चलती का नाम गाडी...

Total Views |



 

अमेरिका हा अफाट विस्ताराचा देश आहे, तिथे सहजपणे संचार करण्यासाठी मोटार हे नवं वाहन लोकांना फारच पसंत पडलं. उद्योजकांनी लोकांना ते स्वस्तात उपलब्ध करून दिलं आणि पाहता पाहता अन्नपाण्याइतकीच मोटारही अमेरिकन माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून गेली.

 

मोटारीची सुरुवात खरं म्हणजे युरोपात झाली. पण, अमेरिकेने मोटारीचा शोध पूर्णत्वाला नेला. कोणतीही वस्तू नवी निघते तेव्हा साधारपणपणे ती महाग असते. साहजिकच तिचा उपभोग घेणं ही श्रीमंतांची मिरासदारी होते. अमेरिकेचं आणि त्यातही विशेषत: 'हेनरी फोर्ड' या मोटार उत्पादकाचं क्रांतिकारकत्व हे की, त्याने मोटार सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात आणून सोडली. अमेरिकन मोटार उद्योगातल्या सुरुवातीपासूनच्या तीन विशाल कंपन्या म्हणजे 'फोर्ड', 'जनरल मोटर्स' आणि 'क्रायस्लर'.
 

घोडा, बैल, खेचर, गाढव, उंट अशा कोणत्याही प्राण्याला गाडीला न जुंपता, गाडी चालू शकेल आणि ती माणसं किंवा सामान यांची वाहतूक करू शकेल, असं स्वयंचलित वाहन निर्माण करण्याची कल्पना इसवी सनाच्या १४-१५व्या शतकापासूनच युरोपातल्या अनेक खटपट्या लोकांच्या डोक्यात तरळत होती.

 

इसवी सन १६०० साली एका कल्पक डच माणसाने शिडांच्या गलबतांच्या तत्त्वांवर एक गाडी बनवली. त्याने एका घोडागाडीला दोन छोटी चौकोनी शिडं जोडली. वारा चांगला असेल तेव्हा ही गाडी तशी २० मैल वेगाने पळत असे, अशी नोंद आहे. आजच्या मोटारीचं म्हणजे स्वयंचलित वाहनाचं हे पहिलं रूप. याला अर्थात फारच मर्यादा होत्या. मुख्य म्हणजे वारा वाहता पाहिजे. पुन्हा आपल्याला ज्या बाजूला जायचंय, त्याच बाजूचा वारा हवा. वारा पडलेला असताना गलबतं वर्‍ह्यांवर चालू शकतात. इथे तशी काहीच सोय नव्हती. पण, लोक नाना प्रकारचे प्रयोग करून पाहत होते, हा महत्त्वाचा मुद्दा. शिडाची गाडी बनवणार्‍या त्या डच संशोधकाचं नाव मात्र इतिहासाला माहीत नाही.

 

शंभर वर्ष उलटली. इ. स. १७०५ साली इंग्लंडमध्ये टॉमस न्यूकोमेन याने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. आपल्यापैकी प्रत्येकाने 'जेम्स वॅटने आपल्या आईच्या चहाच्या किटलीचं झाकण वाफेच्या जोराने उडताना पाहिलं आणि त्यातून त्याला बाष्पशक्तीची व पर्यायाने वाफेच्या इंजिनाची कल्पना सुचली,' ही गोष्ट शाळेतल्या धड्यात वाचलेली असेल. ती चक्क खोटी आहे. अनेक जण वाफेच्या शक्तीने चालणारी यंत्र बनवण्याच्या खटपटीत होते. त्यांच्यापैकी टॉमस न्यूकोमेन या इंग्रजाला, कोळशाच्या खाणीतून पाण्याचा उपसा करणारे बाष्पशक्तीवर चालणारे यंत्र म्हणजे पंप बनवण्यात यश आलं. त्याने या शोधाचं पेटंट घेतलं. ही गोष्ट सन १७०५ सालची.
 

