कुठे गेला काँग्रेस पक्ष?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2019   
Total Views |



खऱ्याखुऱ्या पक्षनिष्ठांना काँग्रेसमध्ये स्थान उरले नाही आणि गांधी घराण्याच्या पापांवर पांघरूण घालण्याचा एककलमी कार्यक्रम काँग्रेस पक्षाने स्वीकारला. तिथून जनतेतला काँग्रेस पक्ष संपुष्टात येऊन तो गुन्हेगार तुरुंगवासीयांचा पक्ष होऊन गेला. मग त्याचा मतदाराशी व पर्यायाने जनतेशी संपर्क संपत गेला. त्यामुळे अहमद पटेल यांच्या प्रश्नाचे साधे सोपे सरळ उत्तर असे आहे. काँग्रेस पार्टी राहुलनिष्ठा वा सोनियानिष्ठेत अंतर्धान पावलेली आहे. तिला बाहेरून कोणी संपवलेले नाही, तर गांधी खानदानाची गुलामीच काँग्रेसला नामशेष करीत गेली आहे आणि म्हणून जनतेला त्या पक्षाशी कुठले कर्तव्य उरलेले नाही.


सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. त्यात काँग्रेसचे तीन दिग्गज नेते एकमेकांशी गुफ्तगु करीत असून त्यातला एक पक्षातला सर्वशक्तिमान नेता मानला जातो. किंबहुना दहा वर्षांच्या युपीएच्या कालखंडात त्याच्याच इशाऱ्यावर भारत सरकार चालत असल्याच्या वदंताही होत्या. त्याचे नाव अहमद पटेल. असा नेता दुसऱ्या तितक्याच वजनदार नेता भूपिंदरसिंग हुड्डा यांना विचारत आहे की, "कहाँ गयी काँग्रेस पार्टी?" असा प्रश्न विचारण्याची वेळ त्याच्यावर का आली असेल? खरेतर हा प्रश्न मागील पाच वर्षांत माध्यमांनी, अभ्यासकांनी व विरोधी पक्षांनी सातत्याने विचारलेला आहे. तेव्हा हिरिरीने काँग्रेस पक्ष सव्वाशे वर्षं जुना असून तो असा एक-दोन निवडणुकातल्या पराभवाने संपणार नसतो, असे अगत्याने जाणकारही म्हणत होते. पण आता हाच प्रश्न अहमद पटेल विचारत आहेत आणि त्याचे उत्तर दुसरे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांच्यापाशीही असल्याचे दिसत नाही. कारण, त्या चित्रणात त्यांचाही समावेश असून हरियाणात निकालाच्या वेळी काँग्रेसची अवस्था कशी असेल, या विषयावर त्यांचे बोलणे चाललेले आहे. कुठल्या गटाला किती उमेदवार दिले आणि किती आमदार निवडून येतील, या प्रश्नाला उत्तर देताना हुड्डा फ़ारतर १४ असे उत्तर देतात. त्यामुळे उद्विग्न झालेले पटेल हा सवाल करीत आहेत. त्यांचा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण, पाच वर्षांपूर्वी काँग्रेस हाच पक्ष हरियाणामध्ये सलग दहा वर्षे सत्तेत होता आणि भजनलाल यांच्यासारखा दिग्गज नेता बाजूला झाला असताना आणि चौटाला यासारखा दांडगा नेता विरोधात असतानाही दोनदा काँग्रेसने विधानसभेत बहुमत जिंकलेले होते. तेव्हा हरियाणामध्ये भाजपची फारशी ताकद नव्हती किंवा दखल घेण्याइतकाही तो पक्ष तिथे नव्हता.

