माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविशी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



‘अ‍ॅकॉस्टिक’ म्हणजे ‘ध्वनिशास्त्र’ या विषयात संशोधन करणारी एक डच विदुषी डॉ. सास्किया व्हॅन रुथ हिचं असं म्हणणं आहे की, माती किंवा तिच्या प्रयोगातील समुद्रातली वाळू बोलते, म्हणजे नेमकं काय?


‘माटी कहे कुम्हारसे, तू क्या रौंदे मोहे’ हे संत कबीरांचं भजन फारच प्रसिद्ध आहे. पूर्वी आकाशवाणी मुंबई ‘ब’ केंद्रावरून सकाळी ६ ते ६.३० पर्यंत ‘मंगल प्रभात’ नावाचा मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम असायचा. मात्र, त्यात शेवटचं गीत हिंदी असायचं. त्यात हे भजन, ज्युनिक राय नावाच्या बंगाली गायिकेने गायलेलं नेहमी लागायचं. आपले मराठी कवी मधुकर जोशी यांनी त्याचं मराठी रुपांतर ‘माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविशी, तुझाच शेवट आहे वेड्या, माझ्या पायाशी’ असं केलं होतं. गोविंद पोवळे यांनी स्वत: संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं हे गाणंही वरचेवर लागत असे.



त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
, माती बोलते का? माती जीवंत असते का? मातीला जाणीव असते का?संत जनाबाईंची एक कथा आहे. जनी ही संत नामदेवांच्या घरची दासी होती. ही दासी सारखी(सतत)देव-देव करते आणि घरातला कर्ता पुरुष म्हणजे स्वत: नामदेव तिला उत्तेजन देतात, म्हणून नामदेवांची पत्नी राजाई आणि आई गोणाई या जनीचा फार राग-राग करीत. स्वयंपाकात जळण म्हणून गायी-म्हशींच्या शेणाच्या गोवर्‍या थापणे, हे काम सगळ्याच घरांमधून मुख्यत: स्त्रिया करायच्या. राजाई आणि गोणाईने संगनमताने जनीने थापलेल्या गोवर्‍या आपण थापलेल्या गोवर्‍यांमध्ये टाकल्या आणि ही दासी आम्हा घरच्या बायकांपेक्षा कमी काम करते, अशी नामदेवांकडे तक्रार केली. नामदेव गोवर्‍यांच्या राशीजवळ गेले आणि त्यांनी भराभर जनीने थापलेल्या गोवर्‍या ओळखून बाजूला काढल्या. कशा ओळखल्या म्हणून विचारलं, तर त्यांनी गोवरी कानाशी नेऊन दाखवली. राजाई नि गोणाईने थापलेल्या गोवर्‍यांमधून कुणाच्या तरी नावाचे घातलेल्या शिव्या ऐकू येत होत्या. जनीने थापलेल्या गोवर्‍यांमधून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा ध्वनी येत होता.



पंडित सेतुमाधवराव पगडी हे १९९४ साली कालवश झाले
. म्हणजे आता त्यांना जाऊनही २५ वर्ष झाली. अतिरिक्त मधुमेहामुळे शेवटची काही वर्षं त्यांची नजर गेली होती, पण स्मरणशक्ती आणि वाणी मात्र अगदी लख्ख होती. अगदी शेवटच्या काळातलं त्यांचं एक भाषण होतं. विषय होता ‘कौटिल्याचं अर्थशास्त्र.’ कौटिल्याच्या काळात जमाबंदी म्हणजे जमिनीची प्रतवारी ठरवून त्यानुसार शेतसारा ठरवण्याचे काम कसे केले जात असे, हे सांगता-सांगता सेतुमाधवराव एकदम स्वत:च्या अनुभवांमध्ये शिरले. कारण, ते स्वत: निजाम राज्यात जमाबंदी अधिकारी म्हणूनच काम करीत होते. निजाम राज्य खालसा झाल्यावर ते प्रथम मुंबई राज्यात आणि मग महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी झाले. त्याच काळात ते एकदा पानिपतला गेले. पानिपत हे गाव आता हरियाणा राज्यात येते. महाराष्ट्र राज्य सरकारचा एक जिल्हा कलेक्टर पानिपत गावाला भेट देतोय म्हटल्यावर हरियाणा राज्याचा त्यांच्या समकक्ष अधिकारी, तलाठी, पानिपत गावचा सरपंच असा सगळा सरकारी फौजफाटा त्यांच्याबरोबर होता. पानिपतचं रणमैदान हा एक खूप विस्तीर्ण असा भाग आहे. आज तिथे अनेक शेतं आहेत. ‘काला आम’ या नावाने ओळखली जाणारी एक जागा आहे. विश्वासराव आणि भाऊसाहेब पेशव्यांचे मृतदेह आणून तिथे ठेवण्यात आले होते. अशी परंपरागत समजूत आहे. सेतुमाधवराव सांगत होते, “त्या जागी पोहोचल्यावर माझ्या सगळ्या भावना उचंबळून आल्या. मी तिथली माती कपाळाला लावली आणि अस्खलित हिंदीत पानिपतच्या संग्रामाचं वर्णन करण्यास सुरुवात केली. सगळे जण स्थानिकच असल्यामुळे त्यांना तो प्रसंग माहीतच होता. पण, इतके तपशील माहीत नव्हते. ते कळल्यामुळे सगळे जण भारावून गेले. तेवढ्यात तिथल्या एका शेताचा मालक म्हणाला, “साहब, यह जमीन बहोतही उपजाऊ (सुपीक) हैं।” त्यावर मी पटकन म्हणालो, “होनी ही चाहिये. पौना लाख मराठोंने अपना खून बहाया है यहाँ!” व्याख्यानात हा प्रसंग सांगताना वयोवृद्ध सेतुमाधवरावांचा चेहरा फुलून आला होता आणि गेलेले डोळे तरारून आले होते. सभागृहात विलक्षण सन्नाटा पसरला होता. श्रोते जणू मंत्राने भारल्यासारखे शांत झाले होते.



