नामदार गोपाळराव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



महात्मा गांधीजी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरू मानत असत, तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरू होते. सदरच्या लेखातून रानडे आणि गोखले या गुरुशिष्यांबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली असून महात्मा गांधी व गोपाळकृष्ण गोखले या गुरुशिष्यांमधले वैचारिक साम्य, मतभेदही सांगितले आहेत.


पहिली सलामी

 

. स. १८८७ सालची गोष्ट. पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल या नव्यानेच निघालेल्या आणि नामवंत झालेल्या शाळेत कसलासा समारंभ होता. शाळेच्या प्रवेशद्वाराशी वीस-एकवीस वर्षांचा एक तरतरीत तरुण उभा होता. समारंभासाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाजवळ आवश्यक ते निमंत्रण आहे ना, हे तो तपासून पाहात होता. तो शाळेतला नवा शिक्षक होता, हे उघडच होते. तेवढ्यात एक भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे गृहस्थ दरवाजातून आत शिरले. आपल्याला कोणी प्रवेशपत्र विचारेल, हे त्यांच्या गावीही नसावे. पण या तरुणाने त्यांना अडवून विचारले, "निमंत्रण पत्रिका आहे का?" गृहस्थ किंचित खजील होत पुटपुटले, "नाही, गडबडीत घरीच राहिली." "मग तुम्हाला आत जाता येणार नाही," तरतरीत तरुण निर्णायक आवाजात म्हणाला. भारदस्त गृहस्थ थोडे गोंधळले. आता काय करावे, कुणी ओळखीचे दिसते का? म्हणून ते इकडे-तिकडे पाहू लागले. तेवढ्यात शिवराम हरी उर्फ आबासाहेब साठे नावाचे गृहस्थ एकदम तिथे उगवले आणि त्या भारदस्त गृहस्थांकडे निर्देश करीत त्या तरुणाला म्हणाले, "हे रावसाहेब रानडे म्हणजे महादेवराव रानडे. यांना आत सोडायला हरकत नाही." आता तो तरुण खजील झाला. किंचित स्मित करीत रावसाहेब म्हणजेच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आबासाहेब साठ्यांबरोबर आत शिरले. मग मागे वळून त्या तरुणाकडे निर्देश करीत त्यांनी साठ्यांना विचारले, "हे तरुण गृहस्थ कोण हो?" "त्यांचे नाव गोपाळराव गोखले. फार हुशार आहेत. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि फर्ग्युसन कॉलेजातही शिकवतात. एवढ्या लहान वयात अंकगणिताचे पुस्तक लिहिलेय त्यांनी," साठे उत्तरले. भारतीय राजकारणातले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे न्यायमूर्ती रानडे आणि पुढे त्यांचे त्याच तोलाचे शिष्य म्हणून गाजलेले नेक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची पहिली भेट अशी झाली.

 

पूर्ववृत्त

 

