आंबोलीचा माहीतगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2019   
Total Views |

tiger_1  H x W:

 
 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोली या निसर्गसंपन्न गावाच्या जैवविविधतेची निसर्गप्रेमींना ओळख करून देणाऱ्या आणि येथील प्रश्नांची परिपूर्ण जाण असणाऱ्या काका भिसे यांच्याविषयी....

 

 
मुंबई (अक्षय मांडवकर) -  आठवी इयत्तेत असताना कोण्या एका संशोधकाने किटकांवर दिलेले भाषण ऐकून हा माणूस प्रभावित झाला. शिक्षणातून रस उडाल्याने आंबोलीच्या कुवार वाटा भटकू लागला. या वाटांवरच त्याला उभयसृपांच्या रूपाने सोबती मिळाले. या सोबतींशी त्याने गट्टी केली. शिक्षणाचा अभाव असूनही जिद्द न सोडता उभयसृपांविषयींचे ज्ञान अवगत करून घेतले. आंबोलीकरांना त्यांच्यापाशी असलेल्या विपुल जैवविविधतेची जाण करून दिली. या माणसाची निसर्गसंवर्धनाची पद्धत म्हणजे ’दबंगगिरी’. रोखठोक व परखड विचार मांडून प्रसंगी प्रशासनाचा रोष पत्करून हा माणूस आंबोलीच्या संवर्धनाचे काम झोकून देऊन करतो. असा आंबोलीचा माहीतगार म्हणजे काका भिसे.
 
 

tiger_1  H x W: 
 
 

पश्चिम घाटामधील जैवविविधतेची खाण समजल्या जाणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात दि. २९ एप्रिल, १९८१ रोजी काकांचा जन्म झाला. खरे नाव महादेव सुरेश भिसे, पण घरची मंडळी लहानपणापासूनच त्यांना ’काका’ या टोपणनावानेच बोलवायची. त्यामुळे पुढेही त्यांचे हेच नाव प्रचलित झाले. त्यांना शिक्षणाची मुळीच आवड नव्हती. शालेय शिक्षणही त्यांनी चालढकल करत पूर्ण केले. पुढे घरच्यांच्या आग्रहाखातर महाविद्यालयातही प्रवेश घेतला. मात्र, बारावीत ते नापास झाले. २०-२५ वर्षांपूर्वी आंबोली हे गाव आतासारखे उभयसृप आणि कीटकशास्त्रज्ञांची संशोधनभूमी नव्हते. त्यावेळी या गावातीलच लोकांना येथे आढळणार्‍या संपन्न जैवविविधतेची जाण नव्हती. काका आठव्या इयत्तेत असताना शाळेमध्ये कोण्या एका गृहस्थांचे किटकांवरती सादरीकरणाने आकर्षित होऊन लागलीच त्यांनी जंगले पालथे घालून कीटक शोधण्यास सुरुवात केली आणि खर्‍या अर्थाने त्यांचे निसर्गायन सुरू झाले.

 

tiger_1  H x W: 
 
 

पुढल्या काळात त्यांचे उभयसृपांचे व किटकांचे निरीक्षण सुरू होते. साधारण २००० सालच्या सुमारास डॉ. वरद गिरी, कौस्तुभ मोघे, विवेक गौर ब्रुमसारखी तज्ज्ञ संशोधक मंडळी आंबोलीमध्ये संशोधनासाठी येऊ लागली. ही सर्व मंडळी काकांचे गुरू आणि मित्र रोहन कोरगावकर यांच्या हॉटेलमध्ये राहत असत. त्यांच्यासोबत फिरून कोरगावकरांनाही सरीसृप व उभयचरांचा नाद जडला होता. कोरगावकरांसोबत राहिल्याने हा नाद काकांनाही जडला. घरात शिरलेल्या एखाद्या सापाला पकडण्यासाठीही कोरगावकर काकांना सोबत घेऊन जात होते. त्यामुळे काकांच्या मनात सापांविषयीची भीती दूर होण्यास मदत झाली. पुढे कोरगावकरांनी उभयसृप, पक्षी, वनस्पती यांविषयीच्या पुस्तकांवरुन काका या पुस्तकांच्या मदतीनेच विविध प्रजातींची ओळख पटवत होते. २००३ सालच्या दरम्यान त्यांनी डॉ. वरद गिरी यांच्यासोबत जंगल भटकंतीस त्यांनी सुरुवात केली. गिरींनी त्यांना उभयसृपांची शास्त्रीय दृष्टीने ओळख कशी करावी, यासंबंधीचे मार्गदर्शन केले.

 

tiger_1  H x W: 
 
 

काकांचे हे सर्व काम केवळ छंद आणि अभ्यास या दृष्टीने सुरू होते. त्यामधून अर्थार्जन व्हावे, असा उद्देश सुरुवातीच्या काळात नव्हता. निसर्गसंवर्धनाच्या कामामध्ये त्यांच्या हातून सुरुवातीस काही चुकाही घडल्या. गावकरी जंगलातून लाकूड गोळा करत असल्याची माहिती ते वनविभागाला देत होते. त्यामुळे गावकर्‍यांचा रोष त्यांना पत्कारावा लागला. मात्र, लोकसहभागातून निसर्गसंवर्धनाचे काम करण्याच्या त्यांच्या विचारांना यामुळे तडा जात होता. शिवाय गावकर्यांचाही जंगलावर अधिकार असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी माहिती देण्याचे काम बंद केले. २००६ साली त्यांची ओळख पुण्याहून आंबोली भटकण्यासाठी आलेल्या सायली पालांडे-दातार, राहुल खानोलकर, सौरभ फडके, विनय कोलते या मंडळींशी झाली. त्यांच्या पुढाकाराने आंबोलीत निसर्गसंवर्धनाचे काम सुरू करण्यासाठी त्यांनी हेमंत ओगले यांच्यासारख्या निसर्गप्रेमी आंबोलीकराला सोबत घेऊन ’मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब’ची स्थापना केली. जंगलातून लोकोपयोगाकरिता तोडल्या जाणार्‍या लाकडावर तोडगा काढणे, आंबोलीचे प्रदूषण आणि जनजागृती असे तीन मुख्य उद्देश या क्लबचे होते.

 
 
 
 

काकांनी आंबोलीतून उभयसृपांच्या नव्या प्रजाती शोधण्यास आणि काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदविण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ’खैरीस ब्लॅक शिल्डटेल’ या सापाचा आणि ’आंबोली डे गॅगो’ या पालीच्या नव्या प्रजातीच्या संशोधनकार्यात त्यांनी सहसंशोधक म्हणून काम केलेे आहे. तसेच एखाद्या बिटलची अळी बेडकाच्या प्रजातींना कशी धोकादायक ठरू शकते, यासंबंधीचे महत्त्वपूर्ण निरीक्षण त्यांनी अनिष परदेशींसोबत नोंदवले आहे. ही नोंद भारतातील दुसरी नोंद ठरली आहे. जैवविविधता निरीक्षणामधील काकांचे हे काम पाहून ’महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा’च्या आंबोलीमधील ’जैवविविधता व्यवस्थापन समिती’चे अध्यक्षपद त्यांना ग्रामस्थांनी ग्रामसभेत दिले आहे. सध्या काका आंबोलीमध्ये भटकंतीस आलेल्या निसर्गप्रेमींना मार्गदर्शनाचे काम करतात. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी येथील निसर्ग पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळवून दिला असून त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

 
 
@@AUTHORINFO_V1@@