पावनखिंडीच्या अत्यंत रोमहर्षक लढाईच्या कथाकथनात शेवटी बाबासाहेब पुरंदरे सांगत असतात
, “आजही त्या गजापूरच्या घोडखिंडीतील मूठभर माती उचला आणि पाण्यात टाका. तिला येणारा रंग बाजींच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजही तिथल्या जमिनीला कान लावा. तुम्हाला ऐकू येतील त्यांच्या गर्जना ‘हर हर महादेव, हर हर महादेव.” तर मुद्दा काय की, मातीला जाणीव असते का? आधुनिक भौतिक विज्ञानाच्या मते माती, दगडधोंडे, जमीन यांना कुठलीही संवेदना नसते. म्हणून तर त्यांना ‘मॅटर’ असा शब्द आहे.पण, आता आधुनिक विज्ञान आपली मतं बदलू लागलं आहे. ‘अ‍ॅकॉस्टिक’ म्हणजे ‘ध्वनिशास्त्र’ या विषयात संशोधन करणारी एक डच विदुषी डॉ. सास्किया व्हॅन रुथ हिचं असं म्हणणं आहे की, माती किंवा तिच्या प्रयोगातील समुद्रातली वाळू बोलते, म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं पाहा की, सिमेंट, काँक्रिट या वस्तूचा शोध लागल्यापासून जगभर सिमेंट आणि वाळू यांची घरं बांधण्याची पद्धत प्रचलित झाली. सिमेंट कारखान्यात बनतं, पण वाळू ही नद्यांमध्ये किंवा समुद्रातच मिळते. त्यामुळे जगभर सर्वत्र वाळूचा प्रचंड उपसा चालू आहे. आधुनिक यंत्रसामुग्रीद्वारे नद्या, खाड्या यांचे तळ नि काठ अक्षरशः खरवडून काढले जात आहेत. यातून तेलमाफिया, पाणीमाफिया यांच्याप्रमाणेच वाळूमाफिया निर्माण झाले आहेत. गरीब देशांमधून वाळू चोरणे आणि ती श्रीमंत देशांमध्ये विकणे हा भलताच किफायतशीर धंदा झालेला आहे. वेस्ट इंडिजमधल्या जमैका बेटातली एक अख्खी पुळण या वाळू माफियांनी उपसून-उपसून संपवूनच टाकली. म्हणजे आता त्या समुद्रकिनार्‍यावर वाळू नाहीच. समुद्राचं पाणी आणि साधी माती. समुद्रातल्या शंख-शिंपल्यांचा चुरा किनार्‍यावरच्या मातीत जमा होत जाऊन त्याची वाळू बनणं ही प्रक्रिया शेकडो वर्षांची आहे. वाळूमाफियांना त्याची कशाला पर्वा असेल? आपल्याकडे तर तामिळनाडू राज्य सरकार आणि तत्कालीन केंद्र सरकारातच वाळू तस्कर होते. रामसेतू तोडायचा आणि मोठेमोठे कंटेनर्स तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर आणून तिथली वाळू चोरायची, असा त्यांचा ‘ग्रँड प्लॅन’ होता. कारण, या वाळूत ‘थोरियम’ हे अत्यंत मौल्यवान द्रव्य आहे.