गोपाळराव गोखल्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातले ताम्हनमळा. वडिलांचे नाव कृष्णराव आणि आईचे नाव सत्यभामाबाई. तत्कालीन कोकणी तरुण शिक्षण आणि नोकरी यासाठी कोल्हापूर किंवा मुंबईची वाट धरीत असत. कृष्णराव कोल्हापूरला येऊन शिक्षण घेत असताना महादेव गोविंद रानडे त्यांचे वर्गबंधू होते. महादेवराव पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. कृष्णरावांना घरच्या गरिबीमुळे शिक्षण सोडून नोकरी धरावी लागली. कोल्हापूर हे शिवछत्रपतींच्या धाकट्या पातीचे संस्थान. तिथले छत्रपती भोसले. त्यांच्या संस्थानात कागल ही एक जहागिरी होती. घाटगे हे तिथले जहागीरदार. कृष्णराव हे कागल संस्थानात कारकून म्हणून नोकरीला लागले. कर्तबगारीच्या जोरावर ते फौजदार झाले. त्यांना दोन मुलगे. मोठा गोविंद आणि धाकटा गोपाळ. चिपळूणजवळच कोतळूक या आपल्या आजोळी गोपाळचा जन्म ९ मे, १८६६ रोजी झाला. गोविंद आणि गोपाळ दोघांचेही प्राथमिक शिक्षण कागलला झाल्यावर पुढील शिक्षणासाठी दोघेही कोल्हापूरला आले. सर्व मोठ्या माणसांच्या आयुष्यात बरेचदा जे घडते, तेच घडले. १८७९ साली कृष्णराव एकाएकी मरण पावले. गोविंद १८ वर्षांचा आणि गोपाळ १३ वर्षांचा. गोविंदाने स्वत: शिक्षण सोडून कागल जहागिरीतच नोकरी पत्करली. गोपाळला मात्र त्याने शिक्षण सोडू दिले नाही. १८८१ साली गोपाळ मॅट्रिक परीक्षा पास झाला. मग कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात दोन वर्ष आणि मग मुंबईत एलफिन्स्टन कॉलेजमधून गणित हा विषय घेऊन १८८४ साली गोपाळराव बी. ए. झाले. हा तो काळ होता, जेव्हा कोणतीही परीक्षा पास होणे, ही अत्यंत कठीण गोष्ट होती. शिक्षण सवंग झालेले नव्हते. मॅट्रिकच्या परीक्षेपूर्वीची 'प्रिलिमिनरी' पास करून मॅट्रिकच्या परीक्षेचा फॉर्म मिळवणे, हेच अतिशय दुरापास्त होते. त्यामुळे मॅट्रिकला नुसते बसून आलेले, पण पास न झालेले विद्यार्थी 'मॅट्रिक नापास' असे उपपद आपल्या नावापुढे लिहित आणि तोसुद्धा गौरव समजला जात असे.

 

पुण्यात

 

