झाला ‘चीजबर्गर.’ बटाट्याच्या कापलेल्या लांबट फोडी तव्यावर तळून त्याला मसाला फासला की झाल्या ‘फ्रेंच फ्राईज.’ मॅकडोनाल्ड बंधूंनी या तीनच पदार्थांनिशी धंद्याला सुरुवात केली. ‘हॅमबर्गर’ला १५ सेंट्स, ‘चीजबर्गर’ला १९ सेंट आणि ‘फ्रेंच फ्राईज’ला १० सेंट्स, हा त्यांचा त्यावेळचा दर होता.



लोकांना ही कल्पना भलतीच पसंत पडली
. मॅकडोनाल्डच्या रेस्तराँसमोर गाडी थांबवायची. गाडीतून उतरण्याची गरजच नाही. बसल्या-बसल्याच व्यवस्थित पॅक केलेले वरील खाद्यपदार्थ घ्यायचे की, गाडी चालली पुढे. गाडीतच ते खायचे. वर एक बाटलीभर कोकाकोला ढोसायचा. बर्गरचा रॅपर नि कोकची बाटली फेकून द्यायची की ‘नाश्ता’ हा विषय संपला. अमेरिकेतले लोक कार्यालयातलं दुपारचं जेवण हे आपल्याप्रमाणे साग्रसंगीत घेत नाहीत. सँडविचेस, त्यावर कॉफी आणि शेवटी आईस्क्रीम असं साधारणपणे त्यांचं दुपारचं कार्यालयीन जेवण असतं. मॅकडोनाल्डने या सँडविचलाच ‘बर्गर’ हे नवं रूप दिलं. मॅकडोनाल्डची ही ’फास्ट फूड’ संकल्पना इतकी लोकप्रिय झाली की, अल्पावधीतच त्यांनी एकट्या कॅलिफोर्नियातच आठ नवी रेस्तराँ उघडली. युद्धकाळात नि युद्धोत्तर काळात सगळी समाजरचनाच झपाट्याने बदलली. पुरुषांबरोबरच स्त्रियाही मोठ्या प्रमाणावर नोकरीसाठी बाहेर पडल्या. सकाळचा नाश्ता नि दुपारचे जेवण घरी बनवणं वेळेच्या दृष्टीने जिकिरीचं होऊ लागलं. अशा वेळी मॅकडोनाल्ड बंधू आपले चविष्ट आणि पोटभरीचे खाद्यपदार्थ घेऊन पुढे सरसावले. नाश्ता त्यांच्या ‘हॅमबर्गर’ने नि लंच त्यांच्याच ‘चीजबर्गर’ने असा प्रकार हळूहळू रूढ झाला. त्यांनी इतरही नवीन नवीन खाद्यपदार्थ बाजारात आणले.



आज आपल्याला हे सगळं इतकं सवयीचं होऊन गेलं आहे की यात काय विशेष
, असा आपल्याला प्रश्न पडावा. पण, या घटना १९४०च्या काळातल्या आहेत. तेव्हा आपल्याकडेच नव्हे, तर अमेरिकेतसुद्धा हॉटेलचं खाणं हे इतकं सर्रास झालेलं नव्हतं. मॅकडोनाल्ड बंधूंच्या या झटपट खाद्यपदार्थांची लोकप्रियता दिवसेंदिवस इतकी वाढत गेली की, संपूर्ण अमेरिकेतून त्यांच्या खाद्यपदार्थांची एजन्सी देण्याबाबत मागण्या येऊ लागल्या. इथे डिक मॅकडोनाल्डचे व्यापारी डोक काम करू लागले. त्याने एजन्सीची मागणी करणार्‍यांना ‘फ्रँचाईस’ देऊ केलं. एखादा व्यापारी दहा वेगवेगळ्या उत्पादकांचा माल एकाच वेळी आपल्या दुकानात ठेवू शकतो. पण, ‘फ्रँचाईस’मध्ये त्याला फक्त एकाच उत्पादकाचा माल ठेवता येतो. इतकंच नव्हे, तर त्याच्या दुकानाचं एकंदर स्वरूप, अंतर्गत रचना, बाह्य सजावट हे सगळं ‘फ्रँचाईस’ कंपनी ठरवते. मॅकडोनाल्डच्या ‘फ्रँचाईस’ दुकानांची अशी साखळी अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात उभी राहिली.



