निमित्त अनुप जलोटांच्या लग्नाचे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018   
Total Views |


 

जगातले इतर सगळे प्रश्न संपले अन्आता फक्त अनुप जलोटांच्या तिसर्या लग्नाचाच तेवढा मुद्दा संपूर्ण समाजासाठी ऐरणीवर असल्याच्या थाटात वागतो आहोत आपण सारे. सध्या इतके त्याचे चर्वितचर्वण, इतका त्याच्यावरचा विनोद चालला आहे की, बस्स! दुसरा कुठला मुद्दा शिल्लकच राहिला नसल्याच्याचेच चित्र आहे सर्वदूर. बहुधा हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य असावे- वर्तणुकीतील वैचित्र्याचे दर्शन घडविणारे; सोय, काळ अन्व्यक्तिपरत्वे विचारांची दिशा बदलणारे. पाश्चिमात्यांच्या आधुनिक नपेक्षा, मुक्त जीवनशैलीचे, तिथल्या झगमगाटाचे प्रचंड आकर्षणजगण्याची ती निर्बंध तर्हा भावलेल्या आपल्या लोकांना तिथली शिस्त, तिथल्या लोकांची सचोटी, मेहनत या बाबींचे मात्र कमालीचे वावडे! आम्हाला जागोजागी दारूची दुकानंही हवीत अन्समाज निर्व्यसनी राहिला पाहिजे याबाबतचा आमचा दुराग्रहही तितकाच टोकाचा. काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला विनासायास जामीन मिळण्याचेही इथे कुणालाच आश्चर्य वाटत नाही. कारण समाजाच्या लेखी ती आसामीच इतकी मोठी की, तिने फार काळ कारागृहात राहणे, सलमान आणि त्याच्या नातेवाईकांना तर सोडाच, पण दस्तुरखुद्द आम जनतेलाही मान्य नसते! पंडित नेहरू, नेहरूनंतर इंदिरा, इंदिरानंतर राजीव, राजीवनंतर सोनियांनी आणि त्यांना होता नाही आले तरी आता त्यांचेसुपुत्र राहुल यांनी भारताचे पंतप्रधान होणे क्रमप्राप्त असल्याचा, नव्हे, तो गांधी कुटुंबाचा अधिकार असल्याचा गैरसमज करून बसलेला हा समाज, इथले नियम आणि कायदे बड्या धेंडांनी पाळण्याची गरज नसल्याच्या भ्रमातही वावरतो. नव्हे, तसे त्याचे ठाम मत असते. कारण, समानतेच्या कितीही बाता हाणल्या जात असल्या तरी मुळात, श्रेष्ठ आणि कनिष्ठांसाठीचे स्वतंत्र निकष समाजमनात फार पूर्वीपासून घर करून बसले आहेत.
 

स्वत:ला वास्तवात शक्य नसलेल्या सर्वच गोष्टींबाबतची स्वप्नं आणि समाधान हा समाज अलीकडचे चित्रपट, दूरचित्रवाणीवरील मालिकांमधील अत्याधुनिकतेची झालर लेऊन सादर झालेली कथानकं अन्झगमगाटात धुंडाळत राहतो. त्याच वेळी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील आचरणाबाबतच्या संस्कारांशीही त्याचा कडवा संघर्ष चाललेला असतो. चांगल्या-वाईटांच्या संकल्पनांबाबत मनात कुठेच संभ्रम नसला, बहुतांश लोक त्यातील चांगल्याच बाबींची निवड करीत असले, तरी वाईटाची कास धरणार्यांना करावयाच्या शिक्षेबाबत मात्र त्याची भूमिका दुटप्पी होत जाते. गुन्हा करणारी व्यक्ती कोण, यावरून त्या शिक्षेची तीव्रता ठरते. स्वत:चे आकलन, शक्ती, आर्थिक परिस्थिती, व्यक्तिमत्त्व आणि एकूणच परिघाबाहेरच्या ठरलेल्या गोष्टींबाबत सर्वसामान्य माणसांची अवस्था फार बिकट होते. सामाजिक वर्तणुकीबाबत तो बराचसा खबरदारी, जबाबदारीचे भान राखून असतो. त्या परिस्थितीत इतर कुणी विपरीत वागले की मात्र त्याची अस्वस्थता वाढत जाते. पुष्कळदा समाजस्वास्थ्य बिघडण्याची िंचता त्यामागे दडलेली असते, तर कित्येकदा तसल्या वागण्याबाबतच्या कुतूहलाचीही किनार त्याने या संदर्भात स्वीकारलेल्या भूमिकेला लाभलेली असते.

 