गोपाळराव कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात शिकत असतानाच टिळक-आगरकर या संपादक मित्रांनी आपल्या 'केसरी' (मराठी) आणि 'मराठा' (इंग्रजी) या वृत्तपत्रांतून 'कोल्हापूर प्रकरण' गाजवले. हे प्रकरण नुसत्या पुण्या-कोल्हापुरातच नव्हे, तर एकंदर महाराष्ट्रातच प्रचंड गाजले. महादेव वासुदेव बर्वे हे कोल्हापूर संस्थानचे दिवाण होते. टिळक-आगरकरांनी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. बर्व्यांनी त्या दोघांवर अब्रूनुकसानीची फिर्याद केली. न्यायालयात टिळक-आगरकर आरोप सिद्ध करू न शकल्याने त्यांना चार महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. न्यायालयाचे म्हणणे काहीही असो; कोल्हापूरच्या जनतेचे मत मात्र टिळक-आगरकरांच्या बाजूने होते. खटल्यातील टिळक-आगरकरांच्या बाणेदार वागण्याने इतर असंख्य तरुणांप्रमाणेच गोपाळरावही भारावून गेले होते. अशा स्थितीत १८८४ साली वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी गोपाळराव बी. ए. झाले. आता पुढे काय? एम. ए. करण्यात त्यांना स्वारस्य नव्हते. मग एल. एल. बी. किंवा इंजिनिअरिंग. त्यानुसार त्यांनी एल. एल. बी.चे एक वर्ष पूर्ण केलेही आणि मग त्यांच्या आयुष्याने वळण घेतले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी टिळक-आगरकरांना सोबत घेऊन सन १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. १८८२ साली शास्त्रीबुवा वारले. शाळेची धुरा टिळक-आगरकरांच्या खांद्यावर आली. शाळेत शिक्षक म्हणून नव्या पदवीधर तरुणांनी यावे, असा त्यांचा कटाक्ष होता, त्यांनी गोपाळराव गोखल्यांना न्यू इंग्लिश स्कूलमध्ये येता का, अशी गळ घातली. गोखल्यांनी ती मान्य केली. ते शिक्षक बनले. १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूल निघाले. १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही त्या शाळेची मातृसंस्था (पॅरेंट बॉडी) बनली आणि १८८५ साली त्या संस्थेचे 'फर्ग्युसन' किंवा 'फर्गसन' हे कॉलेज निघाले. गोपाळराव गोखले आता शाळा आणि कॉलेज दोन्ही ठिकाणी शिकवू लागले. बी. ए.ला त्यांचा विषय होता गणित, पण शाळेत आणि कॉलेजातही ते मुख्यत: शिकवायचे इंग्रजी. गोपाळराव गोखल्यांचे इंग्रजी भाषेवर असामान्य प्रभुत्व होते. ते त्यांनी शालेय विद्यार्थी असल्यापासून प्रचंड मेहनतीने मिळवले होते. मिल्टन, बर्क, मेकॉले, ग्लॅडस्टन, ब्राईट अशा मोठ्या इंग्रजी साहित्यिकांच्या लेखनाचे, भाषणांचे उतारेच्या उतारे त्यांना तोंडपाठ होते. त्यांचे शाळेतले मित्र त्यांची 'पाठ्या गोपाळा' म्हणून टिंगल करीत. पण या पाठ्या गोप्याने १८८५ साली कोल्हापुरात 'ब्रिटिश अंमलाखालील हिंदुस्थान' या विषयावर अस्खलित इंग्रजीत जाहीर भाषण केले. त्यावेळी त्याचे वय फक्त १९ वर्षांचे होते. संस्थानचा इंग्रज रेसिडेंट विल्यम ली वॉर्नर हा मुद्दाम भाषणाला हजर राहिला होता. अवघ्या १९ वर्षांच्या तरुणाची ती खणखणीत वाणी ऐकून वॉर्नरसाहेब गारच झाला. १८८४ ते १८८७ अशा वर्षांत शाळेत आणि कॉलेजात उत्तम शिक्षक म्हणून गोपाळराव गोखल्यांनी लौकिक मिळवला. टिळकांपेक्षा आगरकरांशी त्यांचे जास्त जमले. टिळक मराठी 'केसरी'चे काम पाहत, तर आगरकर इंग्रजी 'मराठा'चे. त्यामुळे गोखले अधूनमधून 'मराठा'मध्ये लेखसुद्धा लिहीत. 'जनरल वॉर इन युरोप' ही त्यांची लेखमाला तेव्हा चांगली लोकप्रिय झाली होती. १८८७ साली त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अंकगणितावर पुस्तक लिहिले. ते मात्र त्यांनी टिळकांना दाखवले. टिळकांना ते पसंत पडले, मग शिराळकर आणि कंपनीने ते प्रसिद्ध केले. हेच ते सुप्रसिद्ध 'गोखल्यांचे अंकगणित.' पुढच्या काळात महाराष्ट्रातल्या कित्येक पिढ्या हे पाठ्यपुस्तक अभ्यासत मोठ्या झाल्या आणि याचवर्षी त्यांची महाराष्ट्राचे विराट ज्ञानी महापुरुष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी ओळख झाली. गोखल्यांच्या आयुष्याने पुन्हा एक मोठे वळण घेतले. त्यावेळी ते अवघे २१ वर्षांचे होते.

 

रानडे आणि आधुनिकता

 

