चोर मचाये शोर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019   
Total Views |



राहुलच्या आरोपात एकही पुरावा नाही आणि गाजावाजा आहे. उलट, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातल्या पैशाची देवाणघेवाण न्यायालयात सिद्ध झाली असून त्याचे उत्पादन करणाऱ्या व विक्री दलाली खाणाऱ्यांना दोषीही ठरवण्यात आलेले आहे. त्यातला एक आरोपी भारतीय तपास यंत्रणांसमोर सत्य ओकतो आहे. पण, त्यात लक्ष घालायलाही कुणा संपादक, पत्रकाराला सवड मिळालेली नाही. त्यावर बोलायची कोणालाही कशाला भीती वाटते आहे? कारण, त्यात युपीएचे मंत्री वा अधिकाऱ्यांनाच लाच देण्यात आलेली नाही. काही संपादक, पत्रकारांनाही हिस्सा मिळाल्याचा आरोप आहे. तपशील उपलब्ध आहे. पण, ते सत्य बोलायचे कोणी? शौरी किंवा सिन्हा कुठे गुडूप झाले आहेत?

 

Lie gets halfway around the world before the truth has a chance to get its pants on - Winston Churchill

सत्याला आपले कपडे अंगावर चढवून घराबाहेर पडायला वेळ मिळेपर्यंत असत्य अर्धे जग पालथे घालते, असे विन्स्टन चर्चिल यांचे एक विधान आहे. बऱ्याच काळापासून ते विधान ऐकलेले होते. पण, सध्या जो राफेल लढावू विमानाच्या खरेदीचा गदारोळ चालला आहे, त्यामुळे त्यातला आशय लक्षात आला. गेल्या जून महिन्यात तेलुगू देसम पक्षाने लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, त्यावर प्रदीर्घ भाषण करताना राहुल गांधी यांनी हा विषय पहिल्यांदा उकरून काढला होता. त्याच खरेदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळा करून आपल्या लाडक्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला ३० हजार कोटी रुपये मिळवून दिले आणि त्यासाठी त्या विमानांची किंमतही वाढवून देण्यात आल्याचा धडधडीत खोटा आरोप त्यांनी केला. असे काही आरोप करण्यासाठी त्यांनी कुठला पुरावा किंवा कागदपत्र समोर आणले नाही किंवा सादरही समोर आणलेला नाही. त्यासाठी त्यांनी फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ऑलंदे यांच्या कुठल्या मुलाखतीत उच्चारलेल्या शब्दांचा आधार घेतला होता. खुद्द ऑलंदे यांनी ते शब्द मागे घेतले आहेत आणि आपल्याला तसे काही म्हणायचे नव्हते, असा खुलासा करून झाला आहे. त्यानंतर राहुलनी विद्यमान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी आपल्याला तसे सांगितल्याचा दावा केला होता. त्यांनीही आपले असे कुठले बोलणे राहुलशी झाले नसल्याचा खुलासा करून झाला आहे. मग सदरहू विमानाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीनेही खुलासा देऊन झाला आहे. पण, इतके खुलासे राहुलच्या मेंदूत शिरणार नसतील, तर समजू शकते. पण, त्याच्या आधाराने जो धुरळा माध्यमातून व विविध विरोधी पक्षांकडून उडवला जात आहे, त्यांच्या मेंदूचे काय झाले; असा प्रश्न नक्की पडतो. बोफोर्सप्रमाणे या आरोपांची चिखलफेक करून मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीत हरवता येईल, ही त्यामागची अपेक्षा असावी, अन्यथा हा खोटेपणा इतकी मजल मारू शकला नसता.