आपल्याकडचे विचारवंत लगेच म्हणतील, 'बघा, बघा! युरोपात लोक स्वयंचलित वाहनं, नवनवीन यंत्रं आणि तंत्र शोधून काढण्याच्या प्रयत्नात होते आणि तेव्हा आमचे लोक काय करत होते? तर जुनाट रूढी, अंधश्रद्धा, देव, धर्म, तीर्थयात्रा यातच बुडालेले होते.' आमच्या विचारवंतांचा देवाधर्मावर फार राग! असो. तर त्यांच्या माहितीसाठी सांगायला पाहिजे की, या वेळी म्हणजे १७०५ साली महाराष्ट्र जीवनमरणाची एक प्रचंड लढाई लढत होता. काबूलपासून रामेश्वरपर्यंत जवळपास संपूर्ण भारत देश घशात घालून बसलेला महाबलाढ्य मुघल पातशहा औरंगजेब हा महाराष्ट्राचं चिमुकलं हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी इथे जातीने मांडी ठोकून बसला होता. त्याच्या फौजा उभी पिकं तुडवीत, गावांना आगी घालीत आणि माणसांच्या कत्तली उडवीत सर्वत्र फिरत होत्या. विद्या, कला आणि शास्त्रं यांची वाढ होण्यासाठी शांतता लागते, प्रोत्साहन लागतं. इथे ते नव्हतं आणि युरोपात ते होतं.

 

तर ते कसंही असो, युरोपात यंत्रविद्या झपाट्याने विकसित होत होती किंवा असं म्हणणं जास्त योग्य ठरेल की, त्या समाजातले अनेक कल्पक लोक सतत नवनवीन प्रयोग करून पाहत होते. जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला नसून त्याने टॉमस न्यूकोमेनच्या इंजिनात फार महत्त्वाची सुधारणा घडवून आणली. ही गोष्ट १७६४ सालची. म्हणजे १७०५ ते १७६४ अशी ५९ वर्षं वेगवेगळे लोक सतत प्रयोग करतच होते. जेम्स वॅट, नव्हे वॉट हाच योग्य उच्चार आहे, याने आपल्या हुषारीने त्या इंजिनात फार महत्त्वपूर्ण सुधारणा केली. त्यामुळे त्याचं नाव प्रसिद्ध झालं.

 

बाष्पशक्तीवर चालणार्या इंजिनाचा उपयोग करून १७६९ साली बोथेक कॅग्नॉट नावाच्या फ्रेंच इसमाने एक गाडी बनवली. ही खरीखुरी स्वयंचलित अशी पहिली गाडी म्हणता येईल. तिला तीन चाकं होती. यावेळी पंधरावा लुई हा फ्रान्सचा राजा होता. त्याला ती गाडी फार आवडली. त्याने ती विकत घेऊन तोफ ओढण्याचा गाडा म्हणून तिचा वापर सुरू केला. ही गाडी ताशी तीन मैल वेगाने जात असे. आपल्याकडे या कालखंडात माधवराव पेशवा राज्यावर होता.

इंग्लंडमध्ये रिचर्ड ट्रेविथिक नावाच्या माणसाने 'कॅग्नॉट'च्या कल्पनेत आणखी सुधारणा करीत करीत वाफेवर चालणारी एक मोठी गाडी बनवली. त्यातून त्याने चक्क भाड्याने उतारू नेण्यास सुरुवात केली. ही गोष्ट १८०१ सालची. यानंतर ६१ वर्षांनी म्हणजे १८६२ साली जीन जोसेफ लेनॉर या फ्रेंच इसमाने गाडीच्या इंजिनात दगडी कोळशाच्या वाफेऐवजी गॅस सोडला आणि गाडी चालू केली. ट्रेविथिकप्रमाणेच लेनॉरची ही गाडी पॅरिसच्या उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करीत असे.