सन १८१८ साली इंग्रजांनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव करून मराठेशाही संपवली. आता जवळपास संपूर्ण भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा एकछत्री अंमल सुरू झाला. सन १८४८ मध्ये कंपनी सरकारने उर्वरित पंजाब प्रांतही जिंकला. ब्रिटनमध्ये सांसदीय लोकशाही राज्यपद्धतीने चालणारे सरकार होते. या सरकारने 'ईस्ट इंडिया कंपनी' या एका खाजगी कंपनीला भारतासह पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा मक्ता दिला होता. कंपनीचे एक डायरेक्टर बोर्ड होते. हे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवित असे. कंपनीच्या सैन्याने जसजसे भारतातले वेगवेगळे प्रदेश जिंकले, तसतसे त्या त्या प्रांतावर एकेक गव्हर्नर नेमले गेले. प्रत्येक गव्हर्नरचे एक सल्लागार मंडळ असे. प्रांतांचे गव्हर्नर हे गव्हर्नर जनरलला, गव्हर्नर जनरल डायरेक्टर बोर्डाला आणि डायरेक्टर बोर्ड सरकारला जबाबदार असे. पण कंपनीने भारतात भरपूर अन्याय, अत्याचार, लूट आणि भ्रष्टाचार केला. त्यामुळे १८५७ साली कंपनी सरकारविरुद्ध क्रांतीचा प्रचंड वणवा पेटला. प्रगत विज्ञान-तंत्रज्ञान, प्रगत शस्त्रास्त्रे, कुशल सेनापती आणि नशिबाची साथ यांच्या बळावर इंग्रजांनी क्रांती चिरडून टाकली. पण, आता ब्रिटिश सरकार जागे झाले. त्याने ईस्ट इंडिया कंपनीचा बुरखा फेकून देऊन भारताचा राज्यकारभार कायदेशीरपणे आपल्या हाती घेतला. १८५८ साली भारतात रितसर व्हिक्टोरिया राणीचे म्हणजेच ब्रिटिश मंत्रिमंडळात 'सेक्रेटरी ऑफ स्टेट टू इंडिया' म्हणजे 'भारतमंत्री' असे नवे कॅबिनेट मंत्रिपद निर्माण करण्यात आले. त्याच्या कार्यालयाला नाव मिळाले 'इंडिया ऑफीस'. पहिला भारतमंत्री बनला लॉर्ड स्टेन्ले. तो ब्रिटनमधून भारताचा कारभार पाहणारा होता. प्रत्यक्ष भारतात सगळा कारभार पूर्वीप्रमाणेच गव्हर्नर जनरल करणार होता, पण तो आता कंपनी सरकारचा नोकर नसून, राणी व्हिक्टोरियाचा प्रतिनिधी होता. म्हणून त्याच्या पदाला नाव मिळालं 'व्हॉईसरॉय' लॉर्ड कॅनिंग गव्हर्नर होताच; आता तो व्हॉईसरॉय बनला. पण ब्रिटिश संसदीय लोकशाही यंत्रणा एवढ्यावर थांबली नाही. व्हॉईसरॉय म्हणजे अनियंत्रित सत्ताधीश नव्हे. त्याने स्थानिक प्रतिष्ठित लोकांमधून काही प्रतिनिधी निवडावेत, त्यांचे एक मंडळ बनवावे, हे मंडळ स्थानिक जनतेच्या आशा-आकांक्षा, अडी-अडचणी व्हॉईसरॉयच्या कानावर घालेल. व्हॉईसरॉय सर्वांचा नीट विचार करून आवश्यक तो निर्णय घेईल. याला म्हणायचे व्हॉईसरॉय कौन्सिल किंवा वरिष्ठ कायदेमंडळ. अगदी अशाच प्रकारे प्रांतांचे गव्हर्नर प्रांतिक कायदेमंडळ बनवून कारभार करतील. ही लोकशाही कारभाराची अगदी प्राथमिक अवस्था इंग्रज सरकारने फक्त चार वर्षांत म्हणजे १८६२ पासून देशभर लागू केली. याचा अर्थ इंग्रज मोठे न्यायी वगैरे होते, असा नव्हे. कायदेमंडळातील स्थानिक सदस्य काही म्हणाले तरी निर्णयाचा अंतिम सर्वाधिकार गव्हर्नर आणि व्हॉईसरॉय यांचाच असे पण, इंग्रज सरकारच्या हितसंबंधांना बाधा न आणणाऱ्या सूचना असतील, तर थोड्या उशिराने का होईना, सरकार त्या स्वीकारत असे. इंग्रजी राज्यकारभाराच्या या पद्धतीचे मर्म महाराष्ट्रात सर्वप्रथम ओळखले ते न्यायमूर्ती रानड्यांनी.

