सद्यस्थितीत गृहकर्ज धारकांनीकाय निर्णय घ्यावा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2018   
Total Views |



या परिस्थितीत गृहकर्जदार दोनपैकी एक निर्णय घेऊ शकतात. यातील पहिला पर्याय म्हणजे गृहकर्जाचा मासिक हप्ता वाढविण्यास परवानगी देणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे कर्जाची मुदत वाढविण्यास परवानगी देणे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतधोरणातील ‘रेपो’ दरात वाढ केल्यामुळे, गृहकर्जांवरील व्याजदर वाढविण्यात येत आहेत. गृहकर्जावर दोन प्रकारे व्याज आकारले जाते, एक ‘फिक्स’ व दुसरे ‘फ्लोटर’. फिक्स व्याजदराने कर्ज घेतलेले असल्यास कर्ज घेताना जो व्याजदर ठरलेला असेल, तो कर्ज फिटेपर्यंत कायम राहतो. मधल्या काळात गृहकर्जावरील व्याजाच्या दरात काहीही बदल झाला तरी, त्याचा परिणाम ’फिक्स’ दराच्या गृहकर्जाचा पर्याय स्वीकारल्यावर होत नाही. पण, जर ‘फ्लोटर’ कर्जदाराचा पर्याय स्वीकारला असेल, तर जेव्हा जेव्हा व्याज दरात बदल होईल, तेव्हा ‘फ्लोटर’ पर्याय स्वीकारलेल्या कर्जदारांच्या कर्जाच्या दरातही बदल होणार.  यापैकी एक निर्णय घेताना कमी खर्चाचे काय? जास्त आयकर कोणत्या निर्णयामुळे वाचू शकेल? याचा विचार करावा.

 

मासिक हप्त्यात वाढ व कालावधीत बदल नाही

गृहकर्ज ही दीर्घ मुदतीची असतात. वैयक्तिक किंवा क्रेडिट कार्ड कर्जासारखी अल्प मुदतीची नसतात. घर खरेदीसाठी महानगरांत ७० लाखांपासून करोडो रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात व इतर भागातही लाखांनी रुपये भरावे लागतात. त्यामुळे साहजिकच गृहकर्जावरील मासिक हप्ता फार मोठ्या रकमेचा असतो. या रकमेमुळे कित्येक कुटुंबांचे मासिक बजेटही डळमळीत होते. त्यामुळे ‘फ्लोटर’ पर्यायाने कर्ज घेणार्‍यांना बाजारी दराने व्याज देताना मासिक हप्त्याची रक्कम बरीच वाढू शकते. तुमचा मासिक हप्ता व कर्जाची मुदत यांची सांगड घातलेली असते. कर्जाची मुदत जितकी जास्त, तितकी व्याजाची रक्कम जास्त असते. उदाहरणच द्यायचे तर, ४० लाख रुपयांच्या गृहकर्जावर साडे आठ टक्के व्याजदराने २४० महिन्यांच्या कालावधीसाठी सुमारे ४३ लाख ३१ हजार व्याज द्यावे लागेल. मासिक हप्ता ३४ हजार ७०८ रुपये असेल. ३६० महिन्यांच्या कालावधीसाठी सुमारे 70 लाख ७२ हजार ३५४ रुपये व्याज द्यावे लागेल व मासिक हप्ता ३० हजार ७५० रुपये असेल.१८० महिन्यांच्या कालावधीसाठी व्याज ३० लाख ९० हजार रुपये द्यावे लागते, तर मासिक हप्ता ३९ हजार ४०० रुपये भरावा लागतो. तुमचे म्हणजे बर्‍याच गृहकर्जदारांचे मासिक उत्पन्न निश्चित असते, अशांना मासिक हप्त्यात वाढ करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गृहकर्जदाराने त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार व भविष्यातील खर्चानुसार मासिक हप्त्याची रक्कम वाढवावी की कर्जाची मुदत वाढवावी, याचा निर्णय घ्यावा. कर्जाची मुदत वाढविल्यास व्याजाची रक्कम जास्त भरावी लागणार. त्यामुळे कर्जाची मुदत कमी ठेवावी. ती कमी ठेवल्यास मासिक हप्त्याची रक्कम जास्त भरावी लागेल. पण, व्याजापोटी कमी रक्कम भरावी लागेल. त्यामुळे कर्जाची मुदत कमी ठेवावी. प्रत्येकाच्या खिशाला जसे परवडेल त्यानुसार योग्य निर्णय घ्यावा.

