संघ आणि गांधीजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019   
Total Views |

 

महात्मा गांधीजी आणि रा. स्व. संघात काय साम्यस्थळे आहेत? दोघांच्या विचारांत कोणता सारखेपणा आहे? महात्मा गांधीजींना जे अभिप्रेत होते, तेच संघ नेमके कसे प्रत्यक्ष जीवनात करताना दिसतो? असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात असतील. विरोधकांकडून महात्मा गांधी संघविरोधी असल्याचे ठसवले जाते, तर संघाकडून गांधीजींना प्रातःस्मरणीय मानले जाते. परंतु, महात्मा गांधीजींशी संघाचे नाते काय? हेच सदर लेखात समर्पक शब्दांत मांडले आहे.


संघ आणि गांधीजी असा विषय आल्यानंतर १९३४ साली वर्धा शिबिराला गांधीजींनी दिलेली भेट आणि डॉ. हेडगेवारांशी त्यांचा झालेला संवाद
, हा विषय हमखास येतो. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी, हेदेखील अनेकवेळा गांधीजींना भेटले होते. त्यांच्या संवादाचे प्रसंग श्रीगुरुजी चरित्रग्रंथात आहेत. यापैकी कोणत्याही विषयावर मला लिहायचे नाही. मला असे प्रामाणिकपणे वाटते की, महात्मा गांधीजींनी संघ शिबिराला भेट दिल्यामुळे संघ मोठा होत नाही आणि त्याची प्रतिष्ठादेखील नको तितकी वाढते, असेही नाही. महात्माजी, आपल्या सामर्थ्याने महात्मा आहेत, रा. स्व. संघ आपल्या सामर्थ्याने संघशक्ती आहे.

महात्मा गांधी यांचे वाचन करताना आणि जे काही वाचन केले त्याचे चिंतन करताना, असंख्य वेळा हे जाणवू लागते की, जे विषय महात्मा गांधी आग्रहाने मांडतात, ते सगळे विषय एक संघस्वयंसेवक या नात्याने मी जगत असतो - गांधीन वाचताही जगत असतो. संघाची सर्व रचना, संघाचे तत्त्वज्ञान आणि गांधी विचार, गांधी विचारांची रचना यामध्ये विलक्षण साम्य आढळते. अनेकवेळा असे वाटायला लागते की, ही दोघांनी एकमेकांची केलेली नक्कल आहे का? परंतु, तसे काही नाही. दोघांच्याही स्वतंत्र चिंतनातून भारताला महान करण्याचे जे विचार आणि कार्यक्रम पुढे आले, त्यामागे एकाच शाश्वत सत्याची अनुभूती असल्यामुळे त्यात समानता आढळते.

महात्मा गांधी यांचे कार्य रा. स्व. संघाची स्थापना करण्यापूर्वीपासून सुरू झालेले आहे. १८९३ ला स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माची आणि तत्त्वज्ञानाची महानता प्रकट केली. त्याच काळात गांधीजी दक्षिण आफ्रिकेत, हेच हिंदू जीवनदर्शन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. आपले जीवन त्यासाठी त्यांनी समर्पित केलेले आहे. हिंदू माणूस परमेश्वराची आराधना करतो. देवाला जाणण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी सत्य जाणावे लागते. आफ्रिकेत गांधीजींचा प्रवास सत्य काय आहे, हे समजून घेण्याचा प्रवास आहे.

या प्रवासातील अनेक टप्पे आहेत. पहिला टप्पा ईश्वर सत्य आहे, हा होता आणि दुसरा टप्पा सत्य हेच ईश्वर आहे, हा आहे. त्या सत्याची अनुभूती किंवा प्राप्ती करून घेण्यासाठी गांधीजींनी आपल्या आयुष्याचाच यज्ञ केला. कठोर साधना केली. भगवान गौतम बुद्धांनी सत्य जाणून घेण्यासाठी कठोर साधना केली. या दोघांच्या साधनेत फरक आहे. गांधीजींची साधना समाजात राहून केलेली साधना आहे. गौतम बुद्धांप्रमाणे त्यांनी गृहत्याग केलेला नाही. गृहस्थाश्रमात राहून त्यांनी साधना केली. चारचौघांप्रमाणे त्यांनी गृहस्थाश्रम केला नाही. समाजाचे प्रश्न हाती घेऊन ते सोडविण्यासाठी त्यांनी चळवळी केल्या. त्यासाठी तुरुंगवास पत्करला. हे करत असताना त्यांनी साधनेच्या यम-नियमांचे कठोरपणे पालन केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली केली. त्याला एक तात्कालिक संदर्भ आहे. तो संदर्भ दयनीय हिंदू जीवन आणि अतिशय आक्रमक मुस्लीम समाज यांचा आहे. आज दंगलीच्या युगात आपण जगत नाही. १९२० चे युग तसे नव्हते. केरळातील मोपलांची दंगल, महाराष्ट्र, बंगाल, उत्तर प्रदेश येथे होणार्‍या सततच्या दंगली, यात हिंदू माणूस कापला जाई. तो भयभीत झाला होता. त्याच्यात आत्मतेज निर्माण करणे, त्याला संघटित करणे आवश्यक होते. हे काम डॉ. हेडगेवारांनी सुरू केले. परंतु, त्यांची दृष्टी शतकानंतर भारत कसा असेल, याकडे होती. मुस्लीम समाज आणि त्याच्या दंगली हे सर्व विषय तात्कालिक आहेत. इंग्रज आहेत, तोपर्यंत हे विषय चालतील. इंग्रज काही कायमचे राहत नाहीत, ते आज ना उद्या जातील, तेव्हाचा भारत कसा असेल? हा डॉ. हेडगेवारांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू होता.

महात्मा गांधीजींचेसुद्धा या विषयावरील स्वतंत्र चिंतन आहे. हिंद स्वराज्य’, या पुस्तकात ते प्रकट झाले आहे. गोरे इंग्रज गेले आणि त्याची जागा काळ्या इंग्रजांनी घेतली, तर त्याला स्वराज्य म्हणता येणार नाही, असे गांधीजी पुस्तकात सांगतात. म्हणून आपण कोण आहोत, आपली संस्कृती कोणती, आपली विचार परंपरा कोणती, अहिंसेचे आपल्या जीवनातील स्थान कोणते? यांत्रिकीकरण, भोगवाद, भांडवलशाही, या विदेशी कल्पना जशाच्या तशा आपल्याला घेता येतील का? आणि जर घेतल्या तर भारत, भारत राहील का? हे गांधीजींचे प्रश्न आहेत. संघ सुरू करत असताना डॉ. हेडगेवारांनीसुद्धा प्रश्न उपस्थित केला की, आम्ही कोण आहोत? आमचे स्वातंत्र्य का गेले? स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर आम्हाला काय केले पाहिजे? डॉ. हेडगेवारांनी मार्ग धरला, हिंदू संघटनाचा. हा देश हिंदूंचा आहे. हिंदू संस्कृती ही या देशाचा प्राण आहे. धर्म या देशाचा आत्मा आहे. म्हणून हे हिंदूराष्ट्र आहे. हिंदूराष्ट्राची अनुभूती एकेका हिंदूमध्ये जागी केली पाहिजे. त्यासाठी डॉ. हेडगेवारांनी आपले जीवन समर्पित केले.

गांधीजींनी रुढार्थाने हिंदू संघटनहा शब्द कधी वापरला नाही. हिंदूराष्ट्रहा शब्ददेखील त्यांच्या लिखाणात सापडत नाही. पण ते स्वतःला कट्टर हिंदूम्हणवून घेतात. हिंदू धर्माचा त्यांना ज्वलंत अभिमान आहे, असे तेच सांगतात. हिंद स्वराज्यया पुस्तकात हिंदूंची सांस्कृतिक मूल्ये आणि त्याच्या समोरील आव्हाने याची ते चर्चा करतात. पुस्तकाला नाव मात्र हिंदू स्वराज्यअसे देत नाहीत, ‘हिंद स्वराज्यअसे देतात. त्यांना देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढवायचा होता. राजकीय चळवळ उभी करायची होती. चळवळीत सर्वांना सहभागी करून घ्यायचे होते. इंग्रज, मुसलमानांना राजकीयदृष्ट्या वेगळे पाडण्यात यशस्वी झाले होते. मुसलमानांचे राजकीय हितसंबंध हिंदुपेक्षा वेगळे आहेत, ही गोष्ट त्यांनी मुसलमानांच्या मनात भरविली. मुसलमानांना बरोबर घेतल्याशिवाय राजकीय आंदोलन शक्य होणार नाही, म्हणून गांधीजींनी मुसलमानांना जवळ करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांची खिलाफत चळवळ आपली मानली. त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या त्यांनी मान्य करायला सुरुवात केली. आपण मोठे भाऊ आहोत आणि मुसलमान लहान भाऊ आहेत, त्यांना सांभाळून घेतले पाहिजे, असे त्यांनी मानले. मुस्लीम समाजाची मानसिकता, त्यांनी जगभर साम्राज्य निर्माण केल्यामुळे वेगळ्या प्रकारची झाली आहे. ते आडदांड असतात, अशा प्रकारचे मत त्यांनी नोंदविले आहे.

डॉक्टरांनी सुरू केलेल्या संघाची चळवळ रुढार्थाने राजकीय चळवळ नव्हती. स्वातंत्र्यप्राप्ती हे तेव्हाचे संघाचे लक्ष्य होते. हिंदू समाजाने हे स्वातंत्र्य स्वतःच्या ताकदीवर मिळविले पाहिजे, असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनी हिंदू समाजाच्या संघटनावरच आपले सगळे लक्ष्य केंद्रित केले. डॉक्टरांचा मृत्यू १९४० साली झाला. हिंदूशक्तीच्या आधारे स्वातंत्र्य हे ध्येय त्यांना काही गाठता आले नाही. गांधीजी स्वातंंत्र्य मिळताना हयात होते. पण त्यांना फाळणी स्वीकारावी लागली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा त्यांचा प्रयत्न तो अत्यंत प्रामाणिक असूनही पूर्णपणे फसला. मुसलमानांनी त्यांना कधीच स्वीकारले नाही. हिंदू समाजातीलही खूप मोठ्या वर्गाने गांधीजींना मनापासून कधीही स्वीकारले नाही.

हिंदी समाजाचा विचार करता गांधीजींनी काही गोष्टी अद्भुत केल्या आहेत. डरपोक हिंदूंना त्यांनी निर्भय हिंदू करण्यात यश मिळविले. त्यासाठी आपल्याला बारडोलीचा सत्याग्रह, देशभर झालेला मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, यात भाग घेणार्‍या हिंदूंच्या धैर्य आणि शौर्याच्या कथा वाचाव्या लागतील. दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे, आपली भगवद्गीता, आपली उपनिषदे, आपले तत्त्वज्ञान याविषयी समाजात फार मोठी जागृती केली. गांधीजी म्हणत असत की, “भगवद्गीता माझी आई आहे. ती माझ्या प्रश्नांची उत्तरे मला देते. उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात. मानवी सेवेचा संदेश संतांची चरित्रे देतात.अनेक बुद्धिमान तरुण या विषयाकडे वळल्याचे लक्षात येते. आचार्य विनोबा भावे हे त्यातील एक होते. आचार्य नरेंद्र देव, आचार्य शंकरदेव, दादा धर्माधिकारी, यांचे वर्णन जसे गांधीवादी या शब्दाने करतात, तसेच ते हिंदू तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक असे करता येते.

डॉक्टरांनी सुरू केलेला संघ, हिंदू तत्त्वज्ञानावरच उभा आहे. गीता पठण किंवा उपनिषद पठण या संघशाखेच्या नित्य कार्यक्रमाचा भाग नसतो, हे जरी खरे असले तरी स्वयंसेवकांनी आपल्या नित्य जीवनात यांचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचे वाचन-मनन-चिंतन केले पाहिजे, हे श्रीगुरुजी आवर्जून सांगत असत. विनोबा भावे यांच्याप्रमाणे भगवद्गीतेवर उत्कृष्ट भाष्य करणारा, संघात कुणी निर्माण झाला नसला तरी गीतेचा कर्मयोग जगणारे हजारोजण उभे राहिले. एकनाथजी रानडे आणि नानाजी देशमुख ही दोनच नावे हिमालयाची शिखरे ठरावीत, अशी आहेत. त्यांचे जीवन म्हणजे तरी काय, तर भगवद्गीतेचा कर्मयोग आहे.

राजकीय चळवळ करीत असताना गांधीजींसमोर अनेक विषय होते. त्यातला एक विषय असा होता की, या देशातील सर्वसामान्य माणसाला देशासाठी निःस्वार्थ भावनेने रोज करण्यासारखा कोणता कार्यक्रम देता येईल? दीर्घ विचारांती त्यांना चरखा सापडला. चरख्यावर रोज एक तास सूत कातायचे. रोजच्या एक तासाची ही देशसाधना आहे. आपल्यासाठी काही करायचे नाही. मनात निःस्वार्थ भाव ठेवायचा. संघाची एक तासाची शाखा ही गांधीजींचा चरखाचआहे. एक तासाची शाखा फक्त निःस्वार्थ भाव जागविते. शाखेत जाऊन कोणाला काही मिळत नाही. शाखेच्या शिक्षकांना पगार वगैरे काही नसतो. सर्व काम देशभावनेने करायचे असते-स्वतःच्या खिशातील पैसा खर्च करून.

गांधीजींनी सांगितले की, “आपल्या समाजापुढे असंख्य प्रश्न आहेत. अज्ञान, गरिबी, निरक्षरता, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, जडता, लाचारी अशा अनेक रोगांनी समाज बाधित झालेला आहे, त्याला निरोगी केला पाहिजे. त्यासाठी खेड्यात गेले पाहिजे. आपल्या बांधवांत मिसळले पाहिजे आणि निःस्वार्थ भावनेने सेवाकार्य सुरू केले पाहिजे. उपकाराची भावना असता कामा नये, कर्तव्याची भावना हवी. काही मिळविण्याची भावना नसावी, देण्याची भावना असावी.असे सेवाकार्य करणार्‍यांसाठी त्यांनी अकरा व्रतांची मांडणी केली. सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह, श्रमसाधना, अस्वाद, अभय, सर्वधर्मसमभाव, स्वदेशी, अस्पृश्यता निवारण या व्रतांचे पालन गांधीजींनी आपल्या जीवनात आदर्शवत असे केले. उपदेश करायला सोपे असते, त्याप्रमाणे वागणे फार कठीण असते. महात्मा गांधीजींच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनात एक भावना पक्की झाली होती की, हा असा माणूस आहे की, जो बोलेल त्याप्रमाणे चालेल.

राजकारणात बोलायचे एक असते आणि करायचे दुसरे असते. एखाद्या राजकारण्याला विचारले असता, ‘तुम्ही असे का वागता?’, तर तो म्हणेल, “राजकारणात असेच वागायचे असते.गांधीजी राजकारणात होते, परंतु ते प्रचलित राजकारणी नव्हते. राजकारणात होते म्हणून त्यांना राजकारणी म्हणायचे, परंतु ते राजकारणात असूनही राजकारणापासून निवृत्त होते. चिखलातील कमळ होते.

संघाचे वैशिष्ट्य जे बोलू ते करू, असेच आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरे, हे संघ आचरणात बसत नाही. संघकार्य करणार्‍यासाठी गांधीजींप्रमाणे संघाने व्रते सांगितलेली नाहीत. याचा अर्थ संघ स्वयंसेवक व्रते पाळत नाहीत, असे नाही. संघात प्रचारक व्यवस्था आहे. प्रचारकी जीवनात, प्रचारक ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतो. तो श्रमसाधना करतो. तो कशाचाही संग्रह करीत नाही. त्याच्या मालकीचे त्याच्याकडे काहीच नसते. त्याचे बँक अँकाऊंट नसते. राहण्यासाठी त्याला स्वतःचे घर नसते. कार्यालय किंवा स्वयंसेवकाचे घर हेच त्याचे घर असते. त्याची राहणी कमालीची साधी असते. पैशाची तो अजिबात उधळपट्टी करीत नाही. गांधीजी ज्या कर्मठतेने जीवन जगत, त्याच कर्मठतेने संघाचा प्रचारक जीवन जगत असतो-अगदी सरसंघचालकांपासून ते तालुका प्रचारकापर्यंत. दुसर्‍या भाषेत गांधीजींच्या साध्या जीवनाची ही चालती-बोलती प्रतिके असतात.

महात्मा गांधीजींनी स्वयंपूर्ण खेडे आणि त्याद्वारे स्वायत्त समाजाची संकल्पना लोकांपुढे ठेवली. काहींना ती समजली नाही, काहींना ती समजून उमगली नाही आणि काहींच्या डोक्यात विकासाच्या पाश्चात्त्य कल्पना अशा काही भरल्या गेल्या होत्या की, त्यांनी गांधीजींच्या विचारांकडे दुर्लक्ष केले. संघाने हा विषय मनाने स्वीकारलेला आहे. आपल्यापैकी जर कुणी चित्रकूटला जाऊन आले असेल तर, तेथे खेड्यांच्या विकासासाठी जे सर्वंकष प्रयत्न चालू आहेत, ते गांधीजींना जे अभिप्रेत होते, त्याचेच रूप वाटेल. असे प्रयत्न असंख्य गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संघ स्वयंसेवक करीत असतात. आज संघात त्याला ग्रामविकासअसे म्हणतात. हे काम संघ आपल्या पद्धतीने उभे करीत चालला आहे.

स्वायत्त समाज उभा करायचा असेल तर समाजाचे संस्थाजीवन स्वावलंबी, स्वयंशासित, स्वयंपूर्ण असले पाहिजे. कोणतीही संस्था सरकारवर अवलंबून असता कामा नये. सरकारी अनुदानावर ती जगता कामा नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शासनावर शून्य अवलंबून आहे. आज शासनात महत्त्वाच्या पदावर संघ स्वयंसेवक आहेत. ते सरकार चालवितात. त्यांच्याकडून संघ एक पैसादेखील घेत नाही. अनेकांना हे खरे वाटणार नाही, परंतु, ही वस्तुस्थिती आहे. स्वयंसेवकांनी समर्पित केलेल्या गुरुदक्षिणेवर संघ चालतो. संघाची कार्यालये निधी उभा करून स्वयंसेवक उभी करतात. महात्मा गांधीजींनीदेखील देशात संस्थाचे जाळे उभे केले. केंद्रात काँग्रेसचे सरकार आले. यातील अनेक संस्थांना चालविण्याचे दायित्त्व सरकारने आपल्या डोक्यावर घेतले. गांधीजींची खादी, खादी ग्रामोद्योग महामंडळात गेली. तिचे सरकारीकरण झाले. नोकरशाही आली, बाबूगिरी आली, नोकरी, रजा, पगारवाढ, अन्य सवलती याचीच चिंता जास्त होऊ लागली. सरकारी पैसा सेवाकार्याची वाट लावून टाकतो. संघाची सेवाकार्ये जोपर्यंत समाजावर अवलंबून राहतील, तोपर्यंत ती टिकून राहतील. जेव्हा त्यांचे सरकारीकरण होईल, तेव्हा त्यांच्या अस्ताला फारसा वेळ लागणार नाही.

गांधीजींनी मृत्युपूर्वी सांगितले की, “स्वराज्य मिळविणे हे काँग्रेसचे ध्येय होते. ते साध्य झालेले आहे, आता काँग्रेसला विसर्जित करून टाका. तिचा लोकसेवक संघ बनवा.गांधीजींचे हे म्हणणेदेखील कुणी ऐकले नाही. काँग्रेस राजकीय पक्ष झाला. त्यामुळे आज काँग्रेसची स्थिती काय झाली आहे, हे आपण जाणतो. संघाचे प्रारंभापासूनचे रूप लोकसेवक संघाचेच आहे. संघावर उलटे दडपण खूप आलेले आहे. १९४८ साली दडपण आले की, संघाने राजकीय पक्षात रूपांतरित व्हावे. आणीबाणीच्या कालखंडातही या विचाराने पुन्हा जोर पकडला होता. १९० च्या दशकातदेखील राजकीय चळवळीत संघाने भाग घ्यायला पाहिजे, असे अनेकांना वाटत होते. परंतु, सर्व सरसंघचालकांनी संघाचे जे रूप आहे, त्यात कोणताही बदल करण्यास अनुमती दिली नाही. यामुळे संघाचे आजचे रूप नित्यनूतन तरी अपरिवर्तनीय स्वरूप असे राहिलेले आहे. काळ बदलतो त्याप्रमाणे संघात बदल होत राहतो. संघाच्या शाश्वत विचारात आणि आचारात काहीही बदल होत नाही, ते त्याचे अपरिवर्तनीय स्वरूप असते. 


गांधीजी आणि संघ ही दोन रूपे आहेत. देश-धर्म, समाज, मूल्यशाश्वतता, राजनीती, समाजनीती, शिक्षण, आरोग्य, चारित्र्यनिर्माण अशा अनेक बाबतींमध्ये गांधी आणि संघ हातात हात घालून चालतात. पण टोकाची अहिंसा, टोकाचे तुष्टीकरण, नैतिकतेचा अयोग्य कारणासाठी दबाव या गोष्टी संघविचारात बसत नाहीत. याबाबतीत संघ आणि गांधी ही समान रूपे नसतात. त्यात खूप मोठे अंतर असते.

मुसलमानांना राष्ट्रीय जीवनात सामावून घ्यायला पाहिजे, गांधी विचारांच्या या मताशी संघ सहमत आहे, पण त्याचा मार्ग संघमार्ग आहे, गांधीमार्ग नाही. समाजातील अस्पृश्यता संपली पाहिजे, हा गांधीविचार उत्तम आहे, पण त्यांना हरिजन म्हणणे हा मार्ग नव्हे. संघ त्यांना हिंदू समाजाचे अभिन्न अंग समजतो. सर्वधर्मसमभाव असला पाहिजे, हा गांधीविचार सत्यच आहे. परंतु, गांधीमार्ग सर्व धर्म समान आहेत, हे जर सांगू लागला तर ते ऐतिहासिक सत्य नसते. धर्मग्रंथातील काही शाश्वत भाग समान असू शकतो, परंतु सेमेटिक धर्मांचा आपल्या मतांचा दुराग्रह भारतीय धर्माशी मेळ खात नाही, हे ऐतिहासिक सत्य नाकारता येत नाही. म्हणून म्हणावे लागते की, शाश्वत गांधी वेगळे आहेत आणि कार्यक्रमात्मक गांधी वेगळे आहेत. संघाचे नाते शाश्वत गांधींशीच राहू शकते.


सेवाकार्ये समाजावर अवलंबून

स्वयंसेवकांनी समर्पित केलेल्या गुरुदक्षिणेवर संघ चालतो. संघाची कार्यालये निधी उभा करून स्वयंसेवक उभी करतात. महात्मा गांधीजींनीदेखील देशात संस्थांचे जाळे उभे केले. केंद्रात काँग्रेसचे सरकार आले. यातील अनेक संस्थांचे चालविण्याचे दायित्त्व सरकारने आपल्या डोक्यावर घेतले. गांधीजींची खादी, खादी ग्रामोद्योग महामंडळात गेली. तिचे सरकारीकरण झाले. नोकरशाही आली, बाबूगिरी आली, नोकरी, रजा, पगारवाढ, अन्य सवलती याचीच चिंता जास्त होऊ लागली. सरकारी पैसा सेवाकार्याची वाट लावून टाकतो. संघाची सेवाकार्ये जोपर्यंत समाजावर अवलंबून राहतील, तोपर्यंत ती टिकून राहतील. जेव्हा त्यांचे सरकारीकरण होईल, तेव्हा त्यांच्या अस्ताला फारसा वेळ लागणार नाही.

सत्य काय आहे?

महात्मा गांधी यांचे कार्य रा. स्व. संघाची स्थापना करण्यापूर्वीपासून सुरू झालेले आहे. १८९३ ला स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माची आणि तत्त्वज्ञानाची महानता प्रकट केली. त्याच काळात गांधीजी दक्षिण आफ्रिकेत, हेच हिंदू जीवनदर्शन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. आपले जीवन त्यासाठी त्यांनी समर्पित केलेले आहे. हिंदू माणूस परमेश्वराची आराधना करतो, देवाला जाणण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी सत्य जाणावे लागते. आफ्रिकेत गांधीजींचा प्रवास सत्य काय आहे, हे समजून घेण्याचा प्रवास आहे.


संघाचे नाते शाश्वत गांधीजींशी

मुसलमानांना राष्ट्रीय जीवनात सामावून घ्यायला पाहिजे, गांधीविचारांच्या या मताशी संघ सहमत आहे, पण त्याचा मार्ग संघमार्ग आहे, गांधीमार्ग नाही. समाजातील अस्पृश्यता संपली पाहिजे, हा गांधीविचार उत्तम आहे, पण त्यांना ‘हरिजन’ म्हणणे हा मार्ग नव्हे. संघ त्यांना हिंदू समाजाचे अभिन्न अंग समजतो. सर्वधर्मसमभाव असला पाहिजे, हा गांधीविचार सत्यच आहे. परंतु, गांधीमार्ग सर्व धर्म समान आहेत, हे जर सांगू लागला तर ते ऐतिहासिक सत्य नसते. धर्मग्रंथातील काही शाश्वत भाग समान असू शकतो, परंतु सेमेटिक धर्मांचा आपल्या मतांचा दुराग्रह भारतीय धर्माशी मेळ खात नाही, हे ऐतिहासिक सत्य नाकारता येत नाही. म्हणून म्हणावे लागते की, ‘शाश्वत गांधी’ वेगळे आहेत आणि ‘कार्यक्रमात्मक गांधी’ वेगळे आहेत. संघाचे नाते ‘शाश्वत गांधींशी’च राहू शकते.


९५९४९६१८६९

@@AUTHORINFO_V1@@