वैयक्तिक जीवनातील आचरणाबाबत प्रभू रामचंद्रांचा आदर्श असतो प्रत्येकाच्या ठायी इथे. दिलेला शब्द पाळण्यापासून तर त्यासाठी कराव्या लागणार्या संघर्षापर्यंत आणि त्यागापासून तर एकपत्नित्वाच्या व्रतापर्यंत... बदललेल्या परिस्थितिनुरूप कालबाह्य बाबी बाजूला सारून नव्या संकल्पना अंगीकारण्याचीही त्याची तयारी असते. बालविवाहापासून तर हुंड्याच्या पद्धतीपर्यंत कित्येक गोष्टी केराच्या टोपलीत टाकून हा समाज पुढे जाऊ शकला आहे, तो त्यामुळेच. तरीही विराट कोहली अन्अनुष्का शर्माच्या लग्नाबाबत तो कमालीचा उत्सुक असतो. काही संबंध नसताना सहभागी होतो तो, त्या संदर्भातील चर्चेत. अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांना झालेल्या बाळाचे लाड कसे पुरवले जाताहेत, हे जाणून घेण्यासाठीही तो नको तितका उतावीळ झालेला असतो. अनुप जलोटाने वयाच्या सत्तराव्या दशकात केलेल्या तिसर्या विवाहाची चर्चा केल्याविनाही त्याला राहावत नाही! जलोटांनी बिग बॉस नामक एका तद्दन फालतू कार्यक्रमात चालवलेली थेरं... यामध्येही नाही म्हणायला त्याचा रस असतो तो असतोच. कधीकाळी ज्यांच्या भजनात लोक तल्लीन व्हायचे, ते जलोटा वयाच्या सत्तरीत बिग बॉसमध्ये कुठल्याशा प्रसंगात राण्यांच्या गराड्यातील राजाची भूमिका साकारण्याचे उपद्व्याप करतात. इतक्यातच त्यांचं खरंखुरं नवं लग्नंही झालेलं असते आणि तोच आता लोकांच्याही चघळण्याचा विषय झालेला असतो. अतिशय निम्न दर्जाची फालतुगिरी असूनहीबिग बॉसयशस्वी का ठरतो माहीत आहे? त्याला कारण, पूर्ण कल्पना असतानाही त्या फालतुगिरीला लाभणारे लोकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ हे आहे.

 

दुसरं असं की, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करताना किंवा एरवीही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उदोउदो करताना, एखाद्याच्या खाजगी आयुष्यात नेमके किती खोलवर शिरायचे, त्याची जाहीर रीत्या किती वाच्यता आणि चर्चा करायची, याचे तारतम्य कुणीच बाळगत नाही. त्या चर्चेची उपयोगिता हा तर आणखीच वेगळा मुद्दा आहे. सध्याच्या चर्चेचा अनुप जलोटांवर किती परिणाम झाला, याचे मोजमाप करायला कुठलेही परिमाण उपलब्ध नाही, अन्यथा आपण उगाच तोंडाची वाफ, वेळ किती वाया घालवतो आहोत, याची कल्पना तरी आली असती लोकांना. एरवी वैचारिक प्रगल्भतेच्या गप्पा मारतातच लोक, तर मग त्यांच्या त्यांच्या खाजगी जीवनाचा एक भाग म्हणून सोडून देता येणार नाही हा मुद्दा आपल्याला? बरं, आयुष्यात दोन-तीन लग्नं केलेली माणसं काय कमी आहेत समाजात? एक गायक, या पलीकडे अनुप जलोटांचं स्थान काय आहे तुमच्या-आमच्या जीवनात? गायनाच्या क्षेत्रात त्यांनी भजन हा प्रकार निवडला. उत्तम दर्जाच्या कलेचे सादरीकरण करीत, कितीतरी दिवसपर्यंत लोकांचे मनोरंजन केले. भरपूर पैसा कमावला. पण, शेवटी जलोटा हे केवळ एक गायक आहेत. ते काही साधुसंत नाहीत, हेही समजून घेतले पाहिजे. संतपदाला पोहोचलेल्या व्यक्तींना अवचित स्फुरलेल्या पंक्तीतून वाहणारी भक्तिधारा सुरांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे लोकांपर्यंत पोहोचविल्यानंतरही ईश्वरचरणी लीन होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली नाही म्हणून त्यांना हिणवताना, तसली पात्रता आपण स्वत: कमावली असल्याचा दावा करण्याचे धारिष्ट्य किती लोकांना दाखवता येईल? तसे काही करता येणार नसेल, तर मग जलोटांवर आगपाखड करण्यात, त्यांच्यावर तोंडसुख घेण्यात वेळ किती आणि कशाला दवडायचा समाजाने तरी?

 

निदान भारतीय समाजात तरी, शारीरिक संबंधांच्या पलीकडे लग्नसंस्थेचे महत्त्व आहे. अलीकडच्या विभक्त कुटुंबपद्धतीत ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आधारासाठी म्हणून भासणारी जोडीदाराची गरजही एव्हाना मान्य करताहेत आपल्याकडचे लोक. विचारांचे इतके पुढारलेपण सिद्ध करणार्या भारतीय समूहाने कुणाच्या तरी खाजगी आयुष्यातला लग्नाचा मुद्दा, केवळ तो उतारवयातील असल्याच्या कारणावरून इतका टोकाला जाऊन चर्चेचा ठरवावा आणि त्यासाठी स्वत:चा अमूल्य वेळ खर्ची घालावा, हे काहीसे अनाकलनीय आहे! व्ही. शांतारामपासून तर आय. एस. जोहरपर्यंत आणि कमाल हसनपासून तर कॉंग्रेसच्या शशी थरुरांपर्यंत भली मोठी यादी तयार होईल एकापेक्षा अधिक लग्न करणार्यांची. कुणाकुणाच्या खाजगी आयुष्यात डोकवायचे समाजाने? तेही जलोटा, थरुरांना काडीचा फरक पडत नसताना? यातील कुणीही, भारतीय समाजाचे आदर्श नाहीत. कालही नव्हते, आजही नाही. त्यामुळे त्यांच्या जराशा निराळ्या वागण्याने समाजमन विचलित होण्याची किंवा ते अगदीच रसातळाला जाण्याची शक्यता सुतराम नाही. शिवाय, आज तमाम भारतीयांनी गांभीर्याने लक्ष घालावे असे कित्येक प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत. ज्यावर सखोल चिंतन, मनन, मंथन व्हावे, असेही कितीतरी विषय चर्चेविनाच बाजूला सारले जाताहेत. अशात जलोटांच्या लग्नाचा कवडीमोल विषय, सार्या देशाचे लक्ष जावे इतका फुगवून मोठा अन्महत्त्वाचा केला जाणार असेल, तर मग संपलंच सारं..!

@@AUTHORINFO_V1@@