 

सनदशीर राजकारण

 

सन १८७० साली पुण्यात 'सार्वजनिक सभा' ही संस्था स्थापन झाली. गणेश वासुदेव जोशी ऊर्फ 'सार्वजनिक काका' हे तिचे चिटणीस होते. सन १८७१ साली न्यायमूर्ती रानडे मुंबईहून पुण्यात बदली होऊन आले. त्यांनी सार्वजनिक सभेची सूत्रे हाती घेतली. इंग्रजी राज्ययंत्रणेला उघड विरोध न करता, त्यांच्याच तंत्राचा उपयोग करून सनदशीर राजकारण कसे करावे, हे न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक काकांनी जनतेला शिकवले. न्यायमूर्ती रानड्यांशी परिचय झाल्यावर गोपाळराव साहजिकच सार्वजनिक सभेच्या कार्यात ओढले गेले. १८८८ साली गोपाळराव सभेचे चिटणीस आणि सभेच्या त्रैमासिकाचे संपादक बनले. इंग्रज सरकारविरुद्ध प्रचंड आंदोलन करून त्यांना या देशातून घालवून दिले म्हणजे झाले, असे रानडे मानत नसत. लोकशिक्षण, लोकजागृती आणि समाजाच्या विविध क्षेत्रांत त्या-त्या क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र संस्था निर्माण करणे, यावर त्यांचा कटाक्ष होता. त्याला ते समाजाचे 'मंडळीकरण' असे म्हणत असत. गोपाळराव गोखल्यांना रानड्यांचा हा सगळाच विचार एवढा पसंत पडला की, त्यांनी स्वतःला रानड्यांच्या जणू सेवेलाच वाहून घेतले. रानड्यांच्या आदेशानुसार त्यांनी स्वतः इंग्रजांच्या कारभाराचा विशेषतः आर्थिक धोरणाचा कसून अभ्यास केला. १८८९ साली मुंबई येथे काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहून त्यांनी रितसर राजकारणात प्रवेश केला.

 

वेल्बी कमिशन

 

भारतातील आपल्या सरकारचा एकंदर कारभार नीट चालू आहे ना, हे पाहण्यासाठी ब्रिटिश मंत्रिमंडळ मधून-मधून चौकशी कमिशन नेेमत असे. १८९७ साली लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली असेच एक कमिशन नेमण्यात आले. कमिशनसमोर भारतीय जनतेची गार्‍हाणी मांडण्यासाठी बंगाल प्रांतातून सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मद्रास प्रांतातून जी. सुब्रह्मण्यम अय्यर आणि मुंबई प्रांतातून सर दिनशा वाच्छा आणि गोपाळराव गोखले यांची निवड झाली. पहिले तिघेेही आपल्या प्रांतातले ख्यातनाम वकील व मुरब्बी राजकारणी होते, तर गोखले हे साधे शिक्षक-प्राध्यापक होते. तरीही त्यांची इंग्लंडला जाण्यासाठी निवड झाली. यावरून त्या वेळेपर्यंत गोपाळरावांनी अर्थशास्त्राचा किती जबर व्यासंग केला असेल, याची कल्पना यावी. प्रत्यक्ष साक्षीतही गोपाळरावांनी हिंदुस्थानची आर्थिक स्थिती कशी चिंताजनक आहे, हे लॉर्ड वेल्बींसमोर एवढ्या प्रभावीपणे मांडले की, सरकारी पक्षासह सर्वच लोक भारावून गेले. ब्रिटिश वृत्तपत्रांनी तर भारतीय राजकारणातला 'उगवता तारा' म्हणून त्यांची भरभरून स्तुती केली. गोपाळरावांच्या या यशाचा खरा आनंद दोन व्यक्तींना झाला. एक म्हणजे त्यांचे गुरू न्यायमूर्ती रानडे आणि दुसरे म्हणजे त्यांचे गुरुतुल्य मित्र सोलापूरचे रावबहादुर गणेश व्यंकटेश जोशी. एखाद्या प्रस्तावाच्या संदर्भात गोखल्यांना जी आकडेवारी हवी असे, ती अचूकपणे पुरवण्याचे काम ग. व्यं. जोशी करीत असत. अशाप्रकारे १८९७ साली इंग्लंड गाजवून आल्यावर १८९८ साली त्यांची पुणे नगरपालिकेवर निवड होणे ओघानेच आले. पुढच्याच वर्षी म्हणजे १८९९ साली ते प्रांतिक विधिमंडळात निवडून आले. खरे म्हणजे त्यांना इंग्लंडमध्येच राहून दादाभाई नौरोजींप्रमाणे ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून जावे, असे वाटत होते. वेल्बी कमिशनच्या निमित्ताने त्यांनी जो लौकिक इंग्लंडमध्ये मिळवला होता, तो पाहता हे अवघडही नव्हते. पण, त्यांच्या या बेताला रानड्यांनी संमती दिली नाही. रानडे म्हणाले, "तुम्ही तिकडे गेलात, तर इकडची कामे कुणी करायची?" गोखल्यांनी आपल्या गुरूंचे हे म्हणणे शिरोधार्य मानले.