 

कर्जाची काही रक्कम आगाऊ भरणे

योगायोगाने गृहकर्जाच्या कालावधीत तुमच्या हातात पैसा आला, तर तुम्ही कर्जाची काही रक्कम आगाऊही भरु शकता. समजा, तुम्ही साडे आठ टक्के दराने २० वर्षांसाठी ४० लाख रुपये कर्ज घेतले आहे. यासाठी तुमचा कर्ज भरण्याचा मासिक हप्ता ३४ हजार ७०० रुपये आहे. कर्ज घेऊन एक वर्ष झाल्यानंतर दरवर्षी नियमित मासिक हप्त्यांशिवाय तुम्ही जर कर्ज खात्यात अतिरिक्त ५० हजार रुपये भरलेत, तर तुम्हाला अकरा लाख रुपये व्याज कमी पडेल व कर्जाची मुदत चार वर्षांनी कमी होईल. तुम्ही अतिरिक्त म्हणून तुम्हाला शक्य आहे तेवढी रक्कम जरी भरलीत, तरी तुम्हाला कमी व्याज भरावे लागेल. त्यामुळे बरेच लोक जेवढी शक्य होईल तेवढी अतिरिक्त रक्कम भरत असतात. जर अतिरिक्त रक्कम निश्‍चित ठराविक कालावधीने नियमित भरण्याचे ठरल्यास, कर्ज देणार्‍या यंत्रणेकडून सुधारीत मासिक हप्ता करुन घेता येऊ शकतो किंवा कर्जभरण्याचा कालावधीही कमी करुन घेता येऊ शकतो.

 

आयकरावर परिणाम

आयकर कायद्याच्या २४ बी अन्वये गृहकर्जावरील व्याजाच्या रकमेवर आयकर सवलत मिळते. जर तुमच्या मासिक हप्त्यात व्याजाची रक्कम जास्त असेल, तर तुम्हाला जास्त आयकर सवलत मिळणार मूळ कर्ज रक्कम परतीवरही आयकर सवलत मिळते.कर्ज घेतलेल्या घरात कर्जदार स्वत: राहत असेल, तर दोन लाख रुपयांपर्यंत भरलेल्या गृहकर्जावरील व्याजावर कर सवलत मिळते. जर तुम्ही गृहकर्जावर साडे आठ टक्के दराने व्याज देत आहात आणि तुम्ही जर आयकर आकारणीच्या कमाल मर्यादेत आहात म्हणजे तुम्हाला ३१ .२ टक्के दराने आयकर भरत आहात, तर अशांना गृहकर्जावरील व्याजावर मिळणारी आयकर सवलत ही फार फायदेशीर ठरते.

 

जर तुमची आयकर भरण्याची मर्यादा कमी आहे किंवा तुम्हाला आयकर भरावाच लागत नाही, अशांनी कर्जाच्या मासिक हप्‍तात वाढ केली, तर त्यांना ते फायद्याचे ठरेल. गृहकर्जाच्या मूळ रकमेच्या परताव्यावर आयकर कायद्याच्या ८० -सी कलमान्वये आयकर सवलत मिळते. या कलमाखाली एकूण कर सवलत दीड लाख रूपये मिळू शकते. पण, तुमच्या इतर गुंतवणुकींमुळे जर दीड लाख रूपयांची कर सवलत मिळत असेल, तर ही कर सवलत उपयोगाची नाही. अशांनी मासिक हप्त्यात व्याजाची रक्कम जास्त ठेवावी. मासिक हप्त्यात व्याजाची रक्कम तसेच मूळ रकमेचा परतावा असे दोन्ही घटक असतात. ज्यांना आयकर कायद्याच्या कलम २४ बी अन्वये कर्जाच्या व्याजावर जास्त सवलतही असेल अशांनी मासिक हप्त्यात व्याजाची रक्कम जास्त ठेवण्यासाठी आग्रह धरावा. ज्यांना कलम २४ बी व कलम ८० सी अन्वये या दोन्ही कलमांन्वये फायदे हवे असतील, अशांनी त्याप्रमाणे मासिक हप्त्याची रक्कम समतोल करावी.

@@AUTHORINFO_V1@@