विहंगवनाचा छायाचित्रकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019   
Total Views |



वनसेवेबरोबरच वन्यजीव छायाचित्रणाच्या कलेची सेवा करुन त्यात पारंगत झालेल्या वनरक्षक युवराज काशिनाथ मराठे यांच्याविषयी...


मुंबई (अक्षय मांडवकर) - कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी पक्ष्यांच्या अद्भुत विश्वाचे दर्शन घडविणारा ‘तो’ वनांचा रक्षक. बाहेरून राकट दिसत असला तरी अंतर्मुख तेवढाच शांत आणि मृदुभाषी. दूरदेशीच्या पक्ष्यांप्रमाणे त्याचे कर्नाळा पक्षीअभयारण्य हे माहेरघर. त्याच्या कॅमेर्‍याला वन्यजीवांचा विशेष लळा. पक्ष्यांच्या बारीक हालचाली कॅमेर्‍याच्या हिरव्या भिंगातून टिपण्यामध्ये त्याचा हातखंडा. अरण्याच्या ओढीने तो वनसेवेत रुजू झाला. वन्यजीवरक्षणाचा वसा उचलला. असा हा कॅमेर्‍याचा सखा म्हणजे वनरक्षक युवराज मराठे.

 


 
 
 
नंदुबारमधील एका छोट्या खेडेगावात दि. २५ मे, १९८८ साली युवराज मराठेचा जन्म झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही तिथेच झाले. गावापासून सातपुड्याची कुवार पर्वतरांग बरीच दूर. त्यामुळे या पठ्ठ्याला जंगलाचा नाद कधी जडलाच नाही. मात्र, महाविद्यालयीन वयात कॅमेरा हाताळण्याचे वेड त्याला लागले. २००९ साली कला शाखेतून पदवीचे शिक्षण त्याने पूर्ण केले. तोपर्यंत युवराजचा कॅमेर्‍यावर हात बराच सरावला होता. छोट्या-मोठ्या समारंभात त्याने छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. २०११ साली स्वत:चा कॅमेरा खरेदी केला आणि व्यावसायिक छायाचित्रणाला सुरुवात केली. हे काम सुरू असतानाच पोलीस आणि वन विभागामधील भरतीची जाहिरात निदर्शनास पडली. दोन्ही भरती प्रक्रियेत त्याने अर्ज दाखल केला. सुदैवाने दोन्ही भरती प्रक्रियेत युवराज निवडला गेेला. पण, आता समोर पेच निर्माण झाला होता की नेमके कोणते क्षेत्र निवडावे? या प्रश्नाने मनात काहूर माजले. मात्र, अखेरीस त्यांनी वन विभागाच्या खाकी वर्दीची निवड केली.

 


 
 
 
गावाकडील शांतमय वातावरणात वाढलेल्या युवराजला पोलीस खात्यातील दगदगीचे आयुष्य मानवले नसते. शिवाय दरम्यानच्या काळात छायाचित्रणामुळे त्याला जंगल खुणावत होते. वन विभागाचे आणि तेथील अधिकार्‍यांचे एक आकर्षण निर्माण झाल्यानेच त्याने वनसेवेत काम करण्याचा निर्णय घेतला. २०१३ साली युवराज ठाणे वनवृत्तांतर्गत तानसा वन्यजीव अभयारण्यात वनरक्षक म्हणून रुजू झाला. वन्यजीवांच्या बचाव कार्याचे काम करण्यास त्याने सुरुवात केली. पण, छायाचित्रणाचे वेड त्याला काही शांत बसू देत नव्हते. निसर्गाच्या सान्निध्यातच दैनंदिन काम होते. त्यामुळे निसर्ग त्याच्या कॅमेर्‍याच्या डोळ्यांना खुणवायचा. तानसा अभयारण्यात काम करताना युवराजचा अपघात झाला. शरीरांतर्गत लागलेला मार गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला वर्षभर आराम करावा लागला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर २०१७ साली त्याची बदली पक्ष्यांचे माहेरघर असणार्‍या कर्नाळा पक्षीअभयारण्यात झाली आणि खर्‍या अर्थाने त्याच्या छायाचित्रणाच्या कलेला नवा आयाम प्राप्त झाला.

