व्याघ्र संख्येत वाढ ; समस्या आणि उपाय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019   
Total Views |


 
 

राज्यातील व्याघ्र संख्येत झालेली वाढ आनंदाची बातमी असली तरी, त्यामुळे अनेक समस्या निमंत्रण मिळाले आहे.  

 
मुंबई ( अक्षय मांडवकर) -  यंदा जाहीर झालेल्या व्याघ्रगणनेच्या चौथ्या अंदाजपत्रकानुसार महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढल्याची आनंददायी बातमी समोर आली. २०१४च्या तुलनेत यंदा राज्यात वाघांची संख्या ६४ टक्क्यांनी वाढली. २०१४ साली राज्यात १९० वाघांचे अस्तित्व होते, आता ही संख्या ३१२ झाली आहे. म्हणजेच त्यामध्ये १२२ नव्या वाघांची भर पडली. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्य शासन तथा वनविभागाने व्याघ्र संवर्धनासाठी बरेच उपक्रम राबविले. वाघांसाठी संरक्षित केलेल्या क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे वाघांच्या अधिवास क्षेत्रात भर पडली. शिवाय वन कर्मचार्‍यांमार्फत नियमित गस्त व व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने नानाविध प्रकल्प राबविल्याने वाघांच्या संख्येत भर पडल्याचा दावा वनविभागाने केला. मात्र, वाघांची वाढलेली संख्या या आनंदाच्या बातमीला चिंतेची एक किनार आहे. राज्यात वाढणार्‍या व्याघ्र संख्येबरोबर मानव-वाघ संघर्षाची समस्या अधिक चिघळली जात आहे. याचे एकमेव कारण म्हणजे वाघांच्या वाढलेल्या संख्येमुळे त्यांचा ‘बफर झोन’ बाहेर सुरू झालेला प्रवास. 


गेल्या काही वर्षांत खासकरून ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे
. यातील काही वाघ ताडोबाच्या ‘बफर झोन’ बाहेरच्या म्हणजेच ब्रह्मपुरी, गडचिरोली अशा मार्गाने आंध्र प्रदेशपर्यंत प्रवास करत असल्याचे उघड झाले आहे. याच प्रवास मार्गावर मानव-वाघ संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाघांच्या वाढत्या संख्येवर रोख लावणे, हा त्यावरील उपाय नाही. उलटपक्षी काही वाघांचे इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये स्थलांतर करण्याचा विचार अग्रक्रमाने होणे आवश्यक आहे. याशिवाय व्याघ्र शिकारीच्या छुप्या धोक्याकडेही डोळेझाक करता येणार नाही. ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा’च्या ‘टायगरनेट’ या संकेतस्थळावरील माहितीनुसार, राज्यामध्ये या वर्षात आजतागायत १४ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एका वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला असून अपघात आणि इतर कारणांमुळे ७ वाघ दगावले आहेत. मात्र, महत्त्वाचे म्हणजे शिकारीमुळे ६ वाघांना आपल्या जीवाला मुकावे लागल्याचे या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. ताडोबासारख्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची शिकार ही शेतकर्‍यांनी विष घातल्याने किंवा शिकारीच्या फाशात अडकल्याने होते. त्यामुळे वनविभागाला यापुढे व्याघ्र संरक्षण व संवर्धनाबरोबरच व्यवस्थापनामध्येही आपली ताकद वाढवावी लागणार आहे.



वाघांचे स्थलांतर हाच उपाय


ताडोबातील व्याघ्र संख्येचा फुगा आता फुटला आहे
. या व्याघ्र प्रकल्पात व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाताबाहेर असलेल्या वाघांचे वास्तव्य आहे. येथील बफर क्षेत्रात सहज फेरफटका मारल्यास एकाच ठिकाणी आपल्याला पाच ते सहा वाघांचे दर्शन घडते. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे वाघांचे इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये स्थलांतर करणे. 'ब्रह्मपुरी' क्षेत्रात माणसांवर हल्ला करणार्‍या ‘ई-वन’ वाघिणीला वनविभागाने यावर्षीच्या सुरुवातीला 'मेळघाट व्याघ्र प्रकल्पा'त स्थलांतरित केले. दोन महिने या वाघिणीची बंदिस्त अधिवासात निगा राखण्यात आली. त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मात्र, मुक्तता केल्यानंतर तिने पुन्हा माणसांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. अखेरीस या वाघिणीला जेरबंद करण्यात आलेमानवी संघर्षाच्या समस्येच्या मुळाशी असणारा वाघ स्थलांतरित केल्यावर त्याच्यामध्ये सुधारणा होईलच, असे नाही. त्यामुळे स्थलांतर करताना निवडण्यात येणार्‍या प्राण्यांबाबतही काळजी घेणे आवश्यक आहे


यापूर्वी हाती घेण्यात आलेल्या स्थलांतर प्रकल्पांमध्ये मानवी संघर्षाच्या समस्येच्या मुळाशी असणार्‍या वाघाची निवड करण्यात आली. परिणामी, अशा स्थलांतराचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. ताडोबातील वाढती व्याघ्रसंख्या लक्षात घेता, यातील काही वाघांना मेळघाट किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू करणे गरजेचे आहे. या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांमध्ये ताडोबाच्या तुलनेत वाघांची संख्या कमी आहे. तसेच सह्याद्री आणि मेळघाटातील वाघांची स्वभाववैशिष्ट्य ताडोबातील वाघाशी अजिबात मिळतीजुळती नाहीत. सह्याद्री आणि मेळघाटातील वाघ आक्रमक असले तरी माणसांपासून लपत-छपत आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे वन्यजीव अभ्यासकांच्या मतानुसार विदर्भात वाढलेल्या वाघांना पश्चिम घाटात स्थलांतरित करण्यापूर्वी काही उपाययोजना राबवाव्यात. त्यामध्ये सुरुवातीचे काही महिने वाघाची बंद अधिवासात काळजी घ्यावी. शिवाय जंगलात मुक्त केल्यानंतर त्यांच्या हालचालीवर नजर ठेवल्यास संरक्षणाच्या दृष्टीने हातभार लागेल. एकूणच वाघांच्या वाढत्या संख्येबरोबर ती मर्यादेबाहेर जाऊ समस्याचे जाळे अधिक गुंतागुंतीचे होणार नाही, यावर लक्ष केंद्रित करणे सद्य परिस्थितीत महत्त्वाचे आहे.
 
 
 

@@AUTHORINFO_V1@@