 

पाच वर्षांपूर्वी भाजपने स्वबळावर विधानसभा जिंकली आणि ताज्या लोकसभा निवडणुकीत सर्व दहा जागाही पादाक्रांत केल्या. खुद्द हुड्डा यांनाही पराभूत व्हावे लागले आणि २०१४ मध्ये एकमेव जागा जिंकलेला त्यांचा सुपुत्रही यंदा पराभूत झाला. मग काँग्रेसला तिथे झाले आहे तरी काय, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण त्याचे उत्तर मात्र सोपे असले तरी समजून घ्यायला अवघड आहे. तिथेच कशाला देशभर काँग्रेसची अवस्था रुग्णावस्थेप्रमाणे झालेली आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी भाजपचे नेतृत्व पत्करल्यानंतर लोकसभा प्रचारात ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा केलेली होती. त्याची अनेक शहाण्यांनी टिंगल केली होती आणि मोदींचा उर्मटपणा ठरवलेला होता. पण आपण काँग्रेस संपवणार, असे मोदी कधीच म्हणाले नव्हते. त्यांनी देश काँग्रेसमुक्त होईल, असे भाकीत केलेले होते आणि ते सत्कार्य काँग्रेसचा वारसदारच करील, अशी मोदींना खात्री होती. अर्थातच फ़क्त मोदी कशाला, अनेक काँग्रेस नेत्यांना व पुरोगामी राजकीय भाष्यकारांनाही तशीच खात्री होती. पण ते सत्य बोलण्याची हिंमत कोणाला होत नव्हती. मोदींनी तितकेच धाडस केलेले होते. ते समजून घेण्यापेक्षा मोदींची टवाळी करण्यात राजकीय विश्लेषकांनी धन्यता मानली आणि असल्या उथळ शहाण्यांच्या विश्लेषणावर सोनियांसह अहमद पटेलही विसंबून राहिले होते. इतकेही दूर जाण्याची गरज नाही. काँग्रेसचेच जाणकार नेते जयराम रमेश यांनीही तेव्हा २०१४च्या निवडणुकीत राहुल हे काँग्रेस बुडवत असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितलेले होते. पक्षाला २०१४ची लोकसभा जिंकायची आहे आणि राहुल मात्र २०१९च्या लोकसभेच्या तयारीत गुंतलेत, असा उपरोधिक शेरा तेव्हा त्यांनी मारला होता. त्याचा अर्थ काँग्रेस पक्ष नामशेष होतो आहे, असाच होता. पण रमेश यांची भविष्यवाणी ऐकायला अहमद पटेल यांना सवड कुठे होती? अगदी काल-परवा म्हणजे २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही रमेश यांनी अशी भविष्यवाणी केलेली होती. पक्षासमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न असल्याचे रमेश यांनी वर्तमानपत्राला दिलेल्या जाहीर मुलाखतीत म्हटले होते. पटेलांना ते ठाऊकच नाही का?

 

राहुल गांधी व त्यांचे नेतृत्व काँग्रेस रसातळाला घेऊन चालले आहे, असाच रमेश यांनी धोक्याचा इशारा दिलेला होता ना? ‘रसातळा’ला म्हणजे ‘नरक’, हे पटेल वा काँग्रेसश्रेष्ठींना ठाऊकच नाही का? ‘पार्टी कहाँ गयी’ असा प्रश्न विचारण्यापेक्षा ‘पक्ष असा नामशेष कोणी केला’ किंवा ‘पक्ष असा रसातळाला कोणी नेला’ हा सवाल योग्य ठरेल. त्याचे उत्तर राहुल गांधी व सोनियांचे पुत्रप्रेम असेच आहे. पण ते ऐकायची हिंमत कुणा काँग्रेसवाल्यापाशी आहे का? जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा देणाऱ्यांची पाठ थोपटायला राहुल गांधी पोहोचले, तिकडेच काँग्रेस पक्ष गेला आहे. ‘टुकडे’ भारताचे कधी होत नसतात. असल्या वल्गना करणाऱ्यांचे व त्यांचीच पाठराखण करणाऱ्यांचे ‘टुकडे’ होत असतात आणि झाले आहेत. कारण, हरियाणा असो किंवा महाराष्ट्र असो, तिथे आज काँग्रेस इतक्या गटातटात विखुरली गेली आहे की मूळ काँग्रेस कुठे आहे, तेच काँग्रेसजनांना समजेनासे झाले आहे. तिथे हरियाणात हुड्डा विरुद्ध तन्वर विरुद्ध शैलजा असे अनेक गट आहेत. त्यातही सुरजेवाला किंवा तत्सम उपगटही आहेत. त्यातला श्रेष्ठींचा आशीर्वाद असलेला गट कोणता? कारण, त्यालाच काँग्रेस पक्ष म्हणतात ना! जे कोणी तुरुंगात जातील वा ज्यांच्यावर गुन्हेगारीचे गंभीर दखलपात्र आरोप असतील, त्यांच्या निरपराधीत्वाचा डंका पिटण्याला आजकाल काँग्रेसचे कार्य मानले जाते. सोनिया, राहुलना न्यायालयात जातमुचलका लिहून द्यायचा असला, मग तिथे जमा होऊन त्यांचा जयजयकार करण्याला ‘काँग्रेसकार्य’ म्हणतात. रॉबर्ट वडेरा यांच्या आर्थिक गफलती वा अफरातफरीचे समर्थन करण्यालाच काँग्रेसचा कार्यक्रम मानला जातो. अटकेला घाबरून फरारी होणाऱ्या आरोपी चिदंबरम यांच्या समर्थनाला रस्त्यावर येण्यातून पक्ष चालविला जातो. शिवकुमार यांच्याही अटकेच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्याला काँग्रेसची मोहीम मानले जाते. याचा अर्थ काँग्रेस पक्ष लोकांमध्ये राहिलेला नसून तुरूंगात गेला असाच होतो ना?