 

वरील नावं ही यश मिळालेल्या संशोधकांची आहेत. अयशस्वी ठरलेले, पण सतत प्रयोगशील असणारे असंख्य अज्ञात यंत्रज्ञ होते. यावरून तत्कालीन पाश्चिमात्य समाजाचा किंवा समाजातील बुद्धिमान लोकांचा 'मूड' ध्यानी यावा. समाजातला बुद्धिमान वर्ग जेव्हा काहीतरी नवीन करून दाखवण्याच्या, कर्तबगारीच्या महत्त्वाकांक्षेने झपाटला जातो आणि त्याला राजसत्तेकडून प्रोत्साहन मिळतं, तेव्हाच युगप्रवर्तक असं काहीतरी घडून येत असतं. पण, मुळात यासाठी समाजाची अस्मिता, आत्मभान, आत्मविश्वास जागृत असावा लागतो. आमच्याकडे त्याचीच तर वानवा आहे.

 

राष्ट्राला, समाजाला अस्मिता म्हणून काहीतरी असावी लागते, याचा राजकारण्यांना पत्ताच नाही आणि समाजाची अस्मिता जागृत होऊच नये म्हणून जे सतत बुद्धिभेद करण्याचं काम करीत असतात, त्यांनाच तर आमच्याकडे 'विचारवंत' म्हणतात. लेनॉरनंतर १८६५ साली सिगफ्रिड मार्क्स या ऑस्ट्रियन इसमाने इंजिनात 'क्रूड ऑईल' वापरून गाडी चालवण्याचा बराचसा यशस्वी प्रयोग केला. त्यानंतर १८७४ साली जॉर्ज ब्रेटन या अमेरिकन माणसाने पेट्रोलवर चालणारं इंजिन बनवलं. १८७९ सालो जॉर्ज सेल्डन या अमेरिकन संशोधकाने पेट्रोलच्या इंजिनाचे पेटंट घेतले.

 

१८८५ साली जर्मनीत कार्ल बेंझ या इसमाने पेट्रोलचं इंजिन लावलेली स्वयंचलित मोटार रस्त्यावरून फिरवली. यानंतर इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांमध्ये अनेकांनी स्वयंचलित गाड्या बनवल्या. पण, एकतर त्या फार महाग होत्या आणि त्या केव्हाही बंद पडत. १८९३ सालच्या २१ सप्टेंबर या दिवशी अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स राज्यातल्या स्प्रिंगफील्ड शहरात फ्रँक दुर्या याने बनवलेली संपूर्ण अमेरिकन बनावटीची, पेट्रोलच्या इंजिनाची पहिली गाडी रस्त्यावर धावली आणि अमेरिका मोटार संशोधन क्षेत्रात उतरली. विविध प्रकारची स्वयंचलित वाहनं बनवणारे अनेक संशोधक आणि त्यांच्या संशोधनापाठी आपला पैसा उभा करणारे धनवंत पुढे आले. अनेक कारखाने उभे झाले. पण, तरीही मोटार हा श्रीमंत लोकांनाच परवडणारा मामला होता.
 

यात बदल घडवून मोटार हे नवे वाहन स्वस्त किमतीत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं 'रॅनझम ओल्डस्' या तंत्रज्ञाने. १९०२ साली त्याने अमेरिकेच्या मिशिगन राज्यात डिट्रॉईट या ठिकाणी मोटार कारखाना सुरू केला. त्याची गाडी म्हणजेच सुप्रसिद्ध 'ओल्डस्मोबिल.' नंतरच्या काळात डिट्रॉईट शहर आणि त्याचा परिसर विविध मोटार उत्पादक कंपन्यांच्या कारखान्यांनी इतका गजबजून गेला की, त्याला 'मोटार सिटी', 'मोबाईल सिटी' किंवा प्रत्येक गोष्टीला सुटसुटीत नाव देण्याच्या अमेरिकन शैलीनुसार नुसतंच 'मो-सिटी' असं नाव पडलं.

 

१९०३ साली हेनरी फोर्डने डिट्रॉईटमध्येच आपला कारखाना सुरू केला आणि 'मॉडेल टी' नावाची छोटी, सुबक व स्वस्त गाडी बाजारात उतरवली. या गाडीने अमेरिकन समाजजीवनात क्रांती घडवली. मोटार हा पुढच्या काळात अमेरिकन माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. अमेरिका हा अफाट विस्ताराचा देश आहे, तिथे सहजपणे संचार करण्यासाठी मोटार हे नवं वाहन लोकांना फारच पसंत पडलं. उद्योजकांनी लोकांना ते स्वस्तात उपलब्ध करून दिलं आणि पाहता पाहता अन्नपाण्याइतकीच मोटारही अमेरिकन माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून गेली.

 

१९०८ साली हेरी लीलँड या माणसाने डिट्रॉईटमध्येच 'जनरल मोटर्स' ही कंपनी स्थापन केली. रॅनझम ओल्डस्ची 'ओल्डस्मोबिल', लुई शेव्हरलेटची 'शेव्हरलेट' इत्यादी कंपन्या लीलँडने विकत घेऊन जनरल मोटर्समध्ये विलीन केल्या. 'ब्यूक', 'कॅडिलॅक', 'ओपेल', 'पाँटिअ‍ॅक' इ. ब्रॅण्ड्सच्या गाड्या जनरल मोटर्सच्याच. पूर्वी आपल्याकडच्या हिंदी चित्रपटात हमखास दिसणारी, उघड्या टपाची, भलीमोठी 'शेव्हरलेट इंपाला' ही गाडीदेखील त्यांचीच. २००८ साली कंपनी १०० वर्षांची होत असताना तिची निव्वळ मिळकत वर्षाला सुमारे ४० दशकोटी डॉलर्स एवढी होती आणि जगभरातल्या तिच्या कर्मचार्‍यांची संख्या २ लाख, ५२ हजार होती.

 

आणि तरीही जून २००९ मध्ये कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. याची कारणं अमेरिकन मानसिकतेत आहेत. १०० वर्षांपूर्वी, लोकांना स्वस्त आणि वेगवान वाहन मिळावं व त्याचबरोबर आपल्याला पैसाही मिळावा, या उद्देशाने कारखाने सुरू झाले. पुढे लोकांबद्दलची भावना मागे पडली आणि आपल्याला पैसा, अधिकाधिक पैसा मिळावा एवढीच भावना राहिली. त्यासाठी इतर स्पर्धकांना उघडून टाकणं, इतकंच नव्हे, तर इतर वाहतूक व्यवस्थासुद्धा खच्ची करण्याचे उद्योग 'जनरल मोटर्स'ने केले.

 

१९२० नंतरच्या दशकात त्यांनी अमेरिकेतली एक रेल्वे कंपनीच विकत घेतली आणि तिचा विकास मुद्दाम खुंटवला. शिवाय भरपूर जाहिरात करून मोटार ही अन्नपाण्याइतकी, किंबहुना त्याहूनही महत्त्वाची कशी आहे, हे जनमानसावर बिंबवले. थोडक्यात, मोटार हे लोकांचे व्यसन बनले. दुसर्‍या महायुद्धाच्या सुरुवातीपूर्वी 'जनरल मोटर्स'ने जर्मनीतल्या सत्ताधारी नाझी सरकारशीही तांत्रिक सहकार्य केलं होतं. युद्धोत्तर काळातही नफा कमावण्यासाठी कंपनीने कोणत्याही सूक्तासूक्त मार्गाचा अवलंब करायला मागेपुढे पाहिले नाही. यातून अंतर्गत अव्यवस्था वाढत गेली व तिची परिणती दिवाळखोरी झाली. यंत्रयुग आणि त्यातून निर्माण झालेल्या भांडवलशाहीचा निर्णय नफेखोरी हा अभिशाप आहे. त्यापासून मुक्तता कशी मिळवायची, हा खरा प्रश्न आहे.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.