पण
, मागणी इतकी वाढत चालली की, मुख्य उत्पादन केंद्रातून सर्वत्र माल पोहोचवणं अवघड होत चाललं. मॅकडोनाल्ड बंधूंनी यावर शोधलेला तोडगा अक्षरशः भन्नाट होता. त्यांनी सरळ आपल्या खाद्यपदार्थांचे फॉर्म्युलेच विकायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून त्यांच्या बर्गरचा फॉर्म्युला विशिष्ट रक्कम देऊन विकत घ्यायचा. त्याबरहुकूम पदार्थ बनवायचा आणि तो मॅकडोनाल्ड उत्पादन म्हणूनच विकायचा. प्रत्येक बर्गरमागे त्यांना एक सेंट द्यायचा. या तोडग्याला इतकं अफाट यश मिळालं की मॅकडोनाल्ड बंधूंच्या घरात डॉलर्सच्या थप्प्यांची रास लागली. आपल्याकडेही एखादा वडापाववाला काही काळ खूप नाव कमावतो. तुफान धंदा करतो. मग हळूहळू त्याचं लक्ष गिर्‍हाईकांपेक्षा पैशाकडे वळतं. त्याच्या पावाचा आकार घटतो. चटणीत लसणाऐवजी फोलपटं वाढतात. वड्यांचा आकार घटत-घटतं सागरगोट्यांएवढा होतो. मॅकडोनाल्ड बंधूंनी असं कधीही होऊ दिलं नाही. ‘मॅकडोनाल्ड’ या ब्रॅण्डने विकला जाणारा पदार्थ विशिष्ट दर्जाचा असलाच पाहिजे, याकडे त्यांचं कडक लक्ष असे. त्यांची खास माणसं जगभरातल्या कुठल्याही मॅकडोनाल्ड रेस्तराँला केव्हाही अचानक भेट देत नि मालाच्या दर्जाची तपासणी करीत. एके ठिकाणी बर्गरमध्ये केस आढळला म्हणून एका केसासाठी डिक मॅकडोनाल्डने त्या दुकानाचं ‘फ्रँचाईस’ रद्द केलं.



डिक हा व्यवस्थापनतज्ज्ञ होता
, तर मॉरिस हा ग्राहकसेवेत वाकबगार होता. विशेष म्हणजे, ही तज्ज्ञता मिळवण्यासाठी ते कुठच्याही मॅनेजमेंट कोर्सला गेले नव्हते. ‘जग’ या अनुभवाच्या सगळ्यात मोठ्या शाळेत अनुभवातून धडे घेत-घेत ते मोठे झाले. १९७१ साली मॉरिस मरण पावल्यावर डिकने रिचर्ड क्राक या मित्राला मदतीला घेतलं. १९८७ साली या दोघांनी मॅकडोनाल्डचं जगभरातलं दहा हजारावं रेस्तराँ उघडलं. १९९८ साली डिक मॅकडोनाल्ड वयाच्या ८९व्या वर्षी मरण पावला. आज मॅकडोनाल्ड ही जगभर पसरलेली एक अवाढव्य अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगातल्या १११ देशांमध्ये तिची २३ हजार रेस्तराँ आहेत. अमेरिका हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा देश आहे. तिथे मोठ्या माशाने छोट्या माशाला गिळणं, किंबहुना समोर दिसेल ते गिळत जाणं आणि स्वत:ला बलवान ठेवणं हे शिष्टसंमत आहे. एका हिंदी चित्रपटात खलनायकाचा साहाय्यक त्याला विचारतो, “तुमच्याकडे मुबलक पैसा आहे. मग अजूनही लोकांना टोप्या घालण्याचे उद्योग तुम्ही का करताय?” त्यावर खलनायक उत्तरतो, “गरिबाकडे गमावण्यासारखं काही नसतंच. पैसेवाल्यांना आपली संपत्ती एकदम जाईल, अशी कायम भीती असते आणि म्हणून दौलतवालों को ही दौलत की ज्यादा जरूरत होती हैं।



संपत्ती ही श्रमांमधून निर्माण होत असते
. जे लोक अफाट परिश्रम, कर्तबगारी आणि दैवाची साथ यामुळे श्रीमंत झालेले असतात. त्यांना आपली संपत्ती एकदम जाईल, अशी भीती कधीच वाटत नसते. ज्यांना काहीही श्रम न करता फुकटात संपत्ती मिळते, त्यांनाच अशी भीती वाटते. मग ते आजूबाजूच्यांना फसवून, पिळून, शोषण करून आपली श्रीमंती टिकवून धरण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. अमेरिकन राष्ट्राचा पाया ज्या लोकांनी घातला, त्यांनी अफाट परिश्रम केले. त्यातून ते संपत्तीवान, बलवान बनले. आजच्या पिढीला हे सगळं स्वतः काही न करता मिळालेलं आहे. ते येनकेन प्रकारेण शिखरावर टिकून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या वाटेल त्या सूक्तासूक्त मार्गांचा अवलंब करून संपूर्ण जगातून पैसा खेचत आहेत, त्यामागे हीच मानसिकता आहे. अर्थातच, त्यामुळे जगात सर्वत्र त्यांच्याविरुद्ध असंतोष आहे.