 

जयंती नटराजन वा हेमंत विश्वशर्मा अशा अनेक नेत्यांनी डबघाईला आलेल्या काँग्रेसला सावरण्यासाठी अनेक सूचना केल्या आणि कोणी ऐकतच नाही, म्हणून पक्षाला रामराम ठोकला. तेव्हा त्यांच्या जाण्यातून काँग्रेस पक्ष हळूहळू संपत चालला होता. खऱ्याखुऱ्या पक्षनिष्ठांना काँग्रेसमध्ये स्थान उरले नाही आणि गांधी घराण्याच्या पापांवर पांघरूण घालण्याचा एककलमी कार्यक्रम काँग्रेस पक्षाने स्वीकारला. तिथून जनतेतला काँग्रेस पक्ष संपुष्टात येऊन तो गुन्हेगार तुरुंगवासीयांचा पक्ष होऊन गेला. मग त्याचा मतदाराशी व पर्यायाने जनतेशी संपर्क संपत गेला. त्यामुळे अहमद पटेल यांच्या प्रश्नाचे साधे सोपे सरळ उत्तर असे आहे. काँग्रेस पार्टी राहुलनिष्ठा वा सोनियानिष्ठेत अंतर्धान पावलेली आहे. तिला बाहेरून कोणी संपवलेले नाही, तर गांधी खानदानाची गुलामीच काँग्रेसला नामशेष करीत गेली आहे आणि म्हणून जनतेला त्या पक्षाशी कुठले कर्तव्य उरलेले नाही. ही वास्तविकता जसजशी तळागाळापर्यंत पोहोचते आहे, तसा काँग्रेस पक्ष काळाच्या पडद्याआड चालला आहे. सोनियांच्या रायबरेली मतदारसंघाच्या एक काँग्रेस आमदार अदिती सिंग यांनीच त्याची साक्ष दिली आहे. नुसता मोदी वा भाजप विरोध पक्षाला संपवत चालला आहे, असे सांगत त्यांनी पक्षादेश झुगारून विधानसभेच्या कामकाजात भाग घेतला. महात्माजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त उत्तरप्रदेश विधानसभेचे एक खास अधिवेशन बोलावण्यात आलेले होते. त्यात प्रत्येक आमदाराने आपल्या भागात तुंबलेल्या लांबलेल्या योजनांची जंत्री सांगावी, इतकाच कार्यक्रम होता. तर काँग्रेसने त्यावर बहिष्कार घातला. त्यातला विरोधाभास वा मूर्खपणा ओळखून अदिती सिंग उपस्थित राहिल्या. त्यांना सोनियनिष्ठेपेक्षा गांधी विचारांवरील निष्ठा मोठी वाटली. हा फरक आहे. अदिती या तरुणीला काँग्रेस पक्ष कुठे होता व राहावा हे कळते. पण गांधी खानदान वा त्याचे खास भाट-हुजरे यांना त्याचा थांगपत्ता नाही. म्हणून तर पक्षाचे श्रेष्ठी असून पटेल विचारतात, "कहाँ गयी काँग्रेस पार्टी?"

@@AUTHORINFO_V1@@