 

व्हॉईसरॉय कौन्सिलमध्ये

 

प्रांतिक विधिमंडळाच्या म्हणजे आजच्या भाषेत आमदारपदाच्या आपल्या कार्यकाळात गोखल्यांनी इतके उत्तम काम केले की, १९०२ साली त्यांची व्हॉईसरॉय कौन्सिलमध्ये म्हणजेच केंद्रीय विधिमंडळात निवड होणे अपरिहार्यच ठरले. गोपाळराव गोखले आता खासदार किंवा नामदार झाले. मेंबर ऑफ लेजिस्लेचर कौन्सिल म्हणजेच एम. एल. सी.साठी 'आमदार', मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे एम. पी.साठी 'खासदार' आणि राईट ऑनरेबल किंवा मंत्री या शब्दासाठी 'नेक नामदार' हे मराठी प्रतिशब्द न. चिं. केळकरांनी प्रचलित केले. यावेळी गोखले फक्त ३६ वर्षांचे होते. केंद्रीय विधिमंडळात त्यांचा सामना मुख्यतः दोघांशी रंगला. पहिला म्हणजे व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन. हा कमालीचा उर्मट आणि मिजासखोर होता. दुसरा म्हणजे युद्धमंत्री लॉर्ड किचनेर. भारत सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पावर पहिलेच भाषण करताना गोखल्यांनी या दोघांना अक्षरशः धारेवर धरले. त्या दोघांनाही असे काही ऐकण्याची सवयच नव्हती. पण, गोखल्यांचे भाषण इतके मुद्देसूद, मार्मिक, आवश्यक त्या आकडेवारीने भरलेले असायचे की, हे दोघे हतबुद्ध झाले. गोखल्यांची अशी अकरा भाषणे आज उपलब्ध आहेत. कायद्याची कक्षा कुठेही न ओलांडता, कायद्याने दिलेल्या संसदीय आयुधांचा पुरेपूर वापर करीत, सरकार पक्षाला कसे धारेवर धरता येते, याचा ही भाषणे म्हणजे आदर्श आहेत. केंद्रीय विधिमंडळातील या कामगिरीमुळे १९०५ सालच्या बनारस काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. गोपाळराव गोखल्यांच्या जीवनातला तो सर्वोच्च सन्मान होता. कागलच्या फौजदाराचा 'पाठ्या गोप्या' इंग्रज सरकारच्या केंद्रीय विधिमंडळाचा नेक नामदारही होता आणि देशाच्या राजकीय आकांक्षेचे प्रतीक असलेल्या काँग्रेसचा अध्यक्षही होता. यावेळी ते फक्त ३९ वर्षांचे होते.