भारत किंवा चीन यांसारखे आशियाई देश विविध प्रकारच्या शाकाहारी
, मांसाहारी चविष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. इथे जर तुम्ही बर्गरसारखे तुलनेने बेचवच म्हणावेत असे पदार्थ, केवळ जाहिरात, फॅशन, ग्लॅमर यांच्या जोरावर अव्वाच्या सव्वा दर लावून विकू लागलात, इथला पैसा आपल्या देशात खेचू लागलात, तर लोक फार काळ सहन करणार नाहीत. आणि या बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपन्या केवळ आशियाई देशांना टोपी घालू पाहत आहेत असं नव्हे. युरोपीय देशातदेखील त्यांचे हेच उद्योग चाललेत. नुकतेच मॅकडोनाल्ड कंपनीने ब्रिटनच्या पेटंट ऑफिसकडे आपल्याला ‘बर्गर’ या पदार्थाचे पेटंट मिळावे, असा अर्ज केला आहे. ब्रिटिश नागरिक यामुळे चकित आणि संतप्त झाले आहेत. कारण, ‘सँडविच’ हा पदार्थच मुळी ब्रिटनने जगाला दिला आहे. १७व्या शतकात एडवर्ड माँटेग्यू हा इंग्लंडमधला फार मोठा सरदार होता. ऑलिव्हर क्रॉमवेलच्या राज्यक्रांतीनंतर इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला पुन्हा राजसिंहासनावर बसवण्यात एडवर्ड माँटेग्यूचा फार मोठा सहभाग होता. या कामगिरीबद्दल त्याला ’अर्ल ऑफ सँडविच’ बनवण्यात आलं. ‘ड्यूक’, ‘अर्ल’, ‘काऊंट’, ‘व्हायकाऊंट’ या वेगवेगळ्या दर्जाच्या सरदारक्या होत्या. इंग्लंडच्या आग्नेय दिशेला आजच्या डोव्हर बंदराजवळ ‘सँडविच’ हे एक मध्यम दर्जाचं बंदर होतं. ते बंदर आणि आजूबाजूच्या भागाची सरदारकी देऊन एडवर्ड माँटेग्यूला ’अर्ल ऑफ सँडविच’ बनवण्यात आलं.



एडवर्ड माँटेग्यूचा नातू जॉन हाही फार मोठा सरदार होता
. तो इंग्लंडच्या नौदलाचा मुख्य दर्यासारंग होता. त्याचबरोबर तो अट्टल जुगारीही होता. जुगार खेळायला बसला की त्याला जेवणाचंही भान उरत नसे. एकदा फारच भूक लागली म्हणून त्याने जुगाराच्या टेबलावरच पाव आणि मांस मागवलं. स्वत:च त्याच्या ‘फांका’ म्हणजे स्लाईस कापले आणि पावाच्या दोन ‘फांकां’च्या आत मांसाची एक पातळ ‘फ़ांक’ ठेवून तो पदार्थ खाऊन टाकला. आजूबाजूच्या लोकांना ही युक्ती आवडली. त्यांनीही ती करून पाहिली. जॉनच्या मुख्य आचार्‍याला हे कळल्यावर त्याने पावात मांसाबरोबरच इतरही पदार्थ भरून पाहिले. अल्पावधीत हा नवा पदार्थ इंग्लंडभरच नव्हे, तर युरोपभर लोकप्रिय झाला. जॉन माँटेग्यू उर्फ ‘अर्ल ऑफ सँडविच’ने तो शोधून काढला म्हणून त्या पदार्थालाच ‘सँडविच’ हे नाव पडलं. ही घटना १७६२ सालची. आता ‘बर्गर’ म्हणजे माठे सँडविचच. मग मॅकडोनाल्डने ब्रिटनमध्येच येऊन ‘सँडविच’ किंवा ‘बर्गर’च्या पेटंटसाठी अर्ज करावा, हे ब्रिटिश लोक कसं बरं सहन करतील?

@@AUTHORINFO_V1@@