 

 
 

भारताचे बर्डमॅन डॉ. सलीम अली यांचे पदस्पर्श झालेले कर्नाळा पक्षीअभयारण्य हे खर्‍या अर्थाने पक्ष्यांचे नंदनवन. वर्षातील प्रत्येक ऋतूमध्ये नानाविध प्रजातींचे आणि विविध रंगी पक्ष्यांचे स्थलांतर या प्रदेशात होते. त्यामुळे या विहंगवनात छायाचित्रकारांचा सतत राबता असतो. युवराजला आपली छायाचित्रणाची कला अधिक फुलविण्यात या छायाचित्रकारांची मोठी मदत झाली. तो त्यांच्यासोबत जंगलात हिंडू लागला. त्यातील बारकावे समजून घेण्यास सुरुवात केली. कारण, वन्यजीव छायाचित्रण म्हणजे संयमाची परीक्षा. त्यातही पक्ष्यांच्या बारीक हालचालींचा वेध घेण्याची कला सरावानेच अंगभूत होते. मात्र, ही कला कॅमेर्‍याच्या विशिष्ट्य भिंगानेच टिपणे शक्य असते. त्यामुळे युवराजने ते भिंग खरेदी केले. अभयारण्य पिंजून काढून त्याने पक्ष्यांच्या नियमित वावराच्या जागांचा शोध घेतला. छायाचित्रापुरतीच मर्यादित न राहता त्यांने आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांचा निवारा सुरक्षित करण्याच्या कामाला सुरुवात केली. कर्नाळा पक्षीअभयारण्यात दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला ‘तिबोटी खंड्या’ या पक्ष्याचे आगमन होते. हा पक्षी याच ठिकाणी मिलन करून आपले घरटे बांधतो. त्यानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना घेऊन हा पक्षी परतीच्या प्रवासाला निघतो. हा पक्षी बहुरंगी असल्यामुळे छायाचित्रकारांना त्याला कॅमेर्‍यात टिपण्याचे आकर्षण असते. मात्र, बर्‍याच वेळा छायाचित्राच्या हव्यासापोटी छायाचित्रकार या पक्ष्याच्या घरट्यापाशी ठाण मांडून बसतात. अशा पद्धतीच्या घटना कर्नाळा पक्षीअभयारण्यात घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर मराठे यांनी आपल्या सहकर्मचार्‍यांसोबत या गोष्टीवर रोख लावण्याचे ठरविले.

 


 


वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या पक्ष्यांची घरटी असलेला परिसर अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यापर्यंत बंद ठेवला. यामुळे ‘तिबोटी खंड्या’ची प्रजनन प्रक्रिया सुरक्षितरित्या पार पडली आणि त्याच्या संवर्धनाला एका प्रकारे हातभार लागला. आज युवराजने टिपलेली पक्ष्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर बरीच प्रसिद्ध आहेत. ‘तिबोटी खंड्या’चे संपूर्ण जीवनचक्र त्याने कॅमेर्‍यात कैद केले आहे. त्याच्या छायाचित्रांना विविध स्पर्धांमध्ये नामाकंन मिळाले आहे. वन्यजीवांना टिपण्याबरोबरच त्यांना समजून घेण्यासाठी तो प्रयत्नशील आहेत. महत्वाचे म्हणजे याबरोबरच कर्नाळ्यात भटकंतीत वाट विसरलेले, मधमाश्यांच्या डंखाने जखमी झालेले आणि किल्ला चढताना दुखापत झालेल्या ३० ते ४० पर्यटकांना बचावण्याचे कामही त्यांनी पार पाडले आहे.अशा या विहंगवेड्याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा !
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@