प्रतिगामी परिवर्तनवादी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018   
Total Views |



मंथनासाठी संघाने आपल्या विचारांशी सहमत नसलेल्यांनाही आमंत्रित केले होते. पण त्यावर बहिष्कार घालून या लोकांनी आपण ‘जैसे थे’वादी असल्याची जगाला साक्षच देऊन टाकली. आपल्याला बदलायचे नाही किंवा अन्य कोणाला बदलायचे असेल, तरी आपण त्याला हातभार लावणार नाही, अशीच ही भूमिका नाही काय?

 

तमाम पुरोगामी म्हणवून घेणारे लोक आपल्यासाठी ‘परिवर्तनवादी’ अशी बिरुदावलीलावत असतात. परिवर्तन म्हणजे तरी काय असते? तर जी काही प्रचलित स्थिती-परिस्थिती आहे, त्यात बदल घडवून आणण्याला ‘परिवर्तन’ असा सामान्यत: शब्द वापरला जातो किंवा एका ठराविक स्थितीत समाज असेल, त्याला बदलून टाकायचा असतो. साहजिकच जे लोक असलेली परिस्थिती टिकवून ठेवायला झगडत असतात, त्यांच्यावर ‘प्रतिगामी’ किंवा ‘जैसे थे’वादी असा शिक्का मारला जात असतो. हा शिक्का मारणारेप्रामुख्याने स्वत:ला ‘परिवर्तनवादी’ म्हणवून घेत असतात. ही पूर्वापार चालत आलेली स्थिती आहे. पण आता एक चमत्कारिक विकृती त्यात निर्माण झालेली आहे. ती अशी की, समाजाला बदलण्याचा विचार कधीच मागे पडलेला आहे आणि त्या परिवर्तनवादाची सूत्रे ठराविक लोकांनी आपल्याला हाती घेतली आहेत. स्वत:वर ‘परिवर्तनवादी’ अशा शिक्का एका गटाने मारून घेतला आहे आणि स्वत:ला तसे ठरवण्यासाठी मग हा वर्ग, आपल्याशी सहमत नसलेल्यांवर ‘प्रतिगामी’ असल्याचा शिक्का मारून मोकळा होत असतो. त्यातून त्याला ‘जैसे थे’वादी किंवा ‘प्रतिगामी’ वर्गाच्या तसे असण्यावर बोट ठेवायचे नसते, तर आपल्याला ‘पुरोगामी’ वा ‘परिवर्तनवादी’ घोषित करायचे असते. तो शिक्का मारून घेतला, मग त्यांना वास्तविक परिवर्तनवादी असण्याची वा तसे वागण्याची गरज उरत नाही. याचा अनुभव अलीकडेच रा. स्व. संघाने योजलेल्या एका विचारमंथनातून आला. या मंथनासाठी संघाने आपल्या विचारांशी सहमत नसलेल्यांनाही आमंत्रित केले होते. पण त्यावर बहिष्कार घालून या लोकांनी आपण ‘जैसे थे’वादी असल्याची जगाला साक्षच देऊन टाकली. आपल्याला बदलायचे नाही किंवा अन्य कोणाला बदलायचे असेल, तरी आपण त्याला हातभार लावणार नाही, अशीच ही भूमिका नाही काय?

 

कुठलाही बदल वा परिवर्तन आपोआप घडून येत नसते. एका बाजूचे दुसऱ्याशी संवाद होणे व त्यातून विचारांची देवाणघेवाणहोण्यातून वैचारिक परिवर्तन शक्य असते. एका बाजूने आपली भूमिका दुसऱ्याला समजवायची किंवा चिकित्सा होण्यासाठी चर्चेला आणायची; मग दुसऱ्या बाजूने त्या पहिल्या भूमिकेची चिरफाड करून त्यातील चुका वा त्रुटी समोर आणायच्या आणि त्याचा प्रतिवाद पहिल्या बाजूने करायचा. मागील काही दशकांपासून संघाच्या विरोधात वाट्टेल त्या गोष्टी सातत्याने बोलल्या व पसरवल्या गेल्या आहेत. त्याचा संघाने सहसा प्रतिवाद केलेला नाही. या लोकांनी सहसा संघाच्या प्रतिनिधीला आमंत्रित करून त्यांची बाजू आपल्या व्यासपीठावर स्पष्ट करण्याची संधी दिली नाही. म्हणजेच, संघात वा त्याच्या अनुयायांमध्ये कुठलाही बदल वा परिवर्तन शक्य नाही, असा निष्कर्ष त्यांनी आधीच काढलेला आहे किंवा असल्या पुरोगामी गोतावळ्यात जे कोणी अंधभक्त असतात, त्यांना पढवलेल्या संघविषयक गोष्टींच्या पलीकडील अन्य काही त्यांच्या कानी पडू नये, याची सतत फिकीर करावी लागत असते. म्हणूनच कोणी संघवाला त्यांच्या व्यासपीठावर प्रतिवाद करण्यासाठी आमंत्रित केला जात नाही आणि एकतर्फी संघावर दुगण्या झाडण्याचे समारंभ साजरे केले जातात. आपणच आरोप करायचे आणि आपल्यापैकीच कोणीतरी त्याला दुजोरा देत राहायचे, असा पोरखेळ चाललेला असतो. त्यालाच आजकाल ‘परिवर्तनवाद’ असे नाव मिळालेले आहे. साहजिकच त्यांना संघासमोर येण्याची भीती वाटली तर नवल नाही. उलट बाजू अशी की, आपले विचार संघाच्या मंचावर मांडले आणि तिथे कोणी चिकित्सा करायला आरंभ केला, तर योग्य उत्तरे नसल्याची भीती थोडकी नसते. त्यामुळेच ‘दृष्टी आड सृष्टी’ या उक्तीप्रमाणे समोरासमोर यायचेच नाही. आपल्या डबक्यात विहार करायचा, अशी परिवर्तनवादी चळवळ विटाळून गेलेली आहे.

 

 

काही महिन्यांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रणवदा मुखर्जी यांना संघाने त्यांचे विचार मांडण्यासाठी आपल्या मुख्यालयात आमंत्रित केलेले होते. त्यावरूनही असाच गदारोळ झाला होता. प्रणवदांनी तिकडे जावे किंवा नाही, असा वाद उकरून काढण्यात आला होता. या लोकांचा आपल्या विचारावरही विश्वास नाही काय? आयुष्यातील पन्नास वर्षे ज्या व्यक्तीने एका विचारधारेसाठी कार्य केले, ती व्यक्ती वेगळ्या विचारांच्या व्यासपीठावर तीच भूमिका मांडायला गेली, तर आक्षेपघेण्यासारखे काय होते? की संघाच्या मंचावर वा कार्यालयात गेल्यास कोणाचेही मतपरिवर्तन होते, अशी या लोकांची दृढ श्रद्धा आहे? अशी श्रद्धा असलेल्या व ती जीवापाड जपणाऱ्यांना एकेकाळी यांचेच परिवर्तनवादी हे ‘सनातनीवृत्ती’ मानत होते. लोकमान्य टिळक गव्हर्नराच्या बंगल्यावर गेले म्हणून त्यांना प्रायश्चित्त घ्यायला लावणारा जो ब्रह्मवृंद पुण्यात त्याकाळी होता. त्यापेक्षा प्रणवदांना हटकणाऱ्या पुरोगाम्यांची मनोवृत्ती किती वेगळी होती? टिळकांनी तिथे चहा-बिस्किटे खाल्ली म्हणजेच धर्म बुडवला, म्हणून त्यांना पर्वतीवर जाऊन प्रायश्चित्त करायला लावणाऱ्यांनाही मग ‘परिवर्तनवादी’ म्हणावेलागेल आणि तसे म्हणायचे नसेल, तर आज प्रणवदांना हटकणाऱ्यांना ‘सनातनीवृत्ती’चा ब्रह्मवृंद ठरवण्याला पर्याय उरत नाही. ही आजच्या पुरोगामी, परिवर्तनवादी मंडळींची सोवळी शोकांतिका आहे. कुठल्याही सनातनी घरात वा कुटुंबात जितके सोवळे आजकाल पाळले जात नसेल, त्यापेक्षा आजचे ‘पुरोगामी’ अधिक सोवळे होऊन गेले आहे. संघवाल्याची सावली अंगावर पडली, तरी त्यांचे ‘पुरोगामित्व’ विटाळत असते आणि संघाच्या वस्तीत जाऊन आला कोणी तर त्याला गंगेऐवजी ‘व्होल्गा’ नदीत स्नान करण्याची सक्ती केली जात असते. कारण त्यांचा आपल्याच विचार वा भूमिकेवर विश्वास उरलेला नाही. खात्री उरलेली नाही. तिची कालबाह्यता त्यांना भेडसावत असते.

 

परिवर्तन संवादातून व संपर्कातून होत असते. जे आपल्या विचारांचे वा भूमिकेचे नाहीत, त्यांना बहिष्कृत करून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणता येत नाही. त्यांच्याशी वाद-संवाद करून आपली भूमिका त्यांना पटवावी लागते. ती पटवायची तर आपलाच त्यावर विश्वास असायला हवा. ज्या विचारधारेलाआज देशाच्या कानाकोपऱ्यांतून अफाट प्रतिसाद मिळत आहे. प्रतिकूल अपप्रचारअखंड करूनही ती भूमिका टिकलेलीच नाही, तर लोकप्रिय होत चालली असेल, तर आपल्यात कुठे त्रुटी राहून गेली त्याचा शोध घेतला पाहिजे. संघाच्या प्रमुखांनी आपल्याच संघटनेचे जुने काही पवित्रे वा विचार कल्पना आजच्या काळात उपयोगी नसल्याचे सांगण्याची हिंमत केली. पण, ती समजून घेण्याचे धाडस कोणी पुरोगामी दाखवू शकलेला नाही. कारण जगात परिवर्तन होऊ शकते, यावरही त्यांचा विश्वास उरलेला नाही. संघातील लोक बदलू शकत नाहीत, यावर इतका ठाम विश्वास आहे की, आपण बदलण्याच्याही पलीकडे गेलेले अंधश्रद्ध कधी होऊन गेली, त्याचे भान उरलेले नाही. राजकीय वैचारिक सांस्कृतिक अस्पृश्यता हा आजच्या ‘सनातनी पुरोगामित्वा’चा निकष झाला आहे. वास्तवाशी अशा लोकांचा संबंध तुटलेला आहे. अगदी नेमके सांगायचे, तर असे लोक अजून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच रमलेले आहेत. जग किंवा संघ एकविसाव्या शतकात आल्याचा त्यांना थांगपत्ता लागलेला नाही. हेडगेवार वा गोळवलकर गुरूजींच्या नंतर आणखी काही सरसंघचालक झाले, याचाही त्यांना थांगपत्ता लागलेला नाही. ज्यांना परिवर्तन म्हणजे काय त्याचाही विसर पडलेला आहे, जे ‘ग्रंथप्रामाण्य हेच विज्ञानवाद’समजू लागले आहेत, त्यांच्याकडून कुठल्या बदलाची कोण अपेक्षा करू शकतो? जे स्वत:च ‘जैसे थे’वादी वा ‘पुराणमतवादी’ होऊन गेलेले आहेत, त्यांच्या कामातून वा बोलण्यातून कुठले परिवर्तन शक्य असेल? ते प्रतिगामी होऊन गेल्याचे सत्य स्वीकारले, तरच असल्या चर्चा थांबवता येऊ शकतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@