 

दक्षिण आफ्रिकेत

 

१८९६ साली, दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांच्या हक्काचा लढा उभारणारे बॅरिस्टर गांधी (त्यावेळी ते महात्मा नव्हते) प्रथम पुण्यास आले. ते न्यायमूर्ती रानडे, टिळक, गोखले, भांडारकर अशा अनेक नेत्यांना भेटले. त्याचवेळी गोखले आणि गांधी यांचे मैत्र जुळले. पुढे गोखले १८९७, १९०५, १९०६, १९०८, १९१२, १९१३, १९१४ असे अनेकदा विविध कामांसाठी इंग्लंडला गेले. त्यापैकी १९१२ च्या दौऱ्यात ते इंग्लंडहून परस्पर दक्षिण आफ्रिकेत गेले. दक्षिण आफ्रिकेत जनरल बोथा आणि जनरल स्मटस् यांच्या वर्णद्वेष्ट्या गोऱ्या राजवटीविरुद्ध बॅरिस्टर गांधींनी आंदोलन चालवले होते. गांधींच्या आमंत्रणावरून गोखले तिथे गेले. पण, खुद्द इंग्लंडमध्ये गोखल्यांचा असा दबदबा निर्माण झाला होता की, भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांच्या इंडिया ऑफिसने दक्षिण आफ्रिकन सरकारला खास पत्र लिहून गोखल्यांचे नीट स्वागत होते आहे ना, हे पाहण्याची तंबी दिली. साहजिकच केपटाऊनमध्ये, दरबानमध्ये, नाताळमध्ये, जोहान्सबर्गमध्ये गोखल्यांचे सरकारी इतमामात स्वागत झाले. जनरल बोथा, जनरल स्मटस् यांनी त्यांच्याशी बोलणी केली. अशी नानाविध कामे अंगावर घेऊन, ती पार पाडताना गोखल्यांना फार श्रम होत. कोणतेही प्रकरण मुळापर्यंत जाऊन तपासायचे, या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते सलग २०-२० तास अभ्यास करीत. याचा प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला. १९०३ साली कलकत्ता काँग्रेसच्या निमित्ताने गोखले आणि गांधी जवळपास महिनाभर कलकत्त्यात एकत्र राहिले. गोखल्यांच्या कामाची ती पद्धत पाहून गांधी त्यांना म्हणाले, "कितीही काम असले तरी स्वतःच्या आरोग्यासाठी रोज किमान १ तास तुम्ही व्यायाम केला पाहिजे. तरच तुमची तब्येत तंदुरुस्त राहिल." गोखल्यांना हे कळत होते, पण वळले कधीच नाही. परिणामी, त्यांची मूळची नाजूक प्रकृती आणखी नाजूक बनत गेली. मधुमेह बळावत गेला आणि अखेर १९ फेब्रुवारी, १९१५ रोजी वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी नेक नामदार गोपाळराव गोखले मरण पावले.

 

असा गुरू, असा शिष्य

 

बॅरिस्टर गांधी किंवा पुढील काळात महात्मा गांधी यांनी जाहीरपणे गोखल्यांना आपले राजकीय गुरू मानले होते. त्या दोघांमध्ये पहिल्या भेटीतच जे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले, ते गुरू-शिष्यांपेक्षाही भावाभावांसारखे होते. महात्माजी गोखल्यांपेक्षा तीन वर्षांनी लहान होते. गोखले त्यांना धाकट्या भावाप्रमाणेच प्रेमाने वागवीत. गोखल्यांनी रानड्यांना गुरू मानले आणि त्यांच्या शब्दाबाहेर ते कधीही गेले नाहीत. "मी आज जो काही आहे, तो रावसाहेबांमुळे (रानडे)," असे ते वारंवार सांगत असत. महात्माजींनी गोखल्यांना गुरू मानले; पण म्हणून त्यांनी गोखल्यांचा राजकीय विचार पुढे नेला, असे दिसत नाही. गोखले कधीही कायद्याच्या कक्षेबाहेर गेले नाहीत. उलट, गांधीजींच्या राजकीय जीवनाची सुरुवातच सविनय कायदेभंगाने झाली. गोखले एखाद्या प्रकरणाचा शोध घेताना सपाटून अभ्यास करायचे, उलट गांधीजींनी एखाद्या समस्येचा कसून अभ्यास करून सरकारला धारेवर धरले आहे, असे आढळत नाही. किंबहुना अभ्यास हा प्रकारच गांधीजी आणि त्यांच्या शिष्यपरिवारात आढळत नाही. बुद्धिवाद, तर्क, उत्कृष्ट राजनीती, कठोर मीमांसा हे जे रानडे आणि गोखले यांच्या राजकीय जीवनाचे विशेष, ते गांधींच्या विचारात आढळत नाहीत. १९०५ साली गोखले काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याच साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. ही सरळसरळ हिंदू-मुसलमान लोकसंख्या आधारित विभागणी होती. त्याविरुद्ध प्रचंड आंदोलन पेटले. ते काँग्रेसने जिंकले. १९११च्या डिसेंबरमध्ये सरकारने फाळणी रद्द केली. पण, त्यामुळे मुसलमान नाराज झाले. मग त्यांना सांभाळून घेण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले. पुढे गांधीजींच्या काळात तर या ऐक्य प्रयत्नांना मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्याचे हीन रूप प्राप्त झाले आणि त्यातून अखेर फाळणी झाली. मग सनदशीर राजकारणाचे आदर्श, नेमस्त पक्षाचे अग्रणी गोखले या प्रश्नाकडे कसे पाहत होते? याबाबत एक प्रसंग आहे. सरोजिनी नायडू या मूळ बंगाली, उच्च विद्याविभूषित मुलीने आंतरजातीय, आंतरप्रांतीय प्रेमविवाह केला. त्या राजकारणात तर सक्रिय होत्याच, पण उत्कृष्ट कवयित्री होत्या. गोखले सरोजिनीला अगदी आपल्या मुलीप्रमाणे जिव्हाळ्याने वागवीत. १९१२ साली कलकत्त्याला दोघांची भेट झाली. दोघेही काँग्रेस अधिवेशनासाठी पाटण्याला निघाले होते. बोलता बोलता गोखल्यांनी सरोजिनीला विचारलं, "आपल्या देशाच्या भवितव्याबाबत तुला काय वाटतं?" "आशा," स्वप्नाळू डोळ्यांनी अंतराळात पाहत सरोजिनी उत्तरली. "नजीकच्या काळातलं भवितव्य सांग ना," गोखल्यांनी परत विचारलं. त्यांच्या प्रश्नाचा रोख ध्यानात घेऊन ती उत्तरली, "पाच वर्षांत हिंदू-मुस्लीम ऐक्य होईल, पाहा." यावर मिश्किल हसत गोखले म्हणाले, "बाळ, तू आहेस कवयित्री. त्यामुळे तू भलतीच आशावादी आहेस. पण माझ्याच नव्हे, तर तुझ्याही आमदानीत ते घडून येईलसे दिसत नाही. पण तशी तुझी श्रद्धा असू दे. त्यासाठी तू सतत प्रयत्नशील राहा." महात्माजींनी गोखल्यांचा हाही विचार पुढे नेलेला दिसत नाही. म्हणजेच, 'गोखले माझे राजकीय गुरू आहेत-होते,' असे महात्माजी जे वारंवार म्हणताना आढळतात, ते त्यांच्यातल्या मैत्रीच्या, प्रेमाच्या जिव्हाळ्यामुळे, असे दिसते. रानडे, गोखले, किंबहुना टिळक-आगरकर यांच्याप्रमाणे बुद्धिवाद, ज्ञान यांवर आधारित राजकारण-समाजकारण करण्याऐवजी महात्माजींचे सगळे कार्य भावनेवर आधारित होते, असे दिसते.

@@AUTHORINFO_V1@@