ऐन वादळात पालघर-ठाण्याच्या १६१ बोटी समुद्रात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019   
Total Views |



मत्स्यव्यवसाय विभागाने दिले वायरलेस यंत्रणेव्दारे परतण्याचे संदेश

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'महा' च्रकीवादळाचा फटका उत्तर महाराष्ट्रातील पालघर व ठाणे जिल्ह्याला बसणार आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने या जिल्ह्यांतील मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परत येण्याचा इशारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील २,७७४ पैकी १६१ बोटी मासेमारीकरिता गेल्या असून त्यांना वायरलेस यंत्रणेव्दारे तातडीने संदेश पाठविण्याचे काम सुरू आहे.

 

 
 

अरबी सुमद्रात घोंगावणारे 'महा' चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्री गुजरात किनारपट्टीला धडकेल. लक्षव्दीप बेटांच्या क्षेत्रात निर्माण झालेले हे चक्रीवादळ अरबी समुद्रात वायव्य दिशेला प्रवास करत होते. त्यामुळे ते ओमानला धडकण्याची शक्यता होती. मात्र, हवामान विभागाने हे वादळ दिशा बदलून ईशान्येला वळणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 'महा' वादळ ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री थेट गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. पोरबंदर आणि दिव दरम्यानच्या किनारपट्टीला छेदून हे वादळ पुढे प्रवास करेल. परिणामी याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रावर पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता विभागाने वर्तवली आहे.

 

या परिस्थितीत मत्स्यव्यवसाय विभागाने समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परत बोलावण्यास सुरुवात केली आहे. खास करुन पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील मचछीमारांना बंदरात परत येण्याचे संदेश पाठविण्यात आले आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत मासेमारीच्या एकूण २,७७४ बोटी आहेत. त्यापैकी १६१ बोटी मासेमारीकरिता समुद्रात गेल्याची माहिती पालघर-ठाण्याचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अंजिक्य पाटील यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. या बोटींचे मासेमारीचे क्षेत्र जाफराबादपर्यत विस्तारलेले आहे. त्यामुळे या बोटींना तातडीने वायरलेस यंत्रणेव्दारे बंदरात परतण्याचे संदेश देण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील त्यांच्यापर्यत संदेश पोहोचविण्याची विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@