डॉ
. सास्किया व्हॅन रुथ हिचा प्रयोग खरं म्हणजे अगदी वेगळ्याच दिशेने चाललेला होता. आपल्याला माहितीच असेल की, हॉलंड हा देश समुद्रसपाटीच्या खाली आहे. समुद्राला मोठेमोठे बांध घालून हॉलंडच्या रहिवाशांनी त्यांना ‘डच’ असं म्हणतात- समुद्राकडून भूमी मिळवली. आज आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर हॉलंड सरकारने हे बांध पक्के बळकट केलेले आहेत. पण, ते तसे राहावेत आणि त्यांची दुरुस्ती, देखभाल इत्यादींवरचा खर्च कमी यावा, यासाठी वैज्ञानिकांचे नवे-नवे प्रयत्न चालूच आहेत. समुद्राला प्रतिबंध करणारा सर्वात प्रभावी घटक कोणता? तर अर्थातच वाळू. मग ही वाळू कुठे? कशी? किती? कोणती? टाकावी असे प्रयोग करत असताना डॉ. रुथला आढळलं की, वाळू बोलते आणि आपला ठावठिकाणा सांगते. म्हणजे काय?



वाळू म्हणजे काय
? तर मुख्यत: कार्बोनेट हा पदार्थ. पण, त्यात इतर हजारो पदार्थ मिसळलेले असतात. सल्फ्युरिक अ‍ॅसिड असलेल्या परीक्षानळीत वाळूची एक चिमूट टाकली की वाळूतल्या कार्बोनेटवरआम्लाची प्रक्रिया सुरू होते आणि त्याचा ‘फस फस’ आवाज येऊ लागतो. काही वेळाने तो थांबतो, हेच वाळूचं बोलणं आहे. डॉ. रूथला असं आढळलं की, वेगवेगळ्या किनार्‍यावरच्या वाळूतील कार्बोनेटव अन्य पदार्थांची मिश्रणे वेगवेगळी असतात. त्यामुळे त्यांच्या फसफसण्याचा विशिष्ट असा आवाज येतो. ध्वनिशास्त्र हे वेगळेपण पकडू शकतं. म्हणजे समजा, गिरगाव चौपाटीवरची वाळू, दादर चौपाटीवरील वाळू, जुहू चौपाटीवरील वाळू आणि मुंब्रा खाडीतील वाळू या अ‍ॅसिडमध्ये टाकल्या तर त्यांचा फसफसण्याचा आवाज वेगळा येईल. कारण, त्यांच्यातली कार्बोनेट मिश्रणे वेगळी असतील, हीच त्यांची वेगळी ओळख. वेगळा नाव-पत्ता आणि फसफसण्याच्या वेगवेगळ्या ध्वनीद्वारे ती वाळू कुठची आहे, गिरगावची, दादरची, जुहूची कीमुंब्य्राची हे ती स्वतःच सांगेल. हीच तिची भाषा. मानवी कानांना कदाचित ती भाषा, फस्फस् आवाजातलं वेगळेपण जाणवणार नाही. पण, ध्वनिशास्त्र ते वेगळेपणं ओळखू शकेल, पकडू शकेल. म्हणजे समजा, उद्या तटरक्षक दलाने किंवा कस्टम्सने वाळूने भरलेला चोरटा कंटेनर पकडला तर तस्करांनी ही वाळू कुठून चोरली आहे, हे ती वाळू स्वतःच वरील प्रयोगाद्वारे अधिकार्‍यांना सांगू शकेल.



आयर्लंडच्या कॉर्क विद्यापीठातला एक रसायनतज्ज्ञ दारा फित्झपॅट्रिक याने तर हा प्रयोग आणखी पुढे नेला आहे
. विविध रासायनिक पावडरींची गुणवत्ता मोजण्यासाठी तो ही परीक्षा वापरतो. हलक्या दर्जाची पावडर आणि उत्तम दर्जाची पावडर यांचा अॅसिडमध्ये फसफसण्याचा आवाज वेगवेगळा येतो. पाश्चात्त्य देशांमध्ये हल्ली अन्नात समुद्री मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करण्याची ‘फॅशन’ आली आहे. अर्थातच, भेसळयुक्त सैंधव मिठाचा पुरवठाही वाढलाय. अस्सल सैंधव आणि बनावट सैंधव यांचा अ‍ॅसिडमध्ये फसफसण्याचा आवाज वेगवेगळा येतो. जगातल्या प्रत्येक सजीव-निर्जीव पदार्थात जाणीव आहे. संवेदना आहे. कुणात जास्त, तर कुणात कमी, पण संवेदना आहेच, हे भारतीय अध्यात्मशास्त्राचं म्हणणं हळूहळू आधुनिक विज्ञान मांडू लागलंय.

@@AUTHORINFO_V1@@