 

आरंभी मोदींनी व भाजपनेही त्याकडे कानाडोळा केला. नंतर माध्यमांनी व अन्य पक्षांनी त्यावर धुळवड आरंभल्यामुळे खुलासे व उत्तरेही देऊन झालेली आहेत. पण, उत्तरे कोणाला हवी आहेत? सर्वोच्च न्यायालयातही हा मामला गेला आणि तो घेऊन जाणाऱ्यांनी आपापली नाके कापून घेतली. भाजपचेच माजी मंत्री अरूण शौरी व यशवंत सिन्हा यांनी प्रशांत भूषण यांच्या माध्यमातून हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेलेला होता. त्याच्या चौकशीचीही मागणी केली होती. वास्तविक त्यांनी हा उद्योग करण्यापेक्षा राहुल गांधींनी ते करायला हवे होते. पण, राहुल वा त्यांचे एकाहून एक कायदेपंडीत सहकारी शेपूट घालून बाजूला बसले असताना, शौरी व सिन्हा यांनी मोदीद्वेषाच्या आहारी जाऊन न्यायालयात धाव घेतली. त्यातून आपल्या दीर्घकालीन प्रतिष्ठा व विश्वासार्हतेची माती करून घेतली. कारण, त्यांच्या याचिकेला प्रतिसाद देऊन न्यायालयाने मोदी सरकारकडे जाब मागितला आणि सरकारनेही सर्व संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर केली. ती बारकाईने तपासून न्यायालयाने त्यात कुठला घोटाळा नसल्याची ग्वाही देऊन टाकली. राहुलच्या नादी लागलेल्या अतिशहाण्या शौरी-सिन्हांचे नाक कापले गेले आणि त्यांची बोलती बंद होऊन गेली. जे त्यांचे कोर्टात झाले, तेच अन्य विरोधी पक्षांचे आगामी लोकसभा निवडणुकीत व्हायचे आहे. राहुल आजही जितक्या आवेशात बोलत आहेत, त्यांना आपल्या आरोपाची खात्री असती, तर त्यांनी हा मामला स्वत:च कोर्टामध्ये नेला असता. त्याचे श्रेय शौरी-सिन्हांना नक्कीच मिळू दिले नसते. पण, आपल्या खोटेपणाची खात्री असल्याने त्यांनी गप्प राहून त्या अतिशहाण्यांना बळी व्हायला पुढे केले. शहाण्यांची हीच शोकांतिका असते. ते सर्वात आधी आणि झटकन भामट्यांचे बळी होतात. हा विषय इथेच संपत नाही. राहुलला आपल्या खोटेपणाची कितपत खात्री आहे, त्याची साक्ष गुरूवारी लोकसभेत सभापती सुमित्रा महाजन यांनी राहुलकडूनच वदवून घेतली.

 

राफेल विषयातला आणखी एक खोटा पुरावा राहुलनी लोकसभेत आणलेला होता. त्यात म्हणे मनोहर पर्रिकर व गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे राफेल फायली आपल्या घरात असल्याचे बोलत असल्याचे ध्वनीमुद्रण होते. त्याविषयी राहुल ग्वाही देत असतील, तरच ती वाजवायला देऊ; असे बजावल्यावर या काँग्रेस अध्यक्षाने शेपूट घातली. कारण, त्याला आपल्याच खोटेपणाची खात्री होती. टेपच्या खरेपणाची खात्री लोकसभेत दिली आणि तपासणीनंतर ती खोटी पडली; तर फोर्जरीचा गुन्हा होऊ शकतो. इतकी अक्कल पप्पूला नक्कीच आहे. विषय सर्वोच्च न्यायालयापासून लोकसभेपर्यंत कुठलाही कसोटी वा तपासणीवर टिकेल, असा पुरावा राहुल गांधी देऊ शकलेले नाहीत. पण, पाच महिने उलटून गेल्यावरही भारतीय माध्यमात राफेलचा घोटाळा चर्चेत गाजतो आहे. आता यातली गंमतही तपासून बघायला हरकत नाही. एका काल्पनिक आरोपाचा कुठलाही पुरावा साक्षीदार नसताना गदारोळ चालू आहे. पण, गेला महिनाभर युपीएकालीन ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातला दलाल भारताच्या हाती आलेला आहे. त्याला युपीए सरकारच्या घोटाळ्यात काही कोटी रुपये मिळाले व त्याने ते राहुल व सोनियांसहीत अनेक काँग्रेस नेत्यांना भागिदारी दिल्याचा काही पुरावा इटालियन व दुबईच्या न्यायालयात मान्यही झाला आहे. म्हणून तर त्याचा भारतात तपास सुरू झाला आणि दुबईतील न्यायालयाने त्याला भारताच्या हवाली केलेला आहे. त्याच्या जबानीतून थेट राहुल व सोनियांचे उल्लेख समोर आलेले आहेत. त्याविषयी माहितीही उपलब्ध आहे. पण, त्यावर माध्यमात स्मशानशांतता पसरलेली आहे. राहुलचे बिनबुडाचे आरोप गाजवणारे व पत्रकार परिषदेत हजेरी लावणारे संपादक यापैकी कोणी राहुलना त्याच हेलिकॉप्टर खरेदीतल्या पैसे, दलाली वा व्यवहाराविषयी चकार शब्द विचारलेला नाही. राफेलचे असत्य अर्ध्या माध्यम जगताला पालथे घालून बसले आहे, पण ख्रिश्चियन मिशेलने कथन केलेल्या राहुल व सोनियांच्या पैशाचे सत्य बोलायला कोणी धजावत नाही ना?

 

राहुलच्या आरोपात एकही पुरावा नाही आणि गाजावाजा आहे. उलट, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातल्या पैशाची देवाणघेवाण न्यायालयात सिद्ध झाली असून त्याचे उत्पादन करणाऱ्या व विक्री दलाली खाणाऱ्यांना दोषीही ठरवण्यात आलेले आहे. त्यातला एक आरोपी भारतीय तपास यंत्रणांसमोर सत्य ओकतो आहे. पण, त्यात लक्ष घालायलाही कुणा संपादक, पत्रकाराला सवड मिळालेली नाही. त्यावर बोलायची कोणालाही कशाला भीती वाटते आहे? कारण, त्यात युपीएचे मंत्री वा अधिकाऱ्यांनाच लाच देण्यात आलेली नाही. काही संपादक, पत्रकारांनाही हिस्सा मिळाल्याचा आरोप आहे. तपशील उपलब्ध आहे. पण, ते सत्य बोलायचे कोणी? शौरी किंवा सिन्हा कुठे गुडूप झाले आहेत? राफेलचा डंका पिटणाऱ्या पत्रकारांना हेलिकॉप्टर विषयी बोलायची इतकी भीती कशाला वाटते? नसलेल्या पुराव्यांचे फुगे उडवण्याचा खेळ करणाऱ्यांना सत्य समोर असून त्याला सामोरे जाण्याची भीती कशाला सतावते आहे? कुणालाही कुठलेही प्रश्न बेधडक विचारण्याची हिंमत बाळगणाऱ्यांना राहुलनी योजलेल्या पत्रकार परिषदेत, त्याच सत्याविषयी एक साधा प्रश्न विचारायचे धाडस का होत नाही? कारण, ते सत्य आहे. ते सत्य दडपायचे, तर राफेलचा धुमधडाका लावलाच पाहिजे ना? जगजीत सिंगची गजल आहे, ‘तुम इतका क्यु मुस्कुरा रहें हो, क्या गम है जिसको छुपा रहे हों....’ त्याचीच प्रचिती येते. राफेलचा बागुलबुवा केला नाही तर सगळे लक्ष हेलिकॉप्टर घोटाळ्याकडे वळणार आहे. तिथे इटालीयन आईचा भावी पंतप्रधान पुत्र गटांगळ्या खाणार आहे. त्याला फार वेळ लागणार नाही. कारण, ख्रिश्चियन मिशेल सत्य ओकायला लागला असून, त्यातला थेट गांधी खानदानाला भिडणारा महत्त्वाचा तपशील उघड होत जाईल, तसतशा राफेलच्या रुदाल्या ओक्साबोक्शी आकांत करणार आहेत. दया येते ती त्यात बळी पडलेल्या शौरी-सिन्हांची आणि त्याच वाटेवर बळी व्हायला धावत सुटलेल्या अन्य पक्षातल्या बकऱ्यांची. कारण, उद्या त्यांचा बळी जाईल, तेव्हा राहुल वा सोनियाही त्यांच्यासाठी दोन अश्रू ढाळणार नाहीत